13 July 2020

News Flash

बुकटेल : पुराणातली वांगी

इंडियन मायथॉलॉजी हा जगभरात चर्चेचा विषय आहे. यावर जगभरातील अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला, रिसर्च पेपर तयार केले  आणि काहींनी तर डॉक्टरेट मिळवली.

देवदत्त पट्टनाईक मुळात पौरणिकशास्त्राचे अभ्यासक असले तरी त्यांनी त्याबरोबर लोककथा, दंतकथा यांच्यावरदेखील अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत.

विपाली पदे – viva@expressindia.com

भारताला पौराणिक कथांचा मोठा इतिहास आहे. एखादी साधी गोष्ट पटवून देण्यासाठीसुद्धा आपण पौराणिक कथांचे संदर्भ सहजपणे देतो.  इंडियन मायथॉलॉजी हा जगभरात चर्चेचा विषय आहे. यावर जगभरातील अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केला, रिसर्च पेपर तयार केले  आणि काहींनी तर डॉक्टरेट मिळवली. पण तरी अजूनही इंडियन  मायथॉलॉजीबद्दल असलेली अभ्यासकांची आणि त्याचबरोबर तरुणांची उत्सुकता कमी होत नाही.

देवदत्त पट्टनाईक या एका भारतीय अभ्यासकाने इंडियन मायथॉलॉजीला नवीन स्वरूप द्यायचा विचार केला. ते मुळात पौरणिकशास्त्राचे अभ्यासक असले तरी त्यांनी त्याबरोबर लोककथा, दंतकथा यांच्यावरदेखील अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. या त्यांच्या लिखाणामुळे कधीही पौराणिक कथांकडे उत्साहाने न पाहणाऱ्या या तरुण पिढीनेदेखील त्यांची पुस्तके मनापासून वाचली. पेशाने डॉक्टर असणाऱ्या पट्टनाईक यांनी मायथॉलॉजीवर जवळपास ३१ पुस्तके लिहिली आहेत. या प्रत्येक पुस्तकाचा विषय वेगळा असून पौराणिक कथांमधली अनेक  महत्त्व न दिलेली पात्रेही त्यांनी वेगळ्या ढंगाने मांडली आहेत. त्यांनी शिव, रामायण, देवी, हनुमान, शिखंडी तसेच देवलोक अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली जी लोकांनी मोठय़ा प्रमाणात उचलून धरली. त्यांना स्वत:ला मायथॉलॉजी या विषयाची आवड असल्यामुळे त्यांनी याची अभ्यासपूर्ण मांडणी करायचे ठरवले. देवदत्त म्हणतात, ‘कोणताही समाज मिथक असल्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही’. आणि हे त्यांच्या पुस्तकात पटवून देण्यात ते  कधीच कमी पडत नाहीत.

इंडियन मायथॉलॉजीचा विचार करताना दोन मुख्य कथांचा समावेश आपण त्यात कायम करतो. ते म्हणजे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’. त्यातील ‘महाभारत’ हे एक सगळय़ात मोठे आणि प्रभावी पौराणिक कथानक आहे.  राज्यप्राप्ती या एका कारणासाठी कौरव आणि पांडव यांच्यात झालेले युद्ध हे एक ‘महापर्व’च होते. यावर अनेक प्रकारच्या आवृत्त्या लेखकांकडून लिहिल्या गेल्या. पण ‘जया अ‍ॅन इलस्ट्रेटेड रिटेलिंग ऑफ द महाभारत’ ही देवदत्त पट्टनाईक यांनी केलेली महाभारताची पुनर्बाधणी आहे. परंतु त्यात काही नवीन घटनांचा समावेश केल्यामुळे त्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. साधारण हे पुस्तक दहा विविध भागांत लिहिलेले आहे आणि त्यामुळे वाचकांना गोष्ट समजून घेण्यास मदत होते. लेखकाची शैली ही अत्यंत साधी, सोपी, सुबक आणि तेवढीच तीक्ष्ण असून त्याचे लिखाणाचे स्वरूप हे कथाक थनाच्या शैलीप्रमाणे ओघवते आहे.

यातले अजून एक वाटणारे आकर्षण म्हणजे यात विविध प्रसंगांनुसार मधुबनी चित्रांचा वापर केला आहे. जी प्रभावशाली असून त्यामुळे पुस्तक वाचतानादेखील एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. ज्या व्यक्तींना अगदी मनापासून मायथॉलॉजी जाणून घेण्यात उत्सुकता असते किंवा ज्यांना एकाच गोष्टीचे दहा वेगळे कंगोरे काय आहेत हे जाणून घ्यायचे आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. यात मुख्यत्वे ऐतिहासिक तथ्ये, त्या काळातील सर्व पाप-पुण्यांचे संदर्भ दिलेले आहेत. जिथे कृष्ण आणि त्याच्या संबंधित घटना येतात तिथे भगवद्गीतेचा संक्षिप्त सारांश दिलेला आहे. त्याचबरोबर जगात असलेल्या इतर महाभारताच्या आवृत्यांशी त्यांनी तुलना केली आहे.

यावरील सगळ्या गोष्टींमुळे पुस्तक वाचणे हे वाचकांना खूप सोपे जाते. हे पुस्तक केवळ  महाभारताचे स्पष्टीकरण देणारे नाही. तर पट्टनाईक यांनी त्याचबरोबरीने देशभर विखुरलेल्या कथांचे एकत्रीकरण इथे केलेले आहे. आणि त्यातही मुख्य म्हणजे महाभारतात एकूणच पात्रे अनेक आहेत त्या प्रत्येकाचे स्वभाव, कर्तृत्व, एकमेकांशी असलेली नाती हे सगळे वेगळे आहे.  पण तरी देवदत्त यांनी कुठल्याच पात्राबद्दल नायक आणि खलनायक अशी वेगवेगळे भूमिका मांडलेली नाही.

हे पुस्तक वाचल्यामुळे तरुणांनादेखील कर्म आणि धर्म या संकल्पना विस्तृतपणे नक्कीच लक्षात येतील. तसेच तरुणवर्ग पट्टनाईक यांच्या पुस्तकांकडे वळला गेला, कारण आजकालच्या मुलामुलींना पौराणिक संदर्भ पटायचे असतील तर ते व्यवहाराच्या कसोटीवर उतरलेले असावे लागतात. ते लक्षात घेऊन पट्टनाईक यांनी लिखाण के ले आहे. एखादी घटना घडलेली असेल तर त्याला लागणारे पुरावे आणि अजून त्या संदर्भातील चार गोष्टी लगेच दिलेल्या आहेत. आणि इतकेच नाही तर त्यांना स्वत:ला एखादी गोष्ट पटली नसेल तर त्याला मुद्देसूदरीत्या मांडले आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर ज्यांनी कधीच आजपर्यंत मायथॉलॉजी हा विषय वाचला नसेल त्यांनी तो जरूर वाचवा. कारण देवदत्त पट्टनाईक यांची पुस्तके ही तरुण पिढीला पटतील आणि समजतील अशीच आहेत यात काहीच शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:03 am

Web Title: devdutt pattanaik book jaya an illustrated retelling of the mahabharata mythology booktale dd70
Next Stories
1 डाएट डायरी : रांधा, वाढा आणि रोगांशी लढा
2 वस्त्रांकित : पदर ‘माया’
3 या सुट्टीचं कराल काय?
Just Now!
X