News Flash

अनंत अमुची ध्येयासक्ती : नौदलातील आव्हाने..

कर्तबगार, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध, निर्भीड, निर्णयक्षम, सुसंवादी.. ‘त्या’ दोघींच्या व्यक्तिचित्राचं वर्णन अगदी अशाच शब्दांत करता येईल.

| August 7, 2015 02:01 am

कर्तबगार, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध, निर्भीड, निर्णयक्षम, सुसंवादी.. ‘त्या’ दोघींच्या व्यक्तिचित्राचं वर्णन अगदी अशाच शब्दांत करता येईल. पंचवीसाव्या व्हिवा लाउंजनिमित्त त्या दोघींशी संवाद साधताना उंपस्थित तरुणाईला कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’  स्मरली असेल.  ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावरून आजवर  २४ कर्तृत्ववान स्त्रियांची कामगिरी उलगडली आणि अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरली. २८ जुलैला मुंबईत झालेल्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्तानं ‘त्या’ दोन कर्तबगार स्त्रियांची यशोगाथा उलगडली.. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे आणि नौदल अधिकारी कमांडर सोनल द्रविड. या दोघींना बोलतं केलं अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी.
या कार्यक्रमांची शब्द आणि क्षणचित्रे..

नात्यांचा समतोल
लग्नापूर्वी मी सगळ्या गोष्टी हिरिरीनं केल्या. अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड जपत व्हाइट वॉटर राफ्टिंग, स्काय डायव्हिंग केलं. लग्नानंतर जबाबदारी दुपटीने वाढली. मुलगी झाल्यावर तर आई म्हणून जबाबदारी वाढली. तरीही घरगुती जबाबदाऱ्यांचा, कारणांचा कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. घर आणि काम या दोन्हीकडे समतोल राखणं अवघड होतं, पण घरच्यांचा आणि नातेवाईकांचा पाठिंबा होता. तो असणं खूप गरजेचं असतं.
vv04खुणावणारं  नौदल
संरक्षण दलात आप्तस्वकीयांपैकी कुणीच नव्हतं. त्यामुळे नौदलाबद्दलही फारशी माहिती नव्हतीच. खरं तर मी मध्य प्रदेशातली. समुद्रकिनाऱ्यापासून कोसों मैल दूर. पण समुद्राचं आकर्षण होतं. १९९२ पासून स्त्रियांना नौदलात प्रवेश मिळू लागला होता. त्या वेळी नौदल हे एक नवीन क्षेत्र होतं. मलाही काही तरी नवीन करण्याची इच्छा होती म्हणून मग मी हे क्षेत्र निवडलं. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात झालेलं. पण पासआऊट होण्यापूर्वीच माझ्या लक्षात आलं होतं, की अशा ऑफिसमध्ये बसून करायच्या कामात आपण रमणार नाही. खेळाची पाश्र्वभूमी असल्याने एका जागी बसून करायचं काम नको होतं. तेव्हाच एका सीनिअरकडून सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी इंटरव्ह्य़ू) पाच दिवस चालणाऱ्या मुलाखतीबद्दल ऐकलं नि त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. मग मी त्याविषयी माहिती काढून संरक्षण दलात आणि त्यातही नौदलात जाण्याचा निर्णय घेतला.
mn13जीव  रमला  खेळात.
मी मूळची इंदौरची. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. एकुलती एक असल्यामुळे आईवडिलांची इच्छा होती की, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवावं. त्यामुळे लहानपणी त्यांनी मला शास्त्रीय संगीत, कथक, स्विमिंग, स्पोर्ट्स या सगळ्याची ओळख करून दिली. त्या वेळी मला जाणवलं की, मला खेळात विशेष रस आहे. खेळत असताना मला दुसरं काही सुचायचं नाही. शालेय पातळीवर खेळाच्या निमित्ताने इकडेतिकडे फिरून लोकांच्या भेटीगाठीतून आउटडोर अ‍ॅक्टिव्हिटीज आणि अ‍ॅडव्हेंचरकडे माझा कल आहे हे लक्षात आलं.

‘शिप’वरचं आयुष्य
शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनद्वारे नौदलात भरती होताना सेवेचा बाँड लिहून द्यावा लागतो. अर्थातच आपल्या प्रशिक्षणावर देशाचा पैसा खर्च होत असल्यानं ते आवश्यकच असतं. नौदलात आमच्या प्रशिक्षण केंद्रांना शिप असंच म्हणतात.. प्रत्यक्ष समुद्री जहाज नसलं तरी ‘शिप’ म्हणतात. आयएनएस शिवाजी, आयएनएस तीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ‘शिप’ असतात. आमचं रुटीनही जमिनीवरच्या कँपवर असलो तरीही नेहमी शिपवर असल्यासारखंच असतं. मुलींना शिपवर पोस्टिंग मिळणं परिस्थितीवर अवलंबून असतं. मला एकदा ट्रेनिंगसाठी शिपवर जाता आलं होतं. ४५ दिवस सलग मी शिपवर होते. त्या वेळी मला इजिप्तपासून अगदी इटलीपर्यंत जाता आलं. नौदलाच्या शिपवर मुलींसाठी अशा कुठल्याही वेगळ्या सोयी नसतात, पण त्याची आवश्यकताही वाटत नाही. आमचं ट्रेनिंगच त्या प्रकारचं असतं.
कमांडर सोनल द्रविड
सीनिअर स्टाफ ऑफिसर (एज्युकेशन), भारतीय नौदल

आनंदाचा क्षण!
नौदलात येण्यापूर्वी हा व्हाइट युनिफॉर्म ही प्रेरणा होतीच. प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला एक गणवेश मिळतो पण त्यावर लावली जाणारी पदकं ही आम्हाला २२ आठवडे  ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच मिळतात. तेव्हा खऱ्या अर्थाने काही तरी अचीव्ह केलंय, अशी भावना येते. पासिंग आऊट परेडनंतर तुमचा नागरिक ते सैनिक असा प्रवास पूर्ण होतो. आई-वडिलांना या प्रसंगी खास निमंत्रण असतं. त्यांच्या हस्तेच पदकांचं अनावरण केलं जातं. हे बॅच खांद्यावर लागतात. तो क्षण खूप आनंदाचा असतो.
mn14नौदलातली  समानता
मला नौदलात स्त्री म्हणून कधीच दुजाभाव करण्यात आला नाही. नौदल प्रशिक्षणात मुलामुलींना सारखंच फिजिकल ट्रेनिंग देतात. कार्यभूमी वेगळी असल्याने लष्कर, नौदल आणि वायूदल यांच्या प्रशिक्षणात थोडी तफावत असते पण शारीरिक क्षमतेची चाचणी आणि शारीरिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने देण्यात येणारे धडे मात्र सारखे असतात. मुलींना पदवीनंतरच नौदलात प्रवेश मिळू शकतो. काही पदांसाठी मुलांना बारावीनंतर प्रवेश घेता येतो. माझ्या ट्रेनिंग बॅचमध्ये आम्ही दोघी मुली आणि बाकी सर्व मुलं होती. त्याचं विशेष काही वाटलं नाही. प्रशिक्षणादरम्यान मला सायकलिंग, क्रॉसकंट्री, ट्रेकिंग, नाइट कॅम्प्स याकरिता बेस्ट सबलेफ्टनंटचा मिळाला.

आव्हान पेलणारी सबला  
स्वत:ला मी मुलगी आहे म्हणून कधी बांधून ठेवलं नाही. मी माझ्या इच्छेने या क्षेत्रात आलेय, तर केवळ स्त्री आहे म्हणून मला यात कमी पडायचं नाहीय. त्यामुळे ज्या संधी मिळाल्या त्यात मी हिरिरीनं सहभाग घेतला. आव्हान पेलायचं ठरवूनच यात उतरले. सुरुवातीलाच कोचीन ते गोवा प्रवासात मला सी-सिकनेस होता. तेव्हा डय़ुटीवर जाऊ  नये असा विचार आला. पण दुसऱ्या क्षणी विचार आला की, आपण असं केलं तर, बघा, महिला अधिकारी आहोत म्हणून करू शकली नाही, असं ऐकावं लागेल. मला हे नको होतं. म्हणून विचार झटकून डय़ुटीवर गेले आणि तेव्हापासून कधी मागे वळून पाहिलं नाही. आपण मनात ठरवलं की, ते नक्की करू शकतो. फक्त विचार ठाम हवेत.

‘हवीहवीशी’ बदली
या क्षेत्रात बदली ही निश्चित असते आणि त्याची पूर्ण कल्पना फोर्सेस जॉइन करतानाच असते. मलासुद्धा खरं तर असा बदल हवाच असतो. एकाच ठिकाणी राहून आयुष्य एकसुरी होण्यापेक्षा काही तरी नवीन नि वेगळं करायला मिळतं. नौदलात असल्यामुळे जिथे जाऊ  तिथे सर्व सेवा-सुविधा पुरवल्या जातात त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही. माझे पती लष्करात असल्यामुळे आमची दोघांची बदली होत असते. आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हाच आम्हाला याची कल्पना होती. कारण दिल्लीपासून उत्तरेकडे लष्कर सुरू होतं आणि तिथेच नौदल संपतं. एका शहरात दोघांची बदली असेलच असं नाही. अगदी असली तरीही आम्हाला एकमेकांसोबत राहता येतंच असंही नाही. आत्ता आमचं दोघांचं पोस्टिंग मुंबईत आहे, पण कामाच्या स्वरूपामुळे त्याला पोस्टिंगच्या ठिकाणापासून हलता येत नाही. सुट्टीच्या दिवशी आम्ही एकमेकांना वेळ देतो. आम्ही एका शहरात आहोत यासाठी देवाचे आभार मानतो. या सगळ्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय हे शेवटी महत्त्वाचं असतं. ग्लास अर्धा भरलेला पाहायचा की अर्धा रिकामा ते ज्याच्या-त्याच्या हातात असतं.

सतर्क आणि सक्षम
नौदलात भरती होताना तुमचं ज्ञान, शिक्षण आणि कल बघून त्या त्या स्पेशलायझेशनच्या विभागात पोस्टिंग होतं. उदाहरणार्थ पाण्यातल्या सीमा ओळखण्यासाठी हायड्रोग्राफीचा अभ्यास लागतो. वेगवेगळी यंत्रं हाताळावी लागतात. त्याचा असा वेगळा अभ्यास असतो. माझी शैक्षणिक पाश्र्वभूमी आणि कल पाहता मला नौदलाच्या शिक्षण विभागात अधिकारी म्हणून रुजू करून घेतलं. शिक्षणासोबत संरक्षणदलात शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणं महत्त्वाचं असतं. नौदलात प्रशिक्षणासाठी तुम्ही अ‍ॅकेडमीत प्रवेश घेता त्या दिवसापासून तुमच्या प्रशिक्षणाची आखणीच अशा प्रकारे केली जाते की, तुमची शारीरिक क्षमता तुमच्या नकळतच पणाला लागतं. प्रशिक्षणानंतर तुम्हालाच असा प्रश्न पडतो की, आपण हे एवढं यापूर्वी कधीच केलं नव्हतं मग आता कसं जमलं? हे सगळं ट्रेनिंग सायंटिफिकली डिझाईन केलेलं असतं. त्यासाठी शारीरिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ाही सक्षम असणं गरजेचं आहे.

कस पाहणारं प्रशिक्षण
नौदलाचं किंवा कुठल्याही सैन्यदलाचं प्रशिक्षण हा अनेकांचा उत्सुकतेचा विषय असतो. नौदल प्रशिक्षण काळात आमचा दिनक्रम सकाळी साडेचार वाजता सुरू व्हायचा आणि कधी संपणार याची शाश्वती नसायची. पण साधारणपणे रात्री जेवणानंतर रुटीन संपतं. या ट्रेनिंगचा परेड हा खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यातून शिस्तीची सवय, वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करणं, वक्तशीरपणा अंगी बाणवला जातो. प्रशिक्षणादरम्यान पदोपदी तुमचं मनोधैर्य तर खचत नाही ना याची खात्री करून घेतली जाते. जेणेकरून तुम्हाला पुढे काही संकटांना सामोरं जावं लागलं तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ाही तयारीत असता. सकाळी साडेचारला उठून केलेल्या शारीरिक शिक्षणाच्या तासांनंतर अभ्यासाच्या क्लासेसना डोळे उघडे ठेवून बसणं हेच मला जिकिरीचं वाटायचं. पण पहिल्यापासून कबड्डी आणि इतर खेळात तरबेज असल्याने शारीरिक क्षमता कमी पडली नाही. सैन्यदलात करिअर करू इच्छिणाऱ्यांना स्पोर्ट्सचा, एन.सी.सी.चा फायदा होतोच. कारण त्यातून नेतृत्वगुण, मनोधर्य, व्यवस्थितपणा, शारीरिक क्षमता, प्रामाणिकपणा हे सगळे गुण विकसित होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 2:01 am

Web Title: commander sonal dravid explaining about navy challenges
टॅग : Viva Lounge
Next Stories
1 अनंत अमुची ध्येयासक्ती : प्रशासनातील आव्हाने..
2 स्वप्नांना नवी उभारी
3 पॅशनसोबत पेशन्सही हवा
Just Now!
X