24 November 2017

News Flash

बुक शेल्फ : सकारात्मक चिंतनाचे फायदे

‘मी कोणत्याही दौऱ्यावर जात असलो तरीही एक पुस्तक माझ्या बरोबर नेहमी असते आणि ते

स्वरूप पंडित | Updated: March 1, 2013 1:03 AM

‘मी कोणत्याही दौऱ्यावर जात असलो तरीही एक पुस्तक माझ्या बरोबर नेहमी असते आणि ते म्हणजे नॉर्मन व्हिन्सेंट पील लिखित पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग’ – इति भारताची द वॉल म्हणून ओळखला जाणारा फलंदाज राहुल द्रविड. या एकाच वाक्यात या पुस्तकाविषयी खरं तर सर्व काही आले. परिस्थती कितीही प्रतिकूल असो, त्यावर मात करण्याची चिकाटी, अंतकरणात सातत्याने असलेला आशावाद यांचे श्रेय द्रविड या पुस्तकास देत असे आणि पुस्तक वाचल्यानंतर त्यात जराही अतिशयोक्ती नाही हे सत्य आपल्याला उमगते.
रोजच्या जीवनातील आपला एक साधासा अनुभव आहे हा.. साप्ताहिक सुट्टीनंतर कामावर जायचा दिवस येतो. त्या दिवशी सकाळी अंथरुणातून बाहेर येताना आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? कोणत्याही बदलाला सामोरे जाताना आपण कसा प्रतिसाद देतो? नवीन आव्हानांचा सामना आपण उत्साहाने करू शकतो का? काही सन्माननीय अपवादाचे क्षण वगळले तर या प्रश्नांची बहुतेक उत्तरे नकारात्मक असल्याचे आपल्याला जाणवते. नॉर्मन पील यांनी ‘पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग’मध्ये याच मुद्यांचा उहापोह केला आहे. साध्या-साध्या किश्श्यांमधून पील यांनी दैनंदिन जीवनात अखंड ऊर्जेचा झरा कायम कसा राखावा याची सूत्रे सांगितली आहेत. अनेकदा आपल्या अपयशाचे मूळ स्वतच्याच क्षमतांबाबत असलेल्या न्यूनगंडात असते. या न्यूनगंडातून बाहेर पडून आत्मविश्वास वाढविण्याची गरज अधोरेखित करताना नॉर्मन यांनी त्यासाठी अनेक मार्गही दाखविले आहेत.
समस्यांचे मूळ हे आपल्या विचारांमध्ये असते. सदोष किंवा स्वतच्या क्षमतांबद्दल अनावश्यक शंका उपस्थित करण्याची वृत्ती आपल्याला पराभूत मानसिकतेत नेते. त्यामुळे विचारांमध्ये बदल घडवून आणल्यास आपल्या समस्या आपोआप सुटू शकतात, याच मुद्याभोवती पुस्तक फिरत रहाते. पण पील यांनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचा संदर्भ घेत इतक्या रंजक पद्धतीने हे मांडले आहे की पुस्तक वाचल्यानंतर कोणत्याही नकारात्मक अनुभवातही आपण सकारात्मकता शोधू लागतो.
मानवी जीवनातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढते आहे. या स्पर्धात्मकतेचे आपण इतके गुलाम होतो की आपण ‘पर्फेक्शनिस्ट’ होण्याच्या नादात स्वतला चुका करायची परवानगीच आपण देत नाही. आपण आपले स्वत्व आणि प्रतिमा यांच्या द्वंद्वात गुरफटत जातो. आणि स्वत्वाऐवजी प्रतिमेला महत्त्व देतो. हे चित्र बदलता आले तर नकारात्मकतेवर मात करता येणे फारसे कठीण नाही, असे नॉर्मन पील आपल्याला सांगतात.
या पुस्तकाचे आणखी एक प्रभावीपणे जाणवणारे वैशिष्टय़ म्हणजे, सर्व वयोगट – सर्व प्रकारचे व्यावसायिक यांचा उदाहरणांमध्ये करण्यात आलेला समावेश. त्यामुळे हे पुस्तक आपल्याला ‘आपले’च वाटते. पुस्तकातील उदाहरणांमध्ये कोणताही कृत्रिमपणा नाही, कोणताही दिखावूपणा नाही उलट अत्यंत सूक्ष्मपणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव नेमकेपणाने टिपलेला आहे. आणि क्लिष्ट गोष्टी अत्यंत साधेपणाने सोडविण्याचे सोपे मार्ग आपल्याला समजतील अशा भाषेत मांडलेले जाणवतात.
पुस्तक – पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग
लेखक – नॉर्मन व्हिंसेंट पील
पृष्ठसंख्या – १६४
मूल्य – सुमारे २५०

First Published on March 1, 2013 1:03 am

Web Title: bookshelf book review of power of positive thinking by norman vincent peale