सौरभ करंदीकर

मानवी जनुकांमध्ये असलेल्या त्रुटी शोधून त्यांना कात्री लावायचं हे ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञान आहे. आज हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत असलं तरी उद्या ते सर्वदूर पसरेल, सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा वैद्यकीय उपचार पद्धतीत वापरलं जाऊ शकेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. कृत्रिम गर्भधारणेमध्ये क्रिस्परचा वापर करून आनुवंशिक व्याधींना कायमचं संपवलं जाऊ शकेल अशी स्वप्नंदेखील रंगवली जात आहेत.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

एकदा एका भाबडय़ा नातवाने आपल्या आजीला एक प्रश्न विचारला, ‘आजी आपलं जग पडत का नाही?’,  या विचित्र प्रश्नाची आजीला गंमत वाटली. ‘म्हणजे रे काय?’, ‘आजी, सगळ्या गोष्टी खाली पडतात. मग आपली पृथ्वी आकाशातून पडत का नाही?’ आजी गमतीनं म्हणाली, ‘अरे, ती कशी पडेल? एका मोठय़ा कासवाच्या पाठीवर ठेवली आहे ना ती!’ नातवाचं थोडा वेळ समाधान झालं. पण त्याने दुसरा प्रश्न विचारला, ‘आजी, मग ते कासव कसं पडत नाही?’ ‘नाही. ते कासव दुसऱ्या कासवाच्या पाठीवर उभं आहे.’ ‘मग.. ते दुसरं कासव?’ शेवटी आजी वैतागून म्हणाली, ‘तेसुद्धा अजून एका कासवाच्या पाठीवर आहे, आणि त्या कासवाच्या खाली कासवांचीच सेना असते — तुझ्या दहीहंडीसारखी. आणि आता प्रश्न पुरे झाले, थांब तुला एक चॉकलेट देते!’

या प्रकारच्या युक्तिवादाला शास्त्रीय भाषेत ‘उत्तरांची अनंत मालिका’ — इन्फायनाइट रिग्रेशन  असं म्हणतात. अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे, ‘विश्वाची निर्मिती कशी झाली असावी?’ या प्रश्नाची अनेक उत्तरे विविध धर्मामध्ये, आस्तिक तसेच नास्तिक विचारवंतांच्या सिद्धांतांमध्ये, तत्त्वज्ञांच्या दृष्टांतांमध्ये सापडतात. काहींच्या मते हे विश्व योगायोगांच्या मालिकेतून साकारलेले आहे, तर काहींच्या मते या विश्वाचा एक कर्ता आहे. ती व्यक्ती किंवा शक्ती मानवजातीच्या अस्तित्वालादेखील कारणीभूत आहे. ‘एखादं घडय़ाळ असेल तर ते घडय़ाळ बनवणारा असणारच, मग मानवानं काय घोडं मारलंय? आपलाही एक कर्ता असणारच’, असा तो युक्तिवाद आहे. याला विरोध करणारे पुढचे प्रश्न विचारतात — ‘बरं, घडय़ाळ बनवणारा असतोच, पण त्या घडय़ाळ बनवणाऱ्याला कुणी निर्माण केलं?’  ‘अर्थातच जगन्नियंत्याने’.. ‘बरं, मग त्या जगन्नियंत्याला कुणी बनवलं?’ — या प्रश्नानंतर वातावरण बहुधा गरम होतं — ‘कुणी म्हणजे? आद्य शक्तीने’, ‘बरं मग त्या शक्तीचा उगम कसा झाला?’ आणि प्रश्नांची ही मालिका सुरू राहते. किंवा कुणाच्या भावना दुखावण्याने बंद पडते. परंतु प्रश्न अनुत्तरित राहतात.

प्रसिद्ध उत्क्रांतिवादी विशेषज्ञ चार्ल्स डार्विन याच्या मते प्रत्येक प्रजातीचा पृथ्वीवरील प्रवास हा त्यांच्या उचित (फिट) गुणधर्मानुसार घडतो. जे लायक असतात, जे परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात, तेच टिकतात. त्यामध्ये कुठल्याही दैवी अथवा महाशक्तिशाली व्यक्तीचा (किंवा शक्तीचा) हात मुळीच नसतो. मानवाचं या जगातील स्थान त्याच्या ‘फिट’ असण्यामुळे, संकटांवर कल्पकतेने मात करण्याच्या ईर्षेमुळे कायम आहे. परंतु मानवाला आजही अनेक व्याधींनी ग्रासलेलं आहे. वैद्यक—तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं सरासरी आयुष्य येत्या काही दशकांत अजून वाढेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज असला तरी आजही आपण कॅन्सरसारख्या व्याधींवर मात करू शकलेलो नाही.

‘का?’ या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तरी ‘कसं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधणं अनेकदा शक्य होतं. मानवाची जडणघडण कशी असते, कोणत्या गोष्टींवर ठरते याचं उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे. आपलं रूप, उंची, शारीरिक क्षमता, डोळ्यांचा रंग इत्यादी छोटय़ा छोटय़ा गोष्टींची माहिती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीतल्या ‘डीएनए’मध्ये साठवलेली असते. डीएनए रेणूंची अंतर्गत रचना उलगडून दाखवण्याचं काम १९९० ते २००३ या कालखंडात अनेक देशांमधील सरकारी, तसेच खासगी संस्थांनी केलं. डीएनएमधील चार वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅसिड्सचा (जी, टी, सी, ए) क्रम आपलं रंगरूप जसं ठरवतो तशीच आपली प्रतिकारशक्ती, कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह इत्यादी व्याधी आपल्याला जडण्याची शक्यतादेखील वर्तवतो. या क्रमाचा नेमका कोणता भाग कुठल्या व्याधीशी संबंधित आहे, यावर संशोधन चालू आहे. अशी माहिती हाताला लागली, की ती बदलता येईल का? एखाद्या व्यक्तीला असलेला आजार, त्याच्या शरीरातील व्यंग नाहीसं करता येईल का?, असे प्रश्न पडणं साहजिक आहे. आणि तसं झालं तर जनुकातील माहितीत फेरफार करून मानवाला महाशक्तिशाली  ‘सुपरमॅन’ कदाचित अमरदेखील बनवता येईल का?, हा अर्थातच पुढचा प्रश्न!

अनेक विज्ञानकथांमधून अशा कल्पना आपल्या भेटीस आलेल्या आहेत. आल्डस हक्सलीच्या ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या कादंबरीत समाजाची रचना प्रयोगशाळेत तयार केलेल्या वेगवेगळ्या कुवतीच्या माणसांनी बनलेली आहे असं दाखवण्यात आलं. ‘गटाका’ नावाच्या चित्रपटात (जी, टी, सी, ए याच अक्षरांतून हे नाव साकारलं आहे याची नोंद घ्यावी) देखील भविष्यातील समाजात ‘जनुकांमध्ये फेरफार करून सक्षम केलेले’ आणि ‘न केलेले’ यामधील दुही, आणि अर्थातच सक्षम मनुष्यांना मिळणारी पक्षपाती वागणूक याचं चित्रण करण्यात आलं. ‘हिरोज’ नावाच्या मालिकेतदेखील अशाच कल्पना रंगवल्या गेल्या आहेत.

कल्पना सत्यात यायला खरी सुरुवात झाली ती २०१२ साली. अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जेनिफर डौडना आणि फ्रेंच संशोधक आणि प्राध्यापक इमॅन्युएल शापेंटिए या दोघींनी ‘क्रिस्पर’ या नावाने ओळखलं जाणारं तंत्रज्ञान विकसित केलं. ‘कॅस ९’ नावाच्या प्रथिनांचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आलं की काही सूक्ष्म जीव काही घातक विषाणूंपासून आपलं संरक्षण करण्यासाठी विषाणूंच्या डीएनएचा क्रम तोडतात. चुकीचा क्रम शोधून त्याला कापून टाकण्याची ही क्रिया मानवी जनुकांवर करता येईल का? याबाबत दोघींनी संशोधन केलं. आणि त्यांनी ते करून दाखवलं! सोप्या भाषेत सांगायचं, तर मानवी जनुकांमध्ये असलेल्या त्रुटी शोधून त्यांना कात्री लावायचं हे तंत्रज्ञान आहे. आज हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेत असलं तरी उद्या ते सर्वदूर पसरेल, सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा वैद्यकीय उपचार पद्धतीत वापरलं जाऊ शकेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. कृत्रिम गर्भधारणेमध्ये क्रिस्परचा वापर करून आनुवंशिक व्याधींना कायमचं संपवलं जाऊ शकेल अशी स्वप्नंदेखील रंगवली जात आहेत.

या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार इमॅन्युएल शापेंटिए आणि जेनिफर डौडना या दोघींना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी विकसित केलेलं ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञान उद्या मानवाची पुढची पिढी कशी असेल ते ठरवेल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. हजारो वर्षांनंतर मानवाने ‘आपला उगम कसा झाला?’, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ‘क्रिस्पर’ असं दिलं जाईल. मात्र ‘क्रिस्पर शोधणाऱ्यांचा उगम कसा झाला?’, हा प्रश्न मात्र कुठल्या तरी कासवाच्या खांद्यावर टाकावा लागेल.

viva@expressindia.com