News Flash

शेफखाना : ‘क्लाऊड किचन’चा ट्रेण्ड

एखादं छोटेखानी हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं म्हटलं की खूप साऱ्या गोष्टींचा ताळमेळ जमवावा लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ मधुरा बाचल

घोस्ट किचन, डार्क किचन, व्हर्च्युअल किचन.. बाप रे! नाव ऐकूनच काहीतरी मायावी नगरीत गेल्यासारखं वाटतं की नाही? तसं म्हणाल तर मायावी किचनच म्हणावं लागेल ज्याला आज काल ‘क्लाऊड किचन’ असं म्हणतात. याचीच ही स्पेशल स्टोरी आजच्या शेफखाना सदरात..

एखादं छोटेखानी हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं म्हटलं की खूप साऱ्या गोष्टींचा ताळमेळ जमवावा लागतो. जसं हॉटेलसाठी पहिलं म्हणजे चांगली मोक्याची जागा शोधून काढणं, सर्व स्टाफ हायर करणं, हॉटेलसाठी लागणारं सामान-फर्निचर, विजेचं बिल, महिन्याचा मेंटेनन्स अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. यामध्ये बक्कळ पैशांची गुंतवणूक करावी लागते आणि त्याचबरोबर व्यवसाय करताना बऱ्याच गोष्टींवर अवलंबून रहावं लागतं. जसं की, विजेचा पुरवठा खंडित होणं, शेफ बदलत राहणं, कामावर कामगार वेळेत न येणं.. कुठल्याही ‘डाइन इन’ रेस्टॉरंटच्या तुलनेत ‘क्लाऊड किचन’मध्ये कायमच कमी गुंतवणूक आणि भांडवलाची गरज असते. समस्याही कमी असतात.

हे इतकं ऐकल्यानंतर ‘क्लाऊड किचन’ म्हणजे नक्की काय बाबा?, हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच उमटला असणार. तर क्लाऊड किचन म्हणजे दुसरं काही नसून एक रेस्टॉरंटच आहे. पण या किचनमध्ये आपल्याला हॉटेलमध्ये बसून ऑर्डर देतो, तशी ऑर्डर द्यायची सोय नसते. त्याचबरोबर ऑर्डर देऊन टेकअवे पण करू शकत नाही. क्लाऊड किचनमध्ये पूर्णपणे थर्ड पार्टी इंटिग्रेशन असतं. ज्यात तुम्ही पदार्थ कॉलवर, डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे किंवा मग वेबसाइट वरून ऑर्डर करू शकता. त्याच बरोबर एकाच किचनमधून तुम्ही वेगवेगळे ब्रॅण्ड्स पण लाँच करू शकता. म्हणजे जर तुम्ही ‘अस्सल कोल्हापुरी’ या ब्रॅण्ड अंतर्गत क्लाऊड किचनमध्ये मिसळ पाव, शेव पाव बनवत असाल. तर त्याच किचनमध्ये तुम्ही ‘इटालियन किचन’ असा ब्रॅण्ड लाँच करून पास्ता, पिझ्झा डिलिव्हर करू शकता. आणि सेम शेफ दोन्ही पदार्थ बनवू शकतात.

क्लाऊड किचनमध्ये सगळ्यात जास्त फायदा म्हणजे जागेमध्ये खूप जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. आणि जागा निवडताना तिथे पाार्किंग आहे की नाही, मोक्याचं ठिकाण आहे की नाही या गोष्टींचा विचार करावा लागत नाही. पण स्वछता आणि हायजिन खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कस्टमर डेमोग्राफिक पण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हांला मिसळ पाव सुरू करायचं आहे तर मिसळ पावसाठी सगळ्यात जास्त मागणी कुठल्या भागातून आहे याचा गृहपाठ करणं अत्यंत गरजेचं आहे.

क्लाऊड किचनसाठी महत्त्वाचे असणारे परवाने जसं की ‘एफएसएसएआय’चा परवाना, फायर डिपार्टमेंटकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, जीएसटी रजिस्ट्रेशन या सर्वांची पूर्तता करणं महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता करणं हे वेळखाऊ  असतं, त्यामुळे लवकरात लवकर या सर्व गोष्टींची प्रक्रिया सुरूकरणं गरजेचं आहे.

मला माहिती आहे सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या मनात आला असेल की ऑनलाइन डिलिव्हरीसाठी स्वत:चं अ‍ॅप गरजेचं आहे का? तर स्वत:चं अ‍ॅप असलेलं कधीही चांगलं कारण त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या कस्टमरबरोबर वैयक्तिक संपर्कात राहू शकता. अ‍ॅपची कॉस्ट साधारण १० हजार ते ५० ते ६० हजारापर्यंत जाऊ  शकते. जर डिलिव्हरी अ‍ॅपमध्ये सुरुवातीला गुंतवणूक करायची नसेल तर तुम्ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी अ‍ॅप जसं की स्वीगी, झोमॅटो यावर तुमचा ब्रॅण्ड रजिस्टर करू शकता. ऑर्डर प्रोसेसिंगसाठी ‘पीओएस’ म्हणजे ‘पॉईंट ऑफ सेल सव्‍‌र्हिस’ असणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं ज्या ऑर्डर येतात त्या डिस्प्ले स्क्रीनवर येतात आणि मग ऑर्डर प्रोसेस करणं सोप्पं जातं.

क्लाऊड किचनमध्ये ‘डाइन इन’ नाही त्यामुळे केवळ कुशल शेफ, डिलिव्हरी बॉईज आणि किचनसाठी काही मदतनीस हायर करावे लागतात. क्लाऊड किचन दर्शनीय नसल्यामुळे क्लाऊड किचनमध्ये मार्केटिंगवर जास्त फोकस करणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी सर्व ऑनलाइन माध्यमांमध्ये सतत अ‍ॅक्टिव्ह राहणं अत्यंत गरजेचं आहे. सोशल मीडिया साइट्सवर तुमच्या व्यवसायाबाबत पोस्ट टाकत राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. क्लाऊड किचनमध्ये वेगवेगळे बिजनेस मॉडेल्स अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, स्वतंत्र क्लाऊ ड किचन ज्यामध्ये एकच ब्रॅण्ड असतो, एक किचन आणि स्टोअर फ्रंट नसतं. त्याचबरोबर मल्टी ब्रॅण्ड क्लाऊड किचन, हायब्रीड क्लाऊड किचन, शेल क्लाऊड किचन असे प्रकार यात पहायला मिळतात.

नि:संकोचपणे फूड इंडस्ट्रीचं भविष्य क्लाऊड किचन हे आहे. अर्थातच, रेस्टॉरंटमध्ये जाणं, तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच अनुभव आहे. पण घरबसल्या डिलिव्हरी, सोय या गोष्टींचा विचार करता भविष्यात क्लाऊड किचनला नक्कीच प्राधान्य असेल.

ग्रीन पीज कटलेट

साहित्य : १ बटाटा, ३ ते ४ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, २ वाटी ताजा मटार, १/२ कप पोहे, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा लिंबाचा रस.

कृती : बटाटा सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. कुकरच्या डब्यात बटाटा, मटार, लसूण, मिरची आणि थोडं पाणी घालून एक शिट्टी काढून घ्यावी. बटाटा शिजल्यावर पाणी काढून टाका. मटार, बटाटा, लसूण आणि मिरची स्मॅश करून घ्या. त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले पोहे घाला. लाल तिखट, मीठ आणि लिंबू रस घालून मिक्स करून घ्या. छोटे कटलेट करून तव्यावर श्ॉलो फ्राय करून घ्या.

झटपट ज्वारीचे घावन

साहित्य : १ कप ज्वारीचं पीठ, १/४ कप तांदूळ पीठ, लसूण मिरची ठेचा, १ चमचा लिंबाचा रस, हळद १/२ चमचा, मीठ चवीपुरतं.

कृती : सर्व जिन्नस मिक्स करून सरसरीत पीठ करून घ्या. तव्यावर तेल घालून, छान पातळसर घावणे करून घ्या व सव्‍‌र्ह करा.

कुकरमध्ये गाजर हलवा

साहित्य : १/२ किलो गाजर,

१ कप खवा, २५० ग्रॅम साखर, १/४ कप दूध, वेलची पूड, सुका मेवा.

कृती : गाजर किसून घ्यावेत. सर्व जिन्नस कुकरमध्ये मिक्स करून मीडियम हिटवर एक शिट्टी काढून घ्यावी. झटपट गाजर हलवा तयार आहे.

केळीचे कुरकुरीत काप

साहित्य : कच्ची केळी, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, बारीक रवा.

कृती : केळीचे साल काढून पातळ काप करून घ्यावेत. केळीचे काप १० मिनिटे पाण्यात ठेवावेत. काप पाण्यातून निथळून काढून पुसून घ्या.

कापाला लाल तिखट, चाट मसाला आणि गरम मसाला लावून घ्यावा. रव्यात घोळवून शॅलो फ्राय करून घ्या.

 

शब्दांकन : मितेश रतिश जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:30 am

Web Title: cloud kitchen trend abn 97
Next Stories
1 मातीतील तरुण हात!
2 क्षण एक पुरे! : वाट तोलामोलाची
3 ट्रेक फॅशन
Just Now!
X