|| वेदवती चिपळूणकर

रूढ वाटेवरून जायचं नाही हे एकदा मनात निश्चित असलं की मग कुठल्याही शाखेतील शिक्षण घेण्याचा निर्णय असो किंवा करिअरचा निर्णय असो. प्रत्येकात वेगळेपण जपण्याचा आपला मार्ग आपल्याला शोधून काढता येतोच. पुण्याच्या मानसीने तो शोधून काढला. कला शाखेतच शिक्षण घ्यायचं मात्र तिथेही स्पेशलायझेशन वेगळ्या विषयात करायचं, असा आग्रह धरणाऱ्या मानसीने करिअर करण्यासाठीही आपली आवड काय त्याला प्राधान्य देत केक बेकिंगच्या क्षेत्रातही कलाकार म्हणूनच आपला ठसा उमटवला आहे.

आर्टिस्ट म्हटलं की सामान्यत: चित्रकारी, रेखाटन, रांगोळी अशा किंवा नृत्य, गायन, अभिनय अशा कला डोळ्यासमोर येतात. बाकी कोणत्या कलांना ‘कला’ म्हणून विशेषत्वाने स्वीकारलं जातंच असं नाही. पुण्यात राहणारी मानसी देशपांडे मात्र बेकिंग आणि केक डेकोरेटिंगला अगदी मनापासून कलेचा दर्जा देते. मानसशास्त्रात पदवी घेतलेल्या मानसीने त्यातच मास्टर्स करण्याऐवजी केक बेकिंगच्या आवडीला प्राधान्य दिलं. स्वत:चा व्यवसाय तिने सुरू केला आणि गेली सहा र्वष हळूहळू तिच्या या कलेत तिने व्यवस्थित जम बसवला.

शाळेतून कॉलेजमध्ये जाताना सायन्स किंवा कॉमर्स घ्यायचं नाही आणि आर्ट्सलाच जायचं यावर मानसी ठाम होती. आर्ट्समध्येही गणित किंवा स्टॅटिस्टिक्स घ्यायचं नाही हेही तिचं ठरलेलं होतं. ज्या विषयांना शाळेत विशेष महत्त्व दिलं जात नाही तेच विषय शिकायचे म्हणून तिने आर्ट्स घेतलं. बेकिंगच्या तिच्या सुरुवातीच्या आवडीबद्दल मानसी म्हणते, ‘मी काही अगदी लहानपणापासून फार कोणत्या कलेत गुंतलेली असायचे वगैरे असं काही नाही. कॉलेजमध्ये सहज म्हणून यूटय़ूबवर व्हिडीओ बघता बघता मी बेकिंग रेसिपी करून बघायला सुरुवात केली. सुरुवातीला हौस म्हणून मी कपकेक्स, ब्राउनीज, साधे साधे के क्स असं अधूनमधून करत असायचे. कधीतरी कोणी त्यांना हवाय म्हणून सांगितलं तर त्यांनाही करून द्यायचे. पण या सगळ्यात कॉलेज आणि अभ्यास या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठिकाणी होत्या. त्यामुळे छंद म्हणूनच या केक्सकडे मी बघितलं होतं’. हा छंद करिअपर्यंत नेण्याचा विचार कसा दृढ झाला याबद्दल सांगताना ती म्हणते, नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना हवाय म्हणून केक करून देणं इथपर्यंतच या छंदाला मी मर्यादित ठेवलं होतं. डिग्री झाली की मास्टर्स करायचं हे इतकं स्वाभाविक होतं की मी त्याबद्दल फेरविचार वगैरे केलाच नव्हता. के क आणि बेकिंग वगैरे गोष्टी करिअर किंवा उत्पन्नाचं साधन म्हणून कधी मी कन्सिडरच केल्या नव्हत्या. पण मास्टर्सला प्रवेश घेताना असलेली माझी थोडीशी द्विधा मन:स्थिती आईच्यासुद्धा लक्षात आली होती. त्यामुळे तिने मला हा सल्ला दिला की मास्टर्स करण्याऐवजी मी पूर्णपणे केकबेकिंग आणि डेकोरेशनकडे लक्ष द्यावं. अर्थात, लगेचच आईचा सल्ला शिरोधार्य मानून ती त्याकडे वळली नाही.

प्रत्येकाच्या करिअरसाठी ट्रिगर ठरलेला असा एखादा क्षण किंवा प्रसंग नक्की येत असतो ज्यामुळे तो मार्ग मनाशी पक्का होतो. मानसीच्याही करिअर पाथमध्ये असा एक प्रसंग घडला ज्यानंतर तिची बेकिंगमधली आवड ही केवळ ‘आवड’ नसून ‘पॅशन’ आहे हे तिला जाणवलं. त्या प्रसंगाबद्दल मानसी सांगते, ‘मी सेकंड इयरमध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीने मला केक करून देशील का म्हणून विचारलं. तिच्या आजीआजोबांच्या लग्नाची पन्नासावी अ‍ॅनिव्हर्सरी होती. त्यासाठी तिच्या डोक्यात कल्पना होती की पन्नास केक करायचे. कपकेक्स नव्हे, पूर्ण फुल साइजचे मोठे पन्नास केक्स! मी पण आधी हो म्हटलं. त्यांच्या कार्यक्रमाला जवळजवळ महिनाभर अवकाश होता. पण अचानक तिच्या बाबांना पुढच्या महिन्यात ट्रॅव्हल करावं लागणार आहे असं कळलं. त्यामुळे कार्यक्रम महिनाभर आधी प्लॅन झाला आणि मला कळलं तेव्हा मोजून तीन दिवसांवर तो कार्यक्रम होता. शुक्रवारी मला तिचा हे सांगायला फोन आला आणि त्यांना रविवारी ते केक्स हवे होते. मी तरीही हो म्हटलं आणि पुढचे दोन दिवस न झोपता, न थांबता मी आणि आईने मिळून ते पन्नास केक्स पूर्ण केले. तिच्या त्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना ते केक्स प्रचंड आवडले, सगळ्यांनी माझं कौतुक के लं आणि त्या मैत्रिणीलाही तिचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे खूप बरं वाटलं. तेव्हा मलाही स्वत:च्या कामाचा प्रचंड आनंद झाला होता आणि आत्मविश्वासही खूप आला होता. त्या वेळी मी सेकंड इयरला होते आणि त्यामुळे डिग्री घेणं हेच पहिलं टार्गेट होतं. एवढं मोठं काम पार पाडल्यावरही ते प्रोफेशन म्हणून करावं असं डोक्यातही आलं नव्हतं. पण या घटनेने मला माझ्या पॅशनची ओळख करून दिली, माझ्या क्षमतेची जाणीव करून दिली आणि मला नुसतीच आवड नाही तर माझ्यात स्किल्सही आहेत याची खात्री पटवून दिली. प्रत्यक्ष व्यवसाय उभा करायची वेळ आली तेव्हा मला या अनुभवाने खूप मॉरल सपोर्ट दिला.’

मानसीच्या केकच्या ब्रँडला आता जवळपास सहा र्वष झाली आहेत. ‘मेड टू ऑर्डर केक्स’ हीच तिची खासियत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या फ्लेवरचे, वेगवेगळ्या थीमचे केक तिने आत्तापर्यंत डिझाइन के ले आहेत. क्लाएण्ट्सना आवडेपर्यंत केक्सवर काम करण्याची तिची तयारी असते. तिच्या कल्पकतेतून आकाराला आलेल्या केक्समागे फ्लेवर परफेक्ट जमण्यापासून ते स्केचेस काढेपर्यंत तिची मेहनत असते. केक्स, डझर्ट्स, बेकिंग किंवा व्यवसायाच्या बाबतीतही कोणतंच प्रोफेशनल ट्रेनिंग नसताना तिने अनुभवातून स्वत:ला घडवलं आहे. एखादं टेक्निक शिकण्यापासून ते आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीनुसार रेसिपीत बदल करण्यापर्यंत सगळं ट्रेनिंग तिने स्वत:च स्वत:ला दिलं आहे. कोणत्याही क्षणी मागे वळून न बघता काम करत राहण्याची हिंमत तिच्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तिला मिळाली असं ती म्हणते. आत्तापर्यंत एकटीने सांभाळत असलेल्या तिच्या व्यवसायात आता तिची आईही सामील झाली आहे. आईने तिची नोकरी सोडून बिझनेसला हातभार लावणं हेच मानसीच्या दृष्टीने खूप मोठं यश आहे.

‘आपल्या आवडीच्या क्षेत्रातली स्किल्स जर डेव्हलप करायची असतील तर सगळं सोडून त्या आवडीच्या मागे लागण्यापेक्षा एका बाजूला पोटासाठी कमवून दुसऱ्या बाजूला आपल्या स्किल्सकडे लक्ष द्यावं. यामुळे उत्पन्न आणि आवड या दोन्हींचा समतोल साधला जाईल. कितीही आवडीचा विचार केला तरीही प्रॅक्टिकल विचार करणं हेही तितकंच, किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे’ -मानसी देशपांडे

आपल्याला नेमकी कसली आवड आहे हे जरी समजलं तरी आपल्याकडे नक्की ती स्किल्स आहेत का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. रिस्क घेतलीच पाहिजे, पण रिस्क घेताना आपल्याला मुळात ती गोष्ट जमते आहे का, आपल्यात ती क्षमता आहे का, याची खात्री करून घेणं आवश्यक आहे.