तेजश्री गायकवाड

परीक्षा होऊ नयेत आणि परीक्षा व्हाव्यात.. याबाबत विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमच दिसून येतो. अर्थात, करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा होऊ नयेत अशी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने जास्त दिसून येते. त्यामागची कारणे स्पष्ट करताना वनस्पतीशास्त्रात मास्टर करणारी लातूरची प्रियांका गायकवाड सांगते, आजच्या काळात अनेक प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या पदवीनुसार प्रॅक्टिकल्स किंवा थिअरीवर भर दिला जातो. आमच्या शिक्षणात प्रॅक्टिकल्स आणि थिअरी दोन्ही महत्त्वाचे आहे. परीक्षा घ्यायच्या ठरवल्या तर आम्हाला प्रॅक्टिकल्स करावीच लागतील. प्रॅक्टिकल्ससाठी जे सामान लागतं ते फिल्डवर जाऊन, शेतात जाऊन आणावं लागतं. त्यामुळे कॉलेजचे कर्मचारी ते कुठून घेऊन येतील सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीत त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सामानासह प्रॅक्टिकल्स करणं धोक्याचं आहे, असं ती सांगते. शिवाय, गेले काही दिवस या गोंधळाच्या परिस्थितीमुळे अभ्यासही पूर्ण बंदच आहे. सतत बदलणाऱ्या निर्णयामुळे नक्की काय करायचं, हा प्रश्न समोर आहे. कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ९०% विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यायची नाही आहे हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयामुळे आधीची तीन सेमिस्टर्स मिळून मार्क्‍स देणार हे ठरलं होतं. त्यानुसार कॉलेजने कामही सुरू केलं होतं, पण पुन्हा निर्णय बदलल्यामुळे शिक्षक आणि कॉलेजवरही प्रेशर येत असल्याचे तिने सांगितले. आता परीक्षा घ्यायचा निर्णय झाला तरी पालक परीक्षेसाठी पाठवणार नाहीत, अशी भावनाही अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील कॉलेजेस असोत वा शहरी तिथे अनेक भागांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने एक वर्ष घरी बसलात तरी चालेल, पण परीक्षेला जायचे नाही अशी भूमिका बहुतांशी पालकांनी घेतली असल्याचे विद्यार्थी सांगतात.

परीक्षा घ्यायचा निर्णय झाला तरी कॉलेजेसपर्यंत पोहोचायचे कसे, असाही प्रश्न विद्यार्थी उपस्थित करताना दिसतात. मुंबईत आमच्यासारखे अनेक उपनगरातील विद्यार्थी ट्रेनने दोन तासांचा प्रवास करून कॉलेज गाठतात. सध्या उपनगरांमधील अनेक भाग रेड झोनमध्ये आहेत. शिवाय, ट्रेनही बंद असल्याने परीक्षेसाठी पोहोचायचे कसे, असा सवाल  टेक्स्टाइल आणि फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या श्रुती सोनावणेने उपस्थित के ला. मुंबईत सध्या अनेक कॉलेजेस क्वॉरण्टाइन सेंटर्स म्हणून वापरली जात आहेत. अशा वेळी तिथे परीक्षा घेता येतील का? काही अभ्यासक्रमांमध्ये प्रॅक्टिकल्स आणि त्याचे गुण महत्त्वाचे ठरतात. हे प्रॅक्टिकल्स करताना मानवी स्पर्श अपरिहार्य आहे. या गोष्टी कशा टाळता येतील? यात विद्यार्थ्यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेतला जाईल का, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित के ले आहेत. पुण्यातील अक्षय कु ंभार परीक्षाच नको, ही भूमिका योग्य नाही असे मत मांडतो. आमच्या या बॅचला परीक्षाच न घेता गुण दिले तर उद्या जॉब मिळवताना किं वा पुढचे शिक्षण घेताना अडचणी येतील. आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघितले जाईल, अशी खंत तो व्यक्त करतो. त्याच्या मते यातून तोंडी चाचणी किंवा एम.सी.क्यू. घेऊन निकाल द्यायला हवा. ऑनलाइन परीक्षा हाही एक मार्ग असू शकतो, मात्र अनेक ठिकाणी नेटवर्क आणि इंटरनेट सुविधांअभावी यात अडचणी येऊ शकतात, असं मत त्याने व्यक्त के लं. एरव्ही विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी झटणाऱ्या विद्यार्थी संघटनांमध्येही याबाबत एकमत नाही.

लॉकडाऊनमध्ये एके का गोष्टींचा निकाल लागतोय त्याप्रमाणे आपल्या परीक्षा होणार की नाहीत याचाही निकाल काय लागतो?  याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुरुवातीला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मग राज्यपालांनी तो निर्णयच रद्दबातल के ला आणि ‘परीक्षा होणार’ असं घोषित के लं. पुन्हा मुख्यमंत्र्यांनी ‘नाही’च अशी ठाम भूमिका घेतली.  परीक्षा नाही याचा आनंद साजरा करेपर्यंत पुन्हा एकदा बातमी झळकली, ‘पदवी परीक्षा होणारच’. गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार परीक्षा घेऊच शकत नाही, याचा पुनरुच्चार के ला असला तरी अजूनही परीक्षा घ्यायलाच हव्यात किं वा नकोत याबद्दल तळ्यात-मळ्यातचा खेळ सुरूच आहे. परीक्षांच्या बाबतीत गेले कित्येक दिवस असलेल्या या संभ्रमावस्थेने विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे..

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने वेगळ्या माध्यमातून परीक्षा घेत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणे उचित आहे अशी ठाम भूमिका पहिल्यापासून घेतली आहे. अभाविपच्या राष्ट्रीय सरचिटणीस निधी त्रिपाठी म्हणतात, ‘विद्यापीठ अनुदान आयोगाने २७ एप्रिल रोजी दिलेल्या सूचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत त्यांना प्रत्यक्षात संपर्कात न आणता ओपन बुक टेस्ट, प्रोजेक्ट, लेख, ऑनलाइन किंवा तोंडी चाचणी अशा प्रयोगांच्या माध्यमातून परीक्षा घेत विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होणे योग्य ठरेल. त्यासाठी पुढील शैक्षणिक सत्र थोडे पुढे ढकलून  त्यातील अभ्यासक्रमदेखील कमी करता येऊ शकतो.’ तर शिक्षक आणि विद्यार्थी दोघांच्या भवितव्याचा विचार करत हा निर्णय व्हायला हवा. जेईई मेन आणि नीट या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने पुढील सत्र नोव्हेंबर २०२० मध्ये होईल यात दुमत नाही, परंतु याच धर्तीवर विद्यापीठानेही करोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून पुढे जावे, असे आवाहन अभाविपचे राष्ट्रीय सचिव अनिकेत ओव्हाळ यांनी केलं आहे. तर याउलट भूमिका छात्र भारती या संघटनेने घेतली आहे. छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांच्या मते सतत बदलणारा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा कोणीच विचार करत नसल्याचेच सिद्ध करतो आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षेला का एवढं महत्त्व? मागच्या अनेक वर्षांपासून एकत्रित सहा सेमिस्टरचे मूल्यमापन करून निकाल लावला जात होता. मग या वेळी पाच सेमिस्टरच्या परीक्षा मुलांनी दिल्याच आहेत त्यानुसार मूल्यमापन करून सहज निकाल लावता येईल.ऑटोनॉमस कॉलेज किंवा बाकीच्या काही कॉलेजमध्ये इंटर्नल परीक्षा आधीच झालेल्या आहेत. त्यामुळे फक्त लेखी परीक्षा नाही झाल्या तरी फरक पडत नाही. महाराष्ट्रातील अनेक झोन अजूनही बंद आहेत. परीक्षा द्यायची म्हटलं तरी मुलं वेगवेगळ्या ठिकाणांहून एकत्र एका ठिकाणी येणार. परीक्षा के ंद्रावर कडक नियम बाळगून जरी परीक्षा झाल्या तरी बाहेर पडल्यावर मुलांवर कोण आणि कसं लक्ष ठेवणार? इतक्या महिन्यांनी भेटलेली ही तरुण मुलं एकमेकांना हात मिळवणं, परीक्षा झाली की फिरायला जाणं हे करणारच. याशिवाय, ठिकठिकाणी कॉलेजेस विलगीकरणासाठी वापरली जात आहेत. मग तिथे परीक्षा घेणं कसं शक्य आहे? आमचा ऑनलाइन परीक्षा घेण्यालाही विरोध आहे. इथे नॉर्मल परीक्षांचा रिझल्ट लावताना अनेक चुका घडतात तर ऑनलाइनच्या वेळी काय होईल,  असा सवाल ते उपस्थित करतात. विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी मांडलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे नसल्यामुळेच हा गोंधळ अधिक वाढत चालल्याचे दिसून येते आहे.

परीक्षांबाबत असलेल्या या सावळागोंधळाचा परिणाम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्याही मनावर होतो आहे, यात शंका नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या मनाची तयारी करायला हवी, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी दिला. या सगळ्या घटनांकडे पाहताना नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचारांवर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा, असं ते सांगतात. ‘करोना हा आपल्यापेक्षा हुशार आहे. त्यामुळे असं समजा की बाहेर युद्ध सुरू आहे आणि आपण बंकरमध्ये लपून बसायचं आहे. हे वाक्य मुलांसोबत पालकांनीही लक्षात घ्यायला हवं. एक वर्ष शिक्षण थांबलं तर फरक पडणार नाही. या बदलणाऱ्या निर्णयामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला दूर करण्यासाठी सध्या मोबाइल आणि इंटरनेटचाच प्रभावीपणे वापर करू शकता.  या मिळालेल्या वेळेत तुम्ही अनेक ऑनलाइन गोष्टी शिकू  शकता. अनेक फ्री कोर्सेसही ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. शिवाय, स्वत:चा राग, ताण कमी कसा करायचा याचे मार्गदर्शन असलेले अनेक कोर्सेस, व्हिडीओ उपलब्ध आहेत त्याचाही फायदा घ्या, मानसिक स्वास्थ्यासाठी योगा करा,’ असं डॉ. शेट्टी सांगतात.

viva@expressindia.com