News Flash

सेलिब्रिटी गणपती

बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींच्या गणेशोत्सवाकडे नेहमीच आपलं लक्ष लागून राहिलेलं असतं. राज कपूरपासून नाना पाटेकर, सलमान खान यांच्या घरातल्या गणपतींना नेहमीच प्रसिद्धी मिळाली आहे.

| August 29, 2014 01:08 am

बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटींच्या गणेशोत्सवाकडे नेहमीच आपलं लक्ष लागून राहिलेलं असतं. राज कपूरपासून नाना पाटेकर, सलमान खान यांच्या घरातल्या गणपतींना नेहमीच प्रसिद्धी मिळाली आहे. नव्या जमान्यातील असेच काही सेलिब्रिटी सांगताहेत त्यांच्या गणेशोत्सवाविषयी..

सगळ्यात आवडता सण- शिल्पा शेट्टी
मी फार पूर्वी चेंबूर येथे राहायचे. तेव्हापासूनच गणेशाची भक्त आहे. तेथील कितीतरी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांतील श्रीगणेशाचे दर्शन मी घ्यायचे. मग वर्सोवा येथे राहायला आले. आता जुहू येथे राहते. आता तर माझे पती राज कुंद्रा आणि आमच्या मुलासोबत मी घरात गणपती उत्सव साजरा करते. आमच्या घरी गणपती येतो. आपली चित्रपटसृष्टी सर्वधर्मसमभाव मानणारी, त्याचे जतन करणारी आहे, येथे सर्व धर्माचे सण सारख्याच उत्साहाने साजरे होतात. चित्रपटसृष्टीत सलमान खान, हृतिक रोशन यांच्याही घरी गणपती पूजन होते. सर्व समाजाला एकत्र आणणारा असा हा महत्त्वाचा सण आहे. मी आणि राज तर आमच्या घरच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होतो. खरे तर तेव्हा या पाहुण्याला निरोप देताना मन भरून येते, खूप खूप दु:ख होते, डोळ्यात पाणी येते. पण या वाटण्यातच गणेशाप्रतीची श्रद्धा दडली आहे.

दोन दिवस फक्त गणपतीसाठी – श्रद्धा कपूर
आमच्या जुहूच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी तरी वर्षभर या सणाची प्रचंड आतुरतेने वाट पाहात असते, म्हणूनच तर प्रत्येक वर्षी गणपतीला निरोप देताना मी गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या हे अगदी मनोमन सांगते. वडील पंजाबी आणि आई मराठी त्यामुळे आमच्या कुटुंबात दोन्ही प्रकारचे बरेचसे सण साजरे होतात. पण त्यात गणपती खासच. माझी कितीतरी मित्र-मंडळी, नातेवाईक आवर्जून या दीड दिवसात घरी हजेरी लावतात. आमच्या या घरच्या गणपतीची सगळी सजावट मी आवर्जून पुढाकार घेऊन करते. परळच्या एका दुकानातून त्यासाठीचे सामान घेऊन येते. गेल्या दीड-दोन वर्षांत मी चित्रपटाच्या क्षेत्रात खूपच कार्यरत झाले असले तरी ‘घरच्या गणपती’साठी मी आवर्जून वेळ काढते. या वर्षी तर ‘हैदर’च्या पूर्वप्रसिद्धीतून वेळ काढून तीन-चार दिवस गणपतीसाठी द्यायचे आहेत आणि त्यात गैर ते काय? बाप्पावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. त्याच्यामुळेच मला हे यश लाभत आहे, असे मी मानते. अगदी आता हिंदी चित्रपटाची अभिनेत्री असे माझ्याभोवती वलय आले असले तरी मी आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत आवर्जून सहभाग घेणारच.  मी ‘चित्रपट अभिनेत्री’ असले तरी मी अगोदर एक व्यक्ती आहे, श्रीगणेशाची खरी भक्त आहे, हे मी का विसरू? या दीड दिवसात गोड खाण्यावर मी कसलेच नियंत्रण ठेवत नाही, पण जास्त पसंती उकडीच्या मोदकांना देते. मला मोदक खूप आवडतात आणि अजिबात न मोजता ते मी खाते.

स्वत बनवलेली मूर्ती हेच विशेष – – सौरभ गोखले
माझ्या पुण्यातील घरी अगदी आजोबा-पणजोबांपासून दीड दिवसांचा गणपती येतो व त्याची काही खास वैशिष्टय़ेदेखील आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे शिसवीचा देव्हारा आहे, दीडशे वर्षे वगैरे तो जुना असावा आणि आता इतका जुना देव्हारा कोणाकडे पाह्य़ला मिळेल असे वाटत नाही. तो कायमस्वरूपी असल्याने मला व माझी पत्नी अनुजाला काही वेगळी सजावट करावी लागत नाही. खरं तर घरच्या गणपतीला वारेमाप सजावट करून झाकू नये असे माझे मत आहे, त्यासाठी मोठ-मोठे सार्वजनिक श्रीगणेशोत्सव आहेतच. मी प्रत्येक वर्षी पुणे शहरातील ‘मानाचे पहिले पाच गणपती’ पाहायला आवर्जून जातो, त्या सुबक व प्रभावी मूर्ती आणि आकर्षक सजावट याचे मला विशेष आकर्षण आहे. या वर्षीच्या आमच्या घरच्या श्रीगणेशमूर्तीचे विशेष म्हणजे, माझ्या चित्रकार बाबांनी पद्मासन घातलेली मूर्ती शाडूपासून तयार केली आहे. हात मोकळे सोडून बसलेली ही मूर्ती या वर्षीचे आमचे विशेष आहे. आम्ही शाडूच्याच मूर्तीला प्राधान्य देतो, मी स्वत: तशी बनवलेली मूर्ती माझ्या आत्याच्या घरी बसेल. घरचा गणपती म्हटला की, दिवसभर नातेवाईकांची गर्दी व रात्री आरती हे ठरलेलेच. त्या परंपरेचा आनंद घ्यावा, प्रेरणा घ्यावी व आपल्या पुढील वाटचालीकडे लक्ष द्यावे, असे माझे मत आहे. अनुजा यासाठी आपल्या ‘लगोरी’ मालिकेतून थोडा वेळ काढून येईलच व मी सध्या ‘राधा ही बावरी’मधून थोडासा मोकळा झालेलो आहेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:08 am

Web Title: celebrities and their ganesha
Next Stories
1 व्हिवा वॉल : गणेशोत्सव मनातला
2 यंदाचा फेस्टिव्ह ट्रेंड : साधं पण ‘क्लासी’
3 ओपन अप : प्रेमभंग
Just Now!
X