|| वेदवती चिपळूणकर

मानसशास्त्र विषयात भैरवीने पदवी घेतली आणि पदव्युत्तर शिक्षणही, अर्थात एम.ए. त्याच विषयात घेतलं. ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’ हा तिचा पदवीचा मुख्य विषय होता. मास्टर्स केल्यानंतर पुण्याच्या गरवारे कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिने काम करायला सुरुवात केली. दोन र्वष तिने कॉलेजमध्ये शिकवलं. मात्र नंतर तिला ते प्रोफेशन खूपच बांधीव वाटायला लागलं आणि तिने नोकरी सोडली. मोठय़ा मुलांना शिकवण्यापेक्षा ती लहान मुलांमध्ये रमायला लागली. त्यांची वर्कशॉप्स घेत असतानाच डूडलच्या माध्यमातून तिचा ब्रॅण्ड ‘पिंतोर’ आणि नंतर त्यामागचं ‘भैरवी देशमुख खोत’ हे नाव फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फेमस झालं.

प्रोफेसरसारखी मानाची, आर्थिक स्थैर्याची आणि खात्रीशीर भविष्याची नोकरी सोडून लहान मुलांच्यात काम करणं हा एक मोठा निर्णय होता. त्यामागची भावना भैरवी वर्णन करते, ‘कॉलेजमध्ये मी शिकवत असताना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही अनेक प्रयोग करायचो. ठिकठिकाणी व्हिजिट्स करायचो, प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचो. सतत काही तरी नवीन केल्याशिवाय मला स्वस्थताच मिळत नाही. त्यामुळे मग मला हळूहळू तेच तेच शिकवत राहण्याचा कंटाळा यायला लागला. मला काही तरी नवीन करायचं होतं, प्रयोग करायचे होते. मात्र कॉलेजचा अभ्यासक्रम आणि डिपार्टमेंट हेड्सच्या अपेक्षा या सगळ्यात मला समाधान मिळेना. म्हणून मी जॉब सोडायचा निर्णय घेतला’. सुरुवातीला आईला वाटलं होतं की एवढा चांगला जॉब, शिक्षणासारखं मानाचं प्रोफेशन मी असंच सोडून देऊ  नये, मात्र हळूहळू तिलाही माझा निर्णय पटला असे भैरवी सांगते.

अनेकदा असं होतं की एखादी व्यक्ती एखादा निर्णय घेते. काही काळाने त्या व्यक्तीला स्वत:च्या निर्णयाबद्दल शंका यायला लागते. ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अशा विचारप्रक्रियेत ती व्यक्ती अडकून पडते. धोपटमार्गाने न चालता काही वेगळी वाट धुंडाळणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात असा प्रसंग एकदा तरी आलेला असतो जेव्हा स्वत:च्या निर्णयाच्या योग्यतेची खात्री वाटत नाही. मानसशास्त्राची पदवीधर असलेल्या भैरवीने अशा प्रसंगांबद्दल बोलताना म्हटलं, ‘असा प्रसंग काही एकदाच येतो किंवा अशी मन:स्थिती एकदाच असते असं नाही. अनेकदा अशी शंका येत राहते. विशेषकरून आर्थिक बाबतीत जेव्हा आपल्याच वयाच्या इतरांना स्वत:च्या कमाईवर काही गोष्टी अचिव्ह करताना आपण बघतो, तेव्हा त्यांचं कौतुक तर असतंच. पण आपलं चुकलं का, ही शंकाही येत राहते. हे असे विचार केवळ एकदा नाही, वारंवार डोक्यात येत राहतात. या गोष्टींवर अनेकदा स्वत:च मात करावी लागते. मला मात्र या गोष्टी हॅण्डल करण्यासाठी कुटुंबाचा खूप सपोर्ट मिळाला.’ मी थोडीफार बंडखोर आहे, कारणाशिवाय कोणतीही गोष्ट सहज मान्य न करणारी आहे, आऊट ऑफ द वे जाणारी आहे, असं भैरवी म्हणते. मात्र या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी माझं शिक्षण ज्ञानप्रबोधिनीमध्ये झालं आहे. त्यामुळे विचार करण्याची एक वेगळी पद्धत आणि त्याचा पक्का पाया हा माझ्या स्वभावाचा भाग बनलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे वरवर मी रोखठोक असले तरी त्यामागे काही तरी विचार नक्की असणार याची माझ्या कुटुंबीयांना खात्री असते आणि म्हणून ते मला कायम पाठिंबाच देत आले आहेत. स्वत:च्या निर्णयाबद्दल शंका वाटायला लागली की त्यांनीच मला माझ्या निर्णयाची सकारात्मक बाजू सांगून पुन्हा उभारी दिली आहे, असा अनुभवही तिने सांगितला.

जेव्हा भैरवीने नोकरी सोडली तेव्हा काही एक उपक्रम किंवा गोष्ट करायची असं तिचं ठरलेलं नव्हतं. जसं सुचलं तसं तिने काम करायला सुरुवात केली. ‘Psyकल’ या नावाने तिने लहान मुलांची वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये रमायला तिला आवडत होतं. तिच्या या कल्पनेबद्दल ती म्हणते, ‘Psyकल’ हा कोणताही संस्कार वर्ग वगैरे म्हणून मला सुरू करायचा नव्हता किंवा मुलांना फार काही शिकवायचं होतं असंही नाही. सायकॉलॉजीमध्ये एक सिद्धांत मानला जातो. इंटरेस्ट आणि अ‍ॅप्टिटय़ूडचा. एखाद्याला एखाद्या गोष्टीत रस असतो पण ती त्याची कुवत नसते किंवा एखाद्याची एखाद्या क्षेत्रात कुवत असते पण त्याला त्यात रस नसतो. अशा वेळी चुकीच्या क्षेत्रात धडपड करण्याने अनेकांची करिअर्स वाया जातात. या सगळ्या गोष्टी कोणत्याही मुलाला स्वत:च्या स्वत: लक्षात येत नाहीत. त्यासाठी त्यांचा आईबाबांशी संवाद असणं अत्यंत आवश्यक असतं, असं ती म्हणते. मात्र आजकाल आईबाबा आणि मुलं दोघंही बिझी असतात. त्यामुळे मूल आणि त्याचे पालक यांच्यातला संवादाचा दुवा होण्याची कामगिरी मला पार पाडायची होती. यातून मला खरं तर काहीच अचिव्ह करायचं नव्हतं किंवा मुलांच्या पालकांपेक्षा माझं महत्त्व वाढू द्यायचं नव्हतं. दोघांनाही जोडणारी केवळ ‘ताई’ म्हणून मला हे काम करायचं होतं आणि त्याप्रमाणे मी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली, अशी माहिती तिने दिली.

लहान मुलांची वर्कशॉप्स घेत असतानाच फावल्या वेळात तिने चित्र किंवा डूडल्स काढायला सुरुवात केली. आपल्या चित्रांचा कमर्शिअली काही वापर करावा असं काही भैरवीच्या डोक्यातही आलं नव्हतं. मात्र तिची ही डूडल्स सोशल मीडियावर फारच लोकप्रिय होत गेली. तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला आग्रह करून काही वस्तू तिच्याकडून कस्टमाइज्ड करून घेतल्या. इतरांच्या आग्रहाने तिने ‘पिंतोर’ हा ब्रॅण्ड सुरू केला आणि त्याला थोडं फार कमर्शिअल स्वरूप दिलं. ‘पिंतोर’बद्दल बोलताना भैरवी म्हणते, ‘असा काही ब्रॅण्ड होऊ  शकतो हे माझ्या डोक्यातही नव्हतं. आता काही काळ झाला. आम्ही हा ब्रॅण्ड कमर्शिअल केला आहे. मात्र तरीही मला डेडलाइन आहे म्हणून किंवा मला काम देणाऱ्याला हवं आहे म्हणून काही तरी रेखाटून देता येत नाही. कागदावर काढलेल्या चित्रातल्या बारीकसारीक डिटेल्सच्या मागे माझी मोठी प्रोसेस असते. त्यामुळे उगीचच काही तरी खरडलं आहे, असं मला करता येत नाही,’ असं ती स्पष्टपणे सांगते.

भैरवीची ही कलात्मक धाव इथेच थांबलेली नाही. भविष्यात थेरपी देणारं असं एखादं रिलॅक्सिंग सेंटर वगैरे सुरू करण्याचा तिचा मानस आहे. तिचं मानसशास्त्राचं शिक्षण, रंगभूमीची पाश्र्वभूमी आणि क्रिएटिव्हिटी या तिन्हींचा मेळ घालून भविष्यात काहीतरी समाजोपयोगी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ती विश्वासाने सांगते.

स्वत:च्या निर्णयाबद्दल शंका येण्याचे प्रसंग अनेकदा येतात. मात्र आपलं उदाहरण भविष्यात कोणत्या पद्धतीने दिलं जावं असं वाटतं याचा विचार अशा वेळी आपण करायला हवा. हिमतीने निर्णय घेतला आणि यशस्वी झाली असं आपलं उदाहरण असावं की चुकीच्या निर्णयाने एवढी र्वष नुसतीच वाया घालवली अशी आपली संभावना केली जावी, हे आपण ठरवायचं आणि त्यानुसार आपल्या निर्णयाचा फेरविचार करायचा.’    – भैरवी देशमुख खोत