News Flash

आपलं आपलं बुकशेल्फ

आज अशीही मंडळी आहेत ज्यांना स्वत:च्या घरात आपल्याआवडीप्रमाणे पुस्तकांचं दालन उभं करायला आवडतं.

गायत्री हसबनीस

महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात कॉलेजची लायब्ररी प्रत्येक जणांसाठी एक प्रेरणास्थान असते. शाळेत असतानाही अभ्यासाच्या पुस्तकांसह लायब्ररीतील पुस्तकं हमखास आपल्यापैकी अनेकांच्या दप्तरात असायची. महाविद्यालयीन तरुणांपासून नोकरी-व्यवसायात गुंतलेल्या तरुणांपर्यंत सगळे पुस्तकवेड जपून असतात हेही तितकं च खरं आहे. पूर्वी प्रत्येकाच्या घरात बुकशेल्फ, पुस्तकांनी भरलेली कपाटं दिसायची. आता सतत येणाऱ्या नवनव्या माध्यमांमुळे या आपापल्या बुकशेल्फचं स्वरूप कमालीचं बदलत चाललं आहे. ऑनलाइन वा ऑफलाइन! त्यात कॉन्टेन्ट असो वा ऑडिओ.. पुस्तकोंवरचं प्रेम आणि त्यांचा संग्रह करण्याची आवड अजूनही तरुणाईत कायम असल्याचं जाणवतं आहे.  ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्ताने आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेल्या या बुकशेल्फबद्दल तरुणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न.

पुस्तकांचा संग्रह हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. कुठे पुस्तकांचे प्रदर्शन असो, पुस्तकांची दुकानं असो अथवा पुस्तकं ऑनलाइन विकत घेणं असो.. एक पुस्तक वाचून संपलं की दुसरं पुस्तक  हवंच असा हट्ट धरत पुस्तकप्रेमी आपल्या संग्रहात आपल्या आवडीने आणि भाषेच्या प्राधान्याने पुस्तकांची भर घालतच असतात. वयोगट कोणताही असो, प्रत्येकाचं आपापलं असं हक्काचं बुकशेल्फ हे असतंच. आज तरूण पिढीला कु ठे आहे वाचनाची आवड, असा एक समज वाढतो आहे. वाढते ओटीटी प्लॅटफॉम्र्स, किंडल किंवा ऑडिओ बुक्सचा ट्रेण्ड पाहिला की वाचनाचा उत्साह तरुण पिढीत कमीच झाला आहे असं वाटत राहतं. परंतु इतर बरेच ‘इन्फोटेन्मेंट’चे पर्याय उपलब्ध असले तरी तरुण पिढी वाचते हे ठामपणे म्हणता येते. कित्येकांचा स्वत:चा असा हक्काचा पुस्तकांचा संग्रह पाहिल्यावर हे सहज लक्षात येतं. फक्त हा संग्रह कधी शेल्फ किं वा कपाटात ओळीने मांडून ठेवलेल्या छापील पुस्तकांचा असतो, नाहीतर मोबाइलपासून किं डलपर्यंत ई—संग्रहात जमा के लेले पीडीएफ, ई—बुक्स किंवा ऑडिओ बुक्सचा असतो.

बऱ्याच संकेतस्थळांवर ‘माय लायब्ररी’ असा एक वेगळा कोपराही असतो ज्यात आपलं स्वत:चं कलेक्शन आपण ठेवतो अगदी आपल्या कपाटात ठेवलेल्या पुस्तकोंप्रमाणे. पुस्तकांचा संग्रह कोणत्याही स्वरूपातील असला तरी त्यात जपलेल्या पुस्तकांबद्दलचे प्रत्येकाचे अनुभव वेगळे आणि तेवढेच गोड आहेत. ई-संग्रह असलेल्यांना पुस्तकांचे कलेक्शन त्यांच्या अकाउंटवरूनच करणं सहज शक्य होतं. ‘गुडरीडर्स’सारख्या संकेतस्थळावरून नवीन पुस्तक वाचायचे असल्यास ‘वॉन्ट टू रीड’ या नावे नवा संग्रहही तयार करता येतो. बऱ्याच ऑनलाइन संकेतस्थळावर  म्हणजेच ई-बुक स्वरूपात अख्खंच्या अख्खं पीडीएफही डाऊनलोड करता येतं. अर्थात त्यासाठी आपल्याला तिथे आपलं अकाउंट तयार करावं लागतं. काही संकेतस्थळांवर सभासदत्वही घेता येतं तर काही ठिकाणी अमुक एका किमतीसह पुस्तक सबस्क्राइबही करता येतं. बऱ्याच जणांच्या अनुभवातून असं समजलं की तरुणाईचा ओढा हा सध्या  ई-संग्रहाकडे आहे, कारण तो करायला फार सोपा असतो. बरीच अशी अ‍ॅप्स आहेत जिथे लेखकांच्या वर्गवारीनुसार आपल्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांचे कलेक्शन तिथल्या तिथे करता येतं. कधीतरी नवीन पुस्तक ऑनलाइन दिसलं किंवा ते परिचयाचं नसलं तर फ्री पीडीएफ डाऊनलोड करून त्या पद्धतीच्या पुस्तकांचा पुढे शोध घेतला जातो. आणि त्याप्रमाणे पुस्तकांचा संग्रह के ला जातो. ऑनलाइन संग्रह केल्यास पुस्तकांची सीरिज असेल तर त्याप्रमाणेदेखील कलेक्शन करता येतं. वेगवेगळ्या धाटणीच्या पुस्तकांचे संग्रह आपल्या आवडीप्रमाणे करता येतात. पेशाने कॉपीराइटर असणारा हृषिकेश सिंग सांगतो, ‘मी प्रामाणिकपणे सांगतो की फास्ट रीडरसाठी ई-पुस्तकांचा पर्यायअगदी उत्कृष्ट आहे, तिथे आपण आपलं कलेक्शन  ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला नवीन दुसरं पुस्तक वाचायला हवं असेल तर तेही लगेचच घेऊन वाचू शकतो. खरं सांगायचं तर रोजच्या वाचनासाठी ई-संग्रह छान आहे, कारण त्यावर मला प्रचंड वेगवेगळे फीचर्स उपलब्ध असल्याने मला माझं कलेक्शन व्यवस्थित अपडेट करता येतं. जर फँ्रक झप्पा या अमेरिकन गायकाने ई-वाचन करण्याचा प्रयत्न केला असता तर तो निश्चितपणे म्हणाला असता, ‘किती पुस्तकं आणि इतका कमी वेळ’. खरंतर असं म्हणतात की ई-बुकवर आपला आवडता लेखक शोधणं कठीण असतं, पण त्यातही एक वेगळी मज्जा आहे कारण आपला आवडता लेखक शोधता शोधता आपण नवंच कलेक्शन निर्माण करतो आणि हीच ई-संग्रहाची खासियत आहे’.

आज अशीही मंडळी आहेत ज्यांना स्वत:च्या घरात आपल्याआवडीप्रमाणे पुस्तकांचं दालन उभं करायला आवडतं. ‘माझा स्वत:चा असा एक पुस्तकांचा संग्रह आहे जो मी आवर्जून अपडेट करते. लॉकडाऊनच्या आधी लायब्ररीमधून पुस्तकं आणून ती मनाप्रमाणे वाचली जात होती अगदी व्यवस्थितपणे, परंतु आता मात्र लायब्ररी बंद असल्यामुळे पुस्तकं ऑनलाइन पद्धतीने विकत घेऊनच वाचते. त्यामुळे माझ्या बुकशेल्फमध्ये खंड पडला नाही. माझं बुकशेल्फ म्हणजे आधुनिक प्रकारची जी कपाटं असतात तसं अजिबात नाही. अगदी साध्या पद्धतीची घरात भिंतींना जोडलेली कपाटं आहेत. त्या कपाटांमध्ये मी अगदी व्यवस्थित लेखकांच्या प्राधान्यांसह पुस्तकं रचली आहेत’, असा अनुभव कम्युनिकेशन आणि जर्नालिझम या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुंबईच्या श्रुती जोशी हिने सांगितला. माझ्याकडे अनंत सामंत, अरुण साधू, पु.ल. देशपांडे, शिरीष कणेकर, प्रदीप दळवी अशा लेखकांच्या पुस्तकांचा संग्रह आहे. प्रत्येक पुस्तकाला स्वत:चं असं बुकमार्क आहे. मध्यंतरी शैक्षणिक संशोधनाकरिता मी एक सर्वेक्षण केलं होतं. त्या सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की बहुतांश मंडळी पुस्तकं वाचायला छापील पुस्तकांनाच प्राधान्य देतात. काही पुस्तकं स्वत: विकत घेऊन तर काही लायब्ररी किंवा मित्रमंडळ, शेजारी यांच्याकडून मागून घेऊन वाचतात. त्यातून हे अगदी स्पष्ट होतं की पुस्तकांचा संग्रह करण्यात कोणीच मागे नाही. यासोबतच अनेकांचा ई-संग्रहदेखील आहे. आता अनेक संकेतस्थळांवर पुस्तकं मोफत उपलब्ध असल्यामुळे किं वा किंडलसारखं माध्यम नसलं तरी इतर उपकरणांमध्ये ई-पुस्तकं  वाचता येतात आणि त्यांचे कलेक्शनही करता येत असल्याने ई-संग्रहाकडे कल वाढता असल्याचे श्रुती सांगते.

एकूणच तरुण पिढीमध्ये पुस्तक वाचनाची आवड नवीन नाही. कुणाला अमुक एका पद्धतीच्या कथांचे कलेक्शन आवडते किंवा कुणाला एखाद्या लेखकाच्या पुस्तकांचे कलेक्शन आवडते. मुंबईच्या ‘माहीम सार्वजनिक वाचनालया’च्या ग्रंथपाल रुक्मिणी देसाई सांगतात, बऱ्याच जणांना पौराणिक कथांची आवड आहे अगदी ‘मेलूहा’, ‘महाभारत’, ‘कृष्ण’, ‘युगान्त’ अशा पद्धतीच्या पुस्तकांचे संग्रह तरूणांना करायला आवडतात. कथा कादंबऱ्यांपेक्षा चरित्र, इतिहास, राजकारण इत्यादी पुस्तकांची आवड खासकरून तरुण पिढीला आकर्षित करते. अशीही मंडळी आहेत ज्यांना ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह आवडतो किंवा आत्मचरित्र, कादंबरी इत्यादी.. काहींना ठरावीक लेखकांच्याच पुस्तकाचा संग्रह आवडतो कारण त्यांना त्यांची लेखनशैली फार आवडत असते. इतर शैक्षणिक अभ्यास करणारी जी मुलं असतात उदाहरणार्थ आमच्याकडे पीएचडी करणारे विद्यार्थी आहेत ते मात्र त्यांचा अभ्यासाशी निगडित सोडून इतर वाचन अजिबातच करत नाहीत, असाही एक अनुभव त्यांनी सांगितला. लॉकडाऊननंतर  लायब्ररी सुरू झाली हे कळताच नवीन सभासद वाढले, असं त्या सांगतात. प्रत्येकाची लायब्ररी ही ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन. ती जपणं, वाढवणं आणि स्वत:ला विचारांनी समृद्ध करत राहणं तरुणाईला आवडतं आहे ही खूप सुखावणारी गोष्ट आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 1:04 am

Web Title: bookshelf article on the occasion of world book day zws 70
Next Stories
1 नवं दशक नव्या दिशा : शरकाराची कैफियत – २
2 वस्त्रान्वेषी :  धोतराचा इतिहास
3 ‘परीक्षा’ ही जुलमी गडे…
Just Now!
X