02 March 2021

News Flash

मैत्रांतरे

‘यारो दोस्ती बडी ही हसीन है..’ हे गाणं कानावर आल्यावर कित्येकदा दोस्तीतल्या मस्तीची, भांडणाची, तफावतीची आठवण जागी होते.

| July 31, 2015 01:07 am

‘यारो दोस्ती बडी ही हसीन है..’ हे गाणं कानावर आल्यावर कित्येकदा दोस्तीतल्या मस्तीची, भांडणाची, तफावतीची आठवण जागी होते. मग मनाला पडलेले प्रश्न शोधण्यासाठी हाती पुन्हा एकदा कटिंगचा प्याला येतो. मैत्रीत भांडणं ही होतातच, भांडणांपेक्षा असतात ते मतभेद. लहानसहान कारणांसाठी कधीही मित्रमैत्रिणीचं दार ठोठावणारी ही मंडळी एकमेकांच्या प्रतिक्रियांच्या, मतांच्या पूर्णत: अधीन गेलेली असतात. मग एक वेळ अशी येते की, याच ‘कमेंट्स’ मैत्रीत मतभेद, गैरसमजाचं कारण ठरतात. काहींसाठी सोशिअल नेटवर्किंग साइट्स म्हणजे मैत्री करण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म. पण वेगवेगळे फंडे अजमावत मैत्रीत सहजता आणू पाहणाऱ्या याच सोशिअल नेटवर्किंग साइट्समुळे दोस्तांच्या दोस्तीत त्या थर्ड पर्सनची कधी एंट्री होते तेच कळत नाही. मग परिस्थिती काहीशी ‘दोस्त, दोस्ती और वो’ अशी होते.
आधीच्या काळात मैत्रीत होणारी भांडणं म्हणजे कॉलेजमधले वाद, मतभेद, राजकारण यांवर आधारित असायची, पण समाज- तंत्रज्ञान जसजसं प्रगत होत गेलं तसतसं मित्रांच्या या मैफिलीत वाद होण्याची कारणंही बदलू लागली. अनेकांसाठी फोटोला येणाऱ्या लाइक्सवर मैत्रीचे निकष आधारलेले आहेत. म्युच्युअल फ्रेंडलिस्ट बघून मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारणारेही अमाप आहेत. जास्त वेळ ऑनलाइन दिसणाऱ्या या जगतातही भांडणं होतातच. ‘माझा बालमित्र माझ्या एकाही फोटोला लाइक करत नाही, पण कालपरवा त्याची माझ्या मैत्रिणीशी ओळख झाली आणि तिच्या फोटोला सर्वप्रथम लाइक या पठ्ठय़ाचं’ असा तक्रारीचा सूर बहुतेक जण किंबहुना बहुतेक जणी लावतात. मग पुढे हेच म्युच्युअल फ्रेंड्स आपल्या इतक्या वर्षांच्या मैत्रीत वादळाच्या रूपात उभे राहतात.
व्हॉट्सअॅप हा अॅप तर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे असंच म्हणावं लागेल. व्हॉट्सअॅपच्या ‘ग्रुप चॅट’मुळे खूप दिवस न भेटलेले, वर्गात जास्त न बोललेले, समोरासमोर बोलायला संकोचणारे असंख्य चेहरे बोलके (अॅक्टिव्ह) होतात. हेच ग्रुप मग इतके जास्त बोलके होतात की त्यांना म्युट करण्यावाचून गत्यंतर नाही. ही झाली ग्रुप्समुळे होणारी पंचाईत, पण अपडेटच्या या जमान्यात व्हॉट्सअॅपही बाजूला नाही. मेसेज कोण वाचतंय, कोण ऑनलाइन आहे, कोण किती वाजेपर्यंत व्हॉट्सअॅपवर रेंगाळत असतं (लास्ट सीन) असा सारा तपशील व्हॉट्सअॅपवर मिळतो; अर्थात तो हाइड करण्याची सोयसुद्धा आहे. आता याचा आणि मैत्रीत होणाऱ्या वादविवादांचा काय संबंध, असा प्रश्न असेल तर अनेकांच्या अनुभवातच याचं उत्तर दडलेलं आहे. या भांडणांची सुरुवात होते ती ‘मेसेज वाचूनही त्याला रिप्लाय का दिला नाहीस’ या कारणावरून/ प्रश्नावरून. बरं, अशा बाबतीत खोटंही बोलू शकत नाही. कारण मेसेज वाचला गेला असल्याचा पुरावा हाती असतो. शब्दाला शब्द वाढत जातात आणि कधी त्याचं भांडण होऊन मैत्रीतल्या संवादाला तडा जातो, हे कळतही नाही.
फोन उचलला नाही म्हणूनही मित्रांमध्ये भांडणं होणं हे काही नवीन नाही. आजकाल मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स खूपदा पिकनिक मूडमध्ये असतात, पण याच ग्रुप्समध्ये आयत्या वेळेला नकारात्मक सूर लगावणारे काही कमी नसतात; प्रत्येक वेळी मग ‘त्या’ दोस्तांनाच ग्राह्य़ धरलं जातं, ज्यामुळे मतभेद होऊन वादाला तोंड फुटतं.
आजकालच्या तरुणाईची भांडणं पाहायला गेलं तर गॉसिप्स, अफवा, बॅकबिचिंग या तिकडीवर आधारलेली असतात. त्यामुळे पाठ फिरताच कोण कोणाबद्दल मुक्ताफळं उधळेल याचा काही नेम नाही. कोणाचा स्वभाव खटकतो म्हणून, कोण आपल्या वरचढ जातंय म्हणून, तर अगदी तिचे किंवा त्याचे खूप ‘भारी’ मित्रमैत्रिणी आहेत म्हणून.. मला ती किंवा तो आवडत नाही, अशा कारणांवरून सहसा बॅकबिचिंग केली जाते. कितीही साधेपणाचा आव आणला तरीही हा बॅकबिचिंगचा मुखवटा मात्र सगळ्यांच्याच चेहऱ्याआड दडलेला असतो.
कोणाचाही राग आला असेल तर हा राग व्यक्त करण्यासाठी व तो झेलण्यासाठी मित्रमैत्रिणींची ‘हम है ना’ अशी सादच आधार बनून जाते. काही प्रसंगांसमयी मात्र कौटुंबिक किंवा खासगी ताणतणाव, राग-तंटे, इगो या सगळ्यांचा माराही हे मित्र सहन करतात. पण कोणा एकाचा राग, नखरे झेलताना जर का मित्रमैत्रिणींच्या सहनशीलतेचा बांध फुटला तर मग आधार देणारी हीच मंडळी क्षणार्धात हिरावली जातात.
बदलत जाणारी मैत्रीची ही समीकरणं त्याच्या जोडीला लहान-मोठे वाद, बहुतेकदा गैरसमजुतीच्या भांडणांची धग, समजुती काढण्याचे फंडे, पण तरीही मनात पाय घट्ट रोवून उभी असणारी मैत्री सर्वाच्याच मनाच्या खूप जवळची असते, यात तिळमात्र शंका नाही.

मैत्री तुटण्याची दहा कारणं
१. सोशल नेटवर्किंग साइट्सचा अवाजवी वापर.
२. मेसेज किंवा मिसकॉल पाहूनही त्याचा रिप्लाय न देणं.
३. मीच सर्व मित्रांपेक्षा जास्त श्रेष्ठ असल्याची भावना.
४. दिलखुलास संवादाचा अभाव.
५. गैरसमज.
६. एकलकोंडा स्वभाव.
७. अविश्वास.
८. इतरांवर सतत कुरघोडी करण्याचा मनसुबा.
९. गर्व, ईष्र्या.
१0. बॅकबिचिंग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:07 am

Web Title: conflicts with friends
Next Stories
1 प्रिय मित्रास..
2 ट्रेण्डिंग : #नावीन्याचे प्रयोग
3 मॉडर्न इंडियन क्युझीन
Just Now!
X