|| वेदवती चिपळूणकर

काही भाषांना इतर भाषांपेक्षा जरा जास्त डिमांड बदलत्या वेळेनुसार आली आहे. पूर्वी शाळेत अभ्यासक्रमात आहेत म्हणून फ्रेंच आणि जर्मनची चलती होती. मात्र आता इतरही अनेक भाषांना प्रचंड महत्त्व येऊ लागलेलं आहे.

जग जवळ येत चाललंय वगैरे म्हणी आता जुन्या झाल्या, पण करोनाच्या काळात मात्र लांब राहूनही लोक खरंच एकमेकांच्या जवळ आले. नुसते लोकच नव्हे तर अख्खं जग एकमेकांशी बोलू लागलं. करोनाच्या काळात जेवढा इंटरनेटचा वापर झाला तेवढा आधी कदाचित कधीच झाला नसेल. रेसिपीजपासून ते एमबीएपर्यंत सगळ्याच गोष्टी ऑनलाइन व्हायला लागल्या. घरी बसून काही तरी नवीन शिकता यावं, करता यावं आणि वेळ चांगल्या गोष्टींत जावा म्हणून अनेकांनी नव्याने काही तरी शिकायला सुरुवात केली. त्यातच मोठ्या प्रमाणावर तरुणाईची पसंती मिळालेली गोष्ट म्हणजे नवीन भाषा शिकणं! वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या माध्यमांतून तरुणाई भाषाभ्यासाकडे वळली.

तरुणाईला अचानक भाषेबद्दल कुतूहल आणि प्रेम वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वेब सीरिज आणि सिनेमे… घरात बसून ओटीटी प्लॅटफॉर्मसवर असलेला सगळा क न्टेन्ट पिंजून काढायला तरुणाईने सुरुवात केली. केवळ इंग्लिश आणि हिंदी मुव्हीज तसेच वेब सीरिजमुळे आलेला कंटाळा परदेशी क न्टेन्टनी घालवला. नेहमीचे अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार इत्यादी सगळे प्लॅटफॉर्म संपवून कार्टून्स, अ‍ॅनिम्स, इतर ओटीटी प्लॅटफॉम्र्स अशा गोष्टींकडे तरुणाईने आपलं लक्ष वळवलं आणि वेगवेगळ्या भाषांमधला क न्टेन्ट पाहायला सुरुवात केली. साऊथ कोरियन वेब सीरिजनी तर मोठा फॅन क्लब मिळवला आहे. मोठ्या प्रमाणात मुली साऊथ कोरियन अ‍ॅक्टर्सच्या प्रेमात पडल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉम्र्सवरून अनेकींनी बेसिक शब्द आणि वाक्य शिकायला, समजून घ्यायला सुरुवात केली. ओटीटी वाहिन्यांवरचा क न्टेन्ट हे सध्याचं मुख्य कारण झालं. मात्र परदेशी शिकायला जाणं, गाणी ऐकून ती भाषा आवडणं, करिअरची संधी म्हणून पाहणं अशी इतर नेहमीची कारणं आजही आहेतच.

काही भाषांना इतर भाषांपेक्षा जरा जास्त डिमांड बदलत्या वेळेनुसार आली आहे. पूर्वी शाळेत अभ्यासक्रमात आहेत म्हणून फ्रेंच आणि जर्मनची चलती होती. मात्र आता इतरही अनेक भाषांना प्रचंड महत्त्व येऊ लागलेलं आहे. स्पॅनिशच्या क्लासेसमध्ये अनेकदा आधीपासून पोर्तुगीज किंवा लॅटिन अशा भाषा शिकलेले विद्यार्थी बघायला मिळतात. जुन्या भाषा म्हणून कुतूहलापोटी त्यांचा अभ्यास अनेक जण करतात. स्पॅनिश ही जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेली बोलीभाषा आहे म्हणून तिचंही महत्त्व कलेकलेने वाढतं आहे. करोनाच्या कारणाने आणि घरी बसून असलेल्या काळात एरवी थोड्याफार दुर्लक्षित राहिलेल्या जॅपनीज आणि चायनीजचा भावही वधारला आहे. या भाषा शिकण्यात एरवी असलेली प्रमुख अडचण म्हणजे त्यांना लागणारा वेळ! संपूर्ण वेगळी लिपी शिकून मग बाराखडी आणि मग भाषा यात जाणारा वेळ उपलब्ध नसणं ही या भाषांकडे होणाऱ्या दुर्लक्षामागची काही प्रमुख कारणं होती. मात्र लॉकडाऊनने सगळ्यांना भरपूर वेळ उपलब्ध करून दिला. त्यामुळे या भाषांनाही अचानक महत्त्व मिळायला सुरुवात झाली. त्यातही करोना आणि चीन यांच्या परस्परसंबंधांमुळे ‘त्यांच्याच भाषेत शिव्या घालण्याइतपत तरी शिकावी’ अशा गमतीशीर उद्देशाने चायनीज शिकायला सुरुवात केल्याचंही काही जणांनी सांगितलं.

क्लासेस प्रत्यक्ष सुरू नसले तरीही वेगवेगळ्या ऑनलाइन क्लासेसमधून आणि वेब पोर्टल्स, अ‍ॅप्सच्या मदतीने भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. करोनामुळे अनेक जण मायदेशी परत आलेले असले तरीही परदेशी जाण्याच्या उद्देशाने भाषा शिकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.

viva@expressindia.com