निशा परुळेकर
काय गंमत बघा, उन्हाळ्यात जे खाऊ नये तेच मी खाते, तो म्हणजे आंबा. तो प्रचंड हीट देतो, पण मला तो खाल्ल्याशिवाय राहवत नाही, याचे काय ते दुष्परिणाम होतातच. माझ्यावरही ते झाले असून थोडासा डोळ्याला प्रॉब्लेम झाला आहे. भरपूर दही-ताक खाऊन या उष्णतेपासून मी बचाव करते.

मानसी सिंग
पाणी उकळून पिणे व मांसाहार कमी खाणे ही उष्णतेच्या दिवसातील माझी प्रमुख सूत्रे आहेत. त्या जोडीला नारळपाणी, लिंबूपाणी, फळांचे रस व मँगो आईस्क्रीम यांना प्राधान्य देते. ऊन टाळता येत नाही, पण पोटाची व्यवस्थित काळजी घेतली तर कशाचाही त्रास होत नाही. रात्री शक्यतो भात कमी खायची सवय मला उन्हाळ्यात पथ्यावर पडते.


दीपाली सय्यद

उष्णतेचे हे दिवस म्हटले की, एकदा कोल्हापूरमध्ये माझे झालेले हाल आठवतात. भरत जाधव व इतरांसोबत एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या ताटातला पांढरा रस्सा, मटण-चिकन वगैरे पाहून मलाही वाटले, चार दिवस आपणही चमचमीत खावे, ..नंतर मात्र महिनाभर मी दहीभातावर होते. तेव्हापासून ठरवले, मार्च महिना सुरू झाल्यावर जेवणात बदल करायचा. शूटिंगला जाताना घरून खिचडीचा डबा घेऊन जाते. पण मुंबईबाहेर दूरवर शूटिंग अथवा नृत्याचे कार्यक्रम असले की, ‘आपण काय खातोय’ यावर कटाक्षाने लक्ष ठेवावे लागतेच. कलाकार म्हटलं की, ‘भटकंती’ ही आलीच, मग ऊन असो वा थंडी-पाऊस. पण खाणे व्यवस्थित असेल तर सर्व ‘झक्कास’ रुळते.

अतुला दुगल
उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात म्हणून तो टाळते. चहा-कॉफी-शीतपेय व जंक फूड शक्यतो दूरच ठेवते. कलिंगड, जाम व पांढरा कांदा यांना जास्त पसंती देते, डब्यात ते घेऊनच शूटिंगला निघते. गाजर, टोमॅटो, काकडी यावर ताव मारते. गुलकंद-चंदन असव-तुळशीचे बी या दिवसात खूप हितकारक. सकाळच्या कोवळ्या उन्हात काही काळ वावरते, ते ताजेपण देते, शूटिंगला निघताना चेहऱ्याला गुलाबपाणी लावते, ताजे ताक व माठातले पाणी खूप पिते. भडक रंगाचे कपडेही टाळते. उष्णतेपासून चारही बाजूने आपण बचाव करणे गरजेचे आहेच.

मनीषा केळकर
मी ‘सेलिब्रेटी’ असले तरी मुळात एक ‘माणूस’ आहे, त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे मलाही उन्हाचे चटके-फटके जाणवतात. नाशिकला ‘वंशवेल’ चित्रपटासाठी काळी ओढणी घेऊन कडक उन्हात दृश्य देताना माझी झालेली हालत शब्दात सांगताच येणार नाही. अभिनयाचा पेशा म्हटल्यावर कितीही कमी-अधिक तापमानात काम करावे लागते. उन्हाळ्यात तेलकट-तिखट व मांसाहार टाळते. घरी सकाळी भरपूर सब्जा खाते. मग दिवसभर सेटवर पाणी-ताक-नारळपाणी पिताना युनिटला त्रास देत नाही. कारण ती माणसेदेखील उन्हाळ्याने त्रासलीत याचे भान ठेवते.

श्रद्धा कपूर
डॅडी (शक्ती कपूर) व मावशी (पद्मिनी कोल्हापुरे) अभिनयाच्या क्षेत्रात बरीच वर्षे असल्याने खाण्या-पिण्याच्या पथ्याचे भान मला केव्हाच आले आहे. तबियत सलामत तो करिअर सेफ हा मंत्र मी खूप लवकर अवलंबिला. उन्हाळ्यात तो अधिक काळजीने पाळते. नारळपाणी, कलिंगड यावर माझा जास्त भर असतो, या दिवसात पोट भरलेले असावे, पण ते हलकेही वाटावे.

चित्रांगदा सिंग
अरे बापरे उन्हाळा.. नकोच तो. खाण्या-पिण्याची जरा अतीच काळजी घ्यावयास लावणारा मौसम. तशी मी बाराही महिने तेलकट-तिखट फारच कमी खाते. माझा सॅन्डविचेस खाण्यावर जास्त भर आहे. अनेक प्रकारची सॅन्डविचेस खायची सवय मला या दिवसात उपयोगी पडते. टोमॅटो-काकडीपासून विविध प्रकारची फळे त्यामुळे मी खाते. घरून डबा वगैरे नेणे जमत नाही अथवा सवयीचे नाही. पाण्याची बाटली सतत जवळ असली तरी थंड पाणी टाळते, या दिवसात साधे पाणी जास्त प्यावे. सेटवर व्हॅनिटीची व्यवस्था असल्याने आरामही मिळतो. सध्याच्या काळात फिटनेस फंडा खूपच महत्त्वाचा झाला असल्याने खाण्या-पिण्याचे स्वरूप व वेळापत्रक सवयीचे झाले आहे. प्रत्येक मोसमानुसार त्याचे पालन करण्याचे भान मी ठेवलेय.

प्रार्थना बेहेरे
‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटाचे मागील वर्षीच्या मे महिन्यात पंजाबमध्ये चित्रीकरण असताना तिकडचा कोरडा उन्हाळा काय असतो याचा अनुभव मी घेतलाय, तेथे ‘मिठास’ लस्सीचा स्वाद भरपूर घेता आला तरी उन्हाळ्याचा ‘तडका’ भारी होता. म्हणून मग सेटवर सतत लिंबूपाणी प्यायचे. भरपूर ताक व दही खाऊन उन्हाळ्यात तब्येत सांभाळणे गरजेचे आहे, शरीरातील पाणी कमी झाले तर त्यातून काही समस्या निर्माण होऊ शकते. त्यापेक्षा ठरावीक अंतराने फळांचा रस, ताक अथवा नुसते पाणी प्यावे. मुंबईत मालाडच्या ‘सन्डे ड्रीम’ येथे रात्रौ दोन वाजेपर्यंत मिळणाऱ्या फळांचे रस व सॅन्डविचेसचा या दिवसांत खूप आस्वाद घेऊन तब्येत सांभाळते.