04 July 2020

News Flash

व्हिवा वॉल : क्रेडिट सिस्टीम

जागतिकीकरणाचा वरचष्मा असल्यानं पाश्चिमात्त्यांचं अनुकरण आणि त्यांच्या काही गोष्टी अवलंबणं हे ओघाने आलंच.

| March 28, 2014 01:12 am

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.
जागतिकीकरणाचा वरचष्मा असल्यानं पाश्चिमात्त्यांचं अनुकरण आणि त्यांच्या काही गोष्टी अवलंबणं हे ओघाने आलंच. भारतीय शिक्षणपद्धतीत असलेले दोष काढून टाकण्यासाठी आणि मुळात प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच आणण्यासाठी मुंबई विद्यापीठाने क्रेडिट सिस्टीम २०११ पासून चालू केलीये. या क्रेडिट सिस्टीममध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या ३ वर्षांची विभागणी एकूण ६ सत्रांत केली जाते. प्रत्येक सत्राच्या गुणांचं मूल्यांकन हे ६०-४० अशा गुणपद्धतीवर केलं जातं. त्यातही परत ६० मार्काची लेखी परीक्षा सोडली तर ४० मार्काचं विभाजन पुन्हा प्रोजेक्ट्स, अटेंडन्स, क्लास पार्टिसिपेशन, क्लास टेस्ट या बेसिस वर केलं जातं. आता ही क्रेडिट सिस्टीम ‘अमलात’ आणलीये खरी. पण ती ‘अमलात’ आणली म्हणजे नक्की काय केलंय? सगळ्या कॉलेजेसकडून ती ‘राबविली’ जातेय की ‘अवलंबिली’ जातेय? विद्यार्थ्यांना त्याचा खरंच फायदा होतोय का ? का फक्त प्रोजेक्ट्स, असाइन्मेंट्स इत्यादी करण्यासाठी त्यांना राबवलं जातंय आणि ‘आतले’ ४० मार्क्‍स मिळविण्यासाठी त्यांची दमछाक होतेय? का काही जणांसाठी तेच ‘आतले’ ४० मार्क्‍स हक्काचे वाटताहेत? त्या १० मार्काच्या प्रोजेक्टचा अर्थही त्यांच्यासाठी फक्त गुगलवरून कॉपी-पेस्ट करणं असा राहिलाय का? पहिल्या सेमिस्टरपासून ते सहाव्या सेमिस्टपर्यंतचे गुण ग्राह्य़ धरले जाणार आहेत की नाहीत? सगळ्या कॉलेजेसमधून ही क्रेडिट सिस्टीम अमलात आणली जातेय, पण त्यात एकसारखेपणा कुठेच दिसत नाहीये. मग विद्यापीठाला अपेक्षित असलेला एकंदर परिणाम या क्रेडिट सिस्टीमद्वारे साधला जातोय का? एकंदरीतच ही क्रेडिट सिस्टीम जर प्रायोगिक तत्त्वावर राबविली असती, तर विद्यार्थ्यांची पळापळ थांबली असती का? आणि जर आता ती राबविली जातेच आहे, तर त्यात कुठले बदल आवश्यक आहेत? या आणि अशा बेसिक प्रश्नांवर आणि त्याबाबतीत उद्भवलेल्या गोंधळावर याच क्रेडिट सिस्टीममुळे मनस्ताप सहन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मिळालेली ही काही मतं..

आदित्य जोशी
क्रेडिट सिस्टीम विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी तयार करण्यात आली आहे असा दावा केला जातो; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करताना मात्र विद्यार्थ्यांना काहीच फायदा होत नाहीये. मूळ अभ्यासक्रमामध्ये भरपूर पर्याय क्रेडिट सिस्टीमद्वारा उपलब्ध होत आहेत ज्यामुळे एखादा विद्यार्थी त्याच्या आवडीचा प्रोजेक्ट घेऊन क्रेडिट मिळवू शकतो; पण प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रोजेक्टसाठी वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन केलं जात नाही, कारण क्रमिक अभ्यासक्रमच परीक्षेच्या आत पूर्ण होत नाही. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करायचा की प्रोजेक्ट तपासायचे असा प्रश्न शिक्षकांसमोरही आहे. एकंदर क्रेडिट सिस्टीम अजून सखोलरीत्या अभ्यासून अमलात आणायला हवी. सध्याच्या सिस्टीममुळे विद्यार्थी गोंधळले व त्रासले आहेत.

दामिनी कुलकर्णी
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळावं असा क्रेडिट सिस्टीमचा मुख्य हेतू आहे; परंतु या सिस्टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या हेतूपकी काही हेतू क्रेडिट सिस्टीममुळे साध्य होत नाहीयेत. सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे विद्यापीठाशी शिक्षक बांधील आहेत आणि शिक्षकांशी विद्यार्थी बांधील आहेत; परंतु या प्रत्येक घटकामध्ये अलिप्तता आहे आणि ही साखळी एकमेकांना प्रोत्साहित करणारी नाही. म्हणूनच यामध्ये अंतर्भूत असलेल्या प्रत्येक घटकाची मानसिकता ‘करायचं म्हणून काम करायचं’ अशीच होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर क्रेडिट सिस्टीमची गरज आहे; परंतु क्रेडिट सिस्टीम राबवताना तिचा उद्देश विचारात घेतल्याशिवाय ती राबवली तर गोंधळ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं प्रात्यक्षिक ज्ञान हवं तसं मिळत नाही आणि क्रेडिट सिस्टीमचा ताण शिक्षकांवरही पडतो आहे. ४० -६०च्या पॅटर्नऐवजी ५०-५०चा पॅटर्न असलेला जास्त फायदेशीर ठरेल. एकूणच सध्याच्या क्रेडिट सिस्टीमने काय साध्य केलंय याचं उत्तर शोधावं लागणार आहे.

चिन्मय िवचुरकर
विद्यापीठाच्या क्रेडिट सिस्टीमच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर खूप ताण येत आहे. मुळात क्रेडिट सिस्टीमची संकल्पना चांगली आहे; परंतु त्या संकल्पनेत ज्या गोष्टी मांडण्यात आल्या आहेत तशा त्या प्रत्यक्ष राबवल्या जात नाहीत. बऱ्याचदा प्रोजेक्ट करायचे आहेत म्हणून विषयाशी संबंधित नसलेल्या अथवा न शिकवलेल्या विषयांवर प्रोजेक्ट तयार करावे लागतात म्हणूनदेखील विद्यार्थी ते प्रोजेक्ट करण्यात स्वारस्य दाखवत नाहीत; परंतु आक्षेप फक्त विद्यार्थ्यांवरच घेतला जातो. विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे, त्यांना काय आवडतंय आणि ते कोणत्या विषयातून स्वत:ला अधिक प्रभावीरीत्या व्यक्त करू शकतील याबाबतचा कोणताच विचार विद्यापीठाने राबवलेल्या क्रेडिट सिस्टीमद्वारा केला जात नाही.

अनल टिळक
क्रेडिट सिस्टीम तसं पाहता फायद्याची ठरली असती, पण मार्क्‍सची जी वाटणी केली आहे, त्याने खूप त्रास होतो. स्वत:चा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळत नाही. एका विषयाला २ शिक्षक असल्यामुळे मार्क्‍सचं विभाजन कसं केलं जातं याबद्दल गोंधळच असतो. त्याऐवजी २० मार्काचा प्रोजेक्ट आणि २० मार्काची क्लास टेस्ट असं ठेवलं असतं तरी फार पळापळ झाली नसती. क्रेडिट सिस्टीममुळे ताण अधिक वाढतोय. तसंच तुमचे इंटर्नल्सचे मार्क्‍स जास्त असल्यास आणि मुख्य परीक्षेचे मार्क्‍स कमी असल्यास इंटर्नल्सचे मार्क्‍सदेखील कमी केले जातात. याचं कारण असं दिलं जातं की इंटर्नल मार्क्‍समुळे मार्क्‍स वाटले जातात. जर इंटर्नल्समुळे मार्क्‍स वाटले जाताहेत असं वाटत असेल तर इतके मार्क्‍स इंटर्नल फॅकल्टीच्या हातात दिलेतच कशाला?

सिद्धार्थ वैद्य
क्रेडिट सिस्टीमबद्दल खूप गोंधळ आहे. मुळात जर प्रत्येक सेमिस्टरचे मार्क्‍स ग्राह्य़ धरले जाणार असतील तर सगळ्या सेमिस्टरचे पेपर्स सगळ्या महाविद्यालयांमध्ये सारखे का काढले जात नाहीत? यामधला गोंधळ दूर करायचा असेल तर त्यासाठी या सिस्टीममध्ये एक युनिफॉर्मिटी हवी. शिवाय ६०-४०च्या नियमामुळे मुलांचं लेक्चर्स अटेंड करण्याचं प्रमाण वाढतंय, पण प्रश्न हा उपस्थित होतोय की लेक्चर्स अटेंड करूनही त्या दर्जाचं शिक्षण मिळतंय का? का फक्त अटेंडन्स मिळतेय पण टाइमपास होतोय हा विचार केला जातोय हीसुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

किरण जाधव
मुंबई विद्यापीठाने लागू केलेली ही क्रेडिट सिस्टीम खूप संकुचित स्वरूपाची आहे. या पद्धतीचा मूळ हेतू तर दूरच राहिलाय. ज्ञान आत्मसात करण्याऐवजी मार्कासाठी केलेली धावपळच सगळीकडे दिसून येतेय. शिक्षकसुद्धा या बाबतीत गोंधळलेले दिसतात. कित्येकदा तर त्यांच्याकडून नीट शिकवलंही जात नाही आणि त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत असतो. ही क्रेडिट सिस्टीम लागू करून मुंबई विद्यापीठाला नक्की साधायचंय तरी काय? विद्यार्थ्यांचं ज्ञान की त्यांची गती?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2014 1:12 am

Web Title: credit system
टॅग Boys,College,Girls,Study
Next Stories
1 फॅशन पॅशन : मेकओव्हर
2 ‘साइज झीरोमुळे आयुष्याला वळण’
3 परीक्षेसाठी डाएट
Just Now!
X