12 July 2020

News Flash

‘मी’लेनिअल उवाच : पॅन्डेमिक म्हणजे काय रे भाऊ ?

आपल्या घरच्यांनादेखील हेच सांगा. आपल्या देशाची लोकसंख्या किती जास्त आहे हे तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा हावरटपणा करू नका.

इटलीमध्ये लोकांनी वेळच्या वेळी पावले न उचलल्याने, या आजाराला ‘हलक्यात’ घेतल्याने आज त्यांची मृतांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे.

जीजिविषा काळे

सध्या वेगळा काही विषय नाही आणि मलाही त्यावरच बोलायचे आहे. पण खालील मुद्दे जरी करोनाशी संबंधित असले तरी ते एकमेकांशी संबंधित नसून माणसाच्या वागण्या- बोलण्या- असण्या- समजण्याशी संबंधित आहेत. ओके.. सगळ्यात पहिले व्हॉट्सअ‍ॅप हा तुमचा गुरू नाही, हे घोका,  कुठे तरी लिहून ठेवा आणि आपले आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक यांनादेखील सांगा. करोनाबद्दलची माहिती डब्ल्यूएचओच्या वेबसाइटवर आहे, ती वाचा. आता पुढे..  कदाचित माझे बोलणे आता रूक्ष वाटेल, पण त्यासाठी मी माफी मागणार नाही.

प्रिय वाचक मित्र,

रविवारी २२, मार्च रोजी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. सायंकाळी ५ वाजता आपापल्या खिडक्या/बाल्कनीमध्ये येऊन टाळ्या, थाळ्या वाजवा असा मेसेजपण दिला गेला होता. तो का? तर आपण घरात बसलेलो असताना काही लोक ते करू शकत नाहीत. आपल्या भल्यासाठी त्यांना रोज कामावर जायला लागते आहे, अशा लोकांना प्रोत्साहन द्यायला, हा उपक्रम राबवला होता. त्यातून कोणत्याही ‘व्हायब्रेशन्स’ येऊन करोना मी जातो बुवा.. असे म्हणून पळून जाणार नव्हता. त्यामुळे कृपया असे मेसेजेस एकमेकांना पाठवू नयेत. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, आपल्या साक्षरतेचा चांगला उपयोग करा व बरोबर माहितीच पोहोचवा. गोमूत्र चांगले की वाईट मला माहिती नाही, पण ते करोनापासून तुम्हाला वाचवू शकणार नाही.

दुसरी गोष्ट, मी अनेक लोकांना टिक टॉक/ इन्स्टाग्रामवर उत्तर पूर्वी भारतीयांना करोना  गो वगैरे चिडवताना बघते आहे. तुम्ही जर का त्यातले असाल तर कृपया आपला शहाणपणा बाजूला ठेवा, कारण ही टिंगल नसून ‘जातिवाद’ आहे.

तिसरी गोष्ट, कृपया बाहेर पडू नका. गरजेपुरतेच सामान आणा. आपल्या घरच्यांनादेखील हेच सांगा. आपल्या देशाची लोकसंख्या किती जास्त आहे हे तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा हावरटपणा करू नका. स्वार्थी वागू नका. या झाल्या काही माफक सूचना.

पॅन्डेमिक म्हणजे महामारी. म्हणजे एखादा रोग जेव्हा आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त गतीने आणि मोठय़ा क्षेत्रफळात पसरू लागतो, तेव्हा त्याला महामारी म्हणतात. करोना हा संसर्गजन्य रोग आहे. इटलीमध्ये लोकांनी वेळच्या वेळी पावले न उचलल्याने, या आजाराला ‘हलक्यात’ घेतल्याने आज त्यांची मृतांची संख्या हजारोंच्या घरात गेली आहे. तुम्ही भले पैलवान असाल, कदाचित तुम्हाला करोना झाला तरी तुम्हाला काही होणार नाही, पण कदाचित तुमच्यामुळे एखादी जवळची व्यक्ती आजारी पडू शकते. भारतात अनेक हजार माणसांमागे एक आयसोलेशन वॉर्ड आहे. डॉक्टर दिवसरात्र आपल्यासाठी झटत आहेत. त्यांना वाटले तरी ते घरी राहू शकत नाहीत. तुमच्याकडे तो पर्याय असेल तर कृपया जबाबदार नागरिकांसारखे वागा.

मला माहिती आहे अनेक लोकांचे धंदे, रोजंदारी या सर्व गोष्टींवर याचा घातक परिणाम होणार आहे, परंतु जितक्या लवकर आपण नियम पाळायला लागू तितक्या लवकर कदाचित हा राक्षस आपला पिच्छा सोडेल. पण त्यासाठी आपल्या आपल्या घरी बसून मनाने एकत्र येणे गरजेचे आहे. नशिबाने तुम्ही अशा काळात राहात आहात ज्या काळात ४ जी इंटरनेट आहे. आशा करते की तुम्ही सगळे आपली सुबुद्धी वापराल.  स्वत:ची आणि आपल्या लोकांची काळजी घ्याल.

जाता जाता आजची टीप – काहीच नाही खरे तर.. घरी बसा रे बाबांनो. एवढेच.

कळावे,

जीजि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:04 am

Web Title: coronavirus what is pandemic millennial uvacha dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 बुकटेल : पुराणातली वांगी
2 डाएट डायरी : रांधा, वाढा आणि रोगांशी लढा
3 वस्त्रांकित : पदर ‘माया’
Just Now!
X