12 July 2020

News Flash

अराऊंड द फॅशन : फुलाफुलांच्या  बांधून माळा..

खरं तर वर मांडलेले लूक्स काहीच नाहीत, त्यापेक्षाही अधिक वेगळे आणि तांत्रिकदृष्टय़ाही इतरांपेक्षा अव्वल ठरलेले लूक्स सध्या पाहायला मिळतात.

(संग्रहित छायाचित्र)

||  गायत्री हसबनीस

निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना कॅमेरा हातात असेल तर न चुकता आपण पहिल्यांदा रंगीबेरंगी फुलांचा फोटो काढतो. मानवी स्वभावाला आकर्षित करणारी ही एक महत्त्वाची गोष्ट. रंगीबेरंगी जग आपल्याला सहज खुणावतं. हीच मनाला तजेला देणारी रंगीबेरंगी फुलं आपल्याला रोजच्या रोज कपडय़ांवर मिरवता आली तर आपण किती सुंदर दिसू नाही.. मानवी स्वभावाला मोहवणाऱ्या याच गुणधर्मामुळे फ्लोरल डिझाइन्सचा फॅ शन विश्वातील पसारा वाढला आहे. हे फ्लोरल माहात्म्य आहेच इतकं मोहक की त्याला मिळणारा प्रतिसाद हा यापुढेही वाढताच असेल..

 

डोळ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या नानाविध आणि आकर्षक कपडय़ांच्या हिशोबात कपडय़ांच्या रचनेपेक्षाही त्यावरची नक्षी किंवा प्रिंट जास्त भाव खाऊन जाते. कपडय़ांवरची ही चित्रं किंवा त्यावर केलेलं नक्षीकाम कधी रंगीबेरंगी असतं, तर कधी एकच एक वा दुहेरी रंगाचंही असतं. रंग या घटकाचा वापर कपडय़ावरचं हे नक्षीकाम खुलवण्यासाठी खूप सुंदर पद्धतीने केला जातो. आत्ताचे फॅशन ट्रेण्ड्स पाहता आणखी एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे या कपडय़ांची रचनाही डिझाइन्सना पूरक अशा पद्धतीची असते. रंग, रचना आणि नक्षी कपडय़ांवर बहार आणतात हे कोणाला पटलं नाही तरच नवल. या तीन गोष्टींचा उल्लेख करण्यामागचं कारण म्हणजे आजपर्यंत ग्लोबली फॅशन डिझायनर्सना या नक्षी, रचना आणि रंगांना आपल्या कलाकृतीतून ‘फुलवण्याचा’ मोह चढत आला आहे. ट्रॅडिशनल नक्षीच्या प्रकारातला आजचा आधुनिक प्रकार म्हणजे फुलाफुलांची नक्षी. ज्याला आपण आजच्या भाषेत ‘फ्लोरल डिझाइन्स’ असं संबोधतो. पॅटर्न्‍स आणि डिझाइन्समध्ये आत्तापर्यंत मोनोक्रोम, स्ट्राइप्स, पोलका डॉट्स इत्यादी डिझाइन करताना ते प्लेन सरफेसवर मल्टिकलर डिझाइन या पद्धतीने केले जात होते. त्याच रचनेतील फ्लोरल प्रिंट्सही आहेत. त्यामुळे ग्लोबल फॅशन ट्रेण्डमध्ये ट्रेण्डसेटर ठरलेला फ्लोरल पॅटर्न्‍सचा लुक कशा पद्धतीने इन झाला आणि तो पुढे नेण्यासाठी डिझायनर्सनी काय-काय क्लृप्त्या लढवल्या असतील हा रंजक इतिहास फॅशनप्रेमींना खुणावल्याशिवाय राहात नाही.

रंगांचा विचार केला तर डिझायनर्सनी फ्लोरल आऊटफिट्सबाबतीत अत्यंत बारकाईने अभ्यास केल्याचे दिसून येते. पूर्णत: एकच रंग डिझायनर ड्रेसवर असेल तर ते आपल्याला क्वचित आकर्षित करतात. पण वेगवेगळ्या रंगांचे संमिश्र डिझाइन असलेल्या कपडय़ांकडे आपण जास्त वळतो. जसं हल्ली मोनोक्रोम स्ट्राइप्सवर फ्लोरल डिझाइन्स येऊ  लागल्या आहेत किंवा कॉन्ट्रास्ट रंगावरही फ्लोरल डिझाइन्स आहेत यातही मल्टिकलर वापरलेले असतात. ग्लोबल फॅशनमध्ये हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे हे जाणवतं. पूर्वी एक तर फ्लोरल डिझाइन्स पूर्ण आऊटफिट व्यापून टाकायचे आणि एकाच रंगांच्या शेडवर ते आकारले जायचे. आता आऊटफिट्सची रचनाही वैशिष्टय़पूर्ण आणि आधूनिक असते. फ्लोरल डिझाइन्सच्या बाबतीत ते कुठल्याही एका सीझनपुरते मर्यादित राहिलेले नाहीत हे विशेष. याआधी फ्लोरल हे एकसारखे समर सीझनपुरतेच आणले जायचे. पण आता ते ऑटम आणि विंटर सीझनमध्ये देखील येऊ  लागले आहेत. ‘लंडन फॅशन वीक’चंच उदाहरण घ्यायचं झालं तर ‘वॉलपेपर फ्लोरल्स’ हा वेगळा प्रकार त्यांनी आणलाय. लंडनमध्ये पूर्वीपासून फ्लोरल वॉलपेपर प्रसिद्ध आहेत. अगदी डोळ्यासमोरचं उदाहरण हवं असेल तर ‘मिस्टर बीन’ या कार्टून मालिकेतील मिस्टर बीनच्या घराचं हिरवं वॉलपेपर आठवा. तेही फ्लोरल पॅटर्नचे आहे. निरीक्षणास आलेली बाब म्हणजे लंडनमधील राजघराण्यातील इंटिरिअर्सही फ्लोरल पॅटर्नशी मिळतेजुळते आहेत. ‘लंडन फॅशन वीक’मधून या पॅटर्नचा वापर चांगल्या प्रकारे केला गेला आहे. एसिमेट्रिकल पद्धतीने फ्लोरलला छान खुलवायचा प्रयत्न केला आहे आणि एसिमेट्रिक पॅटर्नसुद्धा विण्टेज आणि रॉयल या दोन्ही पद्धतीने साकारले आहेत. एक फार इंटरेस्टिंग लुकही यात पाहायला मिळतो तो म्हणजे इनर बॉडी गार्मेट आणि त्यावर फ्लोरल डिझाइनचा सूट. यातले वेगळेपण म्हणजे फ्लोरलचा अख्खा सूट नुसताच घालण्यापेक्षा त्याच्या आत मानेपासून पूर्ण शरीर झाकणारं काळ्या रंगाचं गार्मेट घातल्यास त्या फ्लोरल सूटला एक बॅकग्राऊंड मिळाल्यासारखी भासते आणि हा लुक वेगळा ठरतो. फ्लोरलचा प्रभाव इतका वाढला आहे की कधी काळी स्त्रियांपुरते मर्यादित राहिलेले फ्लोरल डिझाइन्स आता पुरुषांसाठी स्टाइल स्टेटमेण्ट ठरले आहेत.

खरं तर वर मांडलेले लूक्स काहीच नाहीत, त्यापेक्षाही अधिक वेगळे आणि तांत्रिकदृष्टय़ाही इतरांपेक्षा अव्वल ठरलेले लूक्स सध्या पाहायला मिळतात. अक्षरक्ष: डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण फ्लोरल लुक कलात्मकरीत्या मोठय़ा डिझायनर्सनी रॅम्पवर आणले आहेत. शूज, सॉक्समध्येही फ्लोरल डिझाइन्स चपखल बसवण्यात आली आहेत. खरं म्हणजे पूर्णपणे फ्लोरलचा एकच एक लुक ठेवणे हे खूप धाडसाचे काम आहे आणि तेही रॅम्पवर आणून ती फॅशन ट्रेण्डसेटर बनवणे हेही तितके च अवघड काम आहे. कारण असे लुक डिझाइन करण्याची प्रेरणा अनेकदा डिझायनर्सना होते खरी मात्र हा लुक प्रत्येक वयोगटातील लोकांना वैयक्तिक पातळीवर आवडेलच याची खात्री नसते. कितीही म्हटलं तरी पूर्ण फ्लोरल लुक अ‍ॅनिमेटेड किंवा एखाद्या बाहुलीप्रमाणे टिपिकल वाटू शकतो. कुठल्याही ठरावीक ओकेजनला घालून मिरवण्याचा तो प्रकार होत नाही आणि फक्त रॅम्पपुरती किंवा शोकेस आणि फोटोशूटपुरती ती फॅशन मर्यादित होते. अशा वेळी डिझायनर जास्तकरून काळजी घेतो ती योग्य फॅब्रिकची आणि रंगसंगतीसोबत अचूक डिझाइनची. उदाहरणार्थ सॉक्स हे फ्लोरल डिझाइनचे असल्यास त्याचे फॅब्रिक हे ट्रान्सपरंट ठेवता येते, कारण ट्रान्सपरंट डिझायनर मोजे हे सहज ब्लॅक शूज, लेदर शूज, पेन्सिल हिल्स, सॅण्डल्स अशा कुठल्याही रंगाच्या, डिझाइनच्या फुटवेअरवर सहज जाऊ  शकतात. फ्लोरल शूज आणायचे झाल्यास त्यातही स्निकर्स, स्लिप-ऑन, स्टिलेटोज, कोन हिल्स, प्लॅटफॉर्म हिल्स, किटन हिल्स असे नानाविध प्रकार आणले जातात. जे कुठल्याही डिझाइनच्या, पॅटर्नच्या आणि रंगाच्या जम्पसूट, डेनिम, मिडी, वनपीस, जीन्स, सूट्स इत्यादींवर घालता येतात. आताच्या घडीला संपूर्ण लुक तसाच्या तसा रुटीन बेसिसवर कॅरी करणारे अंशत:च आढळतील. त्यामुळे फ्लोरल या डिझाइन वैशिष्टय़ांसारख्या प्रकाराला पूर्ण आऊ टफिटमध्ये बसवताना त्यातील शूज, सॉक्स, अ‍ॅक्सेसरीज व अन्य गार्मेटचा वापर इतर आऊटफिट्सवरही व्हायला हवा याची जबाबदारी डिझायनर्स घेत आहेत. एक तर फ्लोरलला संपूर्ण आऊ टफिटमध्ये आणताना प्रामुख्याने ते वनपीस, शूज आणि सॉक्स अशा एकत्रित पॅटर्नमध्ये पाहायला मिळते. ज्याचा वापर कमी-जास्त करता येतो. किंवा या लुकला पर्यायी आऊटफिट्स देत समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यासाठीचे पर्याय तपासून घेत पूरक डिझाइन्स तयार करणे हेही डिझायनर्सचे काम होऊन बसले आहे.

फ्लोरलमध्ये निवडक फॅशनच लोकप्रिय ठरते असे नाही. मेन्सवेअरची फ्लोरल फॅशन आज जगभरात प्रचंड लोकप्रिय आणि प्रभावीही ठरली आहे. त्यात तर दिवसागणिक इतके प्रकार येतात की त्याची नावंही पाठ होणार नाहीत. कोट्स, ब्लेझर, एसिमेट्रिक शर्ट्स, पॅण्ट्स, चिनोज, लोफर्स अशी काही निवडक नावे घेता येतील त्यासोबत फ्लोरल डिझाइन्सची नावंही इतकी आहेत की रोज तीही वाढतच जात आहेत. उदाहरणार्थ, एक्झॉटिक फ्लोरल, विण्टेज फ्लोरल, पेझली फ्लोरल्स आणि डिटसी फ्लोरल्स अशी काही नावं समोर येतील. आतापर्यंत फ्लोरलला अधिकाधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जातो हे दिसून आले आहे, यापुढेही ते प्रमाण वाढतेच राहील. त्यातून नवनवीन स्टाइल स्टेटमेण्ट्सही तयार होत आहेत. मात्र त्यातील कुठली फॉलो करायची हे ठरवताना आपला फ्लोरल लुक आपण योग्य पद्धतीने कॅरी करू शकू, यावरही आपण भर द्यायला हवा आहे. तर हे फ्लोरल स्टेटमेण्ट आपल्याला व्यक्तिमत्वाला फुलवण्यास मदत करणारे ठरेल!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 3:06 am

Web Title: camera colorful flower photo points designs fashion world akp 94
Next Stories
1 शेफखाना : व्हायरल व्हिडीओची कहाणी
2 ट्रायल
3 चमकणारे तारे
Just Now!
X