07 July 2020

News Flash

‘कांदेपोह्य़ां’चा बदलता ट्रेंड

घरी गडबड सुरू आहे. कांदेपोह्य़ांचा सुंदर वास. फक्कड चहा तयार होतोय आणि साडी नेसून मुलगी तयार आहे.

घरी गडबड सुरू आहे. कांदेपोह्य़ांचा सुंदर वास. फक्कड चहा तयार होतोय आणि साडी नेसून मुलगी तयार आहे. मुलाकडची मंडळी येतात. मुलीच्या आवडीनिवडी, स्वयंपाककौशल्य याची चौकशी करतात, लाजत उत्तरं येतात आणि मग फायनली लग्न ठरतं. हे दृश्य अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत कुठल्याही सामान्य घरात दिसायचं. हा सो कॉल्ड मुलगी बघण्याचा कांदेपोह्य़ांचा कार्यक्रम आता बदलतोय.नुसता मेन्यू बदलतोय असं नाही, तर व्हेन्यूही बदलतोय. कॉफी शॉप्समध्ये (कधीकधी मॉल्स, रेस्टॉरंटही) हल्ली हा कार्यक्रम होतो आणि मुला-मुलींतच मर्यादित असतो.

आताच्या पिढीने हे चहापोह्य़ांचे कार्यक्रम पुरते बाद केलेत. या ‘मुलगी दाखवणे कार्यक्रमा’त मुळात मुलीला काहीच ‘से’ नसायचा आणि त्यामुळे काळानुरूप याचं स्वरूप बदललं. लग्न बदलली, अपेक्षा बदलल्या तसं लग्न ठरवण्याची पद्धतही बदलली आहे. मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा स्वप्निल मांडवीकर म्हणतो, ‘‘मुलगी बघणं किंवा दाखवणं’ असं काही म्हणण्यापेक्षा मुला-मुलींना एकमेकांची अनुरूपता तपासण्याचा हा कार्यक्रम आहे. आजच्या मुली मुलांइतक्याच किंबहुना जास्त सक्षम आहेत. त्यामुळे अशा चहापोह्य़ांच्या कार्यक्रमाचं स्वरूप पूर्ण बदललंय.’’
हल्ली मुलाच्या किंवा मुलीच्या घरी कुटुंबासहित भेटण्यापेक्षा बाहेर कुठेतरी भेटून किंवा एखाद्या कॅजुअल मीटमध्येच एकमेकांची अनुरूपता तपासली जाते. अरेंज्ड मॅरेज करणाऱ्या बहुतेक मुलं-मुली हल्ली असे बाहेरच भेटतात. एकदा नाही, तर अनेकदा भेटतात आणि जर सगळं एकमेकांशी जुळलं तरच कुटुंबांना भेटवतात. तेदेखील कधी लंच किंवा डिनर किंवा इतर कुठल्यातरी निमित्ताने. या भेटण्यात चहापोह्य़ांच्या त्या पूर्वीच्या कार्यक्रमाचा गंधही नसतो. याबाबतीत पुण्यात आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी नेहा गोडबोले सांगते, ‘‘मुलींनाच नाही तर मुलांनासुद्धा आपल्या पालकांसमोर बोलायला ऑकवर्ड होत असणार. त्यामुळे ते सर्वच खरं सांगतील असंही नाही. संस्कार दाखविण्यासाठी साडी नेसून ट्रेमध्ये चहा घेऊन येणंच महत्त्वाच नसतं, तर ते संस्कार वागण्या-बोलण्यातून दिसून येतात. म्हणून टिपिकल कार्यक्रम करण्यापेक्षा एखादी कॅजुअल मीट करावी असं मला वाटतं.’’
मुळात एका भेटीत आपल्याला योग्य जोडीदाराची निवड करणं कठीणच आहे. त्या व्यक्तीशी आपलं पटू शकल की नाही, ज्या वातावरणामध्ये आपण राहतो त्यासोबत ती व्यक्ती अॅडजस्ट करू शकेल की नाही, हे सर्व तपासणं जास्त महत्त्वाचं असतं. मग ते एकाच भेटीत कसं ठरवता येणार? समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी आधी भेटणं बोलणं, आवडीनिवडी, विचार जाणून घेणं तरुणाईला जास्त भावतं. ‘टीच फॉर इंडिया’मधील शिक्षिका प्रांजली हर्डीकर सांगते, ‘‘आजच्या परिस्थितीत तरुणाई अशा बघण्या- दाखवण्याच्या कार्यक्रमात अजिबात कम्फर्टेबल नसते. मी पहिले मुलाला बाहेर भेटीन. या डेटवर जर सगळं जुळलं आणि मी लग्नासाठी तयार असले तर पालकांना विचारेन आणि नॉर्मल आणि इन्फॉर्मल भेटीतून परिवारांना भेटवता येईल. त्यामुळे टिपिकल दाखवण्याच्या कार्यक्रमात करण्यापेक्षा काही वेगळं करावं असं मला वाटतं.’’
शिवा सुभेदारचं मतदेखील काही वेगळं नाही. तो म्हणतो, ‘‘एका भेटीत जोडीदार योग्य आहे की नाही ठरवता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीबरोबर डेटला जाणं आणि तिला समजून घ्यायचा प्रयत्न करणं जास्त पटतं. घरच्यांनीही हे समजून घ्यायला हवं की, मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी भेटत नाहीत तर ते एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटत आहेत. त्यामुळे कदाचित ते लग्नाला नकारही देतील. तो नकार पचवणं गरजेचं आहे. कुठल्याही व्यक्तीला सोशल स्टेट्सवरून, सॅलरी आणि डिग्रीवरून पारखणं चुकीचं आहे. तो तुमच्यासाठी कम्फर्टेबल आहे की नाही हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.’’
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:07 am

Web Title: changing trend of kande pohe
Next Stories
1 आठवणींचा अल्बम
2 ‘बँड-बाजा-वराती’च्या पलीकडे
3 क्लिक
Just Now!
X