शेफ वरुण इनामदार – चॉकलेटिअर, फूड डिझायनर
सेलेब्रिटी शेफ वरुण इनामदार यांची ओळख केवळ शेफ म्हणून नाही, तर फूड क्रिटिक, फूड डिझायनर, ट्रेनर आणि ट्रॅव्हलर म्हणूनदेखील आहे. हिल्टन, ट्रायडंट, ओबेरॉय अशा पंचतारांकित हॉटेल्ससाठी त्यांनी काम केलं आहे. ‘द चॉकलेट फॅक्टरी- इक्वेडॉर’चे ते प्रमुख आहेत. अनेक देशी- विदेशी फूड कॉलम्समध्ये आणि फूड शोमध्ये त्यांनी भाग घेतला असून देशातल्या मोजक्या लक्झरी चॉकलेटिअर्समध्ये त्यांची गणना होते. सध्या चॉकलेट मेकिंगमध्ये अनेक प्रयोग होत आहेत. त्याविषयी ते सांगताहेत, त्याबरोबरच रक्षाबंधनानिमित्त खास होम-मेड चॉकलेट्सची गिफ्ट कशी द्यावी याच्याही काही सोप्या टिप्स शेफ वरुण देताहेत.

आजघडीला भारतीय चॉकलेट उत्पादक नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचं धाडस दाखवताहेत आणि त्यांच्या या कृतीला खवय्यांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. मला वाटतं हा सगळा बदल झालाय तो प्रवासामुळं. जगभरात केलेल्या प्रवासामुळं डेव्हलप होणारी टेस्ट नि टेलिव्हिजनच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमुळं हा बदल घडत असावा. गेल्या काही वर्षांत मार्केटमध्ये सिराचा, वासाबी, शेजवान पेपर, लेमनग्रास, काफिर लाइम, थाई चिली असे फ्लेव्हर्स चॉकलेटच्या आखाडय़ात दाखल झाले. मला वाटतं की, आपण त्याही पलीकडं जाऊन आणखी काही प्रयोग होताहेत.
सेव्हरी चॉकलेट क्युझिनसारखे प्रयोग करायला मी स्वत:च वर्षभरापूर्वी आरंभ केलाय नि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय. मी एका उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. त्याचं नाव होतं टकरफएए.  ग्रामीण भागातील कलाकारांचं जीवनमान उंचावण्यासाठी या उपक्रमात प्रयत्न केले गेले. भारतभरातील जवळपास २८० हून अधिक कलाकारांकडून हॅण्डिक्राफ्टेड गिफ्ट आयटेम गोळा केले नि त्याला चॉकलेटची जोड दिली. या कलावस्तूंसोबत काही तरी गोडधोड देण्याची नामी कल्पना लोकांना फारच आवडली होती. मुंबईत वांद्रय़ातल्या एका दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही आणखी एक प्रयोग करून पाहिला. वासाबी-हनी, गुंटर-चिली, मसाला चाय, लेमनग्रास इत्यादी प्रकारच्या काही फ्लेव्हर्सची थोडी बोल्ड नि इंटरेिस्टग वाटणारी चॉकलेट कॉम्बिनेशन्स करून पाहिली.
आपल्याला स्वादाच्या संकल्पना आणि त्याबद्दलचे विचार सुस्पष्ट व्हायला अजून पुष्कळ मजल गाठायची आहे. सध्या त्यात फारसं तथ्य मानलं जात नसलं तरीही रुचीच्या जगात नवनवीन कल्पनांचं नक्कीच स्वागत होत आहे. त्याहीपलीकडं जाऊन घरगुती स्तरावर चॉकलेटचे प्रयोग व्हायला लागले आहेत. चॉकलेट शेक विथ पिनट बटर, हेझलनट फ्लेव्हर्ड हॉट चॉकलेट, खीर, बंगाली मिठाई, श्रीखंड, पायसम आणि किती तरी पदार्थात चॉकलेट असतं. कुठं त्याचा स्वाद अ‍ॅड केला जातोय. कुठं त्याला सरप्राइज एलिमेंट म्हणून वापरलं जातंय. कुठं त्यात हब्र्ज, स्पाइसेस, फळं-भाज्यांचे अर्क अ‍ॅड करून त्याचा फ्लेव्हर वेगळा केला जातोय.
चॉकलेट, फूड नि ट्रॅव्हल फोटोग्राफी करत मी फिरस्तीवर असतो. या फिरस्तीतही मी वेगवेगळी फूड एक्परिमेंट कशी होताहेत, हे अतिशय आवडीनं बघतो, चाखतो नि ते तेवढय़ावरच न थांबता घरी परतल्यावर त्यांचे माझ्या किचनमध्ये प्रयोग करून प्रसंगी त्यात थोडासा ट्विस्ट करायलाही मला आवडतं. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अशीच फिरस्ती करताना एकीशी माझी ओळख झाली नि आमचे ऋणानुबंध जुळले ते कायमचे.
तीन वर्षांपूर्वी साल्झबर्ग नावाच्या छोटय़ा शहरात मी नि बायको फिरत होतो. तिथून स्वित्झर्लण्डला जायचा बेत मी आखला होता नि त्या मनोराज्यांत मी गुंग होतो. फिरता फिरता एक छानसा व्हिला पाहिला. त्याच्या बाल्कनीमध्ये रंगीत फुलांच्या कुंडय़ा लटकत होत्या. त्याच्या पुढच्या अंगणातल्या बागेत छोटुकलं तळं होतं नि त्यात काही बदकं पोहत होती. क्षणभर आम्हाला आम्ही आमचं ड्रीमहाऊसच पाहतोय की काय, असा भास झाला. त्या घरानं आम्हांला इतकी भुरळ घातली की त्याच्या मालकाला हॅलो केल्याशिवाय आम्हांला राहवेना. म्हणून मग थोडं पुढं येतोय न येतोय तोच एक स्त्री त्या सुंदर फुलझाडांना पाणी घालताना दिसली.
आम्ही तिच्याजवळ गेलो नि तिची ओळख करून घेतली तर तीच त्या स्वप्नमयी घराची मालकीण निघाली. मग मी माझी ओळख भारतातला ट्रॅव्हलिंग चॉकलेटियर अशी करून दिली. तिनं लगेचच आमची दखल घेतली नि तिच्या बागेत गप्पा मारायला बोलावलं. आमच्या त्या गप्पा जवळपास दोन तास रंगल्या. ती तिच्या कुटुंबीयांबद्दल, परदेशी राहणाऱ्या मुलाबाळांबद्दल आणि स्वर्गवासी नवऱ्याबद्दल भरभरून बोलली. बोलता बोलता भावनावश होत डोळ्यांतले अश्रू तिनं निर्धारानं पुसले नि आम्हाला होममेड चॉकलेट्स खायला आवडतील का, अशी विचारणा केली. मी लगेचच मान डोलावून तिला होकार दिला. मग तिनं पटकन आत जाऊन आमच्यासाठी थोडी मिठाई – कन्फेक्शन आणली. त्या घडीपर्यंत मी खाल्लेल्या चॉकलेट्सपैकी ती सर्वोत्कृष्ट होती. मी तिच्याकडं त्याची रेसिपी विचारण्याचा प्रयत्न केला, पण आमचे हात प्रेमळपणे हाती घेत ती म्हणाली की, तुझ्यासारखा एखादा भाऊ  असावा, असं मला कायम वाटायचं. तुला हे कधीही खावंसं वाटेल तेव्हा मला कळव, मी ते लगेचच भारतात पाठवून देईन. ते ऐकून आमच्या दोघांच्याही डोळ्यांत अश्रू आले नि आम्ही नि:शब्द झालो. तेव्हापासून दर वर्षी रक्षाबंधनाच्या आधी आम्ही फोनवर गप्पा मारतो नि ती न चुकता नित्यनेमानं मला होममेड कन्फेक्शनचा बॉक्स पाठवते.
मला माहितीय, रक्षाबंधनाच्या दिवशी अशीच काही वेगळी होममेड चॉकलेट्स बनवायला बहिणी उतावीळ झाल्या असतील. मी काही झटपट रेसिपीज तुमच्याशी शेअर करतोय. केवळ काही मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपीज म्हणजे नव्या-जुन्यांचा संगम म्हणता येतील. तुमच्या पाककौशल्याला चौकटीत बंदिस्त करून ठेवू नका. थोडी डोकॅलिटी लढवा नि छानशी, सुंदर नि क्लासी रेसिपी पेश करा.
चॉकलेटसारख्या गोड बहिणींना उद्याच्या रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

चॉकलेट बार्क
vn26साहित्य : डार्क कंपाउंड चॉकलेट ४०० ग्रॅम, सुक्या जर्दाळूचे तुकडे १०० ग्रॅम, सुकं कापलेलं खोबरं १०० ग्रॅम, पिस्ता ५० ग्रॅम, चिमूटभर केशर. (आवडीनुसार सुकामेवा घालता येतील.)
कृती : कंपाऊंड चॉकलेट डबल बॉयलरमध्ये मेल्ट करून घ्या. ट्रेमध्ये बटर पेपर घाला नि त्यावर मेल्टेड चॉकलेट पसरा. त्याचा पातळसा थर होईपर्यंत ते पसरा. त्यावर हलकेच फ्रूट्स नि नट्स भुरभुरा. ते रेफ्रिजरेटरमध्ये ३० मिनिटं सेट करा. बाहेर काढल्यावर त्याचे तुकडे करा नि ते सव्र्ह करा. सूर्यप्रकाशापासून ते दूर ठेवा.

चॉकलेट कोकोनट लाडू
vn27साहित्य : किसलेलं डार्क चॉकलेट २०० ग्रॅम, किसलेला ताजा नारळ ४०० ग्रॅम, बदामाचे तुकडे १०० ग्रॅम, पिस्त्याचे तुकडे ५० ग्रॅम, अक्रोड ५० ग्रॅम, कण्डेण्स्ड मिल्क १०० ग्रॅम, वेलची पावडर १ टीस्पून, डेसिकेटेड कोकोनट २०० ग्रॅम, रंगीत शुगर स्प्रिंकल २ टेबलस्पून.
कृती : डबल बॉयलरमध्ये चॉकलेट वितळवून घ्या. बाऊलमध्ये किसलेल्या नारळात कण्डेण्स्ड मिल्क घालून ढवळा. बदाम, अक्रोड, पिस्ता, वेलची पावडर नि चॉकलेट एकत्र करा. हे मिश्रण १५ मिनिटं बाजूला ठेवून द्या. त्याचे एकसारखे लाडू वळा नि बाजूला ठेवून द्या. दुसऱ्या प्लेटमध्ये मिक्स िस्प्रकल्स नि डेसिकेटेड कोकोनट एकत्र करून घ्या. त्यात एकेक लाडू हलकेच फिरवून त्याचा कोट द्या. ते हवाबंद डब्यात ठेवून द्या.

चॉकलेट चिक्की
vn24साहित्य : असोर्टेड रेडीमेड चिक्की, डार्क चॉकलेट अर्धा कप, बटर दोन टेबलस्पून, असोर्टेड नट्स नि फ्रूटस् एकचतुर्थाश कप, सजावटीसाठी पुदिन्याची पानं.
कृती : एका पातेल्यात चॉकलेट नि बटर वितळवून घ्या. तुम्ही यासाठी डबल बॉयलर किंवा मायक्रोवेव्हही वापरू शकता. ते घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. गॅस बंद करून १० मिनिटं तसंच ठेवा. हे झालं चॉकलेट गनाश. चिक्कीचा तुकडा घेऊन त्यावर चॉकलेट गनाशे घाला. सगळीकडं पसरेल असं पाहा. फ्रूट-नट्स नि पुदिन्याच्या पानांची सजावट करा.
रूम टेम्परेचरला असतानाच सव्र्ह करा.

चॉकलेट पेढा
vn25साहित्य : खवा १ कप, ग्रेन शुगर एकचतुर्थाश कप, कोको पावडर २ टेबलस्पून, सजावटीसाठी रंगीत हार्ट्स.
कृती : खवा आणि साखर मंद आचेवर सतत परतून घ्या. हे मिश्रण कोरडं होईपर्यंत परता. जवळपास १० मिनिटं परतायला लागतील. त्यानंतर त्यात कोको पावडर घालून मिनिटभर परता. मग ते डिशमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्या. नंतर त्यांना पेढय़ाचा आकार देऊन त्याच्या मधोमध रंगीत हार्ट लावून सजावट करा.

(अनुवाद : राधिका कुंटे) – viva.loksatta@gmail.com