आयुष्य म्हणजे जणू बुद्धिबळाचा डावच. आयुष्याच्या प्रवासात वाटय़ाला येणारे संघर्ष, खडतर प्रसंग, आयुष्याच्या बुद्धिबळपटावर घडणाऱ्या महत्त्वाच्या चाली या सगळ्यांवर मात करून ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन हिनं आपलं स्वत:चं स्थान निर्माण केलं. वयाच्या १८व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब संपादन केल्यानंतर सौम्याने राष्ट्रकुल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ६४ घरांच्या खेळामधली ती खरी बुद्धिबळ सम्राज्ञी ठरली. व्हिवा लाऊंजच्या व्यासपीठावर ती अवतरली आणि या खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या लहान-लहान युवा बुद्धिबळपटूंना सौम्याने यशाचा मूलमंत्रही दिला.
संकलन- तुषार वैती

बुद्धिबळ हा माझा श्वास..
बुद्धिबळ हा सौम्याचा श्वास आणि ध्यास. बाबांना बुद्धिबळाच्या पटावरील मोहऱ्या कशा मांडायच्या, हेसुद्धा माहीत नसताना आईच्या आग्रहास्तव ती हळूहळू बुद्धिबळाकडे वळली. बुद्धिबळातील एक महान व्यक्तिमत्त्व होण्याचे आईचे स्वप्न सौम्याने पूर्ण केले असले तरी सौम्याला मात्र विश्वविजेतेपदाला गवसणी घालायची आहे. लोकसत्ता व्हिवा लाऊंच्या व्यासपीठावर सौम्याचा बुद्धिबळातला जीवनपट उलगडत गेला आणि उपस्थित चिमुरडय़ांसह सर्वच जण थक्क झाले. बुद्धिबळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, ही आशा अद्याप ऑलिम्पिक स्पर्धेत बुद्धिबळाचा समावेश झाला नसल्याने अन्य खेळांची राष्ट्रकुल स्पर्धा आणि बुद्धिबळातील राष्ट्रकुल स्पर्धा वेगळी असते. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करता हा आनंद वेगळाच असतो. पदकाची अपेक्षा होती, पण दक्षिण कोरियातील राष्ट्रकुल स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकेन, असे वाटले नव्हते. आता सुवर्णपदक जिंकल्यानंतर मस्त वाटते.

बुद्धिबळपटू विनम्र
बुद्धिबळ या खेळातच नम्रपणा आहे. माणूस म्हणून तुम्ही नम्र असणे केव्हाही चांगले. मला आजपर्यंत कुणीही उद्धट माणूस भेटला नाही. मी खेळाडू असल्यामुळे म्हणा वा अन्य कुठल्या कारणास्तव सगळीच माणसं माझ्याशी नम्रतेने वागतात. बुद्धिबळ हा शांत, संयमी खेळ असल्यामुळे बुद्धिबळपटूही विनम्र असतात. यशाच्या पाठी धावावे लागत नसल्यामुळे आमचे स्वत:वर बऱ्यापैकी नियंत्रण असते.


आईमुळेच बुद्धिबळाकडे वळले
मी लहान असताना माझ्या एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू असायच्या. साडेसात वर्षांची असताना मी आवड म्हणूनच बुद्धिबळ खेळू लागले. पण माझी आई बुद्धिबळाच्या बाबतीत जरा जास्तच पॅशनेट होती. मी काही तरी करून दाखवेन, याची तिला खात्री होती. म्हणूनच तिने बुद्धिबळाच्या किती स्पर्धा होतात, यात करिअर करता येईल की नाही याबाबतीत माहिती काढायला घेतली. मी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा जिंकले त्यानंतर राज्य स्पर्धेची चॅम्पियन झाले. त्यामुळे मी वर्ल्ड चॅम्पियन होईन, असे माझ्या आईला वाटत होते. माझी मुलगी घरात बसून खेळते, असेच बाबांना वाटायचे. आईच्या आग्रहामुळेच मी बुद्धिबळाकडे करिअर म्हणून पाहू लागले. पण नंतर स्पर्धाना जाऊ लागले, तेव्हा बाबांनाही कळून चुकले की माझी मुलगी बुद्धिबळात नक्कीच मोठी होईल.

कधीही शाळा बुडवली नाही..
अभिनव शाळेचे मुख्याध्यपक, प्राध्यापक तसेच मित्र-मैत्रिणींनी मला शाळेत असताना भरपूर मदत केली. मी स्पर्धाना जायचे नाही, त्या वेळी नियमितपणे शाळेत जायचे. मला दिलेल्या सवलतीचा मी कधीही गैरफायदा घेतला नाही. मला शाळेत जायलाही आवडायचे. मार्क्‍स चांगले मिळत असल्यामुळे शिक्षकही माझ्यावर खूश असायचे. मला फक्त स्पर्धासाठी सुट्टय़ा मिळायच्या. काही वेळा परीक्षा बुडायच्या, त्या वेळी मला पुन्हा परीक्षा देण्याची सवलत मिळायची. पण स्पर्धापेक्षा जास्त टेन्शन मला परीक्षेचं यायचं. शेवटच्या क्षणी अभ्यास करायला लागायचे, त्यामुळे अधिक टेन्शन हे परीक्षेचं असायचं. विषय सोपा असला तरी टेन्शन येतंच.

पुस्तकावरूनच बुद्धिबळाचा अभ्यास केला..
माझ्याआधी कुणीही बुद्धिबळाकडे खेळ म्हणून पाहत नव्हते. विश्वनाथन आनंद बुद्धिबळातला जगज्जेता झाला, त्यानंतर लोकांचा या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मी लहान असताना बुद्धिबळाची तयारी करण्यासाठी फारशी साधने उपलब्ध नव्हती. कुणाला तरी बरोबर घेऊन आम्ही बुद्धिबळ खेळायचो. त्यानंतर बुद्धिबळाची पुस्तके घेऊन मी अभ्यासाला सुरुवात केली. १५ वर्षांची असताना मला पहिला कॉम्प्युटर मिळाला, त्यानंतर मी त्यावरूनच अभ्यासाला सुरुवात केली. त्या वेळी बुद्धिबळपटूंना बँकांमध्ये नोकऱ्या मिळायच्या. पण कुणीही पालक आपल्या मुलाला बुद्धिबळात करिअर कर, असे सांगत नव्हते. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. अनेक मुले या खेळाकडे वळू लागली आहेत. बुद्धिबळाचे कल्चर यायला लागले आहे, हे खेळासाठी चांगले लक्षण आहे.

मोठय़ांचा पाठिंबा आवश्यक
तुम्ही काही चांगल्या गोष्टी करायला जाता, त्या वेळी ही गोष्ट चांगली आहे, हे कुणी तरी सांगणे हे त्या व्यक्तीसाठी फारच प्रोत्साहनपर ठरत असते. माझ्या मते, प्रोत्साहन हे सर्वात महत्त्वाचे असते. अन्यथा, हे चांगले होईल की नाही, असे विचार मनात येत राहतात. म्हणूनच मोठय़ांचा पाठिंबा आवश्यक असतो.

अभिजित कुंटे खडतर प्रतिस्पर्धी
माझा खडतर प्रतिस्पर्धी कोण होता, हे सांगणे फारच कठीण आहे. पण माझे गुरू आणि सल्लागार अभिजित कुंटे याच्याबरोबर खेळण्याची संधी मला मिळाली. ते ‘अ’ संघातून खेळत होते आणि मी ‘ब’ संघातून. त्यांना हरवणे फारच कठीण होते. अखेर त्यांनीच मला हरवले. पण दुसऱ्या वेळेला मी त्यांच्याविरुद्ध बरोबरी साधली.

प्रत्येक बुद्धिबळपटूची वेगळी शैली
प्रत्येक पोझिशननुसार युनिव्हर्सल खेळ करणारे फारच कमी ग्रँडमास्टर्स आहेत. विश्वनाथन आनंद त्यापैकीच एक. प्रत्येक बुद्धिबळपटूची एक वेगळी शैली असते. गॅरी कास्पारोव्ह हा अतिशय आक्रमक, तांत्रिकदृष्टय़ा सक्षम आणि गतिमान बुद्धिबळपटू आहे तर अ‍ॅनाटोली कार्पोव्ह हा परिस्थितीनुसार खेळ करणारा, हळूवारपणे प्रतिस्पध्र्यावर आक्रमण चढवून विजय मिळवणारा खेळाडू. माझी शैली तंत्रशुद्ध, गतिमान आणि कौशल्यपूर्ण अशी आहे. प्रत्येक बुद्धिबळपटू प्रतिस्पध्र्याच्या शैलीचा विचार करत असतो.

प्रशिक्षकांना खेळाडूंशी बोलण्याची परवानगी नसते
काही खुल्या स्पर्धामध्ये कुणालाही आमचे सामने पाहता येतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये वेगळे नियम असतात. पण कोणत्याही सामन्यादरम्यान प्रशिक्षकांना खेळाडूंशी बोलण्याची परवानगी नसते. सांघिक स्पर्धामध्ये प्रशिक्षक आमच्याबरोबर असतो.

‘नाइट-फोक’ कसा टाळावा..
‘नाइट-फोक’ म्हणजे घोडय़ाने राजाला चेक दिलेला असतो, राजा वाचवायला गेलो तर वजिराचा बळी जाणार असतो. एका चालीत दोन ठिकाणी शिकार करण्याकडे घोडय़ाचे लक्ष असते. त्यामुळे अशी परिस्थिती येऊ देणे टाळावे. ‘नाइट-फोक’ येणार आहे अशी परिस्थिती येऊ द्यायची नाही, हाच यावर तोडगा आहे.

ऑलिम्पियाड गेम्स सर्वोत्तम..
ऑलिम्पियाड स्पर्धेत शेवटच्या सामन्यात केलेला खेळ हा आतापर्यंतचा सर्वोत्तम होता, असे मला वाटते. त्या वेळी आम्ही जिंकलो असतो तर भारताला कांस्यपदक पटकावण्याची संधी होती. कारण याआधी भारताने कधीही ऑलिम्पियाडमध्ये पदक जिंकले नव्हते. त्यामुळे आम्हा सर्र्वाचे लक्ष कांस्यपदकाकडे लागले होते. त्या वेळी अभिजित कुंटे आमचे प्रशिक्षक होते. कुंटे सरांनी मला खेळण्याची संधी दिली. मला आनंदही झाला होता, पण तितकंच टेन्शनही आलं होतं. सामन्यात एका क्षणी मला बरोबरी करण्याची संधी होती. बरोबरी साधली तर आम्ही सुरक्षित होणार होतो, पण जिंकलो तर कांस्यपदकाची संधी वाढणार होती. पण हरलो तर संघ धोक्यात येणार, याची भीती वाटत होती. पण माझ्या आत्मविश्वासाने तो सामना मी जिंकले, पण भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हा क्षण माझ्या आयुष्यातला संस्मरणीय होता.

मुले-मुली असा फरक करणे चुकीचे
बुद्धिबळ शारीरिक ताकदीचा नव्हे तर बैठा खेळ असल्याने मुले आणि मुली असा फरक करणे मला पटत नाही. पण मुलींना बुद्धिबळात पुढे आणण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मुले आणि मुली असे गट पाडण्यात आले. मुलींनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात करण्याआधीच मुले बुद्धिबळ खेळत होती. त्यामुळे मुले ही मुलींच्या कित्येक पट पुढे निघून गेली आहेत. मुलींच्या गटातल्या स्पर्धा जिंकल्यानंतर मुलींसाठी स्पर्धा शिल्लक राहत नाही. आताच्या लहान मुलींनी मुलांच्या गटात खेळावे, असा माझा सल्ला आहे. हंगेरीतल्या ज्युडिथ, सुझा आणि सोफिया या तीन पोल्गर बहिणी कधीही मुलींच्या गटात खेळल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा खेळ इतका बहरला की ज्युडिथने पुरुषांच्या क्रमवारीत अव्वल दहा जणांमध्ये स्थान मिळवले होते.

मित्र-मैत्रिणी खूपच गोड..
मी वर्ल्ड ज्युनियर जिंकून आलेले तेव्हा माझ्या स्वागतासाठी विमानतळावर बाबा, संयोजक, प्रशासक तसेच माझ्या मित्र-मैत्रिणींचे अनेक पालक आले होते. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. आम्ही रात्री तीन वाजता विमानतळावर उतरलो. घरी गेल्यानंतर मी भारावून गेले. मित्र-मैत्रिणींनी माझी बिल्डिंग आणि घर तसेच माझी खोली सजवली होती. संपूर्ण रात्र ते माझ्यासोबत होते. परीक्षेच्या काळात नोट्स काढण्यासाठीही मला मित्र-मैत्रिणी मदत करतात. तसेच उद्या पेपर आहे, असा एसएमएससुद्धा आदल्या रात्री करतात.

व्यायामाचे महत्त्व मला उमगले..
२०११ हा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता. त्या वेळी मी खूपच वाईट खेळत होते. २०१२च्या पहिल्या सहा महिन्यांत माझी कामगिरी सुधारली आणि त्यानंतर पुन्हा माझा ‘बॅडपॅच’ सुरू झाला. त्यामुळे मी फारच निराश झाले. याच काळात माझे ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी सिलेक्शन झाले. माझी पहिलीच ऑलिम्पियाड असल्यामुळे मी फारच उत्सुक होते. प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. संधी मिळाली असली तरी माझ्या वाईट फॉर्मचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होऊ नये, असे सारखे विचार मनात यायचे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान मी वाईट खेळले. ग्रीसच्या रस्त्यांवर हताशपणे एकटीच बसली असताना मी बाबांना फोन लावला. मी वाईट खेळत असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी मला जॉगिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी प्रत्येक दिवस जॉगिंग करायला लागले. नैराश्यावर मात करून मी स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्या वेळी मला व्यायामाचे महत्त्व उमगले. जॉगिंगमुळे मला मानसिक स्वास्थ लाभले. मानसिक स्वास्थासाठी मी वेळ मिळेल तेव्हा भगवद्गीता वाचते, ध्यानधारणा करते.

वर्ल्ड चॅम्पियन होण्याची इच्छा
मी वल्र्ड चॅम्पियन व्हावं, असं मला वाटत होतं. पण ११-१२ वर्षांची असताना बुद्धिबळाविषयी माझी द्विधा मन:स्थिती झाली होती. मला बुद्धिबळातून फारसा आनंद मिळत नव्हता. पण आई माझ्या बुद्धिबळाच्या बाबतीत फारच आग्रही होती. आईचे निधन झाल्यानंतर तिचे स्वप्न पूर्ण करावे, असे बाबांना वाटत होते. १५ वर्षांची असताना माझी कामगिरी चांगली होत होती. त्यामुळे हा खेळ किती चांगला आहे, हे मला कळले. त्यातून मला भरपूर आनंद मिळत होता.

आताची जनरेशन खूपच लकी..
आता बुद्धिबळ शिकवायला घरी कोच येऊ लागले आहेत. आधीचे खेळाडू पुस्तकं बघून, दुसऱ्यांच्या डावाचा अभ्यास करून बुद्धिबळ शिकायचे. पण यासाठी जास्त वेळ आणि मेहनत खर्ची व्हायची. त्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत समृद्ध व्हायची. आता कॉम्प्युटरमुळे अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. ‘चेसबेस’सारख्या सॉफ्टवेअरमध्ये १३ लाखांहून अधिक बुद्धिबळाचे गेम्स आहेत. एका क्लिकद्वारे अनेक गेम्स समोर येतात. एखाद्या स्पर्धेत मी खेळलेला गेम्स लगेच मला ऑनलाइन मिळतो. सर्व गोष्टी इतक्या वेगाने होताहेत. चेस इंजिनद्वारे काही नॅनो सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या चाली चांगल्या आहेत की वाईट हे समजते. एखादी व्हेरिएशन चांगली की वाईट, हे क्षणार्धात कळतं. पण त्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत मंदावते. त्यामुळे कॉम्प्युटरमुळे आळशीपणाही आला आहे. त्याउलट बुद्धिबळाच्या पटावर खेळणे हे नेहमी कठीण असते.

बुद्धिबळातही चरितार्थ चालवता येतो..
भारतात क्रीडापटूंना एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यावर किंवा बुद्धिबळात ग्रँडमास्टर झाल्यावर सरकारकडून नोकरी मिळते. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांतही बुद्धिबळपटूंना नोकऱ्या मिळत आहेत. क्रीडापटू म्हणून सेवेत असताना दरदिवशी कामावर जाण्याची गरज नसते. कारकीर्द घडवण्यासाठी कंपन्या किंवा सरकार मदत करते. करिअर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे नोकरी करू शकता. युरोप किंवा अन्य देशांमध्ये खेळाडूंना अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाहीत. काही देशांमध्ये सरकारकडून मानधन दिले जाते. बुद्धिबळातही चरितार्थ चालू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर पोहोचावे लागते. त्यापलीकडेही मजल मारल्यास, तुम्हाला पैसे मिळवण्याच्या आणखी संधी मिळतात.

लहान मुलांना वयोगटातल्या स्पर्धेत खेळवावे
लहान मुलांसाठी वयोगटात होणाऱ्या स्पर्धा चांगल्या असतात. १२ वर्षांनंतर मुलांना खुल्या गटाच्या स्पर्धामध्ये खेळवणे उत्तम ठरू शकते. हल्ली मुले आणि मुली अशा वेगळ्या गटात स्पर्धा होतात. पण मुलींना मुलांच्या गटात खेळवल्यास, त्यांची सुधारणा जलद गतीने होईल.

अभ्यास गंभीरतेने करावा
दिवसातून कितीही वेळ सराव करत असाल तर तो गंभीरतेने करावा, असा माझा सल्ला आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स झालेल्यांच्या क्लासिक गेम्सचा अभ्यास केल्यावर भरपूर काही शिकता येते. आताचे गेम्स बघण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर खूपच उपयुक्त ठरू शकतो. गॅरी कास्पारोव्हची ‘माय ग्रेट प्रेडिसेसर्स’ ही मालिका तसेच मार्क वॉरेत्स्की यांचे ‘स्कूल ऑफ चेस एक्सलन्स’ ही पुस्तके वाचायला हवीत.

महान ग्रँडमास्टर्सची ‘सपोर्ट टीम’
वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लढतीसाठी दोन्ही प्रतिस्पध्र्याची सपोर्ट टीम असते. त्यांना ‘सेकंड्स’ म्हणतात. गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीच्या लढतीसाठी विश्वनाथन आनंदच्या टीममध्ये सूर्यशेखर गांगुली आणि अन्य तीन परदेशी ग्रँडमास्टर होते. ही टीम आनंदला शिकवत नाही तर आपल्याकडील कल्पना ते आनंदला देत असतात. आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळत असताना या टीमचे काम दिवस-रात्र सुरू असते. त्यांना पुरेशी झोपसुद्धा मिळत नाही. आनंदचे चित्त शांत राखण्यासाठी ही टीम मदत करत असते. प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा अभ्यास करून आपल्या चॅम्पियनला माहिती पुरवत असतात.

ग्रँडमास्टर कसे होता येईल..
बुद्धिबळात पुरुषांसाठी आंतरराष्ट्रीय मास्टर आणि ग्रँडमास्टर असे दोन किताब असतात. महिलांसाठी ते चार असतात. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर, ग्रँडमास्टर तसेच पुरुषांचे दोन्ही किताब त्या पटकावू शकतात. प्रत्येक रेटिंग स्पर्धामध्ये खेळल्यानंतर रेटिंग गुण मिळतात. पराभूत झाल्यावर रेटिंग गुण कमी होतात तर बरोबरी साधल्यावर गुण सारखेच राहतात. प्रत्येक किताबासाठी तीन नॉर्म पार करावे लागतात. तीन ग्रँडमास्टर नॉर्म आणि २५०० फिडे रेटिंग गुण मिळवल्यावर ग्रँडमास्टर किताब पटकावता येतो.

बुद्धिबळात वयाचे बंधन नाही
बुद्धिबळात वयाला कुठलेही बंधन नाही. गॅरी कास्पारोव्ह ४०व्या वर्षांपर्यंत खेळत होते. महान बुद्धिबळपटू विक्टर कोर्चुनाय हे सध्या ८१ वर्षांचे आहेत आणि ते अजूनही व्यावसायिक बुद्धिबळ स्पर्धामध्ये खेळत आहेत.

सामन्याआधी झोप महत्त्वाची
शारीरिक तंदुरुस्तीपाठोपाठ मन शांत ठेवणे महत्त्वाचे असते. लढतीदरम्यान बुद्धिकौशल्य पणाला लागत असल्यामुळे प्रत्येक सामन्याआधी पुरेशी झोप मिळणे अत्यावश्यक असते. त्याचबरोबर ध्यानधारणा करणे चांगले असते.

प्रवास करताना भाषेचा त्रास जाणवतो
विविध देशांच्या दौऱ्यावर असताना आम्ही अनेक देशांच्या प्रतिस्पध्र्याशी खेळत असतो. पण सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूशी संवाद साधण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रवास करताना आम्हाला खूपच त्रास जाणवतो. लोकांना हातवारे करूनही पाणी म्हणजे काय हे समजत नाही.

बुद्धिबळात रशियाचे वर्चस्व
रशिया किंवा अन्य युरोपियन देशांमध्ये बुद्धिबळाची जबरदस्त क्रेझ आहे. बुद्धिबळ हा राष्ट्रीय खेळ असलेल्या रशियात बुद्धिबळाच्या शाळा आहेत. तिथे मुलांना थेट दिग्गज आणि महान ग्रँडमास्टर्सकडून प्रशिक्षणाचे धडे गिरवण्याची संधी मिळते. मिखाइल बाटुरिन, कास्पारोव्ह यांची चेस स्कूल आहे. रशियात चेस कल्चर असल्यामुळे बुद्धिबळात रशियाचे वर्चस्व आहे. प्रशिक्षणाचा दर्जा उच्च असल्यामुळे तसेच भरपूर स्पर्धा होत असल्यामुळे तेथील बुद्धिबळपटूंचा दर्जाही चांगला आहे. भारतातही गुणवान बुद्धिबळपटू आहेत. तसेच चीनचे खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. चीनमध्येही बुद्धिबळ शाळांमध्ये दिग्गज खेळाडू लहान मुलांना प्रशिक्षण देतात.

प्रत्येक सामना नव्याने खेळावा
मागील सामन्यात वाईट कामगिरी झाली म्हणून निराश होऊ नये. गेल्या सामन्यातली वाईट कामगिरी विसरून येणारा नवा सामना नव्या जोशाने खेळावा. एकदा त्याने मला हरवले म्हणून या सामन्यात त्याच प्रतिस्पध्र्याला हरवावे, हा दृष्टिकोन बाळगायला हवा.

उत्तेजके शक्यच नाहीत!
बुद्धिबळात फसवणूक करण्याचे प्रकार होत असले तरी कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजके किंवा ड्रग्ज घेणे शक्यच नाही. ड्रग्ज घेऊन एखादा बुद्धिबळपटू खेळला तर त्याला झोपच येईल. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी मोबाइलचा वापर टाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच चेस इंजिन वापरण्यास मनाई आहे.