डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा ‘पाळी मिळी गुपचिळी’ हा लेख सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतोय. डॉ. अभ्यंकर वाई, सातारा भागात प्रॅक्टिस करतात. मासिक पाळी पुढे जावी, यासाठी औषधं घेणाऱ्या स्त्रियांविषयी त्यांनी यामध्ये लिहिलंय. गौरी-गणपतीच्या दिवसात अशा स्त्रियांचा ओघ वाढणार हे लक्षात घेऊन औषधं विकणाऱ्या कंपन्याही त्या पद्धतीनं कशा मार्केटिंग करायला लागल्या आहेत, हे त्यांनी मांडलंय. पूजा, उत्सव अशी कारणं नेहमीची..क्वचित प्रवास, परीक्षा हीदेखील कारणं असतात, असा त्यांचा अनुभव. ‘मुली पाळी आली की, प्रॉब्लेम आलाय असं म्हणतात. मी त्यांना सांगतो..पाळी ठरल्या वेळी न येणं हा खरा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम हा शब्द पाळीसाठी वापरू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रियेविषयी नकारात्म भावना निर्माण होते..’ असं ते म्हणतात. याविषयी ‘व्हिवा’शी बोलताना डॉ. शंतनु म्हणाले, ‘मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अशा गोळ्या घ्यायला लागणं हा स्त्रियांसोबत होणारा एक प्रकारचा भेदभाव आहे. मासिक पाळी ही एक शारीरिक आणि नैसर्गिक बाब आहे हे माहीत असूनही त्या काळात स्त्रियांना अपवित्र, अस्वच्छ समजून त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होऊ द्यायचं नाही हे गैर वाटतं.’ डॉक्टरांच्या या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळतोय सध्या. अनेक स्त्रिया त्यांना फोन करून स्वतचे अनुभव सांगत आहेत. एकूणच यातून चांगल्या परिणामाची आणि बदलाची आशा आहे; असं डॉ. अभ्यंकरानी सांगितलं.
मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव गांधी यांनाही याविषयी त्यांचे अनुभव विचारले. त्या म्हणाल्या, ‘जिथे हवामान, ऋतू , संस्कार, कायदे, चालीरीती, रूढी सर्वच बदलत असतात, तिथे पाळीविषयीच्या कल्पना बदलायला काय हरकत आहे? पाळी पुढे -मागे करण्यासाठी अंतस्त्रावांच्या पातळीत गोळ्यांनी ढवळाढवळ केल्यामुळे पुढे अतिरक्तस्त्राव चालू होणे किंवा पाळी खूप अनियमित होण्याचीही भीती असते. काही वेळा तर गोळ्यांमुळे पाळी पुढे गेली आहे अशा कल्पनेत बेसावध राहिल्यामुळे गर्भधारणा झालेली लक्षात येत नाही. मग आता हा गर्भ ठेवायचा की गर्भपात करायचा हा यक्षप्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा एक स्त्रीरोगतज्ज्ञ या नात्याने मला सांगावेसे वाटते की औषधे घेऊन पाळी पुढे मागे न करणेच चांगले! मग पाळीच्या दिवसांत पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करायची की नाहीत? याचे उत्तर प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या विचारसरणीप्रमाणे ठरवायला हवे. सध्या शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीवर आपल्या काळचे संस्कार न लादलेलेच चांगले. असे झाल्यास काही वर्षांनंतर ‘पाळी म्हणजे अमंगल’ ही कल्पना बाद होऊन ‘मासिक पाळी म्हणजे नित्याच्याच आयुष्याचा एक भाग, तेव्हा नित्यनेम, विधी करण्यात पाळीची आडकाठी येता कामा नये’ असा नवा विचार नक्की रुजू शकेल.’
कोमल आचरेकर -viva.loksatta@gmail.com