05 July 2020

News Flash

ब्रेक के बाद

आजच्या तरुणांना व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

दिवसागणिक वेगवेगळ्या ट्रेण्ड फॉलो करणाऱ्या या तरुणाईचा सध्याचा ट्रेण्ड आहे, ‘गॅप इयर किंवा ब्रेक इयर’.

वैष्णवी वैद्य – viva@expressindia.com

आजच्या तरुणांना व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. डिजिटल मीडिया, सोशल मीडिया या आधुनिक अभिव्यक्ती माध्यमांमुळे तरुण मुलं विविध विषयांचा अभ्यास स्वत: च करायला लागली आहेत. ही माध्यमे आधी नव्हती म्हणून आधीची पिढी आधुनिक नाही असंही नाही पण आजच्या पिढीला साचेबद्ध न राहता जगाच्या पाठीवर जे जे नवीन आहे ते शोधण्याची, आत्मसात करण्याची गरज जास्त वाटते. दिवसागणिक वेगवेगळ्या ट्रेण्ड फॉलो करणाऱ्या या तरुणाईचा सध्याचा ट्रेण्ड आहे, ‘गॅप इयर किंवा ब्रेक इयर’.

मध्यमवर्गीय घरातल्या मुलांना प्रवाहासोबत जायला पाहिजे हेच शिकवलं जातं. म्हणजेच काय की उर्वरित जग ज्या वाटेने जातेय तीच वाट आपल्या फायद्याची आहे किंवा त्याच वाटेने जाणे योग्य आहे ही भावना असणं! इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करावं असं कोणाला वाटलं तरी आपण बरोबर करतोय की नाही अशी धास्ती वाटू शकते. या सगळ्या गोष्टी अर्थातच करिअर निवडीमध्ये जास्त होताना दिसतात. अमूक एका गोष्टीत गेलास तरच स्कोप आहे, हे तर ब्रीदवाक्यच असतं. तसं म्हटलं तर दहावी नंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात होते असंही आपल्याला शिकवलं गेलं आहे. जे काही प्रमाणात खरंसुद्धा आहे. आपल्याला नक्की काय करायचं आहे, कुठल्या क्षेत्राकडे जायचं आहे हे ठरवावं लागतं आणि त्यासाठी पुरेसा वेळही असतो. पण अवघ्या सोळाव्या वर्षी त्या मुलाला किंवा मुलीला आपल्या करिअरची एकमेव वाट निवडणं आणि त्याच वाटेने शेवटपर्यंत जाणं ही अपेक्षा जरा तणाव वाढवणारी असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे दहावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान आणि फारतर डिप्लोमा ही काही मोजकीच दालने मुलांना माहिती असतात.

आजच्या तरुणांना व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. डिजिटल मीडिया, सोशल मीडिया या आधुनिक अभिव्यक्ती माध्यामांमुळे तरुण मुलं विविध विषयांचा अभ्यास स्वत:च करायला लागली आहेत. ही माध्यमे आधी नव्हती म्हणून आधीची पिढी आधुनिक नाही असंही नाही, पण आजच्या पिढीला साचेबद्ध न राहता जगाच्या पाठीवर जे जे नवीन आहे ते शोधण्याची, आत्मसात करण्याची गरज जास्त वाटते. दिवसागणिक वेगवेगळ्या ट्रेण्ड फॉलो करणाऱ्या या तरुणाईचा  सध्याचा ट्रेण्ड आहे, ‘गॅप इयर किंवा ब्रेक इयर’. पूर्वी करिअरचे नवनवीन पर्याय अगदीच नव्हते असं नाही पण त्यातून आपण पुढे काही करू शकतो का? ते योग्य पर्याय आहेत का? त्याचे समाजात महत्त्व आहे का? त्याने संसार चालेल का? अशा एक ना अनेक शंका लोकांच्या मनात असायच्या आणि मुळात लोकांची तेवढी आधुनिक मानसिकता नव्हती. गावात शिकलेली मुलं पुढील शिक्षणासाठी शहरात येऊन डॉक्टर, इंजिनीअर, सी.ए. अशा साचेबद्ध आणि त्यांच्या मते ‘सेक्युअर्ड’ क्षेत्र निवडायची. पण आपल्याला माहितीच आहे की, काळ बदलतो, वेळ बदलते तसेच नव्या पिढीचे आचार विचारसुद्धा बदलतात.

आधी म्हटलं तसं अगदीच लहान वयात या मुलांना करिअरची स्पष्टता असणं नेहमी शक्य नाही. काही वेळा लहान वय, विचारांचा कल्लोळ, विषयांची माहिती नसणं अशा अनेक अडथळ्यांना मुलं सामोरी जात असतात. अशा वेळी स्वत:साठी पुरेसा वेळ काढून जर त्यांना एखादं वर्ष अभ्यास करायचा असेल तर तो करिअरमधला ब्रेक घेणं यात काहीच वावगं नाही. आजच्या काळात बऱ्याच प्रमाणात मुलं ब्रेक घेताना दिसतात. पण आपण पडलो मध्यमवर्गीय! आपल्या घरात किंबहुना भारतातच या सो कॉल्ड ब्रेकला सिनेमाचं फॅड असा शेरा मारून आपण सर्रास मोकळे होतो. परदेशात गेलो तर हा ब्रेक तिथल्या मुलांचा हक्काचा वेळ असतो आणि ही पद्धत त्यांच्यासाठी अगदी सामान्य आहे. पण ती इथेसुद्धा तेवढीच आपलेपणाने स्वीकारली गेली पाहिजे असा तरुणाईचा आग्रह आहे. खरंच काही मुलांना अगदी पदवी मिळेपर्यंतही विचारांची स्पष्टता नसू शकते. आपण जे करतोय किंवा करणार आहोत ते नक्की बरोबर आहे हा आत्मविश्वाससुद्धा नसतो. मग उगाच डोळ्याला झापडं लावलेल्या घोडय़ासारखं काहीतरी करायचं आणि मग नंतर पश्चात्ताप करायचा यापेक्षा हा ब्रेक घ्यायला काय हरकत आहे? पैसे कमवणं कधी कोणाला चुकत नसतं ते आपण जगण्यासाठी का असेना पण कमवतोच पण आज या तरुण पिढीला त्या पैशासोबतच आनंद आणि समाधानसुद्धा तेवढेच महत्त्वाचे वाटते. तोच आपला आनंद नक्की कशात आहे हे नेमकं जाणून घेणं पण त्यांना महत्त्वाचं वाटतं. ‘टूर्स अ‍ॅण्ड टुरिझम’चे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सांगते, ‘‘मी आता तिसऱ्या आणि शेवटच्या वर्षांला आहे. त्यानंतर मी नक्कीच ब्रेक घेणार आहे आणि विविध ट्रेक्स, टूर्स करणार आहे तसेच पुढे माझ्या क्षेत्रात नक्की कुठल्या दिशेने जायचे याची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून, पुस्तकांमधून मिळवणार आहे. टुरिझम क्षेत्रात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुमचे स्वत:चे कॉन्टॅक्स खूप महत्त्वाचे असतात जे फक्त शिक्षणातून आणि इंटर्नशिप्स करून मिळत नाहीत, त्यासाठी तुम्हाला फिरावं लागतं, स्वत: काही कष्ट घ्यावे लागतात.’

मानसशास्त्रात बी. ए. पदवी घेतलेली विद्यार्थिनी सांगते, ‘‘मी पदवीनंतर ब्रेकवर होते कारण मला माहीत नव्हतं, नक्की काय करायचं आहे. आता मी योगविद्येत पदव्युत्तर शिक्षण घेते आहे. मी ब्रेकदरम्यान खूप फिरले, ट्रेक्स केले, वेगवेगळ्या लोकांना भेटले. मला पैसे कमवण्यापेक्षा ज्या गोष्टीत आनंद मिळेल ती गोष्ट करायला आवडेल. फिरत असताना आपण आपल्यासारख्या विचारसरणीच्या लोकांच्या सहवासात आपोआपच येतो. हा अनुभव आपल्याला निश्चितच उपयोगी ठरतो. हे भारतातल्या पालकांनी समजून घेणे आणि स्वीकारणे गरजेचे आहे.’’

तसेच आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परदेशात आणि भारतातील विविध राज्यांत जातात त्यासाठी स्पर्धा परीक्षांची गरज असते. त्याची तयारी करण्यासाठीसुद्धा ब्रेकची गरज असते. या तयारीसाठी ब्रेक घेणारा विद्यार्थी सांगतो, ‘‘मी बी. ए.  मानसशास्त्रामध्ये पदवी शिक्षण घेतो आहे पण संगीत ही माझी आवड आहे. त्याचं शिक्षण कुठे मिळेल याच्या शोधात मी आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या परीक्षांची तयारी मी ब्रेक दरम्यान करणार आहे. अभ्यासासोबत हे केलं तर त्याचा अभ्यासावरही परिणाम होऊ  शकतो’’.

गॅप घेणं म्हणजे सर्व काही सोडून घरी बसणं नव्हे तर आपल्या भविष्यासाठीचा भक्कम असा पाया तयार करणं आहे असं तरुणाईला वाटतं. भारतातल्या मध्यमवर्गीय घरात हे कित्येक जणांना मान्य नसतं, कारण आपण हे ठरवलं आहे की योग्य वयात योग्य गोष्टी व्हाव्यात. २१व्या वर्षांपर्यंत पदवी शिक्षण, २५ पर्यंत नोकरी मग लग्न असं सगळंच आपण वेळेत बांधून ठेवलं आहे. पण ती वेळ थोडी पुढे मागे केली तरी काही बिघडत नाही हे पालकांनी समजून घ्यायला हवं, असा आजच्या पिढीचा आग्रह आहे. ही संकल्पना समजून घेताना कदाचित ‘ये जवानी है दिवानी’मधल्या रणबीर कपूरचं पात्र ‘बनी’ आठवेल किंवा ‘थ्री इडियट्स’मधला आर. माधवन् म्हणजेच ‘फरहान’ आठवेल ज्यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन स्वत:चा विचार करायचा ठरवलं. त्यासाठी जे लागेल ते करण्याची त्यांची तयारी होती.

सामान्य पालक म्हणतात तसं असेलही हे सिनेमाचं फॅड, पण बनी आणि फरहानला जसा गोष्टी मिळवायचा अट्टहास होता तसा काही गोष्टींचा त्याग करायचीसुद्धा तयारी होती, काय गरजेचं आहे हे माहिती होतं, तसं काय घातक आहे हेसुद्धा माहिती होतं.

आजची पिढी फास्ट आहे पण उथळ नाही. पालकांनी आज मुलांना चुका करण्यापासून कधीकधी नाही थांबवलं तरी चालेल पण चुका केल्यावर त्याची जबाबदारी घ्यायला जरूर शिकवावं. कुठलीही नवीन गोष्ट आधी ‘कल्चरल शॉकच’ असते, हळूहळू ती सर्वश्रुत होत जाते, आत्मसात होते, गॅपची संकल्पना त्याला अपवाद नाही. फक्त त्याचं भांडवल नक्कीच नसावं, कारण हे स्वीकारणं हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा भाग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:09 am

Web Title: break year or gap year increasing trend in todays youth dd70
Next Stories
1 एक सलाम कृतज्ञतेचा!
2 सदा सर्वदा स्टार्टअप – आपत्तीतून संपत्ती
3 संशोधनमात्रे : पर्यावरणस्नेही शोधांच्या वर्तुळांचा प्रवास
Just Now!
X