गायत्री हसबनीस
करोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षी भले मोठे सोहळे रद्द झाले होते त्यामुळे ना भेटीगाठी, ना मीडिया, ना रेड कार्पेट आणि ना कसलाच उत्साह! त्याचीच उणीव भरून काढायची म्हणून यंदा हेच सोहळे साग्रसंगीत साजरे व्हावेत यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे. अर्थात, वैश्विक महामारीच्या या कठीण काळात सर्व प्रकारची काळजी घेत पार पडणाऱ्या या सोहळ्यांमध्ये यंदाचा कान महोत्सव सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.  मुखपट्टय़ांना सुट्टी देत आकर्षक फॅशन करत तारेतारकांची मांदियाळी कानच्या रेड कार्पेटवर अवतरली..

यंदाच्या कान महोत्सवात नामवंत अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी केलेली फॅशन ही आउट ऑफ द बॉक्स अशी होती. बऱ्याचदा या व्यासपीठावर के ल्या जाणाऱ्या फॅ शनला टीके चाही सामना करावा लागतो. फॅशनमध्ये कला असायला हवी, थोडा जरी अतरंगीपणा जाणवला तर त्या फॅशनला ट्रोलही केले जाते. त्याप्रमाणे यंदाच्या फॅशनला ट्रोलर्सनी ट्रोलदेखील केले आहे. यंदा सर्वात जास्त चर्चा रंगली ती अमेरिकन मॉडेल बेला हदीद हिने परिधान केलेल्या काळ्या गाऊनची. तिने ड्रॅमेटिक शापर्हेली गाऊन घातला होता. ‘हार्पर्स बाजार’नुसार तिचा लुक मोस्ट स्टनिंग लुक ठरला. तिने नेकलाइन कट असलेला फॉर्म – फिटिंग ब्लॅक वुल ड्रेस आणि त्यावर गोल्ड डीप्ड नेकलेस ज्यावर राईनस्टोन्स होते असा लुक केला होता. तिच्या नेकलेसचा आकार हा फुप्फुसांप्रमाणे होता. रुबी रिंग्स आणि रुबी इअरिंग्ज घालत तिने आपला लुक पूर्ण के ला होता. फ्रेंच मॉडेल टीना कुनाकी हिचा लुकही वेगळा होता. तिने लव्हेंडर रंगाचा टॉप तिच्या खांद्यावरून आणि डोक्यावरून गुंडाळला होता आणि कमरेला लाल रंगाचा बो घेऊन तो बांधला होता. तिचा स्कर्टही उठावदार रंगाचा म्हणजे गडद जांभळ्या रंगाचा होता.

कानच्या रेड कार्पेटवर स्त्री आणि पुरुष दोन्ही प्रकारच्या फॅ शनमध्ये काळ्या रंगाचा वापर जास्त पाहायला मिळाला. खरंतर रेड कार्पेटवर काळ्या किंवा पांढऱ्याशुभ्र रंगांचे आऊटफिट्स हे जास्त आकर्षक वाटतात, मात्र यंदाच्या फॅ शनची तुलना ही मेट गाला फॅ शनशी के ली गेली.तिथे ज्या प्रकारे ब्राइट आणि उठावदार रंग आणि काहीशी आऊट ऑफ बॉक्स फॅ शन दिसते तशीच कानमध्ये पहायला मिळाली. बऱ्याच कलाकारांची फॅ शन आऊट ऑफ द थीम गेली आहे की काय? हा लुक मेट गालाचा आहे की कानचा?, अशा चर्चेला एकच उधाण आले आहे. उदाहरणार्थ, अभिनेत्री एलिना लेनिना हिची भलीमोठी केशरचना पाहून बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला. खरंतर तिने यापूर्वीही असे लुक्स उत्तमरीत्या कॅरी केले होते. समजा तुम्ही प्लेन ब्लेझर घातला आहे, त्यावर ना काही नक्षी ना कोरीवकाम. एका बाजूने तुमच्या त्या ब्लेझरवर रंगांचे फवारे उडाले तर तुम्ही कसे दिसाल? होय, तसेच लुक या महोत्सवात प्रसिद्ध दिग्दर्शक स्पाईक ली यांनी के ला होता. त्यांनी त्यांचा लुक स्निकर्स आणि सिग्नेचर सनग्लासेस घालून पूर्ण केला होता.

अमेरिकेन अभिनेता थिमोदी श्ॉलामे आणि स्कॉटिश अभिनेत्री टिल्डा स्विन्टन यांच्या लुकनी मात्र सगळ्यांवर मात के ली. थिमोदी याने घातलेला ब्लेझर सिंपल आणि एलिगंट होता. त्याच्या ग्लिटर लुकमुळे तो अधिकच खुलून दिसत होता. त्याच्या गोंडस चेहऱ्यामुळे आधीच तो चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहे, त्यात त्याच्या हास्यावरही बरेच जण फिदा आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याच्यावरच खिळले  होते. मेन्सवेअर फॅशनमध्ये तोच जास्त भाव खाऊन गेला. तर दुसरीकडे वयाची साठी ओलांडलेल्या टिल्डा स्विन्टनचा फंकी आणि मॉडर्न लुक व तिच्या एलिगंटली फॅशन कॅरी करण्याच्या ख्यातीमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. तिचा लुक एन्ड्रोजेनस होता. तिने कोरल कलर्ड जॅकेट्सबरोबर टॅन्गरिन ट्राऊझर्स परिधान के ली होती. जॅकेटच्या आत तिने सिक्विन टॉप घातला होता.

नामवंत तारेतारका आणि त्यांचे अफलातून लुक्स यांनी रेड कार्पेट खुलले होते. एके क व्यक्ती दोनपेक्षा अधिक लुक्ससह रेड कार्पेटवर अवतरली होती. त्यामुळे गाजलेली फॅशन आणि लुक्स यांचा विचार करता एक भलीमोठी यादी तयार होईल. भल्यामोठय़ा साग्रसंगीत फॅशनच्या बरोबरीने अगदी साधे, सरळ दिसणारे त्याहीपेक्षा कम्फर्टेबल असे लुक्सही खूप जणांनी कॅरी केले होते. काहींचे लुक्स हे लक्झरियस होते. ज्वेलरीमध्ये मात्र डायमंडला जास्त प्राधान्य होते, तर चपला आणि बॅग्ज कॅज्युअल होत्या. अभिनेत्री शेरॉन स्टोनचा बॉल गाऊन हा मूड रिफ्रे श करणारा होता, साठीच्या पुढची  ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळे आजही तरुणाईची लाडकी ठरली आहे. प्रत्येक तरुणीला हवाहवासा वाटणारा असा तिचा फ्लोरल गाऊन खूप सुंदर होता. समाजमाध्यमांमुळे फॅ शनचे कौतुक जेवढे होते तेवढेच ट्रोलिंगही होते. मात्र कानच्या फॅ शनची क्रे झ ही कायम तशीच राहील यात शंका नाही. कल्पना आणि कलात्मकता यांचा अनोखा मिलाफ फॅ शनच्या कानवारीत अनुभवायला मिळतो.  फॅ शनच्या बदलत्या परिभाषेची झलक दाखवणारी ही कानवारी म्हणूनच वैशिष्टय़पूर्ण ठरते.