भारतीय बाजारपेठ ब्रँड कॉन्शस होण्याअगोदरपासूनच काही मोजक्या गोष्टींचे ब्रँड चर्चेत होते. प्रथमपासूनच ब्रँडेड मार्केट असणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौंदर्यप्रसाधने, अर्थात कॉस्मेटिक्स. भारतीय स्त्रिया सौंदर्योपचारांना सुरुवात करायला लागल्या त्याच मुळी ब्रँडेड कॉस्मेटिक्सच्या साहाय्याने. आजही सगळ्यात जास्त ब्रँडकॉन्शसनेस या सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेत पाहायला मिळतो. भारतीय बाजारपेठेत परदेशातले कॉस्मेटिक्स ब्रँड आले ९०च्या दशकात. पहिली सुरुवात झाली रेव्हलॉनच्या रूपानं. तोवर भारतीय बाजारपेठेवर ‘लॅक्मे’चीच एकाधिकारशाही होती. रेव्हलॉन ही अमेरिकन कॉस्मेटिक्स कंपनी १९९५ ला भारतात आपली प्रॉडक्ट्स घेऊन आली आणि तेव्हापासून या ब्रँडेड कॉस्मेटिक्सची बाजारपेठ खऱ्या अर्थानं रंगली. परदेशी ब्रँडचा भारतातला प्रवास जाणून घेण्यासाठी मोदी रेव्हलॉन प्रायव्हेट लिमिटेडचे साहाय्यक संचालक राजीव कुमार यांच्याशी ‘व्हिवा’नं या संवाद साधला.
भारतात प्रवेश करणारा रेव्हलॉन हा पहिला परदेशी कॉस्मेटिक्स ब्रँड होता. तेव्हापासून अनेक ब्रँड्स आले आणि आता भारतातली कॉस्मेटिक्सची बाजारपेठ फुलली आहे. फक्त कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीच नाही, तर भारतीय समाजाची मानसिकताच या वीस वर्षांत प्रचंड बदलली आहे. आता नटण्या-मुरडण्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जात नाही. स्त्रिया स्वतंत्र झाल्या आहेत. बोल्ड रंग वापरण्यात, प्रसाधनांचा वापर करण्यात आता पूर्वीसारखा पूर्वग्रह मानला जात नाही. स्त्रिया अधिक संवादी झाल्या आहेत. स्वत:ची आवड-निवड त्या स्पष्टपणे सांगतात आणि त्याप्रमाणे वागतात.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्त्रियांची सौंदर्यप्रसाधनांबाबत ठाम मतं होती. त्यांच्या सौंदर्यसाधनेच्या रुटीनमध्ये फक्त केसांना तेल लावणं आणि आठवडय़ातून एकदा केस धुणं एवढंच येत असे. आता मात्र यात आमूलाग्र बदल झालाय. आज स्त्रियांच्या दिमतीला ब्युटीपार्लर्स आली आहेत. तेलाला पर्याय असणारी ब्युटी प्रॉडक्ट आली आहेत. थोडे पैसे खर्च करून पार्लरमध्ये जाऊन रिलॅक्स व्हायला, मेक-अपबरोबर स्किन केअरची प्रॉडक्ट वापरायला आजची स्त्री तयार आहे.
कॉस्मेटिक्स वापरायचं वयदेखील कमी झालंय. आज १५ वर्षांच्या मुलीकडेसुद्धा रेडी मेक-अप किट असते. तिची मोठी बहीण वापरेल तेवढीच प्रॉडक्ट्स तीसुद्धा वापरते. तरुण मुली नवीन ट्रेंड लवकर आत्मसात करतात. म्हणूनच या तरुण बाजारपेठेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आम्हीदेखील स्ट्रीटवेअर नावानं तरुण मुलींसाठी वेगळा ब्रँड सुरू केला आहे. १५ ते २२ वर्षांच्या मुलींसाठी कलरफूल आणि ट्रेंडी शेड यामध्ये मुद्दाम अंतर्भूत केल्या आहेत.
गेल्या दोन दशकांमध्ये भारतीय समाजाची मानसिकता बदलली तरीही एकूण ग्राहकांची मानसिकता अद्याप फारशी बदलली नाही. त्यामुळे आजही भारतीय कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये किंमत हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आजचा ग्राहक खर्च करायला तयार असतो, पण व्हॅल्यू फॉर मनीबाबत तो आग्रही असतो.
भारतीय कॉस्मेटिक्सच्या बाजारपेठेत आज स्पर्धा दिसते. ब्रँड-कॉन्शसनेस या मार्केटमध्ये होताच, आता ग्राहक अधिक चोखंदळ झालाय. त्यामुळे त्याच्यापर्यंत योग्य संदेश घेऊन पोहोचणं महत्त्वाचं आहे. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर करून आम्ही ग्राहकांपर्यंत पोचतो. चॉइसबाय रेव्हलॉन नावाचं सोशल मीडिया कँपेन हा त्याचाच एक भाग आहे. स्त्रियांनी आपले विचार मुक्तपणे मांडण्यासाठी पुढे यावं, रिलेशनशिप, स्वत्त्व, कुटुंब याबाबत आपली मतं मनमोकळेपणानं मांडता यावीत यासाठी आम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.

आद्य देसी ब्रॅण्ड
स्वातंत्र्योत्तर काळात कॉस्मेटिक्सची बाजारपेठ भारतात फारशी नव्हती, कारण त्या काळची स्त्री सौंदर्यप्रसाधनं वापरणारी नव्हती. ज्या काही मोजक्या उच्चभ्रू स्त्रिया कॉस्मेटिक्सचा वापर करायच्या त्या परदेशातून आपल्यासाठी प्रसाधनं मागवायच्या. त्या वेळी कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांना असलेली मागणी लक्षात घेऊन पहिली देशी कंपनी सुरू झाली. लॅक्मे नावानं. आजही भारतीय स्त्रीच्या मनावर आणि कॉस्मेटिक्स मार्केटवर अधिराज्य गाजवणारी लॅक्मे कंपनी मुळात टाटा ऑइल मिल्सनं सुरू केली होती, हे आज कितीतरी लोकांना माहिती नसेल. पन्नासच्या दशकापासून आजपर्यंत लॅक्मेनं भारतीय स्त्रीला ‘सुंदर’ करण्यात मोठा वाटा उचलला आहे. लॅक्मे नावाच्या फ्रेंच ऑपेराच्या नावावरून या प्रसाधनांचं ठेवण्यात आलं. नंतरच्या काळात हिंदुस्तान लिव्हरनं या कंपनीत भागीदारी मिळवली. ९० च्या दशकात टाटा कंपनीची भागीदारी संपुष्टात येऊन लॅक्मे इंडिया ही हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ताब्यात आली. आज लॅक्मेनं सौंदर्यप्रसाधनांबरोबरच सौंदर्योपचारातही जम बसवायची तयारी केली आहे. लॅक्मे सलाँ नावाची त्यांची पार्लर्स देशभर पसरली आहेत आणि वाढत आहेत.