16 July 2020

News Flash

एक सलाम कृतज्ञतेचा!

करोना नावाच्या आजाराने आपल्या सगळ्यांचीच झोप उडवली आहे.

आभार मानताना मनामध्ये एकच स्वच्छ आणि निर्मळ भावना हीच आहे की लवकरच देशभरातील जनता करोनाच्या या भयाण संकटातून बाहेर पडू दे.

विपाली पदे – viva@expressindia.com

देव देव्हाऱ्यात नाही, तर तो आज भारतातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या, नर्सेसच्या रूपात, रस्त्यांवर जमावबंदी करणाऱ्या पोलिसांच्या रूपात, अन्नधान्य आणि औषधं पुरवणाऱ्या दुकानदारांच्या रूपात आणि त्याचबरोबर या सगळ्यांना त्यांच्या डय़ूटीच्या जागेवर वेळेत पोहोचवणाऱ्या वाहनचालकांच्या रूपात आज ठायी ठायी दिसून येतोय. मागचे काही दिवस थैमान घातलेल्या या करोना नावाच्या आजाराने आपल्या सगळ्यांचीच झोप उडवली आहे. आणि त्यातही जिवावर उदार होऊन ही मंडळी आज आपल्याकरता दिवसरात्र झटतायेत. या सगळ्यांसाठीच हा कृतज्ञतेचा शब्दरूपी सलाम..

कुठल्याही संकटकाळी सैरावैरा बेभान होऊन लढण्याची गरज असते किंवा नसते ही बाब प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळी आहे, कारण तो त्या संकटाला कशा पद्धतीने तोंड देतो हे सर्वात महत्त्वाचे ठरते. सध्या सुरू असणाऱ्या करोना तांडवामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कौशल्य पणाला लागले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला आपल्याच मनातील भीतीला तोंड द्यायचं आहे. दुसरीकडे आपल्याबरोबरच देशभरात नव्हे, जगभरातच कितीतरी लोक आपली भीती बाजूला ठेवून करोना रुग्णांना बरे करण्यासाठी, इतरांना त्याची लागण होऊ नये यासाठी कार्यरत आहेत. इतरांच्या विचारात ते मग्न आहेत, त्यांचेही कौशल्य पणाला लागले आहे.

करोना या रोगाचा प्रादुर्भाव जगभर वाढतच चालला आहे आणि त्याच्याच परिणामी आज मात्र अख्खं जग जवळ आलं आहे. इतिहासात या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. मॅनकाईंड म्हणजे हा लढा माणुसकीचा आहे आणि या लढय़ात सर्व वयोगटातील, जातीतील, उंचीतील, श्रीमंत – गरीब आणि गरजू – मध्यमवर्गीय कुटुबातील सर्व माणसं या लढय़ात सामील झाली आहेत. त्यामुळे या सर्वाचे लाख लाख आभार मानले जाणं अत्यावश्यक आहे. आजच्या काळातील आम्ही तरुणवर्ग एका सुजाण नागरिकाची जबाबदारी पार पाडू इच्छितो आणि म्हणून हे आभार आम्ही आज मानतो आहोत. तर येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याकडून आदर्श मिळेल. येथे खरं तर प्रथम आभार मानावेसे वाटतात ते म्हणजे दिवसरात्र एक करून करोनावर औषध तयार करण्याऱ्यांचे आणि मुख्यत: करोना रुग्णांवर प्राथमिक औषधोपचार करणाऱ्यांचे.. हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार. हा काळ इतका कठीण आहे की वैद्यकीय सेवेची ही एक मोठी परीक्षाच आहे आणि त्यात ही सर्व मंडळी आपल्या आरोग्यासाठी झटापट करत आहेत. त्यातूनही या काळात घेतले जाणारे निर्णय, पेशंटच्या मानसिक स्वास्थ्याचीही काळजी या अशा अनेक गोष्टींची काळजीपूर्वक देखभाल करण्यांचेही आभार. पेशंटच्या तपासणीकरता २४ तास झटणाऱ्यांचे आभार. सगळीकडे स्वच्छता मोहीम प्रत्यक्षात आणणाऱ्यांचे आभार. विशेष आभार मानायचे म्हणजे विमानतळावर लोकांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेऊन त्यांची तपासणी करून त्यांना योग्य ठिकाणी सुखरूप ठेवून त्यावर उपचार करणाऱ्यांचेही अधिक आभार.

आपल्या देशातील सामान्य माणसाच्या आयुष्यातील सुपरहिरो असलेल्या पोलिसांना सलाम, ज्यांनी सरकारने २२ मार्चला जाहीर केलेल्या कफ्र्युच्या काळात संपूर्ण देशात शांतता कायम राखून ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न केले. आणि सतत २४ तास स्वत:च्या जिवाची काळजी न करता लोकांना घरात बसून रहा हे आव्हान करणाऱ्या पोलीस हो.. तुमच्यामुळे अजूनही रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. तुम्हाला सगळ्यांना सलाम !

एक छोटा समूह वर्ग आहे जो आपल्या लक्षात येत नसेल. विशेषत: त्यांचेही आभार मानले पाहिजेत. सर्वत्र उच्चभ्रू लोकांच्या इमारतींखाली, मोठय़ा कंपन्यांमध्ये, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, हॉस्पिटल्स, शॉपिंग मॉल्स, कॅ फेज, मल्टिप्लेक्सेस आणि रस्त्यारस्त्यांवर चोवीस तास नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हॅण्ड सॅनिटायझर आणि बॉडी टेम्परेचर चेक करण्याचे मशीन घेऊन उन्हात दिवसभर उभ्या राहणाऱ्यांचे विशेष आभार. त्यांच्याबरोबर सिक्यूरिटी गार्ड्सचेही आभार मानायला हवेत.

आभार मानताना मनामध्ये एकच स्वच्छ आणि निर्मळ भावना हीच आहे की लवकरच देशभरातील जनता करोनाच्या या भयाण संकटातून बाहेर पडू दे. जागतिक पातळीवर आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्थैर्य प्राप्त होऊ  दे. आणि सरतेशेवटी, आभार मानले पाहिजेत ते म्हणजे सरकारचे आणि दिवसभर आपल्या प्रत्येकाला माध्यमांतून माहिती पुरवणाऱ्यांचेही मन:पूर्वक आभार!

२२ मार्चला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण देशाने तुमचे टाळ्या, शंख, वाद्ये, विविध भांडी वाजवून आभार प्रदर्शित केले. आम्ही तुम्हाला घरी बसून मदत करू असे आश्वासन सगळ्यांनी दिले. पण ते केवळ एका दिवसाचे कौतुक किंवा काही क्षणांचे आभार मानणे नव्हते. आम्हाला तुमच्या कार्याची ‘जाणीव’ आहे या भावनेने केलेला तो एक नाद होता. पण एवढेच करून आम्हाला थांबायचे नाही. आम्हाला अगदी शेवटपर्यंत तुम्हाला साथ द्यायची आहे आणि हे करोनाचे संकट दूर करायचे आहे.

तसे तुमचे आभार मानणारे आम्ही वयाने आणि मनाने छोटे आहोत पण तरी कृतज्ञतेची भावना आम्हाला कायम जपायला हवी आणि तुम्ही करत असलेल्या या सेवेचे उपकार जन्मभर लक्षात ठेवायला हवेत. आम्ही तरुण मंडळी एवढंच सांगतो, आम्ही टाळ्या वाजवल्या पण करोना घालवण्यासाठी नाही, आम्ही टाळ्या वाजवल्या पण केवळ पंतप्रधानांचे ऐकावे म्हणून नाही, आम्ही टाळ्या वाजवल्या त्या लहान आहोत म्हणून नाही, आम्ही टाळ्या वाजवल्या त्या स्वत:साठी दिवसभर एकटे राहिलो म्हणून नाही. आम्ही या टाळ्या वाजवल्या त्या आमच्या मित्रवर्गासाठी जे रात्रंदिवस विविध सेवांमध्ये रुजू होऊ न करोडो नागरिकांचे जीव वाचवत आहेत. आमच्या मनात तुमच्या सगळ्यांविषयी आदर आहे, प्रेम आहे, तुम्हाला देण्यासाठी धैर्य आहे, जाणीव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आम्हा सगळ्यांचा तुमच्यासाठी एक ‘कृतज्ञतापूर्वक सलाम’ आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:08 am

Web Title: coronavirus janta curfew salute to corona fighters dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप – आपत्तीतून संपत्ती
2 संशोधनमात्रे : पर्यावरणस्नेही शोधांच्या वर्तुळांचा प्रवास
3 माध्यमी : संकलनाचं तंत्र
Just Now!
X