19 February 2020

News Flash

संस्कृत करिअर वाटा..

भाषा आणि कला यांचे एक जवळचे नाते असले तरीही आपल्याकडे हे करिअरचे दोन वेगळे मार्ग समजले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

रिद्धी करकरे

कवी कुलगुरू कालिदासाने म्हटले आहे, ‘मनुष्य: उत्सवप्रिय:’, सध्याच्या तरुणांच्या बाबतीत हीच उक्ती बदलून म्हणावेसे वाटते की, ‘युवक: महोत्सवप्रिय:’. कारण महाविद्यालयीन जीवनात होणारे वेगवेगळे महोत्सव आणि फेस्टिवल्स हे अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. सामान्यत: वेगवेगळ्या महाविद्यालयांचे महोत्सव वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असतात. परंतु संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी आणि ही भाषा तरुणांमध्ये रुजावी या उद्देशाने दरवर्षी होणारा एक आगळावेगळा महोत्सव म्हणजे ‘ध्रुवा संस्कृत महोत्सव’!  या महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत भाषेतील करिअर संधींबाबत घेतलेला वेध..

‘ध्रुवा संस्कृत महोत्सव’ नुकताच मुलुंड येथील व्ही. जी. वझे महाविद्यालयात संपन्न झाला. हे या महोत्सवाचे चौथे वर्ष होते. चार वर्षांपूर्वी या महाविद्यालयात शिकणाऱ्या संपदा जोशी, अनुजा साठे, अनुष्का भट, जुई जुवेकर आणि अनमोल हरिहरन या विद्यार्थिनींच्या कल्पनेला आदिती माधवन या उत्साही प्राध्यापिकेचे पाठबळ मिळाले आणि हा महोत्सव सुरू झाला. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना मग कधी ती सिनेसंस्कृत किंवा पूर्णब्रह्म असेल किंवा या वर्षीची क्रीडा ही कल्पना असेल. या कल्पनांवर आधारित वेगवेगळ्या रूपातील कार्यक्रम गायन, नृत्य, प्रश्नमंजूषा, नाटय़, अशा वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून संस्कृतप्रेमींच्या भेटीला घेऊन येत राहिला.

एकीकडे केवळ गुण मिळवण्यासाठी उरलेली स्कोअरिंग अशी संस्कृत भाषा पुन्हा एकदा बोलीभाषा, ज्ञानभाषा म्हणून रुळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन अतिशय तळमळीने केले जाते. त्याला संस्कृतच्या विद्यार्थ्यांचा व संस्कृतप्रेमी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. पण याबरोबरीने संस्कृत भाषेमध्ये करिअरचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत याचा धांडोळा घेणेही आवश्यक आहे. केवळ संस्कृत भाषेवरील प्रेमापोटी मळलेल्या वाटा सोडून देऊ न स्वत:ची अशी वेगळी वाट निर्माण करून त्यावर यशस्वीपणे मार्गक्रमण करणाऱ्या काही व्यक्तींशी बोलून यामागची प्रेरणा, संधी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

‘कोणत्या क्षेत्रात अधिक पगाराची नोकरी उपलब्ध आहे याचा फारसा विचार न करता मला नेमके काय करायला आवडते ते ओळखून मी संस्कृतचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि यातूनच मला माझी वेगळी अशी वाट सापडली,’ असे के.जे. सोमय्या महाविद्यालयातील संस्कृतचे प्राध्यापक प्रसाद भिडे सांगतात. त्यांच्या मते संस्कृत भाषेचा ज्यांना मनापासून अभ्यास करायचा आहे त्यांनी संस्कृतबरोबर सांप्रत काळच्या एखाद्या ज्ञानशाखेचा अभ्यास केल्यास संस्कृतचा विविध ज्ञानशाखांबरोबर मेळ घालणे शक्य होईल आणि यातूनच संस्कृत भाषाही अधिक वृद्धिंगत होईल. संस्कृतमध्ये पदवी घेण्याबरोबरच मी भाषाशास्त्रामध्येही एम.ए.ची पदवी घेतली ज्याचा मला निश्चितच उपयोग झाला, असे ते स्वानुभवावरून सांगतात. त्यामुळे आत्ताच्या काळात संस्कृत भाषा कशी व कु ठे उपयोगी पडू शकते हे ओळखून तसेच करिअरच्या संधींपेक्षा आपली आवड ओळखून क्षेत्र निवडल्यास आपोआप संधी मिळत जातात, असे त्यांनी सांगितले.

अशाचप्रकारे आपली आवड ओळखून संस्कृत भाषेमध्ये लिहिलेल्या बौद्धकालीन हस्तलिखितांचा थेट म्यानमारमध्ये अभ्यास करणाऱ्या जाई परांजपे यांनीही असाच काहीसा अनुभव सांगितला. संस्कृतमध्ये एम.ए. केल्यानंतर मी आयआयटी मुंबईमध्ये ‘संगणक आणि भारतीय भाषा’ या विषयावर अभ्यास करत होते. पण याच दरम्यान मला हस्तलिखितांचा अभ्यास करणाऱ्या ‘मनुस्क्रिप्टॉलॉजी’ या क्षेत्राबद्दल कळले आणि हे क्षेत्र माझ्या आवडींशी मिळतेजुळते असल्याने मी बर्मामधील बौद्धकालीन हस्तलिखितांचा सध्या अभ्यास करते आहे. यासाठी संस्कृत भाषेबरोबरच प्यू, सिंहल, थायी अशा लिपींचा अभ्यास मी करते आहे. आपल्याकडे कॉलेज जीवनात विविध परदेशी भाषा शिकल्या जातात, पण संस्कृतमध्ये अशा प्रकारचे करिअर करण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी ब्राह्मी, शारदा, ग्रंथा अशा वेगवेगळ्या लिपी शिकल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ  शकतो, असे त्या सांगतात. खरे तर या क्षेत्रामध्ये आग्नेय आशियायी देशांमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, परंतु त्याबद्दल नीट माहिती न कळल्यामुळे आणि बऱ्याच वेळा आपल्याकडील आर्थिक स्थैर्याच्या परंपरागत कल्पनांना चिकटून बसल्यामुळे अशा प्रकारच्या संधींकडे कोणी वळत नाही. म्हणूनच आपल्या समाजातील करिअरच्या, स्थैर्याच्या संकल्पना बदलायला हव्यात, अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली. याच जोडीने जर संस्कृतशी निगडित आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताना आर्थिक जम बसवणे अवघड होत असेल तर ‘चेग इंडिया’ किंवा अशा काही संकेतस्थळांवरून ऑनलाइन शिकवणे हाही उत्तम पर्याय असू शकतो, असे त्या म्हणाल्या.

भाषा आणि कला यांचे एक जवळचे नाते असले तरीही आपल्याकडे हे करिअरचे दोन वेगळे मार्ग समजले जातात. परंतु या दोन परस्परपूरक मार्गावरून चालत आपली हटके वाट निर्माण केली आहे त्या संस्कृत आणि कथ्थक नृत्याचा मेळ घालणाऱ्या अनन्या गोवित्रीकर यांनी! आमच्या घरी वडील भिक्षुकी करत असल्यामुळे मला लहानपणापासूनच संस्कृतची आवड होती आणि तितक्याच आवडीने माझे कथ्थकचे शिक्षणही सुरू होते. एकीकडे संस्कृतची पदवी घेत असताना कथ्थक नृत्यामधील भरतमुनींचे ‘नाटय़शास्त्र’ किंवा ‘अभिनयदर्पण’ यांसारख्या मूळ ग्रंथांचा अभ्यास करताना संस्कृतची गरज भासत होती. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा एकत्र अभ्यास करताना दोन्ही गोष्टींचा एकमेकांना खूप उपयोग झाला. मुळातच संस्कृत ही संस्कारित भाषा असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना ही भाषा विचारांना शिस्त लावण्याचे काम करते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज विविध कार्यक्रमांमधून ‘मृच्छकटिक’ किंवा ‘भासाच्या प्रतिमा’ नाटकातील वेगवेगळ्या पदांवर त्या नृत्य सादरीकरण करतात तसेच कथ्थक नृत्यांगना आणि संस्कृतची विद्यार्थिनी अशी दुहेरी ओळखही त्या जपतात.

थोडक्यात काय तर सरसा, सरला, रमणीया अशा अनेकानेक विशेषणांनी ओळखली जाणारी ही अमृतवाणी संस्कृत भाषा प्रसंगी आपल्या पुत्रांना उपजीविकेचे साधनही प्राप्त करून देऊ  शकते. पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे काही असेल तर धनश्री लेले यांनी ध्रुवा महोत्सवात त्याचे वर्णन केले. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर संस्कृत भाषा आपल्यावर नीतिमूल्यांचे संस्कार करते, लाघव शिकवते, शब्दसंपत्तीने समृद्ध करते आणि म्हणूनच ती उपजीविका तर देईलच, पण संस्कृत भाषा ही जीविका म्हणजे काय तेही शिकवेल.

viva@expressindia.com

First Published on September 6, 2019 12:07 am

Web Title: dhruva sanskrit festival sanskrit career abn 97
Next Stories
1 जगाच्या पाटीवर : केल्याने होत आहेरे..
2 अराऊंड द फॅशन : स्ट्रीट शॉपिंग
3 फूड.मौला : लडाखमधील खाद्यभ्रमंती
Just Now!
X