: प्रियांका वाघुले

काही गोष्टी आपण आयुष्यात नित्यनियमाने करत असतो. जेवण, झोप, नेहमीची कामं यासारख्या गोष्टी न चुकता दररोज आपण करत असतो. नित्यनेमाने केल्या जाणाऱ्या कामांच्या या वेळापत्रकात व्यायामाचाही समावेश असलाच पाहिजे, असं अभिनेता राज हंचनाळे सांगतो. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाचा भाऊ सूरजच्या भूमिकेत लोकप्रिय झालेला राज फिटनेसच्या बाबतीत स्वत: काटेकोर आहे. त्याच्या मते कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहिलो तरच त्याचा उपयोग आपल्याला होतो. त्यामुळे व्यायामही याला अपवाद नाही, असं तो म्हणतो.

फिटनेस राखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. फिटनेस कशा पद्धतीने ठेवावा, त्यासाठी काय करता येईल, या गोष्टी आधी समजून घ्यायला हव्यात. नुसतंच कोणाचं तरी पाहून फिटनेस प्रकार करण्याची घाई आपल्याला नुकसानच पोहोचवते, असं तो मानतो. मनाचा आणि शरीराचा फिटनेस राखण्यासाठी आपण मोकळ्या हवेत जायला हवं, असं राज सांगतो. शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी मोकळ्या हवेत जाणं ही तशी अवघड गोष्ट आहे, हे राजच्या लक्षात आलं आहे. मात्र त्यासाठीचे त्यासाठी शोधणंही आपलं आपल्याला जमायला हवं, असं तो आग्रहाने सांगतो.

सध्या तो जिममध्ये वेट ट्रेनिंग नियमितपणे घेतो. मात्र तिथंही व्यायाम करत असताना एकाच पद्धतीचे व्यायाम न करता, दर दोन ते तीन आठवडय़ांनी व्यायामाचा प्रकार आणि क्रम बदलत असल्याचं राजने सांगितलं. हिप थ्रस्ट, डेडलिफ्ट, शोल्डर प्रेस, स्प्लिट स्क्वॉटसारखे व्यायामप्रकार तो रोजच्या रोज करतो. मात्र हे करताना कधी त्याचा क्रम किंवा त्याचे रिपिटेशन बदलून त्यात फरक करण्यावरही तो भर देतो. यामागचं कारण समजावून देताना तो म्हणतो, कोणताही पदार्थ सारखा खाल्ला की त्या चवीची जिभेला सवय लागते. अगदी तसंच आपल्या व्यायामाचं जे स्वरूप आहे त्याची शरीराला काही काळाने सवय होते. त्यामुळे शरीराला अशी सवय होऊ  देण्यासाठी आणि शरीर नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी सक्षम राहावं, यासाठी व्यायामाचा क्रम आणि व्यायामप्रकार बदलले जात असल्याचं राज सांगतो. फिटनेस शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने आपल्या व्यायामात खंड पडू नये म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचंही राजने सांगितलं.-viva@expressindia.com