वेदवती चिपळूणकर

भाऊबिजेच्या निमित्ताने बहीणभावांमध्ये एकमेकांना काही तरी खास, हटके आणि वेगळं द्यायची धडपड सुरू होते. या धडपडीतूनच ही ओवाळणी कस्टमाईज्ड होऊ लागली आहे.

दिवाळीतला भाऊबिजेचा दिवस ही सगळ्या बहिणींसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर कंजूषपणा करणारा भाऊही भाऊबीज मात्र सुनी जाऊ  देत नाही. अर्थात, या दिवशी बहिणीने भावाला ओवाळायचं आणि ओवाळणी म्हणून भावानेच तिला काही तरी द्यायचं ही संकल्पना आता तर जवळजवळ पूर्णच बाद झाली आहे. त्याउलट, भाऊबिजेच्या निमित्ताने बहीणभावांमध्ये एकमेकांना काही तरी खास, हटके आणि वेगळं द्यायची धडपड सुरू होते. या धडपडीतूनच ही ओवाळणी कस्टमाईज्ड होऊ लागली आहे.

भाऊबिजेला पूर्वी भावानेच बहिणीला काही भेटवस्तू देण्याचा प्रघात आता मोडून पडला आहे. त्याउलट, बहीणही भावाला तितक्याच प्रेमाने दिवाळीचं काही तरी गिफ्ट देऊ  लागली आहे. भाऊबिजेला काय भेटवस्तू किंवा गिफ्ट द्यायचं, याचे पूर्वी काही ठोकताळे होते. त्यानुसारच गिफ्ट्स दिली जायची. एके काळी भावाला शर्ट आणि बहिणीला ड्रेस किंवा ड्रेस मटेरिअल. थोडे मोठे म्हणजे संसारी असतील तर बहिणीला लागणारी स्वयंपाकाची भांडी किंवा भावापेक्षा त्याच्या घरी काय उपयोगी पडेल अशी वस्तू ओवाळणी म्हणून दिली जात होती. मात्र ओवाळणीच्या बाबतीतले हे सगळे जुने फंडे आता गळून पडले आहेत. खरं तर, ओवाळणी काय द्यायची हा विचार असा अचानक बदललेला नाही, तो हळूहळू बदलत गेला आहे. कधी तरी ओवाळणी म्हणून चॉकलेट, कधी काही गळ्यातलं-कानातलं वगैरे किंवा फार फार तर एखादी पर्स.. यापलीकडे ओवाळणीचं स्वरूप फारसं जात नसे. पण आता मात्र स्पेशल भावंडासाठी स्पेशल गिफ्टची शोधाशोध सुरू असते.

दिवाळीच्या आधीच भाऊबीजेच्या खरेदीची जय्यत तयारी सुरू होते. गिफ्ट काय घेता येईल, याची पडताळणी करताना  ‘हे तर काय सगळेच देतात, मी काही तरी वेगळं देणार’ हा विचार मनात ठिय्या मांडून असतो. मग हे नको, ते नको..च्या सुरावटीवर वेगळं काहीचा शोध सुरूच राहतो. याच विचारातून आणि शोधातून कस्टमाईज्ड गिफ्ट्सच्या ट्रेण्डला सुरुवात झाली. सुरुवातीला स्वत:चं डोकं  चालवून आपलं गिफ्ट कस्टमाईज करायला लागायचं. मात्र आता त्यातही इतके पर्याय उपलब्ध झाले आहेत की स्वत:चं डोकं न चालवताही आपण आपलं गिफ्ट ‘स्पेशल’ करू शकतो.

प्रत्यक्ष दुकानं पालथी घालून फायनली एखादी मनासारखी वस्तू मिळाल्याचं समाधान आजकाल दिवसभर सगळ्या वेबसाइट्स हुडकून फायनली एक वस्तू ऑर्डर केल्यावर मिळू लागलंय. त्यामुळे कस्टमाईज्ड गिफ्ट्सचा जास्तीत जास्त ट्रेण्ड हा ऑनलाइन मार्केटमध्ये दिसून येतो. एखाद्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या फॅशन सेक्शनमधून काहीही घेण्यापेक्षा टीशर्ट्सवर आपल्या भावाचा किंवा बहिणीचा फोटो प्रिंट करून घ्यायचा. त्याचा किंवा तिचा आवडता एखादा डायलॉग, आवडत्या चित्रपटाचं डूडल, आवडत्या एखाद्या कॅरेक्टरचं व्यंगचित्र वगैरे अशा गोष्टींना अधिक पसंती दिली जाते आहे. भावांसाठी कस्टमाईज्ड टीशर्ट्स आणि बहिणींसाठी कस्टमाईज्ड पिलो असा ट्रेण्ड सध्या ऑनलाइन मार्केटमध्ये दिसतो आहे. कस्टमाईज्ड पिलोमध्ये एलईडी पिलो हाही एक इंटरेस्टिंग प्रकार पाहायला मिळतो आहे. ‘फर्न्‍स अ‍ॅण्ड पेटल्स’सारख्या वेबसाइट्सवर अशा युनिक वस्तूंची रेलचेल आहे. टीशर्ट्ससाठी तरुणाईकडून आदिमानव, बेवकूफ, टी-मराठी अशा वेबसाइट्सना प्राधान्य दिलं जातंय. या प्रत्येक वेबसाइटवर वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेण्डी टी-शर्ट्स उपलब्ध आहेत. खरं तर प्रत्येक गोष्ट कस्टमाईज करण्याची तरुणाईला भारी हौस आहे. त्यामुळे सुरुवातीला हा ट्रेण्ड यायला लागला तेव्हा कॉफी मग किंवा फोटोफ्रेमसारख्या सोप्या गोष्टी कस्टमाईज केल्या जात होत्या. आता मात्र पाणी प्यायची बाटली, घडय़ाळ, वह्य़ा-पुस्तकं, मोबाइल आणि लॅपटॉपची कव्हर्स आणि स्लीव्हज, पासपोर्ट होल्डर्स अशा अनेक गोष्टी कस्टमाईज केल्या जातात. आणि मोठमोठय़ा भेटवस्तूंना फाटा देत या कस्टमाईज वस्तूंवर तरुणाईच्या उडय़ा पडताना दिसतात.

एखादी गोष्ट कस्टमाईज किंवा पर्सनलाइज करणं यामागे खरं तर एक वेगळं मानसशास्त्र आहे. आपण दिलेली एखादी वस्तू त्या माणसाकडे कायमची राहावी या हेतूने ती दिली जाते. अशा वेळी ती कोणी दिली, त्या वेळी काय काय घडलं, त्यासोबत काय आठवणी जोडल्या गेल्या आहेत या सगळ्या गोष्टींना सतत उजाळा मिळत राहावा आणि या गोष्टी सतत नजरेसमोर राहाव्यात, या उद्देशाने कोणतीही भेट देताना ती कस्टमाईज केली जाते. ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं ती व्यक्ती तितकी जवळची समजली जात असेल तरच ते गिफ्ट कस्टमाईज करण्याचा घाट घातला जातो. या सगळ्यात जो उद्देश असतो तो अगदी योग्य पद्धतीने सफल होतो. एखाद्या बहिणीला अनेक भावांनी वेगवेगळी गिफ्ट्स दिलेली असतात, मात्र तिच्यासाठी ‘प्रिन्सेस’ लिहिलेली फोटोफ्रेम तोच भाऊ  बनवून घेतो जो तिच्या सगळ्यात जवळचा असतो. एका भावाला अनेक बहिणी दिवाळी गिफ्ट देतात, पण त्याचं आवडतं सुपरहिरो कॅरेक्टर तिलाच माहिती असतं जी त्याच्याशी सर्वात जास्त कनेक्टेड असते. या कनेक्ट होण्यातूनच कस्टमाईज किंवा पर्सनलाईज वस्तूंचा पसारा वाढतच चालला आहे. आपली कल्पकता पणाला लावण्याची संधीही या कस्टमाईज वस्तूच्या रूपात तरुणाईला मिळते. त्यामुळे मी खास बनवून दिली आहे, याचाही आनंद त्यांना यातून अनुभवता येतो. सध्या या कस्टमाईज वस्तूंचे मोठे मार्केट तरुणाईवर मदार ठेवून आहे. आणि कस्टमाईज वस्तूंची ही देवघेव काही दिवाळीच्या किंवा भाऊबीजेच्या सणापुरतीही मर्यादित राहिलेली नाही. तर ती मित्रापासून आई-वडिलांना काही तरी युनिक देण्यापर्यंत अधिकाधिक व्यापक होते आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मात्र कस्टमाईज वस्तू त्याहीपेक्षा कस्टमाईज ओवाळणीचाच बोलबाला जास्त राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी मार्केट भावा-बहिणींना जोडणाऱ्या खास क्षणांना अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या कल्पक वस्तूंनी बहरलं आहे.

कस्टमाईज्ड गिफ्ट्समधून दाखवता येणारी जवळीक ही त्या बहीण-भावाच्या नात्याची गोड साक्ष असते जी दोघांनाही आयुष्यभर जपावीशी वाटेल. कस्टमाईज्ड गिफ्ट्स या केवळ वस्तू नसून भावना असतात. सणांच्या निमित्ताने नात्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ‘कस्टमाईज’ तरुणाईमुळेच एरव्ही रुक्ष वाटणारा हा बाजार‘भाव’ अधिक आपलासा वाटतो आहे.