विनय नारकर

चंद्रकळा ही खास मराठी साडी. महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेतील, मराठी स्त्रियांच्या मनातील हळवा कोपरा म्हणजे ‘चंद्रकळा’. सातशे—आठशे वर्षांपूर्वीच्या काळाला आपल्याशी जोडणारा दुवा म्हणजे चंद्रकळा. मराठी स्त्रियांच्या भावविश्वात इतकी वर्षे अढळ स्थान असणारी साडी म्हणजे चंद्रकळा.

Gajanan Kirtikar criticizes Narendra Modi for guarding Parliament
संसद ताब्यात घ्या; पण मित्रपक्षांचाही मान राखा! शिंदे गटाचे खासदार कीर्तिकर यांचा मोदींना टोला
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about Imbalance of development in vidarbha
मुद्दा महाराष्ट्राचा : विदर्भ- असमतोलाची अस्वस्थता…

महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरांचा ज्ञात इतिहास साधारण दोन हजार वर्षांचा आहे. या कालावधीत कित्येक परंपरा बनल्या व नष्ट झाल्या असतील. यादवकाळातील ‘शिशुपाल वध’ या भास्करभट्ट बोरीकर यांच्या ग्रंथात चंद्रकळेचा उल्लेख सापडतो,

मृणालसुताचे वोलीसेले :

तुआं खासटे म्हणौनि वेढूं सांडिले

तीए चंद्रकळेसि काइ जालें : कैसि धाटे साहृति असे ॥

मराठी भाषेत साहित्य निर्माण होऊ लागलं, तेव्हापासूनच वस्त्रांचे संदर्भ आणि उल्लेख मराठी साहित्यातून दिसून येतात. मराठीतील आद्य कवयित्री महदंबा यांच्या ‘धवळ्या’ या ग्रंथात तत्कालीन वस्त्रांचे उल्लेख आले आहेत. त्याच काळातील कवी नरेंद्र यांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या रचनेमध्येही वस्त्रांचे उल्लेख आहेत. तत्कालीन वस्त्रप्रकारांच्या नावांसाठी हे उल्लेख महत्त्वाचे आहेत. कोण कोणत्या पात्रांनी कोणती वस्त्रे परिधान केली होती, या प्रकारचे हे उल्लेख आहेत. या वस्त्र प्रकारांच्या ऐतिहासिकतेसाठी हे उल्लेख महत्त्वाचे आहेत.

सोळाव्या शतकातील संतकवी एकनाथांच्या रचनांमधूनही वस्त्रप्रकार आपल्यासमोर येतात. विविध वस्त्रांचा साज ल्यालेल्या गवळणी एकनाथांनी वर्णिल्या आहेत.

दुसरी गौळण भाळी भोळी  रंग हळदीहून पिवळी

पिवळा पितांबर नेसून आली  आंगी बुट्टेदार चोळी

तिसरी गौळण रंग काळा   नेसून चंद्रकळा

काळे काजळ लेऊन डोळां  रंग तिचा सांवळा

आणखी एका गौळणीमध्ये तर फक्त चंद्रकळेचंच वर्णन येतं. ती म्हणजे,

नेसले गं बाई मी    चंद्रकळा ठिपक्याची

तिरपी नजर माझ्यावर या   सावळ्या कृष्णाची

उपरोक्त उल्लेखांवरून ‘चंद्रकळा’ ही मुख्य साडय़ांपैकी एक होती हे आपल्याला समजू शकते.

चंद्रकळा या साडीबद्दल किती तरी प्रकारच्या ओव्या व गाणी आहेत. चंद्रकळा ही स्त्रियांच्या भावविश्वाचा भाग कशी होती, हे आणि  आणखीही बऱ्याच गोष्टी या लोकगीतांमधून आपल्याला समजतात.

काळी चंद्रकळा

जसे रात्रीचे गगन

घेणाऱ्याचे मन मोठे

दादारायांचे

या ओवीमधून चंद्रकळेचे स्वरूप सांगितले गेले आहे. या ओवीच्या कर्तीने एक प्रकारे चंद्रकळेची व्याख्याच केली आहे. या ओवीने एका ओळीतून, तेही फक्त तीन शब्दांच्या, चंद्रकळेचं रूपंच आपल्या समोर सादर केलं आहे. काळ्या रंगाचा आणि चंद्रकळेचा अन्योन्य संबंध तर सर्वश्रुतच आहे. ‘जसे रात्रीचे गगन’ यामधून चंद्रकळेमध्ये रात्रीचे आकाश दाखवण्यात येते, हे आपल्याला समजते. विणकामातून हे कसे दाखवायचे? वस्त्रकलेच्या भाषेत हे दाखवायचे तर कसे दाखवणार? तर रंग आणि बुट्टय़ांच्या भाषेत. चंद्रकळेमध्ये चंद्र, चांदण्या अशा बुट्टी असतील असा अंदाज आपल्याला बांधता येतो. प्रसिद्ध चित्रकार धुरंधर यांच्या ‘लेडी इन चंद्रकळा’ या चित्रात चित्रित करण्यात आलेल्या चंद्रकळेवर चंद्र आणि चांदणी अशी बुट्टी आहे.

साधारण पन्नास—साठ वर्षांंपूर्वीपर्यंत खडी असलेली चंद्रकळा मिळायची. यांवर काळ्या किंवा अन्य रंगांवरही चांदणीच्या आकाराची खडी काढलेली असायची. ही खडी छपाईद्वारे काढली जायची.

शांता शेळकेंनी ही आठवणही काव्यबद्ध केली आहे.

गोऱ्या गोऱ्या वहिनीला अंधाराची साडी

अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी

काही पारंपरिक उखाण्यातही चंद्रकळेचे सुरेख वर्णन येते.

काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके

——— रावांच्या हातात गुलाबाचे झुबके

काळ्या चंद्रकळेवर ताऱ्यासारख्या टिकल्या

——— रावांच्या मळ्यांत खूप तुरी पिकल्या

एखाद्या साडीमध्ये ‘रात्रीचे गगन’ दाखवण्यामागे काय प्रेरणा असू शकेल.. का तो केवळ वस्त्राच्या अलंकरणाचा एक प्रकार आहे? पारंपरिक वस्त्रकलेमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांचा काहीतरी सांकेतिक अर्थ असतो, नेमके संदर्भ असतात, विशिष्ट प्रेरणा असतात. या अंगांनी विचार करता ‘रात्रीचे गगन’ आणखी गूढ वाटू लागले. असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये असलेले काळ्या रंगाचे वावडे. भारतातील बहुतांश भागात, बहुतांश समाजात कोणत्याही शुभ प्रसंगात, सणासुदीला काळा रंग वज्र्य मानला गेला आहे. अर्थात याला अपवाद आहेत. याची कारणे आणि ऐतिहासिकता हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. तर असा हा काळा रंग चंद्रकळा का मिरवते? आणि अशी काळ्या रंगाची रात्र ती का साजरी करते?

काळ्या रंगाबद्दलच्या आपल्या मराठी समाजातल्या प्रथांचा शोध घेता, असे दिसते की मुलीच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट देण्याचा रिवाज आहे. आजही ही प्रथा पाळली जाते. खरे पाहता संक्रांतीला कोणतीही काळी साडी नाही तर, चंद्रकळाच भेट द्यायची प्रथा होती. काळाच्या ओघात चंद्रकळाच नामशेष झाली, मग कोणतीही काळी साडी भेट देणे सुरू झाले. एकप्रकारे या सुरेख प्रथेचा ‘अपभ्रंश’ झाला.

शांता शेळकेंनी त्यांच्या ‘आठवणीतील चंद्रकळा’ या कवितेत संक्रांतीच्या हळदी कुंकवाची आठवण सांगितली आहे. या कवितेत चंद्रकळा आणि संक्रांत यांचा संबंध उलगडला आहे.

आठवणीतील चंद्रकळेवर

हळदीकुं कू डाग पडे

संक्रांतीचे वाण घ्यावया

पदर होतसे सहज पुढे

शांताबाईंनी कवितेचं शीर्षक च ‘आठवणीतील चंद्रकळा’ असे दिले आहे. चंद्रकळा ही साडीच नामशेष झाल्यामुळे त्यांनी अशा शीर्षकाची योजना केली असणार.

तरीपण संक्रांती आणि चंद्रकळा या संबंधामागे नेमका काय संकेत असेल..अन्य कोणत्याही साडीला नाही, चंद्रकळेलाच का महत्त्व या सणाचे? यासाठी संक्रांत या सणाच्या स्वरूपाबद्दल विचार केला पाहिजे. संक्रांत हा सण साजरा करण्यामागे कोणतेही धार्मिक कारण दिसत नाही, कोणत्याही देवतेला समर्पित असा हा सण नाही किंवा या सणाला कोणतेही नवीन वर्ष सुरू होत नाही.

संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो व रात्र छोटी होऊ लागते. म्हणजे संक्रांतीची रात्र ही येणाऱ्या रात्रींपेक्षा सर्वात मोठी असते. ही विशेष रात्र साजरी करण्यासाठी, या रात्रीची आठवण ठेवण्यासाठी ‘चंद्रकळा’ जन्मास आली. यापेक्षा सुंदर आणि कल्पक समर्पण काय असू शकते.. निसर्गातल्या एका महत्त्वाच्या स्थित्यंतराला साजरं करण्यासाठी एक वस्त्र परंपरा जन्मास आली. कोणताही थेट धार्मिक संबंध नसल्यामुळे कदाचित काळ्या रंगाच्या शुभाशुभतेचा प्रश्न निर्माण झाला नसावा. आपल्या समाजाची सौंदर्यासक्ती धार्मिक समजुतींपेक्षा वरचढ ठरली. चंद्रकळेची ही व्युत्पत्ती वस्त्र परंपरांच्या इतिहासातील एक  अतिशय सुंदर उदाहरण आहे.

viva@expressindia.com