विनय नारकर

काळी ग चंद्रकळा दोन्ही पदर सारक

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

हौशा कांताची पारक

मराठी साडय़ांच्या बऱ्याच परंपरांमध्ये साडीला दोन्ही बाजूंनी पदर असायचा. साडी वापरून वापरून जेव्हा साडीचा पदर खराब होई, तेव्हा साडी टाकून न देता परत वापरता यावी म्हणून साडय़ांना आतल्या बाजूलाही पदर असायचा. मुख्य पदर जर जीर्ण झाला तर आतल्या बाजूचा पदर मुख्य पदर म्हणून ठेवून साडी वापरता यायची. आजही बऱ्याचशा इरकली साडय़ांमध्ये दोन्ही बाजूला पदर असतो. अशा साडय़ांमध्ये सहसा आतला पदर हा साधा असतो. मुख्य पदराएवढा मोठा वा भरजरी नसतो. या ओवीमध्येही चंद्रकळेला दोन पदर असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे या चंद्रकळेला दोन्ही बाजूंना सारखाच पदर असल्याचे सांगितले आहे. आतला पदर साधाच असतो या समजुतीला छेद देणारी ही नोंद आहे. हौशी नवरा चंद्रकळा घेताना या बाबीची खातरजमा करून घेतो, असं ही ओवीकर्ती अभिमानाने या ओवीतून सांगते आहे.

काळी चंद्रकळा पदरी राम नाम

रोज नेस माझी आण

या ओवीमध्ये चंद्रकळेच्या पदरावर ‘राम’ नाम असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत पाहिलेल्या चंद्रकळांपेक्षा वेगळा असा हा प्रकार आहे. पदरावर राम नाम लिहिण्याची परंपरा ही ‘कशिदाकारी’मधून आली आहे. पदरावर कशिद्याने राम नाम काढले जायचे.

काळी चंद्रकळा   पदरी रामबाण

नेसली सूर्यपान  उषाताई

काळी चंद्रकळा   दोन्ही पदर रामसीता

नेसली पतिव्रता  उषाताई

चंद्रकळेच्या पदराला मोत्यांचे अलंकरण असलेलेही बरेच उल्लेख सापडतात.

काळी चंद्रकळा   पदरी मोती घस

रोज रोज लाडे नेस       काळी चंद्रकळा

पदरी मोतीजाळी  नेसली सायंकाळी

उषाताई

चंद्रकळेच्या पदरावर कशिदाकारी, मोती याशिवाय आरसे, म्हणजेच भिंगे लावण्याचीही तऱ्हा होती.

काळी चंद्रकळा, नेसते गांठीवरी

गनिस बंधुजी, पदर भिंगाचा पाठीवरी

चंद्रकळेच्या पदरावर प्रकाश टाकणारे काही उखाणेही प्रचलित होते.

अहमदाबादी चंद्रकळा, तिला मोत्यांचा पदर

——— रावांच्या जिवावर हळदीकुंकवाचा गजर

काळी चंद्रकळा तिला मोतीचूर पदर

——— रावांच्या जिवावर हळद कुंकवाचा गजर

या उखाण्यात ‘मोतीचूर पदर’ असा उल्लेख आहे. वस्त्र आरेखन परंपरेमध्ये तुटक रेषेसारखी दिसणारी एक नक्षी बरीच प्रचलित आहे. या नक्षीचा वापर साडीच्या काठांमध्ये आणि पदरामध्ये होतो. पदराच्या अलंकरणाबद्दल सांगणाऱ्या या काही ओव्या आहेत. या ओव्यांमुळे चंद्रकळेच्या पदराबद्दल अंदाज येऊन, या साडीचे स्वरूप लक्षात येण्यासाठी ही माहिती किती उपयोगी आहे याचे प्रत्यंतर येते. एवढेच नव्हे तर चंद्रकळा जिथे विणली जायची त्या ठिकाणाच्या नावावरून पडलेल्या वाणाचे नावही ओव्यांमध्ये सांगितले गेले आहे.

तांबडी चंद्रकळा     अमदाबाजी पदर

बंधवानी माझ्या     कुठं टाकिली गदर

काळी चंद्रकळा तिचा पदर ममई

बाळे तुझ्या बापाची कमाई

काळी चंद्रकळा पदरावरी मासा

माझ्या बाळाबाई, गोकाकी रंग खासा

चंद्रकळेच्या रचनेच्या दृष्टीने एवढय़ा सगळ्या बाबींबद्दल बोलणाऱ्या ओव्या साडीच्या पोताबद्दल बोलणार नाहीत हे संभवतच नव्हते.

काळी चंद्रकळा पोत किती मऊ

घेणार बंधुजी व्यापारी माझा भाऊ !

चंद्रकळेच्या मऊ पोताबद्दल सांगणाऱ्या काही ओव्या आहेत. काही ओव्यांमधून चंद्रकळेच्या पारदर्शक पोताबद्दल सांगितले आहे. असा पोत चंदेरी साडीचा असू शकतो.

काळी चंद्रकळा  नेसतां अंग दिसं

गोरे बाळाबाई, दृष्ट होते खाली बैस

चंद्रकळेच्या रचनावैशिष्टय़ांचे वर्णन करणाऱ्या या ओव्यांशिवाय इतरही काही ओव्या आहेत. यातल्या काही ओव्या चंद्रकळा जिथे विणली जायची किंवा ज्या बाजारात ती मिळायची त्या गावांची नावे सांगतात.

भावोजी हो दीरा  सांगत होत्ये नानापरी

स्वस्त झाल्या राजापुरी    चंद्रकळा

तांबडी चंद्रकळा     येवढी वाण्याच्या दुकाना

बांधव माझा सखा     सोलापूरच्या मुक्कामा

तांबडी चंद्रकळा     रुपये दिलेत हजार

बंधवान केला     मिरजेचा बाजार

काही ओव्या चंद्रकळेच्या किमतीबद्दल आहेत. पण त्यातून चंद्रकळेच्या किमतीचा नेमका अंदाज येत नाही.

काळी चंद्रकळा, चाटी सांगतो साडेबारा

बंधु किती सांगू, घडी उचल तालेवारा

तांबडी चंद्रकळा     घ्यायला होते मन

शिंपी सांगतो     भाव सव्वादोन

चंद्रकळेची खरेदी हा स्त्रियांच्या अगदी आनंदाचा भाग. हा आनंद साजरा करणाऱ्या ओव्याही लिहिल्या गेल्या.

चाटय़ाच्या दुकानी, चंद्रकळा डोळं मोडी

मन रुतलं घाला घडी

चाटय़ाच्या दुकानी चंद्रकळाची लुगडी

बयाला देखुन चाटी दुकान उघडी

या चंद्रकळेसाठी किती झुरत राहणार, ही हौस भागवायची म्हणजे आपल्या जिवाभावाच्या माणसालाच गळ घातली पाहिजे. अशा जवळच्या व्यक्ती म्हणजे भाऊ, भरतार, दीर.. भावाकडे चंद्रकळेची मागणी करणाऱ्या अनेक ओव्या आहेत. या ओव्यांमधून बहीण-भावाचे प्रेम, खटय़ाळपणा दिसतो आणि या ओव्या जास्त खुमासदार होतात.

काळी चंद्रकळा, उंच मोलाची काढूं नका

भीड हरीला घालूं नका

काळी चंद्रकळा, नका दिंडाच्या आड ठेवूं

न्हाई मी मागत, बंधुजी नका भिऊ

काळी चंद्रकळा पोत किती मऊ

घेणार बंधुजी व्यापारी माझा भाऊ !

तांबडी चंद्रकळा     भडकं मारिते पदराला

बंधू माझा घरी नाही     शिंपी राहिना उधाराला

काळी चंद्रकळा     नेसता लागे मऊ

भूषणाजोगे भाऊ    राज्यधर

काळी गं चंद्रकळा ।      लेवूं वाटली जिवाला ॥

आलाय् रंगारी गांवाला। घ्यावा लावीतो भावाला॥

भरतार (पति)

काळी चंद्रकळा माझ्या मनांत घ्यावी होती

हौशा भरतारानं आणिली अंगमती

हौशा भरतार हौस करी मनामंदी

काळी चंद्रकळा घेतो बाळंतपनानंदी

दीर

काळी चंद्रकळा पदरावरी मोर

हौशी घेणार माझे दीर

अशा प्रकारे, चंद्रकळा या विषयाच्या जवळपास सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या ओव्या लिहिल्या गेल्या आहेत. काही बाबतींत सविस्तर वर्णनं आली आहेत तर काही बाबतीत विषयाला ओझरता का होईना स्पर्श केला गेला आहे. हे मोठंच काम लोकगीतं लिहिणाऱ्या स्त्रियांनी करून ठेवले आहे.

आपल्या समाजातील वस्त्र परंपरांचं दर्शन या लोकसाहित्याद्वारे आपल्याला होतं. वस्त्र हा आपल्या समाजमनाच्या किती जिव्हाळ्याचा भाग होता, हे या लोकसाहित्यातून दिसून येतं. नरहर कुरुंदकरांनी प्रतिपादन केले होते की, लोकसाहित्याचे महत्त्व हे, ते साहित्य सांस्कृतिक संचयावर प्रकाश टाकण्यास कुठवर उपयुक्त होते, यांवर ठरते. हा सगळा ऊहापोह करून पाहताना या निकषावर ओवी साहित्य हे किती प्रभावी आहे आपल्या लक्षात येते.

वस्त्र परंपरांचा अभ्यासक म्हणून मला ओवी साहित्याचा जितका उपयोग होतो, तितकाच एक वस्त्र आरेखनकार म्हणून काम करतानाही होतो. ओवी साहित्यात आलेले काठांबद्दलच्या, पदराबद्दलच्या किंवा नक्षीबद्दलच्या सखोल निरीक्षणाचा, मला या वस्त्र परंपरांवर काम करताना, यांवर आधारित वस्त्रे बनवताना अतिशय उपयोग होतो.

या लोकसाहित्याचा उपयोग जसा चंद्रकळा ही वस्त्र परंपरा समजून घ्यायला झाला तसाच अन्य वस्त्र परंपरांचा अभ्यासासही होत आहे. काही ओव्यांमधून उलगडलेल्या एका रोमांचकारी प्रवासाबद्दल जाणून घेता येईल पुढच्या लेखातून.

viva@expressindia.com