शास्त्रीय संगीत म्हणजे कानांना पर्वणी (आणि लाईव्ह परफॉर्मन्स म्हणजे डोळ्यांनाही पर्वणीच). पण यात जर सुगंधाची अनुभूती आली तर? सोन्याहूनही पिवळं. काहीसा असाच विचार करून डॉ.मंदार लेले आणि आनंद जोग या संगीतवेडय़ा जोडीनं दर्दी रसिकांसाठी अनोखी भेट आणली आहे. त्यांनी ९ रागांवर आधारित ९ परफ्युम्स तयार केली आहेत. या दोघांचा खरं तर परफ्युमशी दूरान्वयानंही संबंध नाही. मंदार इंजिनीअर-  ‘आयआयटी’मधून डॉक्टरेट मिळवलेले तर आनंद र्मचट नेव्हीत. पण गेली २५ वष्रे सातत्याने सवाई गंधर्व महोत्सवाला हजेरी लावताहेत. या द्वयींची ओळखही इथलीच! अत्तर बनवण्याची कल्पना सुचल्यानंतर रागाची गायनवेळ, त्यातून उत्पन्न होणारे भाव आणि रंगछटांचा बारीक अभ्यास करून हे सुगंधरूपी रसायन तयार झालं आहे. ललत, बिलावल, दरबारी, मुलतानी, सारंग, मारूबिहाग, हंसध्वनी, बहार, चंद्रकंस अशा तब्बल ९ रागांची अत्तरे १०० ते १५० रुपयांमध्ये इथे उपलब्ध आहेत. व्यवसायाने प्राध्यापक असलेले डॉ.लेले आणि मर्चट नेव्हीचा अनुभव असलेले श्री.जोग यांनी रागाबरोबरच थाटावरही संशोधन करून त्याच अत्तर करण्याचे योजिले आहे. स्वरानुभूतीबरोबरच ही सुगंधानुभूती सवाई महोत्सव आपल्या मनात राहील हे नक्की !!