स्वप्निल घंगाळे

ठाण्यातील बेघर आणि रस्त्यावर राहणारे लोक उपाशी झोपू नयेत म्हणून व्यवसायाने शेफ असणारा आनंद जोशी हा तरुण त्याच्या कुटुंबीयांसोबत एप्रिल महिन्यापासून रोज मोफत अन्नवाटप करतो आहे. आनंदची आई रोज सकाळी पाच वाजता उठून  ५० ते ८० जणांचा स्वयंपाक करतात. मग आनंद त्याचे वडील आणि वहिनीच्या मदतीने या शिजवलेल्या अन्नाची छोटी छोटी पाकिटं तयार करतो. त्यानंतर हे सर्व जण दुपारी साडेबाराच्या आसपास आपल्या चारचाकी गाडीमधून ठाणे शहरामध्ये अन्नवाटप करत फिरतात. ‘आम्ही प्रामुख्याने ठाणे स्थानक, सेंट्रल मैदान, तलावपाळी या ठिकाणी जाऊन अन्नवाटप करतो. टाळेबंदी संपेपर्यंत आम्ही हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत,’ असं आनंद सांगतो. हे अशा पद्धतीने अन्नवाटप करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? असं विचारलं असता, ‘बेघर लोकांना अनेक जण तांदूळ, डाळी वगैरे साहित्याची मदत करत आहेत. मात्र या लोकांकडे अन्न शिजवण्यासाठी काहीच साहित्य नाही हे आमच्या लक्षात आलं त्यामुळेच आम्ही थेट शिजवलेलं गरम गरम अन्न देण्याचा निर्णय घेतला,’ असं आनंद सांगतो.

‘आज सर्वच जण संकटात आहेत. पण आपल्याकडे देण्याची क्षमता आहे त्यामुळे आपण काही तरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि हा उपक्रम आम्ही सुरूकेला, असं आनंद सांगतो. आनंदचे कुटुंब स्वखर्चामधून मागील एका महिन्याहून अधिक काळापासून ठाणे शहरातील बेघर आणि गरिबांना अन्नवाटप करत आहेत. कधी भात, कधी डाळ खिचडी, कधी पोळी भाजी तर कधी इडली अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आनंद आणि त्याचे कुटुंबीय गरजूंना वाटतात. इतकंच काय त्यांनी अगदी पावभाजी आणि मिसळही या गोरगरिबांना वाटली आहे. हे अन्नवाटप करताना आनंद आणि त्याचे कुटुंबीय हातमोजे, मास्क वगैरे घालून नियमांचे पूर्णपणे पालन करतात. अनेकदा पोलिसांनीही आमची मदत केल्याचे आनंद सांगतो.

विशेष म्हणजे गरजूंना वाटप करण्यासाठी जे पदार्थ बनवले जातात तेच पदार्थ जोशी कुटुंबीय खातात. ‘जे दान देतो तेच आपण खावं, असं आमच्याकडे म्हणतात. त्यामुळे आम्हीसुद्धा या गरिबांना जे वाटतो तेच पदार्थ त्या दिवशी घरी येऊन खातो,’ असं आनंद हसत हसत सांगतो.  सध्या संकटाच्या काळात आपण एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे. आपल्याकडे क्षमता असेल तर पुढे आलं पाहिजे. माझ्या काही मित्रांनी मला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता लॉकडाऊन वाढल्यानंतर पुढील नियोजनासंदर्भात ठरवू, मात्र मे महिना संपेपर्यंत तरी आम्ही हे वाटप करत राहणार आहोत, असं आनंदने स्पष्ट केलं.

viva@expressindia.com