शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. सध्या आपण ब्राझील मुक्कामी आहोत. मुबलक प्रमाणात फळ-फळावळ आणि जेवणात जास्तीत जास्त स्थानिक नैसर्गिक पदार्थाचा वापर यासाठी ब्राझील प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज आणि आफ्रिकन संस्कृतीच्या मीलनातून झालेल्या ब्राझीलियन खाद्यसंस्कृतीविषयी..

जगामध्ये फाइन डायनिंग, एक्झिक्युटिव्ह क्यूझाइन, बुटिक रेस्तराँ कित्येक येतील आणि जातील. पण स्ट्रीट फूड किंवा रस्त्याच्या कडेला मिळणारं, ठेल्यावरचं खाणं हे लोकप्रिय होतं, लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय राहील. ब्राझीलियन्सचं पण याविषयी दुमत नाही बरं का !
जसं प्रत्येक देशातील काही स्ट्रीट फूड फेमस असतात, तसं ब्राझीलमधलं फेमस स्ट्रीट फूड म्हणजे च्युरोज (ब्राझीलियन डोनट) हा गोड पदार्थ. जसं आपण चकल्यांना आकार देतो, तसा गोल आकार या च्युरोजला देतात. च्युरोज खरपूस तळून वरून मस्त चॉकलेट सॉस (भरपूर. यात हात आखडता घेत नाहीत) घालतात. तिथल्या लहान मुलांचा तर हा आवडता पदार्थ आहे.
आजच्या ब्राझीलची खाद्यसंस्कृती बघितली तर त्यात इतर देशांच्या खाद्यसंस्कृतीचाही हातभार लागला आहे. ब्राझीलवर ज्यांची सत्ता होती, त्या पोर्तुगीज खाद्यसंस्कृतीचा या देशावर प्रभाव तर आहेच. शिवाय पोर्तुगीजांनी त्यांच्या वसाहतीमध्ये कामाला आफ्रिकेतून मजूर आणले होते. त्यामुळे आफ्रिकन खाद्यसंस्कृतीचाही प्रभाव आजच्या ब्राझीलियन संस्कृतीत दिसतो.
शिवाय देशोदेशीचे पर्यटक ब्राझीलला भेट देत असतात. कळत-नकळतपणे त्यांच्या फूड कल्चरचा प्रभावही दिसतो आणि अशी मिश्र खाद्यसंस्कृती या देशात दिसते. त्यामुळे स्थानिक ब्राझीलियन फूड चॉइस हा बहुरंगी आणि विस्तारलेला आहे.
पोर्तुगालमध्ये मिळणारं पोटॅटो अॅण्ड लीक सूप (फजोंदा) ब्राझीलमध्ये लोकप्रिय आहेच पण त्याबरोबर अगदी इथलं ओरिजिनल कॅपरिहा ड्रिंकसुद्धा (कॉकटेल ड्रिंक) इथे मोठय़ा प्रमाणात घेतलं जातं.
श्रिम्प आणि चवळीचं भजं म्हणता येईल अशी एक आफ्रिकन डिश इथे खूप खाल्ली जाते. परकीय संस्कृतीचा प्रभाव म्हणाल तर तिथे आपल्या इंडियन क्युझाइनला चांगली दाद मिळू लागली आहे. वेगवेगळी मस्त मस्त इंडियन रेस्टॉरंट्स इथे सुरू झाली आहेत.
इथलं सगळ्यांना आवडणारं पेय म्हणजे कॉफी. इथली कॉफी भारतीय चवीपेक्षा खूप स्ट्राँग असते. म्हणूनच ब्राझीलचे लोक कॉफी पितात ते कप अगदी छोटे छोटे असतात. कुणी तुम्हाला कॉफी ऑफर केली तर त्याला नाही म्हणू नये, असं ब्राझीलमध्ये मानलं जातं. ही प्रथा नक्की लक्षात ठेवा आणि झक्कास ब्राझीलियन कॉफीचा मस्त झुरका मारा!

ब्राझिलियन ब्लॅक बीन स्टय़ू विथ स्वीट पोटॅटो
साहित्य : बारीक चिरलेला कांदा : ३ कप, काळी चवळी उकडून घेतलेली – ३ कप, पाणी – ६ कप, मीठ – चवीनुसार, ऑलिव्ह ऑईल – २ टेबल स्पून, रताळे (सोलून आणि कापून घेतलेले) – १ मोठे, काळी मिरीपूड – चवीनुसार, ठेचलेल्या लसूण पाकळय़ा – २-३, जिरे – २ टी स्पून, लाल तिखट – दीड टीस्पून, बारीक चिरलेला गाजर – १ मीडियम, सिमला मिरची उकडून घेतलेली – १, संत्र्याचा रस – दीड कप, टोमॅटो – २ नग, संत्र्याची किसलेली साल – १ टिस्पून, क्रिम – २ टिस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टीस्पून

कृती : एका बाऊलमध्ये रताळय़ाचे कापलेले तुकडे, त्यात ऑलिव्ह ऑईल, मीठ, काळीमिरी पूड टाकून ओवनमध्ये २० मिनिटे बेक करा. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, गाजर, जिरे, लाल तिखट आणि मीठ टाकून शिजवून घ्या. नंतर त्यात सिमला मिरचीचे कापलेले लहान तुकडे टाका. मग त्यात टोमॅटोचे तुकडे टाकून शिजवून घ्या. नंतर उकडून घेतलेली चवळी त्यात टाका. आणि एकजीव करा. एक कप चवळीचे मिश्रण मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या आणि ते उरलेल्या मिश्रणात टाकून शिजवून घ्या. नंतर त्यात बेक केलेले रताळय़ाचे तुकडे घालून शिजवा. मग त्यात संत्र्याचा रस आणि संत्र्याची किसलेली साल टाका आणि तयार झालेलं ब्राझीलियन ब्लॅक बीन स्टय़ू विथ स्वीट पोटॅटो बाऊलमध्ये काढून क्रीम आणि कोथिंबिरीने गाíनश करून सर्व्ह करा.

चॉकलेट पिझ्झा ब्राझीलियन स्टाइल
साहित्य : पिझा डोव (पीठ)साठी, ड्राय यिस्ट – अर्धा टी स्पून, गरम पाणी -१ कप, ऑलिव्ह ऑईल – २ टी स्पून, मदा – २५० ग्रॅम, मीठ – १ टीस्पून, साखर – १ टीस्पून
साहित्य : टॉिपगसाठी कन्डेन्स्ड मिल्क – २०० मिली., कोको पावडर -दीड टी स्पून, बटर – १ टेबलस्पून, स्ट्रॉबेरी -५-६, क्रीम -३ टेबलस्पून, किसलेलं चॉकलेट – आवश्यकतेनुसार
कृती : परातीत मैदा घेऊन त्यात खड्डा करून त्यात डोवसाठीचं साहित्य टाका आणि दहा मिनिटं कणकेचा गोळा मुरत ठेवा. मग कणीक एकजीव करून पिझा डोव करून घ्या आणि दोन तास गरम जागेत ठेवा. ओवन १८० अंशावर गरम करून घ्या. पिझ्झा डोव परत मळून घ्या आणि त्याचे लहान गोळे करून त्यांना लाटून घ्या आणि ओवनमध्ये बेक करा. पिझ्झा बेस रेडी आहे.
एका पॅनमध्ये टॉपिंगसाठी लागणारे साहित्य टाकून १०-१५ मिनिटं गरम करून घ्या. गरम टॉिपगचे मिश्रण पिझा बेसवर चमच्याने लावून घ्या आणि क्रीम, चॉकलेटनं आणि स्ट्रॉबेरीने सजवून पिझ्झा सव्र्ह करा.

आजची सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..

चॉकलेट कर्ल्स

साहित्य : चॉकलेट ब्लॉक किंवा चिप्स् आणि बटर

१. डबल बॉयलरमध्ये चॉकलेट आणि बटर वितळून घ्या.
२. वितळून घेतलेले चॉकलेट ट्रेमध्ये एकसमान थापून घ्या. पातळ थर झाला पाहिजे.
३. फ्रीजमध्ये ठेवून सेट करा. मग फ्रिजमधून काढून स्क्रेपरने चित्रात दाखवल्याप्रमाणे स्क्रेप करा.
४. तयार आहे चॉकलेटचे कर्ल्स.