|| निक्की ठक्कर

चॉकलेट पाहिलं की थोडासा तुकडा मोडून तोंडात टाकावासा वाटतोच. लोक मला विचारतात तू चॉकलेट खातेस का.. तर माझं उत्तर ‘हो’ असतं. कारण २०० ते २५० ग्रॅम चॉकलेट रोज मी खातेच खाते.. आजच्या फूड-मौला या सदरातून माझ्या चॉकलेट प्रेमाविषयी सांगण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे चॉकलेटच्या आवडीमुळे मी चॉकलेटच्या गावांची भ्रमंती केली. आणि याच भ्रमंतीतून वाढत गेलेल्या चॉकलेट प्रेमातून मी स्वत: चॉकलेटचं गाव वसवलं..

मी लहानपणी चॉकलेटवेडीच होते, परंतु चॉकलेट कसं तयार करतात. त्याच्यात गोडवा कसा येतो, त्याचे वेगवेगळे आकार यांचंही कुतूहल माझ्या मनात असायचं. लहानपणापासून परदेशवारी खूपदा अनुभवली. त्यात विविध चॉकलेट ब्रॅण्ड चाखून पाहिल्याच्या अनेक आठवणी आहेत. याच कुतूहलाने एके दिवशी मला माझी व्यावसायिक बंधनं झुगारून देऊन युरोपला जाण्यास भाग पाडलं.

एकदा मी एका युरोपियन चॉकलेट बुटिकमध्ये गेले. तिथून काही चॉकलेट्स घेऊन भारतात परतले, तेव्हा डोक्यात विचार आला की परदेशातूनच का वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची चॉकलेट्स आपण आणतो. ती भारतात का तयार होत नाहीत. त्यानंतर चॉकलेट फॅक्टरी सुरू करण्याचे वेध लागले. आणि मी ते चांगलंच मनावर घेतलं. चॉकलेटच्या प्रॉडक्टमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचं हे मनातून ठरवलंच होतं. त्यासाठी प्रशिक्षण घेणं भाग होतं. मग इटली आणि बेल्जियमधून चॉकलेट मेकिंगचं प्रशिक्षण घेऊन मी २०१७ ला भारतात दाखल झाले.

चॉकलेट फॅक्टरीसाठी लागणारी अत्याधुनिक मशिनरी आणली. मग मोजकेच कामगार आणि मशिनरी घेऊन माझ्या चॉकलेट प्रवासाला सुरुवात झाली. बहुतेक सर्व काम मशीनवरच चालतं. त्याला हाताळायला कामगारवर्ग असतो. भारतात बऱ्याच चॉकलेट उत्पादनामध्ये कंपाऊंड चॉकलेट वापरलं जातं, पण मी चॉकलेटच्या उत्पादनांसाठी प्युअर डार्क चॉकलेट वापरते. असं डार्क चॉकलेट जे कुठल्याच ब्रॅण्डमध्ये वापरलं जात नाही. डार्क चॉकलेटमध्ये कोको बीन्स आणि कोको बटर असतं. त्याचा एक रिच फ्लेवर चॉकलेटला छान रंग आणि चव देतो. एका मोठय़ा टेम्परेचरला मशीनमध्ये ६० किलो ते २५ किलो चॉकलेट मेल्ट करून घेतो. चॉकलेटच्या विविध आकारानुसार किंवा पद्धतीनुसार ते डार्क चॉकलेट किती टेम्परेचरला, किती वेळ मेल्ट करायचं हे अवलंबून असतं. त्यामुळे त्याला एक छान चमक (शाइन) येते, तसेच ते वेगवेगळ्या आकाराच्या चॉकलेटमध्ये सेट होतं. ३० ते ३२ डिग्री टेम्परेचर हे सर्वसाधारण टेम्परेचर असतं. हे मशीनमध्येच होतं. फॅक्टरीतलं एक खास फ्लेवर्ड चॉकलेट म्हणजे ‘रासबेरी बोनबोन्स’. चॉकलेटला रासबेरी आणि ब्लूबेरीचा स्वाद येण्यासाठी उच्च प्रतीची ताजी रासबेरी आणि ब्लूबेरी यात वापरली जातात. ती आम्ही फ्रान्सवरून मागवतो. कुठल्याही प्रकारचे आर्टिफिशियल घटक त्यात घातले जात नाहीत. त्याचबरोबर जिंजर लाइम फ्लेवर चॉकलेटसाठी फ्रेश जिंजर वापरतो. विविध टेम्परेचरवर मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये फ्रेश फ्लेवर्स घालून ते मिक्स करून वेगवेगळ्या आकारातील साच्यात ओतले जातात. मग ते फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवले जातात.

चॉकलेटमध्ये फ्लेवरसाठी घातलेले वेगवेगळे नट्सही आपण पाहतो. हे नट्स वापरण्यातही आमची खासियत आहे. फॅक्टरीत एक रोस्टिंग रूम आहे. तिथे विविध टेम्परेचरला नट्स रोस्ट केले जातात. चॉकलेट फॅक्टरी मधील सगळा कच्चा माल हा बेल्जियम, फ्रान्स, घाना, टांझानिया, इक्वेडोर आणि मादागास्कर इथून येतो. काही चॉकलेट्समध्ये आम्ही हेजल नट्स वापरतो. तेही रोस्ट करूनच वापरतो. कारण रोस्ट केल्यावर त्याला एक छान चव येते तशी ती त्या आधी येत नाही. दिवाळी ते व्हॅलेंटाइन या काळात चॉकलेट्सना खूप मागणी असते.

एक चॉकलेटची छोटी रेसिपी सांगते, तुम्हाला आवडणारे नट्स घेऊन तुम्ही ते रोस्ट करून त्याला वरून मेल्ट केलेल्या चॉकलेटचे दोन ते तीन थर द्या आणि त्याला फ्रिजमध्ये सेट करा. हा झटपट होणारा चॉकलेट प्रकार आहे. आपल्याकडे काजू मोठय़ा प्रमाणात असतो. त्याचाही वापर करायला हरकत नाही. आम्ही फॅक्टरीत या चॉकलेटसाठी हेजल नट्स वापरतो. त्या रेसिपीला मी ‘ड्रॅगीज’ असे नाव दिले आहे. तसेच चॉकलेट बारमध्येही पिस्तासारखे नट्स आणि केशराचाही वापर करतो. फ्रूट बार, नट्स बार आणि सिंगल ओरिजीन बारही विविध आकारात तयार केले जातात.

सॉल्टेड कॅरामल सरप्राइज, ब्लूबेरी क्यूब चॉकलेट, सिसॅम्स स्क्वेअर्स, जिंजर लाइम हे काही प्रकार आम्ही एन्टीसी चॉकलेट फॅक्टरी सुरू केल्यापासून लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. चिक्कीचे अनेक प्रकार आपल्या आवडीचे आहेत. या चिक्कीचं चॉकलेट व्हर्जनही करून पाहिलं आणि तेही हीट झालं. त्याचबरोबर कॉफी लव्हर्सना कॉफीचे वेगवेगळे प्रकार ट्राय करायला आवडतात. म्हणून एके दिवशी कॉफीच्या एखाद्या प्रकारापासून चॉकलेट करायचं ठरवलं. एक्सप्रेसो कॉफी ही कॉफीप्रेमींच्या खास आवडीची असते. ती तिच्या स्ट्राँग स्मेलसाठी ओळखली जाते. ज्याला कॉफी प्रिय तो एक्सप्रेसो कॉफीचा आधी सुगंध घेतो आणि मगच सीप करतो. ते लक्षात घेऊन एक्सप्रेसो कॉफी वापरून एक चॉकलेट तयार केलं. हे चॉकलेट तुम्हाला प्रवासात कॉफी प्यायल्याचा फील देईल.

चॉकलेटचे प्रॉडक्ट तयार करताना रंग आणि सुगंध यांचा सुरेख मेळ साधून आला तरच ते प्रॉडक्ट उत्तम ठरतं. रिअल चॉकलेट ओळखायचं कसं तर तुम्ही ते तोंडात टाकल्यावर तुमच्या तोंडातील उष्णतेमुळे पटकन मेल्ट होतं, ते रिअल चॉकलेट असतं. कारण त्यात शंभर टक्के कोको बटर असतं. फॅक्टरीत प्रवेश केल्यावर रोज वेगवेगळे अनुभव येतात. काही समस्या उभ्या राहतात, त्यातून वाट काढताना अधिकाधिक शिकायला मिळते. फॅक्टरीत आम्हीच तयार केलेलं विविध नैसर्गिक रंग आणि कॉफीच्या रंगासारखं दिसणारं चॉकलेट आसपास एवढं पसरलेलं असतं की या चॉकलेटच्या गावाची जणू मला रोजच नव्याने ओळख होते. आणि नव्या चॉकलेट रेसिपी सतत खुणावत राहतात.

viva@expressindia.com