vn23
vn24चित्रपटाच्या दुनियेत पुरस्कार सोहळे लक्षवेधी असतात. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महत्त्वाचे सगळे सोहळे पार पडले आहेत आणि आता चर्चा होतेय या सोहळ्यांमध्ये झळकलेल्या सेलिब्रिटींच्या रेड कार्पेट लुक्सची. कुणाची स्टाइल यंदा हिट ठरली आणि कुणाचा लुक फ्लॉप ठरला याची बित्तंबातमी.
नव्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच डिझायनर्सचे फोन खणाणू लागतात ते, अवॉर्ड्ससाठी रेड कार्पेट गाऊन्सच्या मागणीसाठी.. स्वप्निल शिंदे, रॉकी एस, फाल्गुनी-पिकॉक अशी काही खास डिझायनर्सची फौज हा संपूर्ण रेड कार्पेट लुक डिझाइन करण्याच्या मागे जुंपलेला असतो. या डिझायनर्सना सेलेब्रिटीसाठी केवळ जाऊन डिझाइन करायचे नसतात, तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या काळात होणाऱ्या तब्बल सहा ते सात अवॉर्ड फंक्शन्समध्ये प्रत्येक सेलेब्रिटीचा लुक हा तिच्या आधीच्या लुकपेक्षा वेगळा असेल याची काळजी घ्यावीच लागते. पण त्यासोबत तो लुक इतर सेलेब्रिटीशी मॅच होणार नाही याकडेही बारीक लक्ष द्यावे लागते. जर चुकूनही असे झाले, तर त्या डिझायनरची साडेसाती येणं नक्कीचं असतं.
यंदाही नेहमीप्रमाणे या रेड कार्पेटवर सेलेब्रिटीजच्या स्टाईलच्या नाना अदा पाहायला मिळाल्या. दीपिकाची स्टाईल सुरवातीपसून काहीशी गोंधळाची होती. मरर्मेड गाऊनसोबत केलेला ‘वेट हेअर लुक’ तिला फारसा जमला नाही. त्यानंतर एका अवॉर्ड शोच्यावेळी घातलेली घागरा साडी तिला अजिबात साजेशी नव्हती, पण शेवटच्या सोहळ्यात घातलेल्या व्हाईट गाऊनने मात्र तिने सर्वाकडून थम्स अप मिळविले. आलिया भटचा शार्प कट्सचा ब्लॅक गाऊन भाव खाऊन गेला, तर दुसरीकडे आदिती राव हैदरीही ब्लॅक एजी गाऊनमध्ये लक्ष वेधून घेत होती. प्रियांकाचा ‘गाऊन विथ हूड’ यावेळी चर्चेचा विषय होता, पण त्यात ‘काही करायचे राहून गेले..’ अशीच कित्येक डिझायनर्सची प्रतिक्रिया होती. गाऊनमधील ‘मरर्मेड’ स्टाईल सर्वात पॉप्युलर ठरली. इंडियन लुक यंदा फारसा दिसला नाही, पण तब्बूने घातलेली ‘सिंपल येट एलिगंट’ लाल साडी नक्कीच नोंद घेण्यासारखी होती. यंग ब्रिगेडिअरमध्ये आलियाने तिच्या लुक्समध्ये विविधता आणण्याचा छान प्रयत्न केला, पण श्रद्धा कपूरने मात्र सावध खेळी खेळली होती.
यंदाच्या रेड कार्पेट लुक्सबद्दल बोलताना डिझायनर स्वप्निल शिंदे याने साठ आणि सत्तरीच्या दशकातील रेट्रो लुक जास्त पॉप्युलर असल्याचे सांगितले. सोफिया चौधरी, दीपिका पदुकोन यांनी हा रेट्रो लुक दिमाखात मिरविला. ‘कलर्सच्या बाबतीत यंदा नक्कीच प्रयोग केले गेले. नेहमीच्या लाल, निळ्या रंगाऐवजी ऑरेंज, पेस्टल शेड्स जास्त पाहायला मिळाले. मागच्या सीझनमधील कटआऊट गाऊन्स यंदा काहीसे मागे पडले असले, तरी त्यांची जागा यंदा ‘शार्प बॉडीकट’ गाऊन्सनी घेतली होती’, असे स्वप्निल सांगतो. एम्ब्रॉयडरी केलेले गाऊन्सही गर्दीत मागे पडले होते. अर्थात नेहमीप्रमाणे डिप नेकलाईन्स आणि बॅकलेस गाऊन्सची चलती होतीच, पण त्यासोबत ‘क्लासिक लुक’ कॅरी करणं स्टार्सनी यंदा पसंत केल्याचे तो सांगतो. कुठल्याही अवॉर्ड शोचा रेड कार्पेट सोहळा हा सर्वात देखणा सोहळा असतो. त्यामुळे अशा सोहळ्यांमध्ये आपले बॉडी कव्ह्र्स मिरविण्यास सेलेब्रिटीज जास्त पसंती देतात. त्यामुळे एक्सपरिमेंटल गाऊन्सना जास्त पसंती देतात. पण इंडियन लुकमध्ये एका पातळीनंतर प्रयोग करण्यासारखं फारसं हातात काहीचं नसतं, त्यामुळे ते या स्पर्धेत काहीसे मागे पडतात, असे त्याचे मत होते. नाही म्हणायला सोनम कपूरने इंडियन लुक ट्राय केला आणि त्याचे कौतूकही झाले, तो लुकही तिच्या मागच्या वर्षीच्या कान्सच्या लुक्सशी मिळताजुळता होता. त्यामुळे फॅशन समीक्षक काहीसे नाराज होते.
पुरुषांच्या बाबतीत अजूनही टक्सिडो आणि ब्लेझरच्या पुढे जाण्याचे नाव कोणीच काढत नसल्याचे तो सांगतो. नाही म्हणायला यंदा यंग ब्रिगेडियरने पेस्टल शेडचे सूट्स घातले होते, तो एक मोठा बदल म्हणावा लागेल.
    –
छायाचित्रे : या वर्षीच्या सर्व पुरस्कार सोहळ्यात वेस्टर्न लुकची चलती होती.   सोनम कपूर (१) मात्र त्याला अपवाद होती. जॅकलिन फर्नाडिस (२), श्रद्धा कपूर (३) यांची सावध तरीही स्मार्ट फॅशन भाव खाऊन गेली. ‘मर्मेड स्टाइल’ गाऊन या वर्षी रेड कार्पेटवर हिट होते. दीपिका पदुकोणच्या (४) याच स्टाइलच्या व्हाइट गाऊनला अनेकांचे थम्सअप मिळाले. आलियाचा (५) शार्प कटचा गाऊनही स्मार्ट ठरला. प्रियांकाचा (६) गाऊन विथ हूड लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला.