पहिली मराठी वेबमालिका ‘कास्टिंग काउच’च्या रूपाने ‘यूटय़ूब’दरबारी दाखल झाली आहे. वेबच्या जाळ्यावर मराठी मालिका आणताना कर्त्यांचा नेमका काय विचार होता?

टी.व्ही. चॅनेलवर एखादी मालिका बघायची असेल तर त्याच्या ठरलेल्या वेळेची वाट बघावी लागते. एपिसोड मिस झाला तर रिपीट टेलिकास्टसाठी थांबावं लागतं. पण ऑनलाइन सिरियल्समुळे आता तेही खूप सोपं झालंय. पण या वेबमालिकांची धाटणी टीव्ही मालिकांपेक्षा खूप वेगळी असते. ‘पर्मनंट रूममेट्स’, ‘पिचर्स’, ‘एआयबी’च्या काही मालिका यातून या वेबमालिकांचा तरुणाईला आकर्षित करणारा कण्टेण्ट आपल्या परिचयाचा झाला आहे. ‘चॅनेल वाय’ या सदरातून आतापर्यंत या आणि इतर हिंदी, इंग्रजी, हिंग्लिश मालिकांविषयी आपण वाचलेय आणि आता याच हिंग्लिश वेबमालिकांशी नातं सांगणारी मराठी वेबमालिका दाखल झालीय ‘भारतीय डिजिटल पार्टी’ नावाचं चॅनेल ‘कास्टिंग काउच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’ या मालिकेचा पहिला एपिसोड मागच्याच आठवडय़ात ‘यूटय़ूब’वर आलाय. दोन मित्र आपल्या एका नवीन चित्रपटासाठी अभिनेत्रींची स्क्रीन टेस्ट घेत आहेत.. त्यांना हे न सांगता, अशी याची मुख्य संकल्पना आहे.
एकाच ‘काउच’वर बसून नटय़ांशी झालेला अनौपचारिक संवाद साधत हे दोघे धमाल उडवून देतात. एका चित्रपटासाठी अभिनेत्रीला कास्ट करण्याच्या धडपडीमुळे याला कस्टिंग काउच नाव देण्यात आले आहे, असे अमेय आणि निपुण यांनी सांगितलं. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या टीव्ही मालिकेच्या यशाने घराघरात पोचलेला अभिनेता अमेय वाघ आणि गुणवान दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हे दोघे यानिमित्ताने वेबमालिकेतून प्रथमच समोर येत आहेत. पहिल्याच एपिसोडसाठी हिंदी- मराठी चित्रपट, नाटय़अभिनेत्री राधिका आपटेनं भूमिका केली आहे. हे दोघे राधिकाची विकेट घ्यायचा प्रयत्न करतात आणि राधिकादेखील त्यांना जशास तसं उत्तर देत एपिसोडमध्ये धमाल आणते.
अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक सारंग साठे, पॉला मॅग्लेन आणि अनुषा नंदकुमार यांनी एकत्र येऊन सुरू केलेली संस्था म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी. आजचे यंगस्टर्स इतर माध्यमांपेक्षा ऑनलाइन कण्टेंटकडे जास्त धाव घेतात. यामध्ये मराठी प्रेक्षकवर्गदेखील आहे. मराठीतील या पहिल्या मालिकेला यूटय़ूबवर पहिल्या दोन दिवसांतच सत्तर हजार हिट्स मिळाले आहेत. मराठीमध्ये पहिली वेबमालिका सुरू करण्याच्या संकल्पनेबद्दल अमेय वाघ सांगतो, ‘आपल्या देशात खूप मोठा युवा प्रेक्षकवर्ग आहे. तो ऑनलाइन कण्टेंटसाठी उत्सुक असतो. इंग्रजी- हिंदी वेबमालिकांची क्रेझ पाहून १६ ते ३० वर्षे या वयोगटातील तरुणाईला टार्गेट ठेवून मराठीतही काहीतरी सुरू करण्याची गरज होती. वेब कण्टेंट हे माध्यम खूप आव्हानात्मक आहे सोबतच युजरफ्रेण्डलीदेखील. वाहिन्यांवरच्या मालिका आणि त्यांची पद्धत आता जुनी झाली आहे. आवडती मालिका बघण्यासाठी घडय़ाळात १० वाजण्याची वाट बघावी लागते. पण वेबमालिकांमध्ये असं नसतं. यात वेळेचं बंधन नसतं. यामध्ये एपिसोड १० मिनिटांचाही असू शकतो नाहीतर २५ मिनिटांचाही. हे एपिसोड बसमध्ये कॉलेजला जातानापण बघता येऊ शकतात नाहीतर दुपारी निवांत सोफ्यावर पडूनही. प्रेक्षकांना आपलंसं वाटेल आणि मनोरंजनही करेल असं हे ‘कास्टिंग काउच’ आहे’, असंदेखील अमेय सांगतो. ‘आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला निपुण धर्माधिकारी याचा अनुभव, सारंग साठे याचे उत्तम दिग्दर्शन, अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे राधिका आपटे हिची फॅन फॉलोइंग याचा आम्हाला बराच फायदा झाला. आम्ही इतर हिंदी किंवा इंग्रजी वेब कण्टेंटसोबत तुलना नक्कीच करत नाही. आणि स्पर्धापण नाही. कारण त्यांचा आवाका खूप मोठा आहे. पण मराठी भाषेचे दरवाजेपण या क्षेत्रात खुले झाले याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे’, असंही अमेयनं ‘लोकसत्ता व्हिवा’शी बोलताना सांगितलं.
यूटय़ूब चॅनल्समुळे ऑनलाइन मालिका घराघरात जाऊन पोहोचल्या. ‘कास्टिंग काउच’ची संकल्पना जरा वेगळी आहे. याबद्दल विचारता निपुण धर्माधिकारी सांगतो, ‘नेहमीच्याच कण्टेंटपेक्षा प्रेक्षकांना अगदी नैसर्गिक वाटेल असं काहीतरी देण्याची इच्छा होती. मी, अमेय आणि सारंग कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्या वेळी आम्ही खूप धमाल करायचो. मुलींच्या आमच्याशी वागणुकींवर त्यांना रेटिंग द्यायचो. त्या वेळेस अशा प्रकारे आम्ही गंमत म्हणून मुलींचे इंटरव्ह्य़ू घेत असू. सारंगच्या डोक्यात ही कल्पना तेव्हापासून होती. याबद्दल एक वर्षांआधी बोलणं झालं आणि फायनली – वी आर ऑन द फ्लोर नाऊ.’ ऑनलाइन माध्यमात फ्लेक्झिबिलिटी आहे आणि यंगस्टर्सना हे माध्यम आपलंसं वाटतं हे महत्त्वाचं असल्याचंही निपुण सांगतो.
पंधरा दिवसांतून एकदा या मालिकेचा नवीन एपिसोड देण्याची कास्टिंग काउच टीमची तयारी आहे. यामध्ये अजूनही अशाच काही अभिनेत्रींची वेगळ्या पद्धतीने मुलाखत घेतलेली पाहायला मिळेल, असे अमेय आणि निपुण यांनी सांगितलं. प्रेक्षकांच्या प्रतिसादावर पुढील एपिसोड्स अवलंबून आहेत असंदेखील ते सांगतात.