सर्जनशील विचार कसे करावेत हे सुचविणारे आणि तेसुद्धा अत्यंत साध्यासोप्या अन् कोणालाही सहज प्रयत्न करता येतील अशा पद्धतीने मांडणी करणारे लेखक म्हणजे एडवर्ड डी बोनो. मानवी जीवनात मूल्यांना महत्त्वाचे स्थान असते. व्यक्ती असो, संस्था असो किंवा एखादी संघटना.. सर्वाच्याच दृष्टीने मूल्यव्यवस्था महत्त्वाची असते. मात्र कधी कधी उत्तम मूल्ये आयुष्यात जपणारी ‘एंटिटी’ त्या तुलनेत यशस्वी होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून डी बोनो यांनी ‘द सिक्स व्हॅल्यू मेडल्स’ हे पुस्तक लिहिले आहे. आपली मूल्ये कशी वापरावीत आणि हा वापर करीत असतानाच आपली कार्यक्षमता कशी वाढवत न्यावी याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
सुवर्ण पदक, रौप्य पदक, पोलाद पदक, काचेचे पदक, काष्ठ पदक आणि पितळी पदक अशा सहा पदकांच्या प्रतीकात्मक संकल्पना लेखकाने पुस्तकात वर्णिल्या आहेत. ज्याप्रमाणे सर्व पदकांमध्ये सोनं हे श्रेष्ठ मानलं जातं तसंच सर्व मूल्यांमधील श्रेष्ठ मूल्य कोणतं हे पहिलं पदक दर्शवितं. चांदी, किफायतशीरपणा आणि व्यवस्थापन क्षेत्रातील मूल्य यांचा संबंध रौप्य पदक दर्शवितं. काचेचं पदक सर्जनशीलता तर काष्ठ पदक पर्यावरणाशी संबंधित मूल्ये प्रतीकात्मकरीत्या दर्शवितं. लेखकाने अशाच पद्धतीने सर्व पदकांशी मूल्ये जोडली आहेत आणि दैनंदिन जीवनात, व्यवसायात त्यांचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शन केलं आहे.
‘साधी अफूची गोळी घेतली की हजारो कल्पना सुचतात’ हे वाक्य सर्वज्ञात आहेच. पण सुचलेल्या या कल्पनांचं मूल्यमापन कसं करायचं, कुठल्या कल्पनांचा विस्तार करायचा, कुठल्या कल्पनांना पुढील पातळीवर न्यायचं हे सारं ठरविताना आपला गोंधळ उडतोच. हा गोंधळ टाळावा कसा याचा सल्ला डी बोनो आपल्याला देतात. या पुस्तकात एक वेगळी संकल्पना मांडली गेली आहे. ती म्हणजे नकारात्मक मूल्यं. सामान्यपणे मूल्यं ही सकारात्मक संकल्पना आहे. मग ही मूल्यं नकारात्मक कशी असू शकतील, असा सवाल आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. एकाच कृतीचे चांगले अन् वाईट परिणाम होत असतात, असे सांगत डी बोनो आपल्याला परिणामांच्या माध्यमातून ही संकल्पना समजावतात. पोलाद पदके ही संकल्पना मांडताना डी बोनो यांनी ग्राहकांना नजरेसमोर ठेवलं आहे. उत्पादन आणि सेवा यांत ग्राहक नेमकं काय पाहतो या उदाहरणाद्वारे डी बोनो यांनी ही संकल्पना समजावली आहे.
काचेच्या पदकाच्या मूल्याचा संबंध दाखवताना माणसांची अंगभूत क्षमता, गुणवत्ता, वृत्ती आणि नेमकं काय होऊ शकतं याची संभाव्यता यातील नातं मांडलं गेलं आहे. जे मूल्य आपण आयुष्यभर जपतो त्या मूल्याचं उगमस्थान कोणतं याचा आपण विचार करतो का? अनेकदा आपण तो नाही करीत. डी बोनो आपल्या पृथक्करणात या बाबीला फार महत्त्व देतात. एखादी मूल्यव्यवस्था स्वीकारताना त्याची प्रेरणा, सदर मूल्यं आपल्यात रुजवण्यासाठी आपण स्वत:त केलेले बदल, या बदलांनंतर आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागला त्याची तीव्रता व पुढे होत जाणारे फायदे, मूल्यवर्धितता अशा तपशिलाद्वारे डी बोनो यांनी हे पुस्तक रंगविलं आहे. एकूणच उद्योजकतेला चालना देणारं हे पुस्तक असून व्यवसायात, सेवा क्षेत्रात असणाऱ्या तसेच जाऊ पाहणाऱ्यांसाठी हे उपयुक्त आहे.

पुस्तक – द सिक्स व्हॅल्यू मेडल्स
लेखक – एडवर्ड डी बोनो
पृष्ठे – ११६
प्रकाशक – मेहता प्रकाशन
मूल्य – १२०.