|| गायत्री हसबनीस

अठरा वर्षे पूर्ण झाली की जोश असतो तो म्हणजे निवडणुकीत पहिल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा… पण सध्या अठरा वर्षांवरील तरुणाईला वेध लागले आहेत ते लसीकरणाचे! जगभरात करोनाने थैमान घातलेलं असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी  सगळ्यांनाच लसीकरणाचा आधार वाटतो आहे. आत्तापर्यंत टाळेबंदी आणि परीक्षा होणार की नाही? याच चिंताचक्रात अडक लेल्या युवामनांना १८ वर्षांवरील सगळ्यांना लस उपलब्ध होणार या वार्तेने कोण आनंद झाला. आपल्याला कोणती लस मिळणार? कु ठे आणि कशी उपलब्ध होणार? इथपासून ते लसीकरणापूर्वी आणि नंतर कोणती काळजी घ्यायची याबद्दल आपला डेटा अपडेट करण्यात ही तरुण मंडळी चांगलीच गुंतली गेली आहेत. अर्थात, लसीकरणाच्या त्यांच्या या उत्साहाला पुन्हा लशीच्या प्रतीक्षेचा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आधी गांभीर्याने लशीची शोधाशोध करणारी मंडळी आता आपल्या वाट्याला आलेल्या या सावळ्या गोंधळाबद्दल समाजमाध्यमांवरून दिलखुलास ‘मीम’ताना दिसते आहे.

समज-गैरसमज आणि गप्पा! 

लसीकरणाविषयी तरुणाईत उत्साह तर आहेच, पण त्याबद्दलचे समज-गैरसमजही तेवढेच आहेत. सध्या वर्क फ्रॉम होममध्ये गढलेली तरुण मंडळी कामाच्या निमित्ताने व्हिडीओ किंवा कॉन्फरन्स कॉलवर येतात  तेव्हाही लसीकरणाचा विषय हा निघतोच निघतो असं सांगतात! त्यातून ऑफिसच्या कामाव्यतिरिक्तचा बराचसा वेळ हा लसीकरणाची माहिती शोधणं, खरं-खोटं तपासणं, अनुभवी बोल गूगलणं यातच जातो. शिवाय इतर कोणत्या प्रकरणात घेतली नसतील इतकी याबाबतीत तरी घरच्यांची मतंही विचारात घेतली जात आहेत. लसीकरणापोटी वाटणारी एकमेकांची काळजी, थोडी त्याच्या मनातील थोडी तिच्या मनातील भीती घालवण्यासाठीही मित्रमंडळी प्रयत्न करत आहेत. लशीची नोंदणी कशी करायची? म्हणून अ‍ॅप शोधण्यापासून त्यातील अडचणींवर मात करणाऱ्या या मंडळींवर सध्या गेला ओटीपी कोणीकडे? अशी वेळ आली आहे. तुझा ओटीपी आला का? माझा आलाच नाही, असे संवाद जागोजागी रंगत आहेत. वरिष्ठ मित्रमंडळींपासून शिक्षक, आई-वडील, नातेवाईक प्रत्येकाकडून लसीकरणाविषयी जमेल तशी माहिती जमवण्याचा प्रयत्न तरुणाईकडून सुरू आहे. काहींच्या मते लसीकरण घेताना योग्य काळजीही घ्यायची असेल तर खासगी लसीकरण केंद्रांमध्येच जायला हवे. मग अशी कें द्रं कोणाच्या ओळखीपाळखीत आहे का? याचाही जोरशोर से शोध घेतला जातो आहे.

 

लस माझ्या आवडीची!

आत्तापर्यंत अनेकांच्या घरी आई-वडिलांनी किं वा आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकूं पैकी कोणी ना कोणी लस घेतलेली आहे. जाणत्यांनी एक तर कोव्हॅक्सिन किं वा कोव्हिशिल्ड यापैकी एक लस घेतलेली आहे. त्यामुळे या दोन्ही लशींबद्दलच खात्रीलायक (?) माहिती या जेन नेक्स्टकडे आहे. आता या जाणत्यांच्या अनुभवांवरून काही अंशी साइड इफे क्ट्सबद्दलची काळजीही त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. अशा वेळी किमान कोणती लस घ्यायची याच्या निवडीचा पर्याय आपल्याला असायला हवा, असं तरुणाईचं स्ट्राँग मत तयार झालं आहे. बहुतेकांच्या मते त्यांच्या घरी बऱ्याच जणांनी कोव्हॅक्सिन घेतली आहे ज्याचे साइड इफेक्ट्स फार जाणवले नाहीत त्यामुळे आम्ही पण तीच घेणार. तर सद्य:स्थिती असंही सांगते की, कोव्हॅक्सिनचा तुटवडा आहे आणि त्यामुळे कोव्हिशिल्डशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. या परिस्थितीत आम्ही थोडी आणखी वाट पाहू, पण आम्हाला रशियाची ‘स्पुटनिक’ लसच हवी आहे, असाही आग्रह धरणारी तरुण मंडळी आहेत. तर जी लस उपलब्ध आहे त्याचा पहिला डोस लवकरात लवकर घेण्यासाठी आतुर असलेलेही अनेक जण आहेत. त्यामुळे इथेही आपल्या आवडीने किं वा सोयीने लसीकरणाचा आग्रह तरुणाईने धरला आहे हे सहज लक्षात येईल.

लस घेणे आवश्यक नाही बंधनकारक!

१८ पासून ४५ वयोगटांतील मंडळींमध्ये नोकरदार वर्ग मोठा आहे. याच वयोगटांतील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी उपलब्ध लस घेतलेली आहे. आता सगळ्यांनाच लस घेण्याची संधी आहे. सध्या करोनाविरोधी लढ्यात लस हे महत्त्वाचं शस्त्र आहे याची जाणीव असलेल्या तरुणाईने संकेतस्थळावर नोंदणी सुरू होताच त्यासाठी प्रयत्न सुरू के ले आहेत. लसीकरण कें द्र दूर असणं, त्यासाठी लागणाऱ्या रांगा हे चित्र अनेक ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे. मात्र कितीही अडचणी आल्या तरी त्याचा सामना करत लसीकरण प्राधान्याने पूर्ण व्हायला पाहिजे, याबाबतही तरुणाई आग्रही आहे. लशींचा तुटवडा असल्याने सध्या तरी पुन्हा एकदा वेटिंगवर राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. मात्र लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा होईल, नोंदणी करून ठेवायलाच हवी या विचाराने मंडळी कामालाही लागली आहेत.

लसीकरण आणि मीम्स!

सुरुवातीला जेव्हा लसीकरणाची मोहीम १८ वर्षांवरील सर्वांना उपलब्ध होणार ही बातमी आली तेव्हा लशींच्या किमती पाहून अवाक् झालेल्या तरुणाईने गंमत सुरू के ली. तेव्हा बऱ्याच जणांचा सूर असा होता की, कोव्हिशिल्डची किंमत एवढी समजू शकलो असतो पण कोव्हॅक्सिनही…? असे मेसेजेस स्मायलीसह बऱ्याच ठिकाणी फिरले. सोशल मीडियावर मीम्सही फिरू लागले.? ज्यात ‘माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे, मला लशीची गरज नाही’, असं भाष्य करणारीही मीम्स आहेत, कारण आपण सुपरहिरो आहोत आणि आपल्याला काही होणार नाही या भ्रमात वावरणारेही आजूबाजूला कमी नाहीत. आता पुन्हा एकदा मीम्सनी जोर धरला आहे. लसीकरणासाठी सुरुवात होण्याआधीच मोहीम पुढे ढकलण्यात आली त्यामुळे आता त्याचीही खिल्ली उडवणं सुरू झालं आहे. उदाहरणार्थ, नोंदणी करताना ओटीपी आलाच नाही तेव्हा एका विनोदी चित्रपटातील  ‘निष्कारण दिवस फुकट गेला तो आलाच नाही’, असा संवाद घेऊन मीम तयार करण्यात आलं. अर्थात, आत्ताची परिस्थिती लक्षात घेत लसीकरणाबद्दलच्या उत्साहाची जागा गमतीने घेत असली तरी तरुणाईच्या मनात हा विषय अजूनही तितकाच खोल आहे यात शंका नाही. हा लसकल्लोळ लवकरच थांबेल आणि खासगी लसकेंद्रात का होईना लस उपलब्ध होईल ही आशा अजूनही तरुण आहे.

viva@expressindia.com