20 January 2021

News Flash

वस्त्रांकित : ‘जोट’दार वळणवाट

एका ओवीमधून सुरू झालेला हा प्रवास वास्तवात बरीच रोचक वळणे घेत होता.

(संग्रहित छायाचित्र)

विनय नारकर

एका ओवीमधून सुरू झालेला हा प्रवास वास्तवात बरीच रोचक वळणे घेत होता. ओवीमधून ‘जोठ’ हा शब्द कळणं, एका पुस्तकात त्याबद्दल ओझरता उल्लेख व छायाचित्र सापडणं, त्याहून अकल्पित म्हणजे सत्तर-ऐंशी वर्षे जुनी तशीच साडी मिळणं, आणि ओवी व साडी या दोन्हीचा निर्देश विदर्भाकडे असणं, हे सगळे दुवे जोडून आम्ही विदर्भ दौरा निश्चित केला.

नागपूर किंवा विदर्भ भागाशी माझा काहीच परिचय नव्हता. तिथे जाऊन नेमका शोध घ्यायचा कसा हा मोठा प्रश्न होता. त्यातही लॉकडाऊनच्या काळात (अर्थात नियम शिथिल झाल्यानंतरच) लोकांशी कसा संपर्क साधायचा ही कळीची बाब होती. या बाबतही योग जुळून आला. नागपूरचे रहिवासी असलेले, समाजमाध्यमाद्वारे मैत्री झालेले आमचे स्नेही नरेंद्र गिरीधर यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली. विदर्भातील विणकरांच्या काही प्रमुख गावांमध्ये जाण्याचे ठरवले होतेच.

त्याआधी नागपूरमधील सरकारी विणकर संस्थेत जाऊन शोध घेण्यासाठी गेलो. ही संस्था गेली अनेक वर्षे विणकरांची उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. या संस्थेतील ज्येष्ठ सदस्यांसोबत आम्ही चर्चा केली. त्यांना आमच्या जवळ असलेली ती जुनी साडी दाखवली. ती साडी पाहताच ते म्हणाले की ही जोट साडी आहे. बऱ्याच वर्षांनंतर ही साडी पाहून तिथली मंडळी खूश झाली. जोट साडीबद्दल आणखी माहिती देताना ते म्हणाले की, ही साडी रास्ता (आडव्या रेघा) किंवा प्लेन अशी विणली जायची. पदर गंडेरी असायचा. या साडीच्या काठामधील इकतचा छोटा पट्टा हे या साडीचे वेगळेपण होते. त्यांनी हेही सांगितले की इकतचा पट्टा, ज्याला ते ‘चुटकी’ म्हणायचे, तो इथे नागपूरमध्ये व विदर्भातल्या अन्य भागातच बनायचा. यायोगे महाराष्ट्रात इकत पद्धतीचे रंगलेपन व्हायचे ही महत्त्वाची बाब अधोरेखित होते.

या प्रकारच्या साडय़ा विदर्भातल्या पवनी, भंडारा, उमरेड  या गावांमध्ये विणल्या जात असाव्यात अशी शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं. साधारण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी या साडय़ा विणल्या जात असत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्यापैकी सर्वात ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले की या जोट साडय़ा अचलपूर या गावात बनायच्या. दुसऱ्या दिवशी आम्ही विणकर केंद्राला भेट दिली. तिथल्या सुजाण अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे तिथे जतन केलेले जोट साडय़ांचे नमुने आम्हाला पाहायला मिळाले. ते नमुने साधारण पस्तीस-चाळीस वर्षे जुने होते. आमच्या जवळ असलेल्या जोट साडी आणि हे नमुने यात थोडा फरक दिसून येत होता. काळाच्या ओघात हा फरक पडल्याचे लक्षात येत होते. हे नमुने फक्त सुती साडय़ांचे होते. आमच्याकडे असलेली साडी ही रेशमी होती. या नमुन्यांमधे काही नमुने असेही होते त्यांच्या काठांमधे इकतचा पट्टा नव्हता आणि या साडय़ा सगळ्यात नंतरच्या काळातील होत्या. म्हणजे साधारण १९८५ ते ८७ या दरम्यानच्या होत्या. याचा अर्थ साधारण ८५ सालानंतर विदर्भामधील इकत रंगलेपन संपुष्टात आले, असे आपण म्हणू शकतो. विणकर केंद्रात उपलब्ध असलेली माहिती व नमुने हे साधारण ४०-४५ वर्षांपूर्वीपर्यंतचेच होते.

सरकारी हातमाग संस्था आणि विणकर केंद्र या दोन्ही भेटी या शोधकार्यात अतिशय उपयोगी ठरल्या. परंतु एका गोष्टींची माहिती मिळू शकली नाही. ती म्हणजे आमच्याजवळील रेशमी जोट साडी किती वर्षे जुनी आहे हे समजू शकले नाही. आमचा पुढचा टप्पा होता आसपासच्या विणकर गावांना भेटी देण्याचा. आम्ही पवनी, भंडारा,पालंदूर व आसपासची  छोटी गावे आणि उमरेड या गावांमधे जाऊन माहिती मिळवण्यासाठी बरेच भटकलो. प्रत्येक गावाची वस्त्रपरंपरा व विणकाम याची स्वतंत्र कथा आहे. उमरेडची वस्त्रे तर एक खास अभ्यासाचाच विषय आहे. या गावात एके काळी एकूण लोकसंख्येच्या ८० टक्के  लोकसंख्या ही फक्त विणकरांचीच होती. आज विदर्भातील प्रसिद्ध सावजी भोजनालये ही इथल्या बेरोजगार झालेल्या विणकरांनीच सुरू केली आहेत. पण आत्ताचा आपला विषय हा जोट साडी असल्याने याच्या अधिक खोलात जाणे उचित नाही.

या गावांच्या भेटींमधून इथल्या वस्त्रपरंपरांविषयी बरीच माहिती मिळाली. या बहुमूल्य माहितीसोबत निराशादायक अशीही माहिती मिळाली की यापैकी कोणत्याही गावात जोट साडी विणली जात नव्हती. आता एकच मार्ग शिल्लक होता आणि तो म्हणजे अचलपूरचा. दुसऱ्या दिवशी साशंक मनानेच आम्ही अचलपूरचा मार्ग पकडला. आम्हाला अचलपूरबद्दल एवढंच माहिती होतं की सध्या तिथे ‘तडव’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सतरंज्याच फक्त विणल्या जातात. या तडवनाही शेकडो वर्षांची परंपरा आहे. पेशवाई काळातही या तडवना विशेष मागणी असल्याचे उल्लेख सापडतात. या गावात पोहोचताच आम्ही तडक तडव विणणाऱ्या विणकराच्या  घरी गेलो. या विणकर परिवाराचे कुटुंबप्रमुख होते बशीर आजोबा. या आजोबांचे वयं होते तब्बल ९८ वर्षे! खणखणीत आवाज, तल्लख स्मरणशक्ती व एकूणच उत्तम तब्येत राखून असलेल्या बशीर आजोबांनी आमच्याजवळील साडी तात्काळ ओळखली. साडी पाहताच ते उद्गारले, ‘ ये तो हमारे अचलपूरकाही लुगडा है!’ त्यांच्या या उद्गाराने आमच्या मावळलेल्या उत्साहाला भरते आले. त्यांनी हेही सांगितले की ही साडी साधारण स्वातंत्र्यप्राप्तीदरम्यानच्या काळात अचलपूरमध्ये  विणली जात होती. आणि  ही साडी त्यांच्या तरुणपणी विणली जात असताना पाहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. यासोबतच आम्हाला आमच्या आणखी एका प्रश्नाचे उत्तर मिळाले, आमच्याजवळ असलेली साडी ही ७० ते ८० वर्षे जुनी आहे. ते म्हणाले की या साडीला त्या काळी इतकी मागणी होती की या साडीचे विणकाम रात्रंदिवस चालायचे तरी मागणीएवढा पुरवठा होत नसे. त्यांच्या परिवारातील तरुण सदस्य आम्हाला तेथील विणकर समाजाचे अध्यक्ष भेंडे यांच्याकडे घेऊन  गेले.

भेंडे ही साडी पाहताच अतिशय खूश झाले. त्यांनी अचलपूरच्या या साडीबद्दल भरभरून माहिती दिली. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आजीकडे व आईकडे अशी साडी असल्याची आठवण त्यांनी सांगितली. ही साडी ठेवणीतली साडी असून विशेष प्रसंगी नेसली जायची, असेही त्यांनी सांगितले. ही साडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरितही केली जात असे. या साडीच्या अचलपूरमधील बाजाराचीही त्यांनी विशेष माहिती दिली. अचलपूरमधील समरसपुरा या भागात दर बुधवारी व शनिवारी हा बाजार भरायचा. हा बाजार विशेष म्हणजे पहाटे ४ ते ६ या वेळेतच भरायचा. या बाजारासाठी देशाच्या अनेक भागांतून व्यापारी यायचे. अगदी कराचीहूनही बरेच व्यापारी यायचे. या व्यापाऱ्यांना अचलपूपर्यंत पोहोचण्यासाठी इथल्या खास अशा ‘शकुंतला’ या भारतातील एकमेव खासगी रेल्वेचा उपयोग होई. बाजाराच्या आदल्या दिवशी हे व्यापारी अचलपूरला  येत. त्यांच्या मुक्कामाची खास सोय विणकरांकडून केली जायची. या दोन तासांच्या बाजारात तब्बल १५०० ते २००० लुगडय़ांची खरेदी-विक्री होत असे. सहा वाजल्यानंतर बाजारात एकही लुगडे शिल्लक राहात नसे. इतकी प्रचंड मागणी असल्या कारणाने, विणकर इथे रात्री दोन वाजेपर्यंत लुगडी विणत असत.

हे सगळं ऐकताना आम्हाला एखाद्या अद्भुतरम्य कथेचा भास होत होता. आम्ही भेंडे यांना विचारणा केली की अशी साडी विणलेल्या एखाद्या विणकराला भेटता येईल का? त्यानंतर ते आम्हाला गावातील सर्वात ज्येष्ठ विणकरांकडे घेऊन गेले. त्यांच्याकडे जात असताना वाटेत आम्हाला विणकरांची जुनी घरे व गल्ल्या यांचे मनोरम दर्शन होत होते. गल्लीतील एका घरासमोर थांबून त्यांनी कांबळे काकांना हाक मारली , धोतर आणि गांधी टोपी घातलेले कांबळे काका बाहेर आले. वयाची ऐंशी  वर्षे पार केलेल्या कांबळे काकांना ऐकायला कमी येत होते. पण आमच्याजवळील जुनी साडी पाहताच, काकांचा चेहरा असा काही खुलला की  त्यांना काही विचारण्याची गरजच उरली नाही. काकांना साडी दाखवतानाच्या क्षणी आमचा कॅमेरा सज्ज नव्हता याची हुरहुर, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आम्हाला लागून राहिली. काकांनी आम्हाला सांगितले, त्यांनी अशा साडय़ा त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून त्यांच्या घरी विणल्या आहेत. या साडीबद्दल माहिती देताना ते म्हणाले की ही साडी प्लेन, रास्ता आणि बुट्टी अशा तिन्ही  प्रकारांत विणली जायची. या निमित्ताने अचलपूरच्या वस्त्रांचा हा वैभवशाली काळ आठवून सगळेचजण सुखावून गेले होते.

जोट साडीबद्दलचा एका ओवीपासून सुरू झालेला हा प्रवास या साडीबद्दलची सर्वतोपरी माहिती मिळवत ही साडी विणलेल्या एका विणकरापर्यंत येऊन पूर्ण झाला.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 12:30 am

Web Title: clothe article on saree abn 97
Next Stories
1 ‘केश’रंगी रंगले!
2 मौज अनलॉक!
3 सदा सर्वदा स्टार्टअप : मार्केटिंग माहात्म्य
Just Now!
X