भाषा नेहमीच साधते संवादाचा पूल. त्याच अनुषंगानं आरोग्य क्षेत्रातल्या दुभाषाची अवघड कामगिरी जपानीत लीलया पार पाडण्याच्या प्रयत्नांविषयी सांगतेय अभिलाषा म्हात्रे.
अभिलाषा म्हात्रे, अहमदाबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावीनंतर आर्ट्सच घ्यायचं ठरवून डी. जी. रुपारेलमध्ये प्रवेश घेतला. मुळात इंग्रजी भाषा चांगली असल्यामुळं त्याखेरीज दुसरी भाषा शिकावीशी वाटल्यानं जपानी शिकले. अकरावी-बारावीत कॉलेजमधली लेक्चर्स नि परीक्षेपुरतंच माझं जपानी मर्यादित होतं. त्यानंतर बोरिवलीत ‘प्रोफेशनल फॉरेन लॅग्वेज सेंटर’ जॉइन केलं. तिथून परीक्षाही दिली. मात्र त्यानंतर दोन र्वष जपानी शिकणं सोडलं, कारण मानसशास्त्रातल्या पदवी अभ्यासक्रमाकडं जास्त लक्ष होतं आणि जपानी भाषेकडं मी फक्त छंद म्हणूनच बघत होते. म्हटलं तर दुर्लक्षच झालं जपानीकडं. मात्र तसं न करता जपानीत करिअर करण्याचा सल्ला बाबांनी दिला.
मानसशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर ‘एम.बी.ए.’च्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यात वर्ष घालवलं. लक्षात आलं की, आपल्याला हे बिलकुल करायचं नाहीये, तरी आपण हे का करतोय? योगायोगानं एका ऑनलाईन पोर्टलच्या ‘एच.आर.’मध्ये वर्षभर काम केल्यावर पुन्हा लक्षात आलं की, आपण हे काम आयुष्यभर करू शकत नाही. तो जॉब सोडून मी पुन्हा जापनीजच्या अभ्यासाला लागले. तेव्हा आईबाबांनी खूप सपोर्ट केला. महिन्याभरानं Unikaihatsu Software Pvt Ltd ट्रान्सलेशन कंपनीमध्ये वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर मेडिकल ट्रान्सलेशन्स करायचा जॉब लागला. टोकियोहून रोज येणाऱ्या जपानीतल्या मेडिकल रिपोर्ट्सचं भाषांतर करावं लागायचं. पण मला भाषांतरापेक्षा इंटरप्रिटेशनमध्ये- दुभाषा म्हणून काम करण्यात अधिक रस होता. सुरुवातीला भाषांतर आणि नंतर इंटरप्रिटेशन या दोन्ही क्षेत्रात काम करताना मला आरोग्यक्षेत्रातल्या संकल्पना, शब्द, व्याख्यांविषयी माहिती करून घेत, त्यांचा अभ्यास करावा लागला होता. मी पुन्हा क्लास न लावता स्वत:च जपानी भाषेची उजळणी नि अभ्यास केला. भाषांतराच्या वेळी समोरचे मोठाले मेडिकल रिपोर्ट्स बघून सुरुवातीला भीती वाटली होती. थोडीशी साशंकही झाले होते. सतत सरावामुळं दोन महिन्यांत या कामात एवढी तरबेज झाले की, नवीन सहकाऱ्यांची प्रोजेक्ट्स मला रिव्ह्य़ू करायला मिळायला लागली.
ट्रान्सलेशनच्या कंपनीसोबतचं वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट संपत होतं. पण मुंबईतल्या लोकल गर्दीला पार कंटाळलेले मी. ब्रेक हवासा वाटत होता. माझी प्रॉडक्टिव्हिटी कमी होतेय की काय असं वाटू लागलं होतं. शिवाय मला स्वतंत्रपणं राहायचं होतं. ‘नोकरी डॉट कॉम’वरून केलेल्या अर्जाला सध्याच्या कंपनीचा प्रतिसाद मिळाला. ट्रान्सलेशनच्या क्षेत्रातून इंटरप्रिटेशनच्या क्षेत्रात जाणं, ही वाटते तेवढी सोप्पी गोष्ट नाहीये. अहमदाबादसारख्या सुरक्षित शहरात जायची संधी मी सोडली नाही. इथं येऊन अडीच महिने झालेत, तरी कधीकधी मी थोडीशी घाबरते. कारण शेवटी हे मेडिकल फिल्ड आहे नि समोर काहीही होऊ शकतं. त्या प्रसंगाला सामोरं जायचा मनाचा खंबीरपणा हवा.
इंटरप्रिटेशनचं काम करताना मध्यंतरी एक घटना घडली की, एका पेशंटनं दातदुखीसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. मी त्याची दातदुखीची समस्या डॉक्टरांपर्यंत पोहचवायची, अशा मानसिक तयारीनं गेलेले. तो हॉस्पिटलमध्ये आला नि पोट पकडून पडलाच. या क्षेत्रात नवीनच असल्यानं मी खूप घाबरले. कळत नव्हतं काय करायचं. त्याच्याशी संवाद साधून लगेचच दुसरी अपॉइंटमेंट घेतली. त्याच्या पोटात इन्फेक्शन झालं होतं. त्याच दिवशी त्याला बरं वाटलं. त्यानं अगदी मनापासून आभार मानले. त्यानंतर त्यानं मला आणि माझ्या सहकाऱ्याला डीनरसाठी आमंत्रित करून आमचे पुन्हा आभार मानले.
सध्या मी एका कुटुंबाच्या बंगल्यात पेइंगगेस्ट म्हणून राहातेय. मी नॉनव्हेजिटेरियन असल्यानं थोडेसे हाल होतात. इथं आले तेव्हा स्वयंपाकातलं काहीच येत नव्हतं. सतत बाहेरचं खाऊन तब्येतीवर परिणाम झाल्यानं स्वयंपाक करायला शिकले. इथं व्हेजच करावं लागतं. माझ्या शेजारच्या रूममेट्स देशाच्या वेगवेगळ्या भागांतल्या आहेत. माझ्या छत्तीसगडच्या रूममेटकडून मी तिथल्या चवीची पोळी-भाजी, आमटी-भात वगैरे करायला शिकलेय. आईला फोन झाल्यावर बहुतांशी वेळा स्वयंपाकाच्याच गोष्टी जास्त होतात. इकडं आल्यापासून मी नि आई खूप क्लोज झालोय. आम्ही सतत संपर्कात असतो एकमेकींच्या. नवीन जागेत गेल्यावर नवीन माणसांसह सगळ्या गोष्टींना शांतपणं तोंड द्यायला आपण शिकतो. माझ्या रूममेटला फिरण्याची आवड असल्यानं आमच्या त्यावर चिक्कार गप्पा होतात. गेल्या वर्षभरात मी सिमला, अमृतसर, चंदीगढ, राजस्थान, काश्मीर आदी ठिकाणी फिरले. आता माऊंट अबूला आणि नंतर लडाखला जायचा बेत आखतेय.
भारतातल्या जापनीज लोकांचा विमा काढलेला असतो. आमची कंपनी त्यांच्या विमा कंपनीच्या संपर्कात असते आणि काही कारणानं वैद्यकीय मदत लागली तर ती आम्ही पुरवतो. त्यांचं डॉक्युमेंटेशन आम्ही करतो. भारतात आल्यावर हवामानापासून ते खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्यानं जपानींना आरोग्याबाबत त्रास जाणवल्यास कंपनीनं दिलेल्या इमर्जन्सी नंबरवर त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यावर आमच्या शांघाय नि कॅनडामधल्या ऑफिसेसना तो कनेक्ट होतो. त्यावर पेशंटनं स्वत:चा पत्ता सांगितल्यावर भारतातल्या स्थानिक ऑफिसला त्या पेशंटचे डिटेल्स दिले जातात. मग आम्ही त्याच्याशी संपर्क साधून त्याची विचारपूस करतो. उदाहरणार्थ, अहमदाबादमधल्या कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये आमचा टायअप आहे. आम्ही पेशंटसाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो. ठरल्या दिवशी पेशंटला लॉबीत भेटून डॉक्युमेंटेशन करतो. डॉक्टर-पेशंटमध्ये संवाद साधतो. मेडिकेशन फार्मसीकडून आणून ते पेशंटला नीट समजावतो. जपानी पेशंटना भारताबद्दल फार कुतूहल वाटल्यानं ते आम्हाला सतत प्रश्न विचारतात.
इथली गुजराती माणसं एकदम शांत आणि स्वत:च्या जगात मग्न असतात. अगत्यशील आहेत. मदतनीस बायकांना हिंदी येत नसलं तरी हातवाऱ्यांनी आमचा संवाद होतोच. आमच्या बंगल्याच्या मालक असणाऱ्या म्हाताऱ्या आजींना गुजरातीखेरीज दुसरी भाषा मुळीच येत नाही. त्यामुळं त्यांच्याशी संवाद साधताना मोठी पंचाईत होते. आता वाटतंय, जपानी शिकले तशी गुजराती पटापट शिकायलाच हवी.. इथली खांडवी मला खूपच आवडलेय. मुंबईपेक्षा इथं पाणीपुरीची क्रेझ आहे. इथं मी साबरमती आश्रमासह साबरमती नदीकाठी, अक्षरधाम मंदिर, तीन दरवाजा आदी ठिकाणी फिरलेय.
कंपनीच्या जापनीज स्टाफपैकी एका जापनीज नर्सनं मला मेडिकल फिल्डशी संबंधित इत्यंभूत माहिती दिली. त्याचा सातत्यानं अभ्यास करावा लागतो. ही माहिती इंग्लिशमध्ये शिकून ती जापनीजमध्ये पुन्हा शिकायची आणि समयोचित त्या माहितीचा वापर करायचा, ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. जपानी लोक वेळेच्याबाबतीत फारच काटेकोर असतात. आपल्याकडं अजूनही वेळेला काटेकोरपणं महत्त्वं दिलं जात नाही. साहजिकच जपानी पेशंटना डॉक्टरची वाट बघायला अजिबात आवडत नाही. त्यामुळं ती परिस्थिती शांतपणं हाताळून त्या पेशंटची समजूत काढावी लागते. डॉक्टरांनाही योग्य मान द्यायचा असतो. अशा वेळी माझा मानसशास्त्राचा अभ्यास उपयोगी ठरतो. मी आणि माझा सहकारी दोघंही एकदम सुट्टी घेऊ शकत नाही. इमर्जन्सी येऊ शकते. त्यामुळं २४ बाय ७ अॅव्हेलेबल असावं लागतं.
इथं यायचं ठरवल्यावर सुरुवातीला घरच्यांना काळजी वाटत होती. बाबांनी माझा आत्मविश्वास वाढवला होता. आता मला खूप इण्डिपेंण्डंट वाटतंय. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला मी न घाबरता तोंड देऊ शकते. घरच्यांच्या मते, मी अधिक मॅच्युअर झालेय. आमच्या कंपनीत काम मॉनिटर करून वर्षभरात भारतातल्या चार विभागांतून एका उमेदवाराची निवड होऊन त्यांना जपानमध्ये ट्रेनिंग मिळतं. त्या यादीत माझं नाव यावं, असं वाटतंय.. तिथं जायचं माझं स्वप्न आहे. पुढं इंटरप्रिटर म्हणून जपानी दूतावासात काम करायला आवडेल. त्यासाठी खूप अनुभव गाठीशी असावा लागतो. त्यामुळं अजून खूप अवकाश आहे त्या गोष्टीला.. माझ्या जपानी भाषेच्या एन३ लेव्हल्स झाल्या असून डिसेंबरमध्ये एन४ची परीक्षा देणारेय. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करते. अगदी ऑफिसमध्येही पुस्तकं असतातच समोर. घरी फक्त सुट्टीच्या दिवशी अभ्यास करते. भाषेचा अभ्यास घोकंपट्टी करून येत नाही. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करणं उपयुक्त ठरतं. कोणत्याही भाषेचा अभ्यास कधीच संपत नाही. कारण, ले गई दिल भाषा जापान की..
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com
(शब्दांकन- राधिका कुंटे)

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career and job as translator
First published on: 13-05-2016 at 01:11 IST