News Flash

हा खेळ जिवाला..

आपल्या देशाचा क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर देव मानला जातो. क्रिकेटप्रेमी जनता कोटय़ानकोटी आहे

| August 14, 2015 01:50 am

आपल्या देशाचा क्रिकेट हा धर्म आणि सचिन तेंडुलकर देव मानला जातो. क्रिकेटप्रेमी जनता कोटय़ानकोटी आहे, पण क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या मुली.. हातावर मोजण्याइतक्या. कारण महिला क्रिकेटबद्दल असणारी उदासीनता. महिला क्रिकेटमध्ये एक मराठी नाव सातत्याने प्रगती साधत आहे.. पूनम राऊत-कुळ्ये. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आणि मिताली राजला आदर्श मानणारी पूनम भारतीय महिला संघात गेली पाच-एक र्वष खेळतेय. २०१३चा विश्वचषक सामना हा तिच्यासाठी स्वप्न होतं. त्या सामन्यान ओपनर म्हणून खेळून तिने स्वतला सिद्ध केलं.

लहानपणापासून खेळाची आवड असणारी पूनम वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळतेय. एक समर कॅम्प केल्यानंतर तिला जाणवलं आपला जीव क्रिकेटमध्ये रमतोय. तिने वडिलांना सांगितलं की तिला क्रिकेट खेळायचंय. तेव्हा वडिलांनी स्पष्टपणे विचारलं, ‘तू शेवटपर्यंत क्रिकेट खेळणार असशील तरच मी तुला पाठवतो. खेळ मध्येच सोडायचा नाही.’ वडिलांना दिलेला शब्द पूनम आजही पाळत आहे. लग्नानंतरही ती सातत्याने क्रिकेट खेळतेय आणि भारताचं प्रतिनिधित्व करतेय. संजय गायतोंडे यांच्याकडून पूनमने प्रशिक्षण घेतलंय. गल्ली क्रिकेटमधून सुरू झालेला प्रवास तिला भारताच्या राष्ट्रीय संघापर्यंत घेऊन गेला. नॅशनल टीममध्ये तिला स्थान मिळालं आणि एक स्वप्न साकार झालं.
‘एकदा मी अंजुम चोप्राला क्रिकेट खेळताना पाहिलं तेव्हा मला पण वाटलं की, आपणही देशासाठी खेळायला हवं. १५ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील गटात मी मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. तीन र्वष मी भारतीय टीमसाठी स्टॅण्डबाय म्हणून निवडली जात होते.’ असं पूनम सांगते. २००९ सालच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून पूनमने भारतीय टीममधून पदार्पण केलं. त्यानंतर टी२० विश्वचषकातसुद्धा तिने देशाचं प्रतिनिधित्व केलंय. ‘२०१३चा विश्वचषक माझ्यासाठी स्वप्न होतं. त्यातला पहिलाच सामना आणि ओपनर फलंदाज म्हणून मी. याचं थोडं दडपण होतं. पण पहिल्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी केली. त्या दडपणातून बाहेर येऊन उत्तम खेळ केला. गेल्या वर्षी कसोटी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं आणि भारतीय महिला संघाने इंग्लडच्या भूमीत त्यांचा पराभव केला होता. भारतीय टीमसाठी शतक करायचं स्वप्न दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी सामन्यात पूर्ण झालं. तो आयुष्यातला आनंदाचा क्षण होता,’ असंही पूनम सांगते.
मुलींचं खेळण्याचं प्रमाण कमी आहे. त्यात महिला क्रिकेट तेवढय़ा उत्साहाने पाहिलंही जात नाही, अशी खंत तिने व्यक्त केली. मुली क्रिकेट कंटिन्यू करत नाहीत. कारण एक तर हा तसा खर्चिक खेळ. त्यातून मुलगी ६ ते ८ तास किमान मैदानावर असणार. क्रिकेटसाठी फिटनेस लेव्हल चांगली लागते. ‘उन्हात खेळल्यामुळे काळी होशील, मग लग्न ठरणार नाही, घरात लक्ष देता येणार नाही,’ असा विचार पालकांनी केला तर मुली खेळात पुढे येणारच नाहीत. पालकांचा विश्वास आणि पाठिंबा गरजेचा असतो. माझ्या सुदैवाने आईवडिलांनी आणि लग्नानंतर नवरा स्वत क्रिकेटपटू असल्याने सासरच्यांकडूनही माझ्या खेळासाठी मला प्रोत्साहनच मिळत आलंय. लहानपणीच सराव करायची एक शिस्त लागल्याने फिटनेसबद्दल आवड निर्माण झाली. मुलांमध्ये खेळत असताना त्यांच्याकडे बघून मी शिकले. मुलींनी मुलांसारखंच खेळायला हवं. तितकंच सीरिअसली मुलींनी क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहायला हरकत नाही. मुलींनी क्रिकेटसाठी पुढे येणं गरजेचं आहे,’ असंही पूनमने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:50 am

Web Title: cricket is religion in india
टॅग : Religion
Next Stories
1 जोडी कमाल की!
2 ‘अनियन’ आख्यान
3 स्वातंत्र्याचा अर्थ
Just Now!
X