07 August 2020

News Flash

ब्राँडेड सेलेब्रिटी

सध्याचे सिनेस्टार स्वतची ब्रँडेड कलेक्शन्स घेऊन बाजारात उतरत आहेत. दीपिका पदुकोण, मलाइका अरोरा-खान, बिपाशा बसू, हृतिक रोशन, सलमान खान, जॉन अब्राहम असे कितीतरी बॉलीवूडचे तारे

| June 6, 2014 01:31 am

सध्याचे सिनेस्टार स्वतची ब्रँडेड कलेक्शन्स घेऊन बाजारात उतरत आहेत. दीपिका पदुकोण, मलाइका अरोरा-खान, बिपाशा बसू, हृतिक रोशन, सलमान खान, जॉन अब्राहम असे कितीतरी बॉलीवूडचे तारे स्वत: डिझायनर बनले आहेत किंवा त्यांच्या नावाचे ब्रँड बाजारात यायला लागले आहेत. करिना कपूर आणि सोनम कपूरही फॅशन ब्रँड सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या ब्रँडेड सेलेब्रिटीजविषयी..
सेलेब्रिटीज आणि फॅशन यांचा संबंध काही नवीन नाही. आपण एकदा तरी आपल्या लाडक्या सेलेब्रिटीजसारखं दिसावं.. सजावं, असं चाहत्यांना वाटत असतं आणि हे खूळ जगभरात  सापडतं.  फार वर्षांपासून.. कदाचित सेलेब्रिटीज ही संकल्पना सुरू झाली तेव्हापासूनच या वेडानेही जन्म घेतला असावा. सिनेकलाकारांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाइल, अॅक्सेसरीज याबाबत त्यांच्या फॅन्समध्ये असलेल्या वेडाचे कित्येक पुरावे देता येतील. अर्थात काळाप्रमाणे या वेडाचं रूप बदलत गेलं हे नक्की. बॉलीवूडमध्येच पाहायचं झालं तर सुरुवातीच्या काळात स्टार्स त्यांच्या विशिष्ट स्टाइलसाठी ओळखले जायचे. राजेश खन्ना म्हटलं की डोळ्यासमोर सफारी सूट, देव आनंदचा स्कार्फ आणि शर्मिला टागोर म्हटलं की ती वेगळी हेअर स्टाइल आणि कॅटआय लूक डोळ्यासमोर आलाच पाहिजे हे ठरलेलं होतं. पण आता चित्र बदलतंय.
मंदिरा बेदीचं साडय़ांचं कलेक्शन लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर झालं.
आज कलाकार विशिष्ट लूकमध्ये अडकून न राहता वेगवेगळ्या अवतारामध्ये त्यांच्या चाहत्यांसमोर येतात. त्यामुळे या स्टार्सचा विशिष्ट लूक फॉलो करण्याऐवजी त्यांचे डिझायनर कपडे, ब्रँड्स फॉलो करण्यास प्राधान्य मिळू लागलंय.
गेल्या काही वर्षांमध्ये डिझायनर ब्रँड्सबाबत भारतीय समाजाची जागरूकता वाढली आहे आणि त्याचा परिणाम अर्थातच स्टार्सची लाइफ स्टाइल फॉलो करणाऱ्यांवरही झालाय. फॅन्स केवळ स्टार्सनी काय घातलंय याचा विचार करत नाहीत तर ते कोणत्या डिझायनर्सना फॉलो करतात यावरही त्यांचं बारीक लक्ष असतं. यामुळेच मनीष मल्होत्रा, नीता लुला यांसारखे कित्येक फॅशन डिझाइनर्स आज नावारूपाला आले आहेत. आजच्या तरुणीला तिच्या लग्नात फक्त लाल लेहेंगा नको असतो तर ‘जोधा अकबर’ चित्रपटात ऐश्वर्याने घातलेला आणि नीता लुल्लानं डिझाइन केलेला लेहेंगा हवा असतो. त्यामुळे डिझायनर आणि ब्रँड्स यांचे भावही वाढू लागले आहेत. आता यापुढचे पाऊल म्हणजे सध्या स्टार्स स्वतचे ब्रँडेड कलेक्शन घेऊन बाजारात उतरत आहेत. सध्या मलाइका अरोरा खानपासून ते दीपिका पदुकोणपर्यंत कित्येक बॉलिवूड स्टार्सना भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँड्स त्यांच्या कलेक्शन्ससाठी करारबद्ध करत आहेत.
पाश्चात्य देशांमध्ये अशा प्रकारच्या सेलेब्रिटीजनी सुरू केलेल्या ब्रँड्सची संकल्पना काही नवीन नाही. हॉलिवूडचे अनेक आघाडीचे स्टार्स, पॉप स्टार्स या ब्रँड व्ॉगनचा भाग आहेत. व्हिक्टोरिया बेकहॅमपासून ते साराह जेसिका पार्कपर्यंत कित्येक सेलेब्रिटीजच्या नावावर फॅशन ब्रँड्स जमा आहेत. पॉप स्टार मॅडोनानेही तिच्या मुलीसोबत मिळून फॅशन ब्रँड निर्मितीचा घाट घातला होता. आपल्या बॉलिवूडमध्ये याची सुरुवात झाली जॉन अब्राहमपासून. जॉनने २००६ मध्ये ‘रँग्लर’ ब्रँड अंतर्गत डेनिमचं ‘जेए जीन्स’ नावाचं खास कलेक्शन काढलं होतं. जॉनने त्याच्या डिझाइन संकल्पना ब्रँडपुढे मांडल्या होत्या आणि त्या आधारावर हे कलेक्शन तयार करण्यात आले होते. जॉनने त्याच्या नावाच्या मेन्स अॅक्सेसरीज कलेक्शनची घोषणाही केली होती. पण ती अजून प्रत्यक्षात आलेली नाही. यानंतर २०१३ मध्ये ‘छाब्रा ५५५’ या ब्रँडने लारा दत्ताच्या नावाने खास साडय़ांचं कलेक्शन बाजारात आणलं होतं. नेट साडय़ांच्या या कलेक्शनची किंमत १५,००० ते ६०,००० रुपयांच्या दरम्यान होती.
यादरम्यान लिसा रे या अभिनेत्रीनंही डिझायनर सत्या पॉलच्या ब्रँडअंतर्गत साडय़ांचं खास कलेक्शन काढलं होतं. तिने कॅन्सरविरोधात दिलेल्या लढय़ाला नजरेसमोर ठेवून हे कलेक्शन तयार करण्यात आलं होतं.
  अर्थात सुरुवातीच्या काळात या स्टार्सच्या कलेक्शन्सची मोठय़ा प्रमाणावर दखल घेण्यात आली नव्हती. त्यातली काही कलेक्शन्स तर सपशेल आपटलीही होती. पण त्यानंतर मात्र स्टार्सना हाताशी घेऊन कलेक्शन्स तयार करण्याचं काम नव्या जोमानं सुरू झालं. गेल्या दोन वर्षांमध्ये दीपिका पदुकोण, हृतिक रोशन, सलमान खान, मलाइका अरोरा-खान, बिपाशा बासू, सुझ्ॉन रोशन, मंदिरा बेदी हे सेलेब्रिटीज या ब्रँडच्या शर्यतीत उतरले आहेत आणि करिना कपूर, सोनम कपूर यांसारखे काही सेलेब्रिटीज स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. या दोघींची कलेक्शन लवकरच बाजारात येतील, असं बोललं जातंय. टीव्हीचा छोटा पडदा गाजवणाऱ्या मंदिरा बेदीने तिचं साडय़ांचं कलेक्शन गेल्या वेळच्या लॅक्मे फॅशन वीकच्या निमित्ताने सर्वासमोर आणलं होतं. सॅटिन आणि जॉर्जेटच्या साडय़ा आणि फ्रेश कलर्स तिच्या कलेक्शनचं वैशिष्टय़ आहे.
आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘व्हॅन हुसेन’ने यंदा दीपिका पदुकोणला हाताशी घेऊन खास कलेक्शन बाजारात आणलं. त्या कलेक्शनसाठी संकल्पनेपासून प्रत्यक्ष डिझाइन बनवण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर दीपिकाने हातभार लावला होता म्हणे. ‘मला स्वतला डिझाइन्स करता येत नसलं तरी माझ्याकडे खूप संकल्पना आहेत. आणि त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मला इतरांची गरज लागते. हे कलेक्शन म्हणजे आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासाचा, माझ्या व्यक्त्तिमत्त्वाचा आरसा आहे’, असं या कलेक्शनबाबत बोलताना दीपिका म्हणते.  ‘ओल्ड हॉलीवूड चार्म’ हे दीपिकाच्या कलेक्शनचं मुख्य वैशिष्टय़ आहे. युरोपीयन आर्किटेक्चरचा प्रभाव या कलेक्शनमध्ये पहायला मिळतो.
ऑनलाइन ब्रँडिंगमध्येही बॉलीवूड सेलेब्रिटीज मागे नाहीत. मलाइका अरोरा-खान आणि बिपाशा बासू यांनी ‘द लेबल कॉर्प’ या ब्रँडअंतर्गत ‘द कॉर्सेट लेबल’ आणि ‘द ट्रंक लेबल’ या दोन ब्रँड्ससाठी डिझाइन करत आहेत. त्या ब्रँडच्या त्याच सेलेब्रिटी फेस आहेत. याच ब्रँडच्या नावाखाली ‘द होम लेबल’या नावाखाली सुझ्ॉन रोशननेही इंटीरिअरची जबाबदारी स्वीकारली असून त्यासाठी ती खास होम डेकॉरच्या टिप्सही देते. शाहरुखची पत्नी गौरी खाननंही नुकतंच दुबईच्या ‘द फिश फेरी’ या ब्रँडसोबत इंटीरिअर डेकोरेशनचं कलेक्शन काढलं असून पुढील वर्षांपर्यंत याच ब्रँडखाली शूज आणि बॅग्सचं कलेक्शन काढण्याचा तिचा मानस आहे.
नेहा धुपिया हिने नुकतीच ‘लाइमरोड डाट कॉम’ साठी स्टाइलिस्टची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑनलाइन शॉपिंगमधला प्रसिद्ध ब्रँड ‘मिन्त्रा डॉट कॉम’नं हृतिक रोशनला हाताशी घेऊन ‘एचआरएक्स’ या नावानं मेन्सवेअरचं नवीन कलेक्शन आणलं आहे. यासाठी खास फोटोसेशनही करून घेतलं आहे. ‘बीइंग ह्य़ुमन’ या ब्रँडच्या माध्यमातून सलमान खानने फॅशन जगतात घेतलेली उडीही आपल्याला आठवत असेल. अर्थात त्याच्या ‘दबंग’ इमेजला साजेल अशा प्रकारे या ब्रँडने अगदी अल्पावधीत लोकांच्या मनाची पकड घेतली.
 येत्या काळात करिना कपूरचं कलेक्शनही बाजारात येण्याच्या मार्गावर आहे. ‘बेबो’ या नावानं फॅशन ब्रँड काढण्याचा मानस तिनं बोलून दाखवला आहे. तर सोनम कपूरनेही तिच्या बहिणीसोबत मिळून फॅशन ब्रँड काढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही काळात सेलेब्रिटीजच्या नावाच्या फॅशन ब्रँड्सचा सुळसुळाट भारतातही होईल अशी चिन्हे आहेत.

मलाईका अरोरा खानने तिच्या स्टाईलमधला फ्री, कॅज्युअल लूक तिच्या कलेक्शमध्ये पण कायम ठेवला आहे. आजच्या तरुणीला वेगवेगळ्या ऑकेजन्ससाठी कपडय़ांचे ऑप्शन्स या कलेक्शनमधून नक्कीच मिळतील.

बिपाशा बासूच्या ‘द ट्रंक लेबल’ या अ‍ॅक्सेसरीज कलेक्शनला तिचा पर्सनल टच दिला आहे. स्टेटमेंट ज्वेलरी हे त्याचं वैशिष्टय़.

सुझॅन रोशनचं इंटिरिअर डेकोरेशनमधील कौशल्य तिच्या या ‘द होम लेबल’ या कलेक्शनमधून पहायला मिळतं.‘द लेबल कॉर्प’ या ब्रँडअंतर्गत ही तीनही लेबल्स बाजारात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2014 1:31 am

Web Title: branded celebrity
Next Stories
1 व्हिवा वॉल : हिरवाईचे दूत
2 फॅशन पॅशन : सुयोग्य कपडे – टापटीप राहणी
3 न्यूड मेकअप!
Just Now!
X