नव्या वर्षांच्या आरंभी प्रत्येकाला ‘तो’ एक जाडजूड चेकबुक देत असतो. त्या चेकबुकात ३६५ चेक असतात. प्रत्येक दिवसाचा एक चेक.. अगदी बेअरर चेक.. प्रत्येक चेकवर एक रक्कम टाकलेली असते. २४ तास किंवा १४४० मिनिटे किंवा ८६४०० सेकंद! काही व्यक्तींना त्याचं मोल कळतं, ते हा चेक काळाच्या बँकेत वठवतात आणि त्यावर टाकलेल्या रकमेतला प्रत्येक तास, प्रत्येक मिनिटं, प्रत्येक सेकंद सत्कारणी लावतात. ही रक्कम वापरून ते आयुष्य फुलवतात. सजवतात! ..उरलेले म्हणजे बहुधा आपण.. वेळेचं मोल न जाणणारे किंवा जाणवलं तरी तसं न वागणारे..
पण याची जाणीव याच शब्दांत करून दिली जात असेल तर? खरंच हे वाचून कसं वाटलं? आपल्याजवळ भरपूर आहे, पण कस्तुरीमृग झाला आहे आपला.. असं वाटलं ना! ही जाणीव करून देणं हेच आजच्या पुस्तकाचं खरं यश आहे.
‘सांज गारवा’ या गाजलेल्या अल्बममधील गीतांचे गीतकार, मुक्त स्तंभ लेखक आणि मोटिव्हेटर म्हणून परिचित असणारे प्रसाद कुलकर्णी यांचं ‘प्रासादिक’ हे पुस्तक अत्यंत अप्रतिम आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या ‘लोकप्रभा’ आणि ‘लोकसत्ता’ यांसह अन्य नियतकालिकांमध्ये लिहिलेले काही निवडक लेख वेचून ते त्यांनी संग्रहित केले आहेत. ‘जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सर्वस्वी बदलणारं लेखन’ असंच या पुस्तकाचं वर्णन करावं लागेल.
१४४ पानांमध्ये ऊर्जा ठासून भरली आहे. कोठेही नकारात्मकता आपल्याला स्पर्श करू शकत नाही, हे याचं खरं वैशिष्टय़.
आपल्या शरीरातील ‘व्यवस्थेची’ संगणकाशी तुलना करणारा आणि ‘सिस्टीम’ काम का करीत नाहीये याचं संगणकीय भाषेत विवेचन करणारा ‘खिडक्या उघडा रे’सारखा लेख असो, स्वप्नं पाहण्याचा व्यवसाय करण्यासाठी नेमकं कोणतं भांडवल हवं हे सांगणारा ‘संधी एकदाच येते’ हा लेख, परीक्षांना सामोरे जाताना काय करावं हे सांगणारा ‘बेस्ट ऑफ लक’ हा लेख.. वाचाल तितकं जाणवतं की हे अंतरीचे झरे आपल्याला कसे नाही उमगले? आणि आपलं नसलेलं पण तरीही इतकं आपलं वाटणारं हे लिखाण, हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़.
लौकिकार्थाने हे केवळ व्यक्तिमत्त्व विकासाचं पुस्तक म्हटलं जाईल का मला माहिती नाही, पण या पुस्तकाने आपलं व्यक्तिमत्त्व फुलून आल्याशिवाय राहत नाही, हे मात्र नक्की..
व्यक्तिमत्त्वाचा विकास ही एक सातत्यशील प्रक्रिया आहे. विद्यार्थी म्हणून जगताना, वयात आल्यानंतर, तारुण्यात, नोकरीतील विविध जबाबदाऱ्या पेलताना, संसार करताना अगदी निवृत्त झाल्यावरही आपली ‘फुलण्याची’ प्रक्रिया सुरूच असते. या प्रत्येक आघाडीवर गरज असते ती सकारात्मक दृष्टीने आव्हानाकडे पाहण्याची.. अनेकदा माणसाची दृष्टी इथं अधू होते.. दुर्दैवाने ही दृष्टी बदलण्यासाठी कोणताही वेगळा चष्मा नाही, उलट असलीच तर आपली प्रामाणिक इच्छाशक्ती आणि बदल स्वीकारण्याची वृत्ती एवढाच काय तो आधार.. पण ‘प्रासादिक’ हे पुस्तक तो आधार भक्कम करते.
मनात लपलेला सिद्धिविनायक, संयमाचा लगाम आणि बुद्धीचा आसूड, संसार म्हणजे नक्की काय, मी ईश्वराचा लाडका पुत्र, निवृत्तीचा खरा अर्थ, चिरतरुण वार्धक्याचा मंत्र, आत्म्याची सफाई.. एक नाही अनेक.. असे लेख आपल्याला जीवनाच्या वेगळ्या उंचीवर नेतात.
याहून काही अधिक सांगण्यापेक्षा हे लहानसंच पुस्तक मुळातून जगावं हेच उत्तम!

पुस्तक – प्रासादिक
लेखक – प्रसाद कुलकर्णी
प्रकाशक – राजेंद्र प्रकाशन
मूल्य – १४०/-
पृष्ठे – १४४.