X

फ्यूजन फोडणी

श्रावण महिना आता मध्यावर आलाय. श्रावण आणि अर्धा भाद्रपद असा दीड महिना

श्रावण महिना आता मध्यावर आलाय. श्रावण आणि अर्धा भाद्रपद असा दीड महिना

शाकाहार स्वीकारलेल्या तरुणाईसाठी शेफ विष्णू मनोहर यांनी शाकाहारी फोडणी दिलेल्या चटकमटक व अनोख्या पाककृती खास ‘व्हिवा’ वाचकांसाठी शेअर केल्या आहेत.

छोले पनीर शोरबा

साहित्य – कांदा १, तूप २ चमचे, आलं १ चमचा, लसूण १ चमचा, हिरवी मिरची २-३, तिखट, मीठ चवीनुसार, हरभरे २ वाटी, पनीर १ वाटी, दही पाव वाटी, टोमॅटो १, जिरे १ चमचा, गरम मसाला १ चमचा, कोिथबीर पाव वाटी.

कृती – एक कांदा चिरून घ्या व २ चमचे गरम तुपात परतून त्यात आलं, लसूण व मिरच्या घालून थोडे परता. नंतर तिखट, मीठ, २ वाटी सोललेले हरभरे, १ वाटी पनीरचे तुकडे घाला. नंतर दही व टोमॅटो घालून परता. त्यात दीड कप पाणी घालून शिजवा. १ वाटी हरभरे वाटून ते या रश्शात घाला. जिरे व गरम मसाला घालून भाजी थोडी घट्ट शिजवून घ्या. वरून कोथिंबीर व मिरच्या घालून सव्‍‌र्ह करा.

भाकरी सॅन्डविच

साहित्य : ज्वारीच्या भाकऱ्या (पुरीएवढय़ा) ४ नग, तयार झुणका १ वाटी, हरी चटणी (हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट) १ चमचा, लांब चिरलेला कांदा १ नग, लोणी १ चमचा

कृती : तयार भाकरीचे मधून दोन भाग करावे व अर्धा भाग फुलवून भाकरीच्या दोन्ही पापुद्रय़ांच्या मध्ये जी जागा तयार होईल त्यामध्ये थोडेसे लोणी, हिरवी चटणी, लांब चिरलेले कांदे व झुणका भरावा. असे तयार झालेले सँडविच पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून सव्‍‌र्ह करावे.

भाकरीचा दहय़ातला चिवडा

साहित्य : दही १ वाटी, भाकऱ्या २-३ नग, हिरव्या मिरच्या २ नग, तिखट १ चमचा, मीठ १ चमचा, कढीपत्ता, हळद, मीठ चवीनुसार, शेंगदाणे पाव वाटी.

कृती : भाकरी बारीक कुस्करून त्याला दही लावून ठेवावं. तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता, मिरच्या, हळद, दाणे घालावे. तिखट, मीठ भाकरीला लावावं. भाकरीला वरील फोडणी द्यावी. एकत्र करून खायला द्यावं.

वेफर्सची भाजी

साहित्य : वेफर्स २ वाटय़ा, मोहरी १ चमचा, हिरवी मिरची ३-४, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, हिंग पाव चमचा, कोिथबीर २ चमचे.

कृती : फ्रायपॅनमध्ये मोहरी फोडणीला घालून त्यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, हिंग परतून घ्या. साधारण २ वाटय़ा वेफर्स असतील तर २ कांदे घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर चवीनुसार हळद, तिखट घाला. आवडत असल्यास थोडी साखर व वेफर्स घाला, थोडा पाण्याचा शिबका मारून झाकून ठेवा. कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.

टीप – वेफर्समध्ये मीठ असल्यामुळे भाजीत मीठ घातले नाही.

दाणे भात

साहित्य : भिजवलेले दाणे १ वाटी, लसूण बारीक चिरलेला २ चमचे, तिखट १ चमचा, आमचूर पावडर १ चमचा, तेल २ चमचे, मोहरी १ चमचा, हिंग पाव चमचा, तांदूळ १ वाटी, दही २ चमचे.

कृती : पातेल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, लसूण परतून घ्या व दोन वाटय़ा पाणी घाला. २ चमचे दही व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. नंतर भिजवलेले दाणे व तांदूळ घालून चवीनुसार मीठ, साखर घाला. भात व्यवस्थित शिजवून खायला दय़ा.

मटर पनीर

साहित्य : पनीर १५० ग्रॅम, लसूण २ चमचे, मीठ, साखर चवीनुसार, काळी मिरी पावडर १ चमचा, व्हेजिटेबल ऑइल १ चमचा, मलाई दही अर्धी वाटी, ओवा अर्धा चमचा, मटर २ वाटय़ा.

कृती : सर्व प्रथम २ वाटय़ा पनीर किसून त्यात १ चमचा कणीक थोडे पाणी घालून त्याची मिक्सरवर पेस्ट करून घ्या. पातेल्यात तेल घेऊन चांगले तापवून घेणे. नंतर त्यात लसूण टाकणे. तो चांगला ब्राऊन झाल्यावर पनीरची पेस्ट व इतर जिन्नस मिसळवून थोडेसे दूध टाकून तेल सुटेपर्यंत शिजवणे. २ वाटय़ा मटर थोडे तेलावर परतून यात घाला. वरून फ्रेश क्रीम टाकून गरम गरम पोळीबरोबर खायला देणे.

ब्रेड कोफ्ता करी

साहित्य : ब्रेड स्लाइस ८-१०, बेसन अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, जिरे १ चमचा, हळद पाव चमचा, कांदा पाव वाटी, आलं-लसूण १-१ चमचा, तिखट चवीनुसार, धणे-जिरे पावडर १ चमचा, गरम मसाला १ चमचा, टोमॅटो प्युरी ४ चमचे, कोथिंबीर पाव वाटी.

कृती : ८-१० ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कापून टाकाव्यात. नंतर ब्रेड पाण्यात टाकून हातात दाबून पाणी काढून टाकावे. त्यात अर्धी वाटी बेसन व थोडे मीठ घालून मळून घ्यावे. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून तळावे व बाजूला ठेवावे. थोडय़ा तेलात जिरे, हळद घालून फोडणी तयार करावी. त्यावर पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं घालून परतावे. नंतर त्यात तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला घालून ४ चमचे टोमॅटो प्युरी घालावी. त्यात २ कप पाणी घालून उकळावे. नंतर सव्‍‌र्ह करतेवेळी ग्रेव्हीत ब्रेडचे तयार कोफ्ते घालावे. वरून थोडी कोथिंबीरसुद्धा घालावी.

खडा पालक पनीर

साहित्य : बारीक चिरलेला लसूण १ चमचा, बारीक लांब चिरलेला पालक २०० ग्रॅम, जिरे अर्धा चमचा, लांब चिरलेला कांदा एक, पनीर चौकोनी तुकडय़ांमध्ये एक वाटी, टोमॅटो मोठय़ा तुकडय़ांमध्ये एक, मीठ, साखर चवीनुसार, हिरवी मिरची चिरलेली २ चमचे, लिंबाचा रस एक चमचा, तेल दोन चमचे.

कृती : फ्राय पॅनमध्ये प्रथम तेल घेऊन जिरे तडतडल्यावर हिरवी मिरची, लसूण, कांदा क्रमाक्रमाने सर्व मसाल्याचे साहित्य घालून नंतर पनीर घालावे. तांबूस रंग येईस्तोवर परतावे. सर्वात शेवटी लांब चिरलेला पालक व मीठ चवीप्रमाणे घालून सव्‍‌र्ह करावे. बनवायला अतिशय सोपा असा हा प्रकार आहे.

यसर आमटी

साहित्य : गहू १ पाव, हरभरा डाळ अर्धा पाव, उडीद डाळ अर्धा पाव, कलमी १० ग्रॅम, मोठी वेलची ५ ग्रॅम, लवंग ५ ग्रॅम, काळी मिरी ५ ग्रॅम, स्टारफूल ५ ग्रॅम, जायपत्री ५ ग्रॅम, धने १० ग्रॅम, जिरे १० ग्रॅम, शहाजिरे ५ ग्रॅम, हळकुंड अर्धा नग, सुकं खोबरं ३ चमचे.

कृती : गहू आणि हरभऱ्याची डाळ सम प्रमाणात घेऊन मंद आचेवर भाजून दळून घ्या. सर्व मसाल्याचे साहित्य मंद आचेवर थोडय़ा तेलात परतून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. जेवढे पीठ तेवढा मसाला एकत्र करून ठेवा. वेळेवर लसणाची फोडणी देऊन आमटी तयार करा.

संकलन : मितेश जोशी