News Flash

चीजचाच केक..

चवीने जगणार त्याला

|| सचिन जोशी

‘चीज’ आणि विविध चवींचे ‘केक’ लहानांपासून मोठय़ांपर्यंत आवडीने खाल्ले जातात. आता हे दोन जिन्नस एकत्र जोडा आणि आपल्याला चीज केक मिळेल. चीज घातलेला केक नव्हे तर चीजचाच केक!

चीज केक हे जगभरातील एक प्रिय चविष्ट मिष्टान्न आहे. पुष्कळ लोक असं मानतात की, चीजकेकचं मूळ न्यू यॉर्कमध्ये आहे. पण प्रत्यक्षात त्याची खूपच जुनी ओळख आहे. इतिहासाची पुस्तकं आणि संदर्भ चाळले तर ‘चीज केक’ कदाचित प्रथम ग्रीसच्या समोस बेटावर तयार केले गेले असावेत. उत्खननात सुमारे ईसवी सन पूर्व २००० काळातील चीजचे साचे सापडले होते. ग्रीसमध्ये चीज केक खाणे हे ऊर्जेचा एक चांगला स्रोत मानले जाते आणि म्हणून ७७६ बी.सी.मधील पहिल्या ऑलिम्पिक खेळात खेळाडूंना ते पुरविण्यात आले होते. याचा पुरावाही आहे. त्या काळात वधू आणि वर मंडळी लग्नाच्या केकसाठी चीज केकचीच निवड करत. त्या वेळी पाककृतीमध्ये पीठ, गहू, मध आणि चीज असे साधे साहित्य समाविष्ट करून केक बेक करत असत. सर्वात पहिल्यांदा चीज केक रेसिपी लेखक एथेनियस यांनी सुमारे इसवी सन २३० मध्ये लिहिली. इतिहासाच्या पुस्तकांच्या नोंदींनुसार २००० वर्षांपूर्वी पासून ग्रीसमध्ये चीज केक बनवून सव्‍‌र्ह के ले जात आहेत, परंतु ही सर्वात पहिली लिखित पाककृती आहे. एथेनियसद्वारे लिहिलेली पाककृती ही एक अतिशय मूलभूत कृती होती. त्या पाककृतीत चीज कुटून एकजीव करून मऊ  बनवून एका पितळेच्या भांडय़ात मध आणि गव्हाच्या पिठाबरोबर एकत्र मळून मग हा गोळा गरम करून पुन्हा गार करून सव्‍‌र्ह करत.

रोमने ग्रीसविरुद्ध युद्ध जिंकल्यानंतर युद्धातील लुटींमध्ये चीज केकची ही रेसिपीदेखील होती. रोमन लोकांनी त्यांच्या चवीनुसार पाककृती सुधारली आणि त्यात ठेचलेले चीज आणि अंडी घातली. केक बनवण्याची प्रक्रियादेखील बदलली. त्यांनी पाककृतीसाठी गरम विटांची मदत घेतली. केकचं मिश्रण गरम विटांमध्ये भाजलं आणि चीज केक गरमागरम सव्‍‌र्ह करायला सुरुवात केली.

रोमन साम्राज्य विस्तारित झाल्यानंतर चीज केक रेसिपी इतर अनेक राज्यांपर्यंत गेली. युरोपीय देश आणि ग्रेट ब्रिटनने चीज केक रेसिपीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे चीज केकमध्ये त्यांचे स्वत:चे अनोखे स्वाद जोडले गेले. १८व्या शतकात हळूहळू आपल्याला माहिती असलेल्या चीज केकने आकार घेण्यास सुरुवात केली. युरोपियन लोकांनी यीस्टचा उग्र स्वाद कमी केला. फेटलेल्या अंडय़ांचा वापर करण्यास सुरुवात केली. चीज केकला जेवणानंतरच्या मिठाईच्या स्वरूपात सादर करण्याचे श्रेय देता येऊ  लागले. स्थलांतरित युरोपियन लोकांनी त्यांच्या चीज केकची पाककृती अमेरिकेत आणली.

अमेरिकेने अचानकपणे अनवधानाने ही पाककृती बदलली आणि सध्याच्या लोकप्रिय चीज केकची निर्मिती झाली! १८७२ मध्ये ‘न्यू यॉर्क डेअरी’मधील एक कामगार फ्रेंच चीझ न्युफचेटेलची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न करत होता. त्याऐवजी, अनपेक्षितपणे त्याला एका वेगळ्याच प्रक्रियेचा शोध लागला. ज्यामुळे क्रीम चीज तयार झाले. तेव्हापासून अमेरिकेत चीज केक तयार करण्यासाठी सॉफ्ट क्रीम चीज वापरणे सुरू झाले आणि आजचा चीज केक जन्माला आला.

१९०० च्या दशकात न्यू यॉर्कर्स या मिष्टान्नाच्या प्रेमात पडले. प्रत्यक्षात प्रत्येक रेस्टॉरंटमधील त्यांच्या मेनूमध्ये चीज केकची स्वत:ची आवृत्ती होती. अर्नोल्ड रुबेनला न्यू यॉर्क स्टाइल चीज केक तयार करण्याचे श्रेय दिले जाते. रुबेनचा जन्म जर्मनीमध्ये झाला आणि तो लहानपणीच अमेरिकेत आला. अशी कथा आहे की, रुबेनला एका डिनर पार्टीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते जिथे ‘चीज पाई’ हा पदार्थ सव्‍‌र्ह केला गेला. चीज पाईने प्रभावित होऊन रुबेनने त्या रेसिपीवर प्रयोग सुरू केले आणि त्यातूनच न्यू यॉर्क स्टाइल चीज केकचा शोध लागला!

क्लासिक न्यू यॉर्क स्टाइल चीज केकबरोबर काहीही सव्‍‌र्ह होत नाही. फळे, चॉकलेट सॉस, कॅरेमल चीज केकवर किंवा बाजूला दिले जात नाही. हा सुप्रसिद्ध मऊ सर गुळगुळीत चवीचा केक क्रीम चीज आणि जादा अंडय़ाचे बलक वापरून तयार होतो. संपूर्ण अमेरिकेमध्ये चीज केक्स वेगवेगळ्या प्रकारे दिले जातात. जसं शिकागोमध्ये सॉवर क्रीम घालून चीज केक अधिक क्रीमी बनवला जातो. फिलाडेल्फियामधील चीज केक न्यू यॉर्क स्टाइलपेक्षा हलका आणि जास्त क्रीमी म्हणून ओळखला जातो आणि ते फळ व चॉकलेट सॉस वरून घालून सव्‍‌र्ह केले जाते.

चीज केक दोन थरांत बनवले जातात. केकच्या तळाचा थर चुरलेल्या कुकीज किंवा बिस्किटे किंवा स्पंज केक वापरून बनवतात. तर दुसरा मुख्य आणि सर्वात जाड थर मऊ , ताजे चीज (सामान्यत: क्रीम चीज किंवा रिकोटा प्रकारचे चीज)अंडी आणि साखर यांच्या मिश्रणापासून तयार केला जातो.

चीज केक आज संपूर्ण जगभर पसरला आहे आणि प्रत्येक देश त्याच्या प्रक्रिया व स्वादांनी त्याला नवनवीन रूप देत आहे. इटालियन लोक चीज केकसाठी रिकोटा चीज वापरतात, तर ग्रीक फेटा चीज वापरतात. जर्मन कॉटेज चीज पसंत करतात, तर जपानी लोक कॉर्नस्टार्च आणि अंडय़ाचे पांढरे मिश्रण असलेले चीज वापरतात. या सर्व देशांच्या बरोबर भारतसुद्धा चीज केकच्या स्वत:च्या चवीत मागे नाही.

भारतातही चीज केकची स्वत:ची आवृत्ती आहे. ओडिशामधील ‘चेन्ना पोडा’ हा चीज केक कॉटेज चीज (पनीर), साखर आणि काजू यांचे मिश्रण बेक करून बनवतात. कुठल्याही आकारात कापून हे आपण सव्‍‌र्ह करू शकता आणि ही मिठाई सगळ्यांना आवडणारच! ४००० वर्षांपूर्वीच्या त्याच्या जन्मापासून आजपर्यंतच्या स्टाईलच्या सगळ्या चवींनी जगभरातील लोकांच्या मनात टिकाव धरून सर्वाना जिंकलंय!

जपानी चीज केक

साहित्य : ७ चमचे लोणी (१०० ग्रॅम), क्रीम चीज १०० ग्रॅम, अर्धा कप दूध (१३० मिली), ८ अंडय़ांचे बलक, पाव कप पीठ (६० ग्रॅम), पाव कप कॉर्नस्टार्च (६० ग्रॅम), १३ मोठय़ा अंडय़ांचा पांढरा भाग, २/३ कप  साखर (१३० ग्रॅम), बेकिंगसाठी गरम पाणी, सव्‍‌र्ह करण्यासाठी पिठी साखर आणि स्ट्रॉबेरी.

कृती : ओव्हनला ३२० डिग्री फॅ रनहीटवर (१६० डिग्री सेल्सिअस) गरम करा. मध्यम गॅसवर लहान भांडय़ामध्ये लोणी, क्रीम चीज आणि दूध, पीठ एकत्र करून गुळगुळीत मिश्रण करा. मिश्रण थंड होऊ  द्या. मोठय़ा वाडग्यात अंडय़ाचे बलक फेटून घ्या. मग हळूवारपणे एकत्र होईपर्यंत क्रीम चीज या अंडय़ात ओता आणि एकत्र एकजीव करा. पीठ आणि कॉर्नस्टार्च चाळून मिश्रणात घाला आणि गुठळ्या नाहीत याची खात्री करून एकत्र मिसळा. दुसऱ्या मोठय़ा वाडग्यात, अंडय़ाचा पांढरा भाग हॅण्ड मिक्सरने फेटा आणि आता मऊ  काटेदार टोकं या फेटलेल्या अंडय़ावर येतील. त्यात साखर घालून ते फेटत राहा. या मिश्रणावर आता टोकं येतील ती जरा जाडसर कडक असतील. एकूण अंडय़ांपैकी पाव भाग फेटलेले अंडय़ाचे पांढरे आणि अंडय़ातील पिवळे बलक मिश्रण एकत्र करून मिसळा आणि नंतर एकत्र होईपर्यंत पुन्हा उर्वरित फेटलेले अंडय़ाचे पांढऱ्यासह पिवळा बलक मिक्स करा.

२३ सेंटीमीटर गोल केक पॅनच्या तळाला तेल लावा, त्यानंतर तळाशी आणि बाजूला बटर पेपर लावा. पॅनमध्ये सर्व मिश्रण  घाला आणि हलवून हवेचे बुडबुडे निघून जातील असे बघा. या पॅनला एका मोठय़ा बेकिंग डिशमध्ये ठेवा. बेकिंग डिशच्या तळाशी २ पेपर टॉवेल ठेवा. पेपर टॉवेल मुळे उष्णता पॅनच्या तळाशी समान प्रमाणात वितरित केली जाते. मोठय़ा बेकिंग डिशमध्ये १ इंच गरम पाणी भरा. २५ मिनिटे बेक करा, नंतर उष्णता १४० डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करा आणि केकची मूळ उंची दुप्पट होईपर्यंत तो ५५ मिनिटांपर्यंत बेक करा. ओव्हनमधून काढा आणि काळजीपूर्वक केकला आपल्या हातावर पालथा घालून बटरपेपर काढून टाका. अत्यंत काळजी घ्या, केक गरम असेल. आपण केकला प्लेटवरदेखील पालथा करू शकतो, परंतु यामुळे केक दाबला जाऊ शकेल. केकवर पिठीसाखर शिंपडून, नंतर कापून आणि उबदार असताना स्ट्रॉबेरीसह सव्‍‌र्ह करा!

न्यूयॉर्क चीज केक रेसिपी

साहित्य : १५ गोड नसलेल्या बिस्किटांचा चुरा, २ टेबलस्पून लोणी वितळवून, २५० ग्रॅम क्रीम चीज, १ ते १/२ कप साखर, पाऊण कप दूध, ४ अंडी, १ कप सॉवर क्रीम, १ चमचा व्हॅनिला अर्क, पाव कप गव्हाचे पीठ.

कृती : ३५० डिग्री फॅरनहाइट (१७५ अंश से.) पर्यंत ओव्हन गरम करा. ९ इंचाच्या पॅनला आतून लोण्याचा हात लावून घ्या. मध्यम भांडय़ात, गव्हाचे पीठ घ्या. त्यात लोणी व बिस्किटचा चुरा मिसळून हा चुरा पॅनच्या तळाशी दाबा. मोठय़ा वाडग्यात, गुळगुळीत होईपर्यंत साखर व क्रीम चीज मिसळा. हे मिश्रण दुधात मिसळा, अंडी घालून मिश्रण एकजीव करा. सर्व अंडी व्यवस्थित सामावली जातील असे पाहा. आता या मिश्रणात सॉवर क्रीम, व्हॅनिला आणि पीठ मिक्स करा आणि मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत एकजीव करा. बिस्कीट चुऱ्याच्या तयार क्रस्टवर हे मिश्रण ओता. आधीपासून तापवलेल्या ओव्हनमध्ये एक तास केक बेक करा. तासाभराने ओव्हन बंद करा आणि केकला ५ ते ६ तास ओव्हनमध्ये थंड करा. यामुळे केकला भेगा पडत नाहीत. कापून सव्‍‌र्ह करेपर्यंत केक फ्रिजमध्ये ठेवा.

शब्दांकन – मितेश जोशी

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 7:45 pm

Web Title: cheesecake
Next Stories
1 पटियाला शाही खाद्यसंस्कृती
2 ‘नाटक’वाले
3 उन्हाळ्यातील कूल फॅशन
Just Now!
X