22 September 2020

News Flash

नृत्यातून फिटनेस

हल्लीच्या लाइफस्टाइलमुळे फिटनेसला खूप महत्त्व आलं आहे.

डान्स फॉर फिटनेस हा ट्रेण्ड सध्या जोरावर आहे. दररोज जिमला जाऊन तोच तो व्यायाम करण्यापेक्षा नृत्यातून मिळणारा आनंद शरीराबरोबर मनाला फिट ठेवत असतो. पण फिटनेसच्या दृष्टीने नृत्याचा विचार करीत असाल तर केवळ एका नृत्यप्रकाराचा क्लास लावून भागणार नाही. नियमित रियाझ महत्त्वाचा आहे. फिटनेससाठी फंक्शनल ट्रेनिंग सगळ्यात उत्तम.. सांगताहेत प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्य कलाकार नकुल घाणेकर

हल्लीच्या लाइफस्टाइलमुळे फिटनेसला खूप महत्त्व आलं आहे. रोज थोडा वेळ व्यायाम करणं आवश्यकच आहे. काही जणांना जिमला जाऊन रोज तेच तेच व्यायाम प्रकार करणं कंटाळवाणं वाटतं. त्यातून ‘डान्स फॉर फिटनेस’ ट्रेण्ड वाढतो आहे. पण नृत्य ही प्रथम कला आहे आणि ती साध्य करण्यासाठी सातत्य हवं आणि रियाझ हवा, हे लक्षात घेतलं पाहिजे. नृत्यातून शंभर टक्के फिटनेस साधता येतो. नृत्यातून मनाला दररोज नवीन काही मिळत असतं. कंटाळा येणार नाही, असा हा फिटनेस एक्सरसाइज आहे. कोणतीही नृत्यशैली फिटनेससाठी मदतच करत असते. नृत्य केल्याने शारीरिक फिटनेस बरोबर मानसिक फिटनेसही वाढतो. तुमच्या मनाला, मेंदूला स्थैर्य देण्याचं काम नृत्य करत असतं. नृत्यात मोठय़ा प्रमाणावर कार्डियो अ‍ॅक्टिव्हिटीज आपण करत असल्यानं त्याचा शारीरिक फिटनेसच्या दृष्टीने फायदा होतो.  जिमपेक्षा नृत्यातून मिळणारा फिटनेसचा अनुभव हा वेगळा आणि छान असतो. जिममध्ये एकीकडे गाणी चालू असतात आणि एकीकडे आपण आपला व्यायाम करत असतो. त्या दोहोंमध्ये समन्वय असतोच असं नाही. याउलट नृत्यात तालबद्ध आणि लयबद्ध हालचाली होत असल्याने रोज नवं काही केल्याचा आनंद मिळतो. मेंदूलाही त्यामुळे चालना मिळत असते.
काही वर्षांपूर्वी फोक, बॉलीवूड, वेस्टर्न फ्री स्टाइल अशा नृत्यशैलींचं खूप आकर्षण होतं. सध्या हिप हॉप, सालसा, बचाटा असे नृत्यप्रकार शिकण्याकडे तरुणाईचा ओढा दिसून येतो. या बरोबरीनेच लोकांना हल्ली बेली डान्सिंग शिकण्याचंही आकर्षण आहे, असं लक्षात येतंय. कथक, भरतनाटय़म नृत्यशैली कलाप्रेमी अजूनही पूर्वीच्या उत्साहानेच शिकताहेत. फिटनेसच्या दृष्टीने कंटेम्पररी, सालसा, हिप हॉप काय किंवा कथक काय..  या नृत्यशैलींतून संपूर्ण शरीराला व्यायाम घडतो. काही नृत्यशैलींमध्ये मात्र शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावर लक्ष देऊन नृत्य केलं जातं.
24फिटनेसच्या दृष्टीने दररोज किमान एक तास व्यायाम होणं गरजेचं आहे. नृत्यातून फिटनेस साधायचा असेल, तर रोज रियाज करायला हवा. दररोज नृत्याचा रियाज केला तर वेगळा काही व्यायाम करायची आवश्यकताच नाही. परंतु त्याची इंटेन्सिटी महिन्याच्या महिन्याला बदलणं खूप गरजेचं आहे. रोज एकाच पट्टीतला रियाज करून एका विशिष्ट मर्यादेपलीकडचा फिटनेस साधता येणार नाही. एकाच लयीत, ठरावीक वेळ नृत्य करताना स्नायूंना त्याच त्याच प्रकारची सवय होत जाते आणि त्यात काही बदल घडत नाहीत. म्हणून फिटनेससाठी समान गतीचा रियाज वर्षभर न करता, इंटेन्सिटी वाढवत जावी. थोडय़ा अवघड वाटणाऱ्या स्टेप्स, नवनवीन स्टेप्स टप्प्याटप्प्यानं वाढवत नेणं गरजेचं आहे.
नृत्याचा क्लास लावला असेल तर दोन-तीन दिवस तिथे तुमचा व्यायाम होत असतो. उरलेले तीन दिवस घरी स्वत:चा रियाज आणि त्याचबरोबर नृत्य सुधारण्यासाठी लागणारा काही बेसिक व्यायाम करणं अपेक्षित असतं. प्रत्येक नृत्यशैलीला त्याची विशिष्ट लय असते, ठेहराव असतो. त्यामुळे त्यातून वजन कमी होण्याची किंवा फिटनेस साधण्याची प्रोसेस सुरु होण्यासाठी काही काळ जावा लागतो. अशा वेळी एकाच वेळी दोन नृत्य शैली शिकणं योग्य ठरतं. कार्डियोसुद्धा साधला जाऊ शकतो. उदाहरणार्थ कथक ही शास्त्रीय नृत्यशैली आहे. या नृत्यशैलीमध्ये सुरुवातीला खूप हळुवार हालचाली असतात आणि जशी तुमची त्यातली पायरी वाढत जाते तशी काठिण्य पातळीही वाढते आणि त्या वेळी तुमचं फिटनेस टारगेट पूर्ण होऊ शकतं. एका वेळी दोन स्टाइल्स केल्यात की, तुम्ही शिकता शिकता फिटनेसकडेही लक्ष देऊ  शकता.
मी स्वत: नृत्याच्या बरोबरीने जिमलासुद्धा प्राधान्य देतो. त्यामुळे मी सतत अ‍ॅक्टिव्ह राहू शकतो. सतत तेच तेच करण्यानं सुस्ती येते. त्यामुळे मी वेगवेगळ्या पद्धतीनं व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. काही दिवस मी फक्त नृत्याचा रियाजच करतो. मग पुढचे काही दिवस रियाजाबरोबर अजून काही तरी वेगळं. असं वैविध्य आणलं तर उत्साह वाढतो आणि असं केल्यानं संपूर्ण शरीराला अ‍ॅक्टिव्हिटी मिळते आणि मी फिट राहू शकतो. या प्रकाराला फंक्शनल ट्रेनिंग असंही म्हणतात. फंक्शनल ट्रेनिंगमध्ये दर वेळी वेगवेगळ्या फिटनेसथेरपीला शरीर सामोर जात असतं. तसं केल्यानं मनालाही वेगळी ऊर्जा मिळते. कंटाळा येत नाही आणि सुस्ती नाहीशी होते.
फिटनेससाठी नृत्य उपयोगी पडतं यात शंका नाही. पण नृत्य ही कला असल्याने त्याचा नियमित रियाज, त्यातलं शास्त्रोक्त प्रशिक्षण आवश्यक आहे. चांगल्या, जाणकार गुरुकडून ते घेऊनच मग नृत्याचा रियाज करावा.
(शब्दांकन – प्राची परांजपे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:36 am

Web Title: dance types for fitness
Next Stories
1 फिटनेस ट्रेण्ड्स
2 Wear हौस: ट्रेण्डी जिम लूक
3 एक्स्प्लोअर करा, एक्स्पोज नको!
Just Now!
X