12 July 2020

News Flash

शेफखाना : व्हायरल व्हिडीओची कहाणी

 व्हायरल व्हिडीओ कसा बनवायचा? तर आता व्हायरल व्हिडीओ बनवणं ही पण एक वेगळी रेसिपीच आहे.

22-11-2019

 

||  शेफ मधुरा बाचल

व्हायरल व्हिडीओ बनवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग तो क्रिएटर असो किंवा ब्रॅण्ड. यूटय़ूबवर दर तासाला ३०० तासांचे व्हिडीओज अपलोड होतात, पण असं नेमकं काय होतं की फक्त त्यातले मोजकेच व्हिडीओ व्हायरल होतात. आणि उरलेले गर्दीत विरून जातात, याचीच ही कहाणी आजच्या सदरात..

जगभरातून २.६५ अब्ज लोक सोशल मीडियाचा वापर करतात. असा अंदाज आहे की, २०२१ पर्यंत हीच संख्या ३.१ अब्जपर्यंत पोहोचणार आहे. याचा अर्थ असा की, व्हिडीओज जास्त अपलोड होत असले तरी ते बघणाऱ्यांची संख्या पण दिवसेंदिवस वाढतच जाणार. आता आपण विचार करू या, जर खरंच आपल्याला अशी एक भन्नाट कल्पना सुचली आणि लोक तो व्हिडीओ बघून चकित झाले आणि बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला तर? फक्त कन्टेन्ट क्रिएटरच नाही तर ब्रॅण्ड्ससुद्धा अशा भन्नाट कल्पनांच्या शोधात असतातच.

पण तुम्ही विचाराल व्हायरल व्हिडीओ म्हणजे नक्की काय? उदाहरणच द्यायचं झालं तर आता मी ‘मधुराज रेसिपी’च्या पेजवर अलीकडेच व्हायरल झालेल्या रेसिपीचं उदाहरण देते. मी ‘पनीर लबाबदार’ या पदार्थाची रेसिपी फेसबुकवर अपलोड केली आणि काही तासांच्या आतच त्याचे व्ह्य़ुज मिलियनच्या घरात गेले. तर असं का झालं असेल? व्हिडीओ लहान आणि नेटका होता. त्याचबरोबर त्याची थंबनेल आकर्षक होती आणि रेसिपी पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी होती. एकदा का लोकांना कंटेन्ट आवडला की ते कमेंटवर कमेंट करतात, शेअर करतात आणि तो व्हिडीओ पटापट वेगाने वाऱ्यासारखा पसरत जातो.

व्हायरल व्हिडीओ कसा बनवायचा? तर आता व्हायरल व्हिडीओ बनवणं ही पण एक वेगळी रेसिपीच आहे. कुठलाही पदार्थ बनवताना उत्तम सामग्री हवी, तो पदार्थ उत्तम होण्यासाठी लागणारी सगळी उपकरणं हवी. पण सगळ्या उत्तम बाबींचा मेळ जमला तरी पहिल्याच प्रयत्नात तो पदार्थ यशस्वी होईल असं नाही. आता उत्तम दर्जाचा पदार्थ बनवायचा प्रयत्न होत असताना सातत्याने तो बनवावा लागतो, पहिल्या वेळेस झालेल्या चुका टाळून त्यात बदल करून त्याचा पोत, दर्जा दिवसेंदिवस उत्तमतेकडे नेण्याचा ध्यास लागतो. आणि जेव्हा तुम्ही सातत्याने बदल करत जाता, तेव्हा एक क्षण असा येतो की आहा! हीच ती रेसिपी. ज्याचा स्वाद घरभर पसरला आहे. घरातून बघता बघता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मग ती रेसिपी फेमस होते आणि लोक त्याचे चाहते होतात. ते त्याचा आस्वाद घेतात आणि त्याचक्षणी उत्स्फू र्त प्रतिसादही देतात. वाह , क्या बात हैं ! तर आता ही रेसिपी यशस्वी होण्यापर्यंत ज्या काही गोष्टी आत्मसात झाल्या त्याच गोष्टी व्हायरल बनवण्यासाठीचा एक मजबूत पाया म्हणून वापर करू शकतो.

व्हिडीओ फॉरमॅट : आपण पोस्ट किंवा व्हिडीओ कुठल्या सोशल मीडियावर शेअर करत आहोत त्यावर त्या व्हिडीओचा फॉरमॅट आणि रेशो बदलत जातो. म्हणजे जर यूटय़ूबवर व्हिडीओ जात असेल तर रेशो १६ :९ असतो, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामसाठी १:१ तर टिकटॉकसाठी ९:१६ असा वेगवेगळा असतो. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक गरजाही वेगवेगळ्या असतात. ही गोष्ट छोटी जरी वाटली तरी यावर युजर अनुभव ठरवला जातो. त्यामुळे तांत्रिक बाजू विचारात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हिडीओसाठी  विषय कुठलाही असला तरी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तो क न्टेन्ट बघणाऱ्यांना भावला पाहिजे. त्यांना त्या विषयाचा त्यांच्या वैयक्तिक जीवनात संदर्भ लागला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. लोकांनी त्याची अंबलबजावणी करायला सुरुवात केली पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर केक, जर घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांत तुम्ही एखादी केक किंवा कुकीची रेसिपी लोकांना दिली तर फॉलोअर्स ती पटकन करून बघतात. आपला प्रेक्षकवर्ग कोण असेल हे समजावून घेतलं पाहिजे. एकदा का व्हिडीओ ऑनलाइन झाला की काम संपलं असं नाही, तर व्हिडीओ लाईव्ह झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया समजावून घेणंही तितकंच महत्वाचं असतं. आणि नुसतंच समजावून नाही घेऊन चालत तर त्यांना वेळोवेळी प्रतिसाद पण दिला पाहिजे. त्यामुळे आपल्या प्रेक्षक वर्गाबरोबर आपली एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते आणि प्रेक्षकही प्रचंड खूश होतात.

आता एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की आपण बनवलेला प्रत्येक व्हिडीओ किंवा पोस्ट व्हायरल होईलच, असं अजिबात नाही. पण तुम्ही जो काही कन्टेन्ट क्रिएट करता त्यात सातत्य ठेवा. लोकांना त्याची सवय लागली पाहिजे. तुम्ही आठवडय़ातून एक वार आणि वेळ ठरवून त्याच वेळी व्हिडीओ शेअर करू शकता. जरी व्हिडीओ व्हायरल होईल याची शाश्वती नसली तरी या काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली तर व्हिडीओला चांगले व्ह्य़ुज नक्कीच मिळू शकतात. व्हायरल व्हिडीओ बनवणं अशक्य नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्की, आपल्या अस्सल फॉलोअर्सना सतत आपल्याबरोबर खिळवून ठेवणं हे दिसतं तितकं सोप्पं नाही.

फ्रूट कस्टर्ड

साहित्य : १ लिटर दूध, ५० ग्रॅम कस्टर्ड पॉवडर, १ कप साखर .

कृती : दुधात साखर आणि कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घ्या. मीडियम हिटवर दूध दाटसर होईपर्यंत गरम करून घ्या. थंड झाल्यावर आवडीप्रमाणे त्यात फळांचे तुकडे घालून सव्‍‌र्ह करा.

वन पॉट पास्ता

साहित्य : २ कप पास्ता, २ बारीक चिरलेले टोमॅटो, १ चमचा मिक्स्ड हर्ब्स,१ चमचा मिरपूड, १ चमचा लसूण पेस्ट, ४ कप पाणी, मीठ चवीप्रमाणे, १ कप ब्रोकोली, १/२ कप चीज.

कृती : चीज सोडून सर्व जिन्नस एका पॅनमध्ये घ्यावेत. मध्यम आचेवर पास्ता संपूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्या. पास्ता शिजला की चीज घालून मिक्स करा आणि सव्‍‌र्ह करा.

क्रिमी पम्पकीन सूप

साहित्य – १ चमचा तेल, १ हिरवी मिरची, १/४ चमचा मिरपूड, सैंधव मीठ, जिरंपूड, १/२ कप बारीक चिरलेला कांदा.

कृती – तव्यात तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या. लाल भोपळ्याचे साल काढून बारीक फोडी करून घ्या. कांदा परतून झाला की हिरवी मिरची आणि भोपळा घाला. भोपळा व्यवस्थित वाफवून झाला की त्यामध्ये जिरं पूड आणि सैंधव मीठ घाला. मिक्सरमध्ये फिरवून प्युरी करून घ्या. सव्‍‌र्ह करताना त्यात चमचाभर क्रीम व मिरपूड घाला.

वन पॉट तडका खिचडी

साहित्य : १/२ कप तांदूळ, १/४ कप सालीसकट मूग डाळ, ढोबळी मिरची, मटार, बटाटा, मीठ चवीपुरतं, १ चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, १ हिरवी मिरची, ३ ते ४ सुक्या मिरच्या, १/२ चमचा जिरं, १/२ चमचा मोहोरी, १ चमचा लसूण, कडीपत्ता.

कृती : डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घाला. त्यात चौपट पाणी घाला. सगळ्या भाज्या, लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालून मीडियम हिटवर ठेवून कुकरला २ शिट्टय़ा काढा. उरलेले पदार्थ वापरून खमंग फोडणी करा आणि ती तयार खिचडीवर घालून सव्‍‌र्ह करा.

शब्दांकन : मितेश रतिश जोशी

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 3:03 am

Web Title: creator brand youtube recipe panir labatdar viral video akp 94
Next Stories
1 ट्रायल
2 चमकणारे तारे
3 बदलती लग्न‘पत्रिका’
Just Now!
X