वेदवती चिपळूणकर

जून महिना हा ‘एलजीबीटीक्यू प्राइड मंथ’ म्हणून जगभर साजरा केला जातो. संपूर्ण जगाने सर्वसमावेशक असावं यासाठीच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे हा ‘प्राइड मंथ’. ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ आणि ‘सेक्शुअल आयडेंटिटी’ या विषयांबद्दलचे सगळे गैरसमज दूर व्हावेत, सगळे टॅबू निघून जावेत, मोकळेपणाने सगळ्याच माणसांनी स्वत:ला आणि एकमेकांना स्वीकारावं यासाठी एक धाडसी व्यक्ती सतत प्रयत्नशील आहे. ‘प्राइड मंथ’च्या निमित्ताने फॅशन डिझायनरसाईशा शिंदे हिच्याशी साधलेला हा संवाद..

आपल्याला आपली स्वत:ची ओळख नेमकी कशी पटते? स्वत:चं नाव सांगता यायला लागल्यावर? की स्वत:च्या शरीराकडे बघितल्यावर? की स्वत:च्या मनात डोकावून पाहिल्यावर? नुकतंच बोलायला लागलेल्या बाळाला आई-बाबांना हाक मारता यायला लागल्यानंतर स्वत:चं नाव सांगायला शिकवतात. चारचौघांत जायला लागल्यावर मुलगा आणि मुलगी यातला फरक शिकवतात. कसं वागावं आणि काय करावं हे मुलगा आहे की मुलगी यावरून शिकवलं जातं. शाळेत जायला लागल्यावर आपण स्वत:ची ओळख शाळेच्या संदर्भाने सांगायला लागतो, कॉलेजला गेल्यावर कॉलेजच्या नावाने आणि काम करायला लागल्यावर कामाच्या हुद्दय़ाने.. आपण मोठे होत असताना, आपल्याला जगाची ओळख होत असताना, आपली स्वत:ची ओळखही इतरांकडून आपल्यावर बिंबवल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपल्या मनात तयार होत असते. या सगळ्यात आपल्याला स्वत:बद्दल नेमकं काय वाटतंय याचा विचार आपण कधी करतो? बहुतेक कधीच नाही किंवा क्वचित कधी तरी. जेव्हा करतो तेव्हा आपल्याला आपली स्वत:ची, इतरांनी सांगितलेल्यापेक्षा वेगळी, नवीन ओळख सापडू शकते. मात्र त्या वेळी ती ओळख समाजाच्या चौकटीत बसणारी नसेल तर संघर्ष अटळ असतो. असाच प्रचंड मानसिक आणि सामाजिक संघर्ष करून आपली नवी ओळख जगासमोर ठेवणारी मराठमोळी फॅशन डिझायनर म्हणजे साईशा शिंदे.

फॅ शन इंडस्ट्रीत नावाजलेल्या स्वप्निल शिंदे या फॅ शन डिझायनरने आपल्या अस्तित्वासाठी असा आगळावेगळा लढा दिला आहे.सुरुवातीची दोन ते तीन वर्ष केवळ स्वत:बद्दलच्या विचारांत आणि द्विधा मन:स्थितीत घालवल्यानंतर मोठय़ा हिमतीने स्वप्निलने लिंगबदलाचा निर्णय घेतला. जगासमोर आपली पुरुषी प्रतिमा असताना इतर लोक आणि समाज हा बदल कसा स्वीकारेल याच्या शंकेने त्रस्त असणाऱ्या स्वप्निलला त्याच्या मानसोपचारतज्ज्ञांनी धैर्य दिलं. आणि स्वप्निल आज साईशा शिंदे या नव्या ओळखीसह जगासमोर आला आहे. आज आत्मविश्वासाने स्वत:बद्दल बोलणारी साईशा उद्याच्या अशा अनेक साईशांना पाठिंबा द्यायला खंबीरपणे उभी आहे.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करत असलेल्या साईशाला तिच्या या निर्णयाचा तिच्या कामावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री आहे. ‘फॅशन इंडस्ट्री ही मुळातच खूप ओपन माइंडेड असल्यामुळे कामाच्या क्षेत्रात मला माझ्या निर्णयाचा, स्वप्निल ते साईशा या बदलाचा, माझ्या आयडेंटिटीचा कोणताही नकारात्मक परिणाम जाणवणार नाही याची मला खात्री आहे. इथे तुमच्यातल्या टॅलेंटलाच महत्त्व असतं, तुमच्या सेक्शुअल आयडेंटिटीला नाही. मी स्वप्निल शिंदे असताना इंडस्ट्रीने माझ्या डिझाइन्सचं, माझ्या कामाचं भरभरून कौतुक केलं होतं आणि त्यात केवळ माझ्या जेंडर चेंजमुळे कोणताही बदल होणार नाही, याची मला खात्री आहे. उलट माझ्या नवीन डिझाइन्सना अधिक अर्थ आलेला असेल याबद्दलही मला विश्वास आहे,’ असं साईशा सांगते. आपल्या नवीन ब्रॅण्डचं ग्रॅण्ड  लॉन्चही लवकरच होईल, असे आत्मविश्वासाने सांगणाऱ्या फॅशन डिझायनर साईशाने स्वत:च्या नवीन ब्रॅण्डची जोमाने तयारी सुरू  केली आहे. पूर्वी जी डिझाइन्स केवळ क्रिएटिव्हिटीच्या आधारावर केली जात होती, आता त्यात वूमन फॅशनच्या दृष्टीने खूप सारा कम्फर्टचा विचारही के ला जात असल्याचं साईशाने सांगितलं.

‘प्राइड मंथ’च्या निमित्ताने बोलताना, ‘खरं तर स्वत:ला स्वत:ची ओळख पटणं आणि ती इतरांना धैर्याने सांगणं, पटवून देणं हे सगळं कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात रोज होत असतं. त्यामुळे एकच महिना प्राइड मंथ म्हणून साजरा करण्यापेक्षा रोज हळूहळू सगळ्यांनीच आपल्या विचारांमध्ये बदल करायला सुरुवात केली तर ते जास्त अर्थपूर्ण असेल,’ असे स्पष्ट मत तिने व्यक्त के ले.  लहानपणापासूनच जशा इतर गोष्टी शिकवल्या जातात तसंच अ‍ॅक्सेप्टन्स ही एक महत्त्वाची गोष्टही शिकवली गेली पाहिजे असं तिचं मत आहे. ‘पूर्वी अगदी रंगांच्या बाबतीतही आपण मुलांचे आणि मुलींचे अशी विभागणी के ली होती. त्यामुळे पूर्वी एखादा मुलगा गुलाबी शर्ट घालून आला तर बघणाऱ्यांना ते विचित्र वाटायचं. पण हळूहळू ते नॉर्मलाइज झालं आणि आता कोणालाच त्यात काही विचित्र वाटत नाही. तितक्याच सहजपणे आपण एखाद्या व्यक्तीचं सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा जेंडर आयडेंटिटी या गोष्टी स्वीकारल्या की कोणालाच त्यात काही वावगं वाटणार नाही,’ असं ती आग्रहाने सांगते. स्वत:च्या संघर्षांनंतरही साईशाच्या दृष्टिकोनात कमालीची सकारात्मकता आहे. सर्वसामान्य मराठी घरातून येऊन फॅशन इंडस्ट्रीत पाय रोवून उभ्या असलेल्या साईशाला तिच्या कुटुंबीयांचीदेखील यात खंबीर साथ मिळाली आहे. अशीच साथ आणि समान वागणूक सहजतेने समाजाकडून सगळ्यांना मिळाली पाहिजे, अशी भावना मनापासून ती व्यक्त करते.

viva@expressindia.com