25 February 2021

News Flash

कॉलेजची ‘तिसरी’ घंटा

कॉलेज सुरू झाल्यावर आम्ही अजून डिटेलमध्ये शिक्षण घेणार आहोत, त्यामुळे परीक्षा ऑफलाइनच व्हाव्यात असं माझं मत आहे.

सुरुवातीला ऑनलाइन शिक्षणाला नकाराची घंटा दर्शवणारे विद्यार्थी आता १५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कॉलेज सुरू होत असताना येणाऱ्या परीक्षासुद्धा ऑनलाइन व्हाव्यात, असा आग्रह धरू लागले आहेत. तर काहीजण एक सेमिस्टर ऑनलाइन झाल्यामुळे आता या पुढची तरी परीक्षा ऑफलाइन व्हावी, असं मत व्यक्त करत आहेत.

|| तेजश्री गायकवाड

कोविडमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींमध्ये बदल घडले. प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉलेज लाइफ.  या कॉलेज लाइफचंही रूपडं या कोविडमुळे पूर्णपणे बदललं आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला ऑनलाइन शिक्षण हवं की नको?, इथपासून सुरू झालेल्या गोष्टी नंतर अगदी वर्षभरासाठी अंगवळणीच पडल्या. सुरुवातीला ऑनलाइन शिक्षणाला नकाराची घंटा दर्शवणारे विद्यार्थी आता १५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कॉलेज सुरू होत असताना येणाऱ्या परीक्षासुद्धा ऑनलाइन व्हाव्यात, असा आग्रह धरू लागले आहेत. तर काहीजण एक सेमिस्टर ऑनलाइन झाल्यामुळे आता या पुढची तरी परीक्षा ऑफलाइन व्हावी, असं मत व्यक्त करत आहेत.

‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये बी. एफ. ए. तिसऱ्या वर्षाला शिकणारी विद्यार्थिनी गायत्री खांडगे सांगते, ‘आमच्या शिक्षणामध्ये अति महत्त्वाचा भाग असतो तो प्रॅक्टिकल्सचा. आम्ही कला शाखेतील विद्यार्थी आहोत. आम्ही योग्य प्रकारे प्रॅक्टिकल्स शिकलोच नाही तर आमच्या शिक्षणाला काही अर्थच राहत नाही. कॉलेज बंद असताना शिक्षकांनी आणि आम्हा विद्यार्थी वर्गाने खूप अडचणींचा सामना करत आधीची सेमिस्टर पूर्ण केली. परंतु जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असतो तेव्हा एका कलाकुसरीवर किंवा काही विषयांवर आम्ही ३ ते ४ विद्यार्थी एकत्र काम करतो. ते काम आणि त्यातून शिकता येणाऱ्या असंख्य गोष्टी, काही अडल्यावर उत्तर देणारी लायब्ररी, मदत करणारे सिनिअर आणि शिकण्यासाठी लागणारी योग्य जागा हे सगळंच मिसिंग होतं. याचा त्रास काही टक्के शिक्षकांनाही झाला, पण या अडचणीतून मार्ग काढत आम्ही ऑनलाइन परीक्षाही दिल्या’. मात्र या ऑनलाइन परीक्षांचा खास असा उपयोग आपल्या अभ्यासक्रमात झाला असेल असं वाटत नसल्याचं गायत्री स्पष्ट करते. इतक्या अडथळ्यांचा सामना करत पूर्ण वर्ष घालवल्यावर आता जेव्हा प्रत्यक्ष कॉलेज सुरू होत आहेत म्हटल्यावर गायत्रीला पुढच्या परीक्षा ऑफलाइनच व्हाव्यात असं वाटतं आहे.

अर्थात, इथेही विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो आहे. प्रॅक्टिकल्स महत्त्वाचे असल्याने काही शाखांमधील विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा व्हाव्यात असं वाटत असलं तरी एकू णच कॉलेज आणि परीक्षांचं वेळापत्रक बिघडलं आहे. त्यात कॉलेज सुरू झाल्या झाल्या ऑफलाइन परीक्षा झाल्या तर त्यांना सामोरं जायची अजून विद्यार्थ्यांची मानसिकता नाही. ‘कॉलेज सुरू झाल्यावर आम्ही अजून डिटेलमध्ये  शिक्षण घेणार आहोत, त्यामुळे  परीक्षा ऑफलाइनच व्हाव्यात असं माझं मत आहे. अनेक मुलांचं शेवटचं वर्ष आहे. त्यांची अशीच ऑनलाइन परीक्षा जर झाली तर त्यांच्या डिग्रीला तेवढी किंमत राहणार नाही असं वाटतं आहे, असं गायत्री सांगते. मात्र कॉलेज सुरू झाल्यावर लगेच परीक्षा घेतल्या जाणार असतील तर मात्र तिची पसंती ऑनलाइन परीक्षांसाठी असल्याचे तिने स्पष्ट के ले. परीक्षेच्या आधी महिनाभर तरी पुन्हा नॉर्मल शिक्षण घेता यावं, अशी अपेक्षा ती व्यक्त करते. असंच काहीसं मत ‘टेक्स्टाईल सायन्स आणि अ‍ॅपरल डिझायनिंग’मध्ये मास्टर्स डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या अंकिता इलुरक रचंही आहे. अंकिता सांगते, ‘ऑनलाईन लेक्चरमध्ये आम्ही थिअरी पार्ट शिकलोच, परंतु तेही शिकताना आम्हाला बरंच अवघड गेलं. आमच्या सिनिअर्सचं दुसरं सेमिस्टर असंच ऑनलाइनच पूर्ण झालं, अगदी परीक्षाही ऑनलाइन झाल्या, परंतु आम्हाला आता पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याची संधी मिळतेय त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत’. आम्ही पूर्णपणे व्यवस्थित शिकूनच कॉलेजमधून बाहेर पडू हे निश्चिात आहे. आमच्या फिल्डमध्ये थिअरीप्रमाणेच प्रात्यक्षिक करणं फार महत्त्वाचं असतं. या आधीची परीक्षा आम्ही ऑनलाइन दिली, आता मात्र कॉलेज सुरू होत असेल तर आम्हाला लेखीच परीक्षा देण्याची इच्छा आहे. कारण जो अनुभव आणि जे शिक्षण ऑफलाइन परीक्षांमधून मिळतं ते ऑनलाईनमध्ये नाही मिळत, असं अंकिता सांगते. जेव्हा तुम्ही ऑनलाइन पेपर लिहिता आणि दोन मार्कांचा प्रश्न असतो, तेव्हा लेखी परीक्षेत दीड किंवा १ असे माक्र्स मिळतात, पण ऑनलाईन परीक्षेत अशापध्दतीने गुणांकन होत नाही. कॉलेज सुरू झाल्यावर काही दिवस अभ्यासाला दिले तरच ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्यात, असं गायत्री प्रमाणेच अंकिताचंही मत आहे.

एकंदरीत विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेसाठी तयार आहेत, परंतु आधी कॉलेज आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी बॅक टू नॉर्मल व्हाव्यात आणि त्यासाठी जुळवून घ्यायला वेळ मिळावा, अशी इच्छा विद्यार्थी व्यक्त करताना दिसतात. इंजिनीअरिंग शिकणारा अथर्व सावंत म्हणतो, आम्ही उत्तमप्रकारे ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे, पण आमची प्रात्यक्षिकं मुळीच जशी हवी तशी झाली नाहीत. आम्हाला आधी पूर्ण थिअरी अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी आणि नंतर संपूर्ण प्रात्यक्षिक अभ्यासक्रम शिकवावा, असं मनापासून वाटतं आहे. हे सगळं झाल्यावरच ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात असं आमचं स्पष्ट मत आहे. लगेच परीक्षा सुरू केल्या जाणार असतील तर ऑनलाईन परीक्षाच घेतल्या जाव्यात, असं मत अथर्व व्यक्त करतो.

एकंदरीतच जवळपास वर्षभर लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतर कॉलेजेसमध्ये परतणाऱ्या मुलांना बॅक टू नॉर्मल होण्यासाठी साधारण महिन्याभराचा कालावधी अपेक्षित आहे. तो मिळाला तर ऑफलाईन परीक्षांची तयारी करता येईल, असं मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत. मात्र कॉलेज सुरू झाल्या झाल्या ऑफलाईन परीक्षा देण्याची त्यांची अजिबात मानसिकता नाही, हेही ते तितक्याच मोकळेपणाने सांगताना दिसतात.

viva@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2021 1:41 am

Web Title: corona virus lockdown college life college bell akp 94
Next Stories
1 जेवलीस का?
2 वस्त्रान्वेषी : फलकारा
3 पुन्हा नव्वदीत!
Just Now!
X