एकटय़ानं एन्जॉय करायची जागा म्हणजे बुक कॅफे असं समीकरण आता रूढ होतंय. पुस्तकांच्या दुकानात असलेलं कॉफी शॉप किंवा कॉफी शॉपमध्ये असणारी लायब्ररी असं बुक कॅफेचं स्वरूप. पण एकटी-दुकटी कुठे जाऊ? असा फील देणारं वातावरण इथे अजिबात नसतं. निवांतपणे, पुस्तक आणि कॉफीच्या सान्निध्यात वीकएंड साजरा करायला हे हक्काचं स्थान बनतंय.
शांत तरीही छान पॉझिटिव्ह वातावरण.., म्हणजे अगदी कोपऱ्यापासून ते एन्ट्रन्स आणि एक्झिटपर्यंत व्यवस्थित प्रकाश मिळेल अशी लाइटिंग सिस्टीम.. ज्यात कुठेही भकभकाट, झगमगाट नाही.. डोळे दिपवून टाकणारा प्रकाश नाही.. नाकाला आणि पर्यायानं तना-मनाला शांत करणारा दरवळणारा वास.. कानांवर पडणारे सॉफ्ट इन्स्ट्रमेंटल्स.. बाजूलाच हवं असेल तर पाणी, कॉफी आणि एखादं स्नॅक्स प्रोव्हाइड करणारं कॉफी शॉप.. आजूबाजूला माणसांची वर्दळ.. पण डिस्टर्ब करणारं कुणीही नाही.. एकूणच हेल्दी अ‍ॅटमॉस्फिअर.. ज्यात पॉझिटिव्हिटी अगदी ठासठासून भरलीय.. कुठल्याही वयोगटासाठी पॉप्युलर बनत चाललेल्या बुक कॅफेमधलं हे चित्र..
काही दिवसांपूर्वी अभ्यासाला अतिशय वैतागून थोडासा चेंज मिळावा यासाठी एकटीच क्रॉसवर्डमध्ये जाऊन बसले. तेव्हापासून तिथे जायची सवयच झालीयं.. क्रॉसवर्ड सारख्या बुक कॅफेज्ची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे, तुम्हाला तिथे एकटय़ाला कितीही वेळ जाऊन बसता येतं.. अगदी तासन्तास. तेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट! खरं तर एकटय़ानं कुठेही जाणं तसं जरासं ऑकवर्डच! पण मला वाटतं यांसारख्या बुक कॅफेज्मध्ये जायचंय, हा फक्त विचारच तुम्हाला तिथं एकटय़ाला जाण्यासाठीच ग्रीन सिग्नल देतो..
क्रॉसवर्ड, ऑक्सफर्ड, चा बार, फोर्टचा किताबखाना, केम्प्स कॉर्नरचं कॅफे मोशेज यांसारखी बुक कॅफेज् म्हणजे मॉडिफाईड व्हर्जनच्या लायब्ररीच! पण लायब्ररीज्च्या कंटाळवाण्या, अंधाऱ्या वातावरणाला ओव्हरकम करणारे हे बुक कॅफेज्! कित्येक लायब्ररींमध्ये पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला कम्पलसरी मेंबरशिप घ्यावी लागते. पण या बुक कॅफेजचं मात्र तसं नाही.. खरं तर लायब्ररीचा टेबल-चेअरचा टिपिकल लुक नसल्यानं या बुक कॅफेजचं एक वेगळेपण नजरेत भरतं. शिवाय इथे बॅकग्राउन्डला वाजत असणारं इन्स्ट्रमेंटल आणि दरवळणारा माइल्ड अरोमा तुमच्या मूडमध्ये लगेच चेंज करतो.. आणि एक पॉझिटिव्हिटी देतो. मधूनच कॉफीबिन्सचा तरतरी आणणारा वास येतच असतो.
हल्ली तर अगदी सगळ्या वयोगटांच्या सगळ्यांनाच बुक कॅफेजचा हा ऑप्शन अगदी कन्व्हिनिअन्ट वाटायला लागलाय. कोलाहल नाही, कुणी उपटसुंभासारखं विचारायला येणार नाही. फक्त पुस्तक, कॉफी आणि तुम्ही. झकास! कधीही या, आणि तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्याही विषयावरचं कुठलंही पुस्तक उचलून वाचत बसा, हा ट्रेंड अनेकांना आवडतोय.
आणि त्यात बसायला खुर्ची किंवा टेबल हवंच असंही नाही. तुम्ही अगदी एखाद्या कोपऱ्यात मांडी घालून, पाय पसरून अगदी निवांत बसू शकता. सो दॅट घरी बसल्याचा एक फील येतो.. शिवाय तिथे कंपनी हवी असंही काही नाही. रादर कंपनी नसलेलीच जास्त चांगली. इन्ट्रोवर्ट आणि सोशली ऑकवर्ड असणाऱ्या लोकांसाठी बुक कॅफेज् म्हणजे वरदान ठरू लागलेयत.
अशीच एकदा क्रॉसवर्डमध्ये कोपऱ्यात बसून पुस्तक वाचत असताना सध्या बारावीला असलेली एक मुलगी भेटली. व्हेकेशनमध्ये चालू असलेल्या क्लासेसमुळे वैतागून क्लास सुटल्यावर क्रॉसवर्डमध्ये येऊन बसणं हे तिच्यासाठी नेहमीचंच ठरलेलं. तिच्या म्हणण्यानुसार हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट असतो. एखादं मोठं पुस्तक विकत घेण्यापेक्षा इथेच बसून वाचणं जास्त सोयीस्कर असतं. तसं करून करूनच तिनं तिथे बसून शिवा आणि फिफ्टी शेड्सची ट्रायलॉजी पूर्ण केली होती.
एखाद्या रविवारी फावला वेळ मिळाल्यानंतर सगळे फ्रेंड्स बिझी आहेत आणि थोडं डिप्रेस्ड वाटतंय तर काय करावं हा प्रश्न पडलेल्या ऐश्वर्याचं म्हणणं असं की, मेट्रो सिटीजसारख्या गजबजलेल्या ठिकाणी ती एकच जागा अशी असते, जी तुम्हाला पूर्णपणे शांत करते. शिवाय पुस्तकांमध्येही व्हरायटी असल्यामुळे तुम्ही तुमच्या मूडनुसार कुठलंही पुस्तक घेऊन कितीही वेळ वाचत बसू शकता.
थोडसं फिलॉसॉफिकल बोलायचं झालं, तर एखाद्या डिप्रेस्ड सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी, बिझी लाइफमध्ये स्वत:शी चार क्षण बोलता यावं यासाठी किंवा अगदी एखाद्या कठीण विषयावरचा डिसिजन घेण्यासाठी, कित्येक यंगस्टर्स आजकाल या बुक कॅफेजचाच आधार घ्यायला लागलेयत. या सगळ्यासोबतच एक्स्ट्रा फॅक्टर्स अ‍ॅड करणाऱ्या गोष्टी म्हणजे इथे लहान मुलांसाठी असणारा प्ले कॉर्नर, स्टेशनरी कॉर्नर आणि कॉफी शॉप. हातात कॉफी मग घेऊन एखाद्या पुस्तकाची सर करताना एकदम नॉस्टॅल्जिक वगरे झाल्याचा फीलही इथे येतो.
थोडक्यात बुक कॅफेज् हे कित्येकांसाठी एक रिलीफ देणारा कॉर्नर, कित्येकांसाठी पॉझिटिव्हिटीचा सोर्स, कित्येकांसाठी स्वत:चा एकटेपणा खोडून काढणारा एक उत्तम कट्टा, तर पुस्तकप्रेमींसाठी एक उत्तम खजिनाच बनलेयत. पाश्चात्त्यांकडून आलेली ही एक गोष्ट मात्र नक्कीच फायद्याची ठरतेय. एकटय़ाने एन्जॉय करायची ही जागा आहे. अशा या जगाची आठवडय़ातून एकदा तरी सफर करायला काहीच हरकत नाही.. नाही का?