स्वरविचार, सांगीतिक गप्पा या प्रत्यक्ष गाण्याइतक्याच रसपूर्ण असू शकतात याचा प्रत्यय गेल्या मंगळवारी
(दि. २९ सप्टेंबर) दादरला झालेल्या ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या कार्यक्रमातून आला. शास्त्रीय गायकीबरोबरच सुगम संगीत, चित्रपट आणि मालिकांसाठीच्या पाश्र्वगायनामुळे घराघरात पोचलेल्या प्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्याबरोबरची शब्दमैफल ‘व्हिवा लाउंज’मध्ये रंगली आणि या हरहुन्नरी गायिकेचा सांगीतिक प्रवास उलगडला गेला. ‘केसरी’ प्रस्तुत आणि ‘दिशा डायरेक्ट’च्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी देवकी पंडित यांना बोलतं केलं. त्या शब्दमैफिलीतून टिपलेल्या काही चिजा..
(शब्दांकन : कोमल आचरेकर, प्राची परांजपे)

परफॉर्मन्स म्हणजे शेअरिंगच
एका उत्तम कलाकाराला कलेच्या शिक्षणाबरोबरच लोकांची मनं रिझवता आली पाहिजेत. मी स्वत:साठी गाते आणि त्यातला आनंद तुमच्याशी शेअर करते ही भावना कलाकाराच्या ठायी असायला हवी. यासाठी कलेचा ध्यास घ्यायला हवा. त्यातून त्या कलेच्या सौंदर्याची अधिकाधिक ओळख होत जाईल आणि तुम्हाला उमजलेलं हे सौंदर्य तुम्ही शेअर कराल तो परफॉर्मन्स. मी स्वत:साठी गाते आणि आवडतं तेच गात राहीन किंवा तुम्हाला आवडेल तेच गात राहील असं नाही. स्वत:ला दिसलेलं सौंदर्य इतरांना दाखवतो तो कलाकाराचा परफॉर्मन्स.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड

एकच तास नाही तर ध्यास घ्या
सध्याच्या धावपळीच्या जगात रियाजाला वेळ मिळत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. रियाजाच्या एका तासापेक्षा संगीत हा एकच ध्यास घ्या. कलेत नैपुण्य मिळवायचं असेल तर त्यात स्वत:ला झोकून देऊनच ते केलं पाहिजे. प्रोफेशन किंवा मजा यासाठी तासभर केलेला रियाज नक्की पुरेल पण संगीताची खोली जाणून घायची असेल, तर त्याचा ध्यास घेतल्याशिवाय पर्याय नाही.

सुरेलतेची संकल्पना
आपल्याला एखाद्या पदार्थाची चव माहीत असते. तो पदार्थ पुन्हा करताना तीच सर्वोत्तम चव पुन्हा यावी यासाठी आपण कसे प्रयत्नशील असतो तसंच गाण्याचं आहे. तो एक विशिष्ट सूर लागला पाहिजे आणि त्याचा असा परिणाम झाला पाहिजे. आपल्याला काय करायचं हे मनात असतं आणि त्यासाठी प्रयत्न सुरू असतात. मनातून मला असं वाटायचं की आपला तसा सूर लागत नाही तर आपण त्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले पाहिजेत. स्वरांच्या संस्कारांमुळे सुरेलपणाची संकल्पना स्पष्ट होत जाते आणि मग अजून गाणं गावंसं वाटतं. एखाद्या कलाकाराला असं होणं स्वाभाविक आहे. मला एवढं आलं मग अजून हे यायला हवं असं सतत वाटत राहतं. त्यासाठी मग बाकी सगळं दुय्यम असतं. तासन्तास रियाज, त्यासाठीचे कष्ट याचं काही वाटत नाही. आवाज कसा असायला हवा याची एक माझी संकल्पना होती आणि त्यासाठी जे करायचं ते करायची माझी तयारी होती. एकदा गाणं शिकायला बाहेर पडले आणि गाण्याची ओढ आणखीनच वाढली. शाळा कधी सुटतेय आणि कधी एकदा गायला बसतेय असं व्हायचं मला.

कोणतंही चांगलं गाणं कठीणच
अभिजात संगीत आत्मसात करणं कठीण तसं लाइट म्युझिक, फिल्म म्युझिक किंवा कोणतंही चांगलं गाणं कठीणच आहे. चित्रपटासाठी पाश्र्वगायन करताना गाण्याचं रेकॉर्डिग होतं, तेव्हा अगदी थोडय़ा वेळात तुम्हाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. रेंज, शब्दांचे उच्चार, सांगीतिक उच्चारातली स्पष्टता, टोनल क्वॉलिटी, आवाजाचा लगाव या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. शास्त्रीय संगीत गातानाचा आवाजाचा लगाव आणि लाइट म्युझिकमधला आवाजाचा लगाव खूप वेगवेगळा असतो. लाइट म्युझिक किंवा फिल्म म्युझिकमध्ये कम्पोजरच्या मनातलं ओळखून गाणं महत्त्वाचं असतं. त्यातून सारं भावविश्व उभारायचं असतं, केवळ २-३ मिनिटांत!

vv04
‘लोकसत्ता’च्या अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी देवकीताईंशी संवाद साधला.

गुरूचं देणं
सुरुवातीला आईकडे शिकल्यानंतर मी वयाच्या नवव्या वर्षी पं. वसंतराव कुलकर्णीकडे गाणं शिकायला जाऊ लागले. त्यानंतर गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गजांकडे शिकण्याची संधी मिळाली. किशोरीताईंच्या बाबतीत सांगायचं तर तर ताई अगदी सढळ हाताने देणाऱ्या आहेत. त्यांच्या गाण्याच्या सौंदर्यातलं थोडं जरी समजून घेता आलं तरी खूप असतं. आपण गुरूकडे जातो ते त्यांचे चार स्वर समजावेत म्हणून, त्यांच्या गाण्यातलं सौंदर्य थोडं तरी घेता यावं म्हणून. समोर बसलेल्या शिष्याला देण्याचीच गुरूची इच्छा असते. शिष्याला चांगल्या हरकती, ताना याव्यात यासाठी गुरू प्रयत्न करत असतो. शिष्यानं अपेक्षित कष्ट घ्यावेत, आपण सांगतो तसं गावं, रियाज करून मन राखावं अशी गुरूची अपेक्षा असते आणि ती तर पूर्ण करायलाच हवी. त्यामुळे या गोष्टीचं कधी दडपण आलं नाही. किशोरीताईंचं दडपण त्यांच्या संगीतामुळे आलं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे नाही. गुरूंकडून सतत शिकत राहावं, असं मला वाटतं. अजूनही शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच भावनेतून पं. बबनराव हळदणकर, डॉ. अरुण द्रविड यांचं मार्गदर्शन घेत आहे.

अभिजात संगीताची श्रीमंती
आपल्या अभिजात संगीतात श्रुतींचा सखोल अभ्यास झालाय. तो इतर कोणत्याही संगीतात झालेला नाही. आज इतक्या वर्षांनीदेखील आपण उस्ताद बडे गुलामअली खाँसाहेब, उस्ताद आमीर खाँसाहेब यांचं गाणं ऐकलं की, जागीच खिळून राहतो. ही अभिजात संगीताची जादू आहे. आपल्या अभिजात संगीताची श्रीमंती सर्वव्यापी आहे. त्याचा सूक्ष्म अभ्यास केला नाही तर स्वरांची श्रीमंती अनुभवता येणार नाही. तुम्ही गाण्यासाठी कोणताही फॉर्म निवडा, पण त्यात अभिजातता जपता आली पाहिजे. तरच गाण्याला उंची प्राप्त होईल.

vv05
केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांनी देवकी पंडित यांचे स्वागत केले.

सुज्ञ श्रोते गरजेचे
प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. प्रत्येकाची शैली वेगळी असते. म्हणूनच संगीत व्यक्तिविशेष आहे. व्यक्तीनुसार प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने शिकवायला हवं. जेव्हा तुम्ही संगीत क्लासमध्ये शिकता तेव्हा तुम्हाला गाण्याची माहिती होते. या माहितीमुळे.. क्लासमुळे एक चांगला श्रोता निश्चितच तयार होतो. संगीतात फारशी प्रगती होत नसणाऱ्या मुलांनाही गुरू वसंतराव कुलकर्णी तितक्याच मनापासून शिकवायचे आणि म्हणायचे की, ‘त्यांना नको का कळायला तुम्ही काय गाता ते?’ श्रोता सुज्ञ असणं हेसुद्धा तितकंच आवश्यक असतं. शंभर सुज्ञ श्रोत्यांमधून एक कलाकार नक्की निर्माण होतो.

महत्त्वाची अशी कंठतयारी!
गुरूच्या समोर रियाज करायला हवा. गाणं शिकवायला आपल्याकडे खूप मोठे मोठे गुरू आहेत. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला गाणं येतं या कल्पनेतून आधी बाहेर यायला हवं, मग गाता येईल. शास्त्रीय संगीत असो वा सुगम संगीत अथवा चित्रपट संगीत.. गाण्यासाठी मुळात कंठ हे आपलं माध्यम पक्कं हवं. फॉर्म कुठलाही असला तरी त्यातली अभिजातता जपता आली पाहिजे. त्यासाठी कंठतयारी हवी. आवाज तयार करण्यासाठी रियाज, साधना करणं या गोष्टी करायलाच हव्यात.

संगीत हा एकमेव ध्यास
घरात संगीताचं होतं तसं नाटकाचंही वातावरण होतंच. मला नाटकात काम करण्यासाठी विचारणाही झाली, पण गाण्यातच काही करायचं हा माझा विचार पक्का होता. मो. ग. रांगणेकरांनी संगीत नाटकाबद्दल विचारलंही होतं, पण संगीत हा माझा एकमेव ध्यास होता. फोकस क्लिअर होता, की गाणंच करायचंय.

vv07
व्हिवा लाउंजच्या निमित्ताने देवकी पंडित यांची शब्दमैफल ऐकायला रसिकांची मोठी गर्दी झाली होती. तुडुंब प्रेक्षागृहात या सांगितिक गप्पा रंगल्या.

लहानग्यांनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये गावं का?
हा प्रश्न आणि निर्णय सर्वस्वी पालकांचा आहे. माझ्या मुलांना लहान वयात मी रिअ‍ॅलिटी शोमध्ये नसतं पाठवलं. रिअ‍ॅलिटी शो ही एक स्पर्धा आहे. त्यातून एक संधी उपलब्ध होते. त्याचं तुम्ही पुढे काय करता हे महत्त्वाचं. आपल्या मुलामध्ये जर गुण असतील तर रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाठवण्याआधी एका चांगल्या गुरूकडे पाठवा. स्पर्धेची भीती निर्माण करण्याऐवजी त्याचं गाणं कसं जास्तीत जास्त खुलेल याकडे लक्ष द्या. लहान वयातच रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाऊन लोकांसमोर प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आपल्या मुलाचे गुण कसे फुलतील याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. गाण्याचं सौंदर्य अनुभवता आलं पाहिजे. गाण्याची उंची गुरू, रियाज आणि साधना या माध्यमांतूनच गाठता येते.

संगीताला करिअर ऑप्शन म्हणून बघू नका
संगीत करिअर ऑप्शन आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही. त्यातून सुबत्ता, पैसा मिळेल की नाही हे मला माहिती नाही. मी मुळात संगीताकडे कधीच यादृष्टीने पाहिलं नाही. करिअरचा विचार करण्यापेक्षा त्यात प्रभुत्व मिळण्यासाठी ते शिका. पण एक मात्र मी नक्की सांगू शकते, जर तुम्ही नेटानं संगीतसाधना करत राहिलात तर आपोआपच तुमचं गाणं ऐकण्यासाठी श्रोत्यांची गर्दी होईल आणि त्यातून आपोआप गाणं हे तुमचं करिअर घडू शकेल.

प्रौढपणी संगीत शिकता येतं का?
लहान असतानाचा आवाज कोवळा असतो. त्यानंतर तो बदलतो. तिशीचा आवाज वेगळा असतो, चाळिशीत तो आणखी बदलतो. वयाच्या वीस वर्षांनंतर शिकण्याची क्षमता कमी व्हायला लागते, हे तर सिद्ध झालंय. संगीतात ते आणखी पटतं, कारण आावाज बदलतो. व्होकल कॉर्डला वळण लागायला वेळ लागतो. गाणं हे शेवटी कंठवादनाचं माध्यम आहे. त्यामुळे वयाचा फरक पडतोच. एकदम पन्नाशीत मॅरॅथॉन धावायला लागलात तर चमत्कार म्हणूनच ते शक्य होईल. गाण्याचं तसंच आहे. प्रोफेशनल गाणं तिशीच्या पुढे होऊ शकत नाही. पण स्वत:च्या आनंदासाठी गाऊ शकता. सर्वसाधारणपणे आवाज फुटण्याच्या वयात मुलांनी प्राणायाम करायला हवा. त्यातून श्वासाचं नियंत्रण शिकता येतं. पण शेवटी गाणं हे व्यक्तिविशेष आहे. श्वासाचा शृंगारच आहे सूर! त्याला कसं जपावं हे प्रत्येकाच्या आवाजावर अवलंबून आहे.

शास्त्रीय संगीतासाठी चळवळ व्हावी
सध्याच्या पिढीतील लहान मुलांना शास्त्रीय संगीताची ओळख करून द्यायला हवी. शास्त्रीयपेक्षा मी म्हणेन चांगल्या संगीताची, ‘आपल्या’ संगीताची, अभिजात संगीताची ओळख करून द्यायला हवी. त्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत ते त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. त्यातली मजा, त्यातलं सौंदर्य त्यांना समजावलं पाहिजे. चांगलं ऐकूनच चांगले श्रोते निर्माण होतात आणि पुढे जाऊन त्यातूनच चांगले कलाकार तयार होतात. हल्ली लहान मुलं किंबहुना त्यांचे पालकही शास्त्रीय संगीत फारसं ऐकत नाहीत. समाजातील अभिजातता कमी होत चालली आहे असं मला वाटतं.
vv08

हरवलेला आवाज आणि पटलेली ओळख
पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते आम्हाला पूर्वीच्या गायकांची उदाहरणं द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा मी ते इतकं मनावर घेतलं, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून गात राहिले. काय गायचं हे माहीत नसताना मी गात राहिले. दोन महिने सतत गायल्यामुळे माझा आवाज बंदच झाला. त्यानंतर मी जवळजवळ तीन र्वष गाऊच शकले नाही. पण त्यामुळे समजलं मी आवाजाला गृहीत धरत होते. गळ्यातला सूर नाहीसा झाला तेव्हा काय करायचं कळेना. पण तेव्हाही आपल्याला गायचंय हे ध्येय कायम होतं. मी गाणारच, हे निश्चित होतं. तो दोन-तीन वर्षांचा काळ वेदनादायी होता, कारण मी तंबोरा लावून बसायचे आणि गाता तर येत नव्हतं. पण मी तंबोऱ्याचे सूर ऐकत राहायचे. या काळात खूप ऐकलं. सगळ्यांची गाणी ऐकत राहिले, तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी मी करून करून शिकले. हार्मोनियम, तबला या काळात शिकले. आवाज आणि श्वास यातला दृढ संबंध तेव्हा लक्षात आला. आपलं मन, आवाज, सूर आणि आवाजातली तरलता यांच्या नात्याचा विचार मी केला. माझ्या आवाजाची खरी ओळख मला त्याच काळात पटली.

गुरू हाच खरा पारखी
तुमच्यातील कलाकार पारखणारी पहिली व्यक्ती म्हणजे तुमचे गुरू. एक चांगला कलाकार होण्यासाठी स्वत:ला विसरून गाता येणं खूप महत्त्वाचं आहे आणि जो कलेची साधना करतो त्याला त्या कलेच्या सौंदर्याची नक्कीच जाणीव असते. पण या सगळ्या पलीकडे गुरू तुम्हाला जास्त चांगलं ओळखत असतात. कलाकाराची सर्जनशीलता केवळ गुरूच ओळखू शकतो. आपल्या स्वत:लाही आपल्यातील कलाकार ओळखण्यास वेळ लागतो. गुरूला मात्र त्याची ओळख असते.

सहज गवसलेला सूर
संगीताचं बाळकडू घरातच मिळालं होतं. लहानपणी सूर हेच आयुष्य असा फार गहन विचार केला नव्हता, पण ते होतंच तसं. माझी आई, आजी, माझं सगळं आजोळ संगीताच्या क्षेत्रात कार्यरत होतं. गाण्याच्या वातावरणातच मी लहानाची मोठी झाले. आई उषा पंडित तर पंडित जितेंद्र अभिषेकींची शिष्या होती आणि तिचं गाणं मी लहानपणापासूनच ऐकत होते. अनेक लोकांचं गाणं न कळत्या वयापासून कानावर येत होतं. घरातले सगळेच संगीतप्रेमी आणि जाणकार होते. संगीत होतंच. मला गावंसं वाटलं हा एवढाच फरक.
मला आठवतंय त्याप्रमाणे, मी गातेच असं मला वाटायचं.. अगदी लहानपणापासून. त्यामुळे माझ्या मनात इतर काही करण्याचा प्रश्नच नव्हता. गाणं येत नसलं तरी असं वाटायचं मला ते येणार. त्यामुळे आईकडे शिकण्याआधीच गायला सुरुवात केली होती. खरं तर गाणं ऐकूनच आपण शिकत असतो. संगीत खूप ऐकायला पाहिजे. ऐकलं तरच आपल्यात ते गुण असतील तर आपसुकच, सहज, स्वाभाविक गायला सुरुवात होऊ शकते. मी लहानपणीच गायला लागले तेव्हा कौतुक व्हायला लागलं. आईलाही लोक सांगायचे की, हिला गाणं शिकव. मग माझाही आत्मविश्वास वाढला, की मी गाऊ शकते. गाण्याविषयी मनात संभ्रम नव्हताच. तो सूर सहज गवसलेला होता.

आई पहिली गुरू
माझी गाण्याची आवड लक्षात घेऊन आईने शिकवायला सुरुवात केली. तुला संगीताच्या क्षेत्रात जायचंय, असं म्हणून नाही तर तुला आवडतंय ना गायला मग हे शीक असं सहज सोप्या पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे रियाजाचे, गाण्याचे कधी कष्ट वाटले नाहीत. आपल्याला हे गायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल हे लहानपणापासूनच आईने सांगितलेलं होतं. आईमुळे माझ्यात गाणं सहज आलं. पण तिने कधीही मला असं भासवलं नाही, की गाणं सोप्पं आहे. तुला जर गायचं असेल तर रियाज हा करायलाच हवा. मी गातेय तर तूपण गा, असा अट्टहासही तिने केला नाही. माझी गाण्याची आवड आणि शिकण्याची आस लक्षात घेऊन आता हिला गाणं शिकायला पाठवायलाच हवं असा निर्णय तिने घेतला आणि मी वयाच्या नवव्या वर्षांपासून पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे गाणं शिकायला जायला लागले.

घराण्यांचं संगीत
पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे मी आग्रा घराण्याची गायकी शिकत होते. त्या वेळी सरांनी खरं तर आम्हाला चांगलं गाणं ऐकायला शिकवलं. ते आम्हाला अनेकांच्या कार्यक्रमांना आवर्जून नेत असत. त्याच वेळी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या अनेक मैफली मी ऐकल्या. त्यांची गायकी मला भावली. ही कोणत्या घराण्याची गायकी आहे, याचा माझ्या आवाजावर काय परिणाम होईल, असे प्रश्न त्या वेळी मनात नव्हतेच. त्यांच्या गाण्याच्या सौंदर्याने मी भारावून गेले होते. हे मला येईल का, त्या मला शिकवतील का, एवढंच मनात होतं. किशोरीताईंकडे शिकताना अगदी गाण्यातील ‘अ’पासून शिकण्याच्या इच्छेने गेले.. अगदी कोऱ्या पाटीप्रमाणे!

गुरूसमोर शरणागती पत्करा
गुरूकडे जाताना केवळ शिकण्याची भावनाच मनात पाहिजे. संगीत आणखी येण्यासाठी आपल्याला काहीच येत नाही, या भावनेनंच शिकलं पाहिजे, तर प्रगल्भ होता येईल. गुरूसमोर शरणागती पत्करलीत की नक्कीच त्या कलेच्या आतपर्यंत तुम्ही पोचू शकाल. लाइट म्युझिक करताना, एखाद्या गाण्याची चाल आत्मसात करतानासुद्धा अगदी हीच भावना बाळगून मी गेले.. अगदी कोरी पाटी घेऊन. त्यामुळे ते जमलं. मला हे येतंय, असा अर्थ घेऊन गेले असते तर कदाचित जमलं नसतं. संगीतकाराने जे ऐकवलंय त्याच पद्धतीने ते माझ्या गळ्यातून उतरलं पाहिजे, अशी माझी जिद्द असते.

शास्त्रीय संगीत अजरामर
रिमिक्स, फ्युजन किंवा इतर कुठल्याही प्रकारचं संगीत शास्त्रीय संगीताला मारक ठरणार नाही. शास्त्रीय संगीत हे अभिजात आहे. अजरामर आहे. अनेक मोठमोठय़ा लोकांनी त्याची श्रीमंती वाढवली आहे. अनेक तरुण मंडळी शास्त्रीय संगीताची जोपासना करत आहेत. त्यामुळे शास्त्रीय संगीताला धक्का लागणे केवळ अशक्य.

३० सेकंदांची जादू
बऱ्याच मालिकांची शीर्षकगीतं मी गायली. पहिल्यांदा ‘हसरतें’ गायले. संगीतकार जयदेवजी, आर. डी. बर्मन यांच्याकडेदेखील मी सीरिअल्ससाठीच गायले. मराठीत लोकप्रिय झालेली बहुतेक शीर्षकगीतं मी अशोक पत्कींसाठी गायले. केवळ ३० सेकंदांत संपूर्ण गाण्यातला आनंद द्यायचं आव्हान यात असतं. अगदी एवढय़ाशा वेळातसुद्धा काही तरी छान करू या या भावनेने मी ते गात गेले. असं केलं तर छान होईल, इथे पॉज घेतला तर जास्त उठाव येईल, असा सगळा विचार त्यामागे मी करायचे. माझे गाण्यातील विचार आणि संगीत दिग्दर्शकाचे मूळ विचार अशी सांगड असल्यानं त्या शीर्षकगीतांना उठावदारपणा आला आणि ती लोकप्रिय झाली, असं मला वाटतं.

फ्युजन म्हणजे काय?
दोन वेगवेगळ्या विचारांचं मीलन म्हणजे फ्युजन होय. फ्युजन कसं असावं तर, दोन वेगळ्या विचारधारांना एकत्र बांधणारं संगीत.. हे माझं वैयक्तिक मत आहे. फ्युजन चांगलं-वाईट हा मुद्दा नाही, हा सध्याच्या काळाचा प्रयोग आहे. पण माझ्या मते, त्या दोन विचारधारांच्या एकत्र येण्यातून काही तरी नवीन निष्पन्न व्हावं. फ्युजन आर्टस्टिना आपण काय करतोय आणि प्रेक्षकांना आपल्याला कुठे न्यायचंय याचं भान असावं. मीदेखील फ्युजन केलंय. एक प्रयोग म्हणून ते गायलंय. पण दोन तंबोऱ्यांमधून मिळतो, तो आनंद मला या प्रयोगात नाही मिळाला. जे इतर फ्युजन आर्टिस्ट्सना सापडलं ते मला सापडलं नसेल कदाचित. पण या प्रयोगातून गेल्यावर एक नक्की सांगू शकेन की, हे केल्यानंतर परत अभिजात संगीताकडे तुम्ही येणारच.

बंदिशींची भाषा
आजच्या काळातील शब्द आणि संदर्भ वापरून बंदिशी का केल्या जात नाहीत, हा प्रश्न चांगला आहे. पण आजच्या काळाची भाषा म्हणजे नेमकं काय? पंडित कुमार गंधर्वाच्या बंदिशी आपल्याला नक्कीच समजतात. बंदिशीचं टेक्श्चर वेगळं असतं. त्यात एक निराळा काव्यात्म भाव आहे. एकच भाषा असेल तर बंदिशी- गजल- भावगीत यामध्ये काय फरक राहील? बंदिशीच्या फॉर्मचा आनंद वेगळा असतो. त्यातल्या भाषेचा एक निराळा आनंद असतो. क्सासिकल म्युझिक सर्वसाधारण होऊ नये असा एक प्रयत्न असतो. त्यातून ट्रॅडिशनली काही गोष्टी चालत आल्या आहेत. त्यातलीच ही बंदिशींची भाषा. पण सुंदर अर्थ असतो बंदिशींना आणि तो समजतोही. रामाश्रय झा यांच्या काही सुरेख बंदिशी आहेत, कुमार गंधर्वाच्या आहेत. त्याचा अर्थ सुलभ आहे, तो वेगळा आनंद देऊन जातो.

गुरूंच्या मागची स्वरसाथ
मैफलीत गुरूंच्या मागे बसून त्यांना स्वरसाथ द्यायची हा अनुभव खूपच मोठा असतो. ते मोठं कठीण असतं. अभिषेकीबुवांच्या पाठी मी कधी बसले नाही. बुवा सहसा ‘काळी २’ मध्ये गात असत. त्यामुळे त्यांचा एखादा पुरुष शिष्यच बऱ्याचदा त्यांना स्वरसाथ करायला बसत असे. किशोरीताईंच्या पाठी मात्र मी बसलेय. गुरूंच्या पाठी बसून त्यांना साथ करणं मुळातच सोपं नाहीय. त्यांचे जे विचार चालले असतात, त्याच्या पाठी आपण पळू नाही शकत. आपल्यामध्ये ती क्षमताच नसते. आपण केवळ अवाक् होऊन स्वरसौंदर्य बघत असतो. त्या कुठून कुठे पोचतात हे कळेपर्यंत काही तरी वेगळं घडलेलं असतं. काय काय धरायचं त्यातलं? स्पाँटॅनियस, उत्स्फूर्त, असिम सौंदर्य असलेलं ते संगीत तिथे गुरूंच्या मागे बसून अनुभवताना अचंबित करत असतं. मनाला, आत्म्याला.. त्याच्याही पलीकडे काही असेल तर त्याला व्यापून टाकणारं ते संगीत असतं. अशी स्वरसाथ करताना उत्स्फूर्तपणा म्हणजे नेमकं काय हे यातून शिकायला मिळतं. भारतीय संगीताचं वैशिष्टय़ या उस्फूर्तमध्येच आहे. त्यातच या संगीतचं सौंदर्य आहे. गुरूच्या पाठी बसून स्वर लावण्याचा अनुभव प्रत्येक गायकानं नक्की घ्यावा. कारण जेव्हा ते उत्कृष्टतेच्या परमोच्च बिंदूवर असतात तेव्हा आपण त्यांच्या सारखं करण्याचा प्रयत्न करत असतो. गुरूंचं बोट धरून पुढे जायचा तो प्रयत्न असतो. त्यातूनच प्रगती होते. धडपडणं गरजेचं आहे. सहज कोडकौतुक करणारे गुरु मला लाभले नाहीत. त्यातून शिकता येत.

अभिषेकीबुवांसोबतची एक आठवण
जितेंद्र अभिषेकीबुवांच्या आतच गाणं होतं. अगदी उत्स्फूर्तपणे ते गात असत. त्यांची कम्पोझिशन्स अशीच उत्स्फूर्त असत. ठरवून केलेली नसत. त्यात सहजता होती. एकदा त्यांनी काही नवं कम्पोज केलं आणि मला गायला बोलावलं. त्यांनी कम्पोझिशन ऐकवलं आणि काही काळ मी स्तब्धच झाले. अगदी मोजक्या सुरांत त्यांनी केवढं सांगून ठेवलं होतं! ‘अनेक सुरांचा गोंधळ घालू नका. एका सुरातही सांगायचं ते सांगू शकता,’ असं ते म्हणत असत. त्याचा नेमका प्रत्यय त्यांची ती रचना गाताना मला आला.

वैविध्यपूर्ण गायकी
वैविध्यपूर्ण गायकी हे समृद्ध गायकाचं लक्षण आहे. काही तरी एकच डोक्यात ठेवून काम करू नये. प्रत्येक प्रकारच्या गाण्याचं आव्हान स्वीकारायची तयारी असली पाहिजे. गझल, ठुमरी, भावगीत यांसारखे सगळे प्रकार गाता आले पाहिजेत. माझे गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणत, ‘प्रत्येक संगीत प्रकाराला त्याचा एक फ्लेवर आहे.’ प्रत्येक प्रकारातील संगीताचं वेगळेपण, वैशिष्टय़ तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. भजन गातानाची आणि गझल गातानाची वेगवेगळी वातावरणनिर्मिती तुम्हाला कळली पाहिजे आणि तशी सादर करता आली पाहिजे.
मुंबई- viva.loksatta@gmail.com